क्षारपड जमिनीचं आव्हान आणि उपाय

नवनाथ मोरे

शेती विकासाचे नवनवे टप्पे पार करत असताना फक्त नफ्यासाठी उत्पादन, हे तत्व अवलंबले गेल्यामुळे घटती उत्पादकता आणि क्षारपड जमिनी हे एक संकट समोर येत आहे.
माती तयार होण्यास हजारो वर्षे लागतात. त्यामुळे उत्पादन करत असताना त्याच्याकडे लक्ष देण्याची गरजेचे होते. परंतु ते दिले गेले नाही, हे वास्तव आहे. ज्या पश्चिम महाराष्ट्राकडे आपण सधन प्रदेश म्हणून पाहात आहोत. तेथील शेतकऱ्यापुढे क्षारपड जमिनी हे एक संकट उभे राहिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका या समस्येला सामोरे जात आहे. ऊसासारख्या पिकाला सातत्याने लागणारे पाणी. त्याच जमिनीत घेतले जाणारे एकच पीक. वारेमाप पाजले जाणारे पाणी, ज्यामुळे लाखो टन माती पाण्याबरोबर वाहून जाते. या भागातील असंख्य जमिनी पाहिल्यास त्याचे ना सपाटीकरण आहे, ना त्याला बांधबंदिस्ती आहे. त्यात शेतात वारेमाप रासायनिक खतांचा वापर. जमिनीतील सेंद्रिय घटक कमी झाले आणि रासायनिक खतांचा मारा वाढल्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होत आहे. असंख्य जमिनीवर पांढरा थर दिसत आहे. याचा परिणाम पिकांंच्या वाढीवर,गुणवत्तेवर आणि उत्पादनावर होत आहे. जास्त उत्पादनाच्या हव्यासापोटी उत्पादनात घट होत आहे, हे लक्षात येत नाही. कारण आपण त्यासाठी केलेला खर्च विचारत घेतला तर ते परवडते का? असंख्ये शेतकरी शेती परवडत नसल्याचे बोलत आहेत. दूधाच्या जोडधंद्यावर अनेकांची आर्थिक घडी टिकून आहे. निश्चितपणे मृदा प्रदूषण वाढल्याने त्याचा परिणाम उत्पादकतेवर झाला आहे.

*रासायनिक खते वापरताना*

रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण कमी झाले आहे. रासायनिक खतं वापरल्यामुळे अन्नधान्यात वाढ झाल्याचे दिसते. परंतु एकुणच शेतीच्या खर्चामध्ये ( input ) मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. याकडे आपण लक्ष देत नाही. त्या श्रमाचा विचार करत नाही. मुळात रासायनिक खतांचा अतिवापर केला की उत्पादन वाढते हा आपला घोर गैरसमज आहे. जमिनित मिसळलेली रासायनिक खते पिकांना मिळतात असे नाही. ती पाण्याबरोबर वाहून जातात, तर काही झाडांना उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे खते प्रमाणातच दिली पाहिजेत.

*खते कशी द्यावीत?*

माती परिक्षणावर आधारित खतांचा वापर करावा. योग्य ओलावा असताना खते द्यावीत. खते जमिनीवर फेकू नयेत, बिया पेरतांनी बियांखाली पेरून द्यावीत. ठिबक सिंचनाद्वारे द्रवरूप खतांचा वापर करावा. शेतात जास्त पाणी असल्याचा खतांचा वापर टाळावा. पेरणीच्या वेळी आवरणयुक्त ( उदा. SSP, DAP ) खतांचा वापर करावा.

सुपिकता का कमी होते?

जमिनीचा विचार करता जमीन ही असंख्य घटकांनी बनलेली असते. जसे माणसाचे आरोग्य शरीरातील काही प्रतिकार किंवा आवश्यक घटक कमी झाले की बिघडते. तसेच जमिनीचे पण आहे. ज्या जमिनीचा सामू ( PH ) सहापेक्षा कमी ते आम्ल ( acid ) आणि आठपेक्षा जास्त ते क्षारीय ( Alkaline ) असते. यामध्ये पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही. पिकाच्या उत्तम वाढीसाठी सामू हा सहा ते आठ च्या दरम्यान असावा लागतो. जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण १० टक्केपेक्षा जास्त असते, जलधारणा कमी असते, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असते. तसेच जमीन पाणथळ किंवा उथळ असणे, सतत होणारा अन्नद्रव्यांचा उपसा, सतत एकच पिक घेणे ( उदा. ऊस ), आंतरपीक नसणे, द्विदल पिकांचा समावेश नसणे, पाण्याचा अतिवापर किंवा खाऱ्या पाण्याचा वापर यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडते. आपण भांडवली व्यवस्थेच्या नफा या तत्वात गुंतून जातो आणि जमिनीच्या बिघडत्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. येणाऱ्या काळात याचा विचार करावा लागणार आहे.

काय केले पाहिजे ?

१ ) वाढती लोकसंख्या आणि त्यांच्या अन्नधान्याचा पुरवठा याचा विचार करता. घटती उत्पादकता हे आव्हान समोर येणार आहे. त्या दृष्टीने उत्पादकता वाढविण्यासाठी सेंद्रिय घटकांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. कारण जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

२) माणसाला थकल्यानंतर जशी विश्रांतीची गरज आहे, आपण वर्षानुवर्षे पिक घेत आहोत पण जमिनीला विश्रांतीच देत नाही. कारण जमिनीतील सूक्ष्मजीव, ऊन वारा पाऊस याचा स्पर्श होणे गरजेचे आहे. सततच्या पिकामुळे जमीन तापलीच जात नाही. त्यासाठी किमान दोन वर्षातून एक उन्हाळा जमिनीला विश्रांती द्यावी.

३) जसे नफ्याचे तत्व अंगीकारल्यापासून फक्त पैसा देणारी ( Cash crop ) पिके घेतली जातात. एकच पिक घेतल्यामुळे जमिनीचा पोत घसरतो. परंतु वेगवेगळी पिके घेतली तर जमिनीचा पोत नक्कीच सुधारेल. तसेच आपल्या कुटुंबाला लागणारे सर्वच आपल्याच शेतात पिकवले आणि त्यातून जास्त उत्पादन विकले. तर कुटुंब स्वयंपूर्ण होती.

४) असंख्य जमिनी या सपाट नसतात, त्यामुळे पाणी तसेच खते ही जास्त झाल्यामुळें वाहून जातात. तसेच जमिनीची मोठ्याप्रमाणात धूप होते. ते थांबविण्यासाठी मृदा आणि जलसंधारण गरजेचे आहे.

५)पिके घेत असताना एकच पिक न घेता आंतरपीक, बहुपीक आणि त्यामध्ये कडधान्य पिकांचा समावेश महत्वाचा आहे.

६) जमिनीवर आच्छादन ( malching) असणे गरजेचे आहे, सूक्ष्मजीवांची वाढ, पाण्याचा कमी प्रमाणात वापर याचा फायदा होतो.

७)शेतासाठी दरवर्षी ठराविक प्रमाणात शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खते तसेच इतर भर खतांचा वापर करणे गरजेचे आहे. मातीचे आरोग्याचा समतोल राखला जाईल

लेखक युवा कार्यकर्ते व लेखक आहेत. त्यांचे पर्यावरण आणि विकास हे पुस्तक मैत्री पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे.

हे सुद्धा वाचा..

भांडवलशाही : निसर्गाचे विनाशकारी शोषण करणारा एकमेव गुन्हेगार- अॅलन बाडिओ

गंगा वाचवणाऱ्या संतांना प्राण का गमवावे लागतात ?

नवनाथ मोरे लिखित “पर्यावरण आणि विकास” पुस्तकाचे नांदेड येथे प्रकाशन

Leave a Reply