कोण आहेत हे-राम (!)आणि ‘ द हिंदू ‘

किशोर मांदळे

” चौकीदारही चोर है – नरेंद्र मोदी चोर है ” ही दोन वाक्ये विशेष आत्मविश्वासाने प्रेस कॉन्फरन्समध्ये उच्चारण्याची संधी राहुल गांधींना दिली ती ‘द हिंदू’ या मातब्बर इंग्रजी दैनिकातील एन. राम यांच्या राफेलविषयी गौप्यस्फोटाने. हे तेच नरसिंह राम तथा एन. राम आहेत ज्यांनी १९८८-८९ला बोफोर्स प्रकरण बाहेर काढले होते.

थेट पीएमचीच विकेट घेणारे एन. राम आपल्या उमेदीत तमिळनाडूच्या रणजी क्रिकेट संघाचे फलंदाज व यष्टी रक्षक राहिले आहेत.एस. कस्तुरी रंगा अयंगार यांचे पणतू आणि घरच्याच कस्तुरी एण्ड सन्सच्या द हिंदू ग्रुपचे एन. राम हे शोधपत्रकार. १४०वर्षांची परंपरा असलेल्या ‘द हिंदू’चा दबदबा मोठा आहे. ‘टाईम्स लिस्ट’मध्ये जगातील पहिल्या दहा न्यूज पेपरमध्ये स्थान मिळविलेल्या ‘द हिंदू’कडे भारतातील पहिलेच ऑनलाइन दैनिक सुरू करण्याचा मान (१९९५) जातो. आज ११राज्यातील २३प्रमुख शहरातून हा पेपर निघतो.

४मे १९४५ला जन्मलेले एन. राम चेन्नईच्या लॉयलॉ व प्रेसिडेन्सी कॉलेजचे पदवीधर आणि कोलंबिया विद्यापीठातून पत्रकारितेची पदवीप्राप्त करणारे कुशाग्र बुद्धीचे पत्रकार. १९७७ला ‘द हिंदू’ मधून सह संपादक म्हणून कारकीर्द सुरू होऊन फ्रंटलाईन, स्पोर्टस्टार या घरच्याच ग्रुपच्या नियतकलिकांसह त्यांनी पत्रकारितेत चढत्या क्रमाने अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या असल्या तरी तरुणपणी स्वतंत्रपणे आपल्या दोन मित्रांसह ‘Radical Review’ हे जर्नलही त्यांनी ‘चालवून’ पाहिले होते ! ते मित्र म्हणजे पी. चिदम्बरम व कॉ. प्रकाश करात, जे पुढे राजकारणात स्थीर झाले. १९७०ला स्थापनेवेळीच SFI या सीपीएमच्या विद्यार्थी संघटनेत एन. राम यांनी उपाध्यक्षपद सांभाळले तरीही नंतर मात्र ते आपल्या पत्रकारितेतच रमले.

एन. राम यांना पद्मभूषणसह अनेक पुरस्कार मिळाले. अगदी अलीकडे १६ नोव्हेंबरला ‘प्रेस-डे’ला त्यांना प्रेस कौन्सिलचा प्रतिष्ठेचा राजा राम मोहन रॉय पुरस्कार मिळाला आहे. परंतु लक्षवेधी असा ‘श्रीलंका रत्न’ सन्मान (२००५) आणि जे.आर. डी. टाटा बिझनेस इथिक्स (२००३) सह आशियायी शोधपत्रकारिता सन्मान (१९९०) त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात पुष्कळ चढउतार त्यांनी पाहिले आहेत. पहिल्या सुसान नामक ब्रिटिश पत्रकार, प्रकाशक पत्नीशी घटस्फोट आणि नंतर मरियम क्यांडींशी विवाह. त्या मल्याळम ख्रिस्ती आहेत. उद्योजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आहेत. बोफोर्स प्रकरणी त्यांच्या सहकारी असलेल्या पत्रकार चित्रा सुब्रमण्यम यांनी त्यांच्यावर काही गंभीर आरोप केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. अण्णा डीएमकेच्या एका खासदाराने मोठ्या जमीन अपहरणाचा आरोप त्यांच्यावर केल्याने बरीच कोर्टबाजी झाली.

शोध पत्रकारितेचे हे अटळ प्राक्तन समजून ते या सर्व गदारोळाचा शांतपणे सामना करतात. बोफोर्सने राजीव गांधींचे सरकार धोक्यात आणले होते. आता राफेल हे त्याहून भयंकर प्रकरण उघड करुन एन. राम नवा इतिहास घडवतील असे दिसते.

Leave a Reply