सॉरी नीरजा, असला भोंगळ भगिनीभाव मला मान्य नाही…’- प्रज्ञा दया पवार

रवी कदाचित व्यक्त झाले नसते पण नीरजाने लिहिलं आहे म्हटल्यावर मी आजवर जसं तिला आणि तिच्या लेखनाला गांभीर्याने घेत आले आहे तसाच तिचा आजचा लोकसत्ता -चतुरंगमध्ये प्रसिद्ध झालेला लेखही त्याच गांभीर्याने घेतला. वाचल्यावर आधी हे नीरजानेच लिहिलंय यावर विश्वास ठेवणं अंमळ जड गेलं आणि दुःखही झालं.

तिची माझी मैत्री जवळपास तीसएक वर्षांची आहे आणि खरं तर ती मला काहीशी ज्येष्ठही आहे. आमच्या मैत्रीत आजच्या माझ्या पोस्टमुळे कुठलीही बाधा येणार नाही हा विश्वास आहेच. ती फेसबुकवर नसली तरी फेसबुकवरच्या घडामोडी जाणून असते हे तिच्या आजच्या लेखातून विदित झालेलं आहे. शिवाय मीही तिला माझ्या पोस्टची कल्पना दिली आहे.

तर मला तिच्या लेखातून व्यक्त झालेला भगिनीभाव भोंगळ का वाटतो, त्याची काही ठळक कारणं…

१. संपूर्ण लेखात डॉ. अरुणा ढेरे यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी बोलणारी नीरजा नयनतारा सहगल यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी मात्र चकार शब्दही उच्चारत नाही.
ज्या संमेलनात एका लेखिकेचा सन्मान होत असताना निमंत्रित केलेल्या दुसऱ्या ज्येष्ठ लेखिकेचा अवमान झाला त्यातील राजकारणाविषयी, साहित्य महामंडळाच्या कारभाराविषयी, सांस्कृतिक दहशतवादाविषयी नीरजाला काहीच म्हणायचं नाही का? किमान त्याचा निषेधही करावासा वाटत नाही का ? सिलेक्टिव्ह अभिव्यक्ती स्वातंत्र्य भगिनीभावाच्या संकल्पनेलाच सुरुंग लावणारं नाही का?

२. घरात गोमांस बाळगल्याच्या अफवेपायी अखलाकला जमावाने ठेचून ठेचून जिवानिशी ठार मारुन टाकणं आणि अरुणाताईंनी ‘निदान आता तरी भूमिका घ्यावी’ असं अनेकांनी आपलेपणाने म्हणणं, सुचवणं, तसा आग्रह धरणं हे दोन्ही एकाच पातळीवरचं आहे? म्हणजे या दोन्ही घटना सारख्याच आहेत ? अरुणाताईंना आणि अखलाकला एकाच लोकेशनवर ठेवून पाहणं यात मुळातूनच काही गफलत होत नाहीय का ? आपण इतकं सुलभीकरण करु शकतो का ?

३. जो भगिनीभाव विशिष्टांचचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य गौरवतो, त्याला सार्वत्रिक मान्यतेचं कवचकुंडल बहाल करतो, जो भगिनीभाव अभिव्यक्ती स्वातंत्र्याला लगटून- जोडून येणाऱ्या दलितांच्या, मुस्लिमांच्या, विद्यार्थ्यांच्या, तमाम वंचित स्त्री-पुरुषांच्या माणूस म्हणून जगण्याच्या हक्काचे तीनतेरा वाजत असताना, त्यातली हिंसा विक्राळ होत असतानाही त्याविषयी मौन बाळगतो त्या भगिनीभावाला भोंगळ म्हणू नये तर काय म्हणावं ?

४ संमेलनाचं उद्घाटन सत्र सुरू असताना नयनतारा सहगल यांचा मुखवटा घालून सभामंडपात अत्यंत शांतपणाने बसून निषेध करू पाहणाऱ्या तीन निमंत्रित कवयित्रींना पोलिसांनी अक्षरशः गचांडी पकडून बाहेर काढलं, त्या तीन भगिनींप्रती आपला काहीच भगिनीभाव नाहीय का ? भाषणातून झुंडशाहीचा विरोध करणाऱ्या अरुणाताईंना समोर घडत असलेल्या झुंडशाहीबद्दल काहीच करावसं वाटू नये? संमेलनातल्या या घटनेचा का नाही निषेध झाला आजच्या भगिनीभावाच्या लेखातून?

५. पुरस्कारपरती ही एक लहानशी कृती होती असहिष्णुतेच्या विरोधातली. ज्यांना ती मनोमन पटली त्यांनी ती लगोलग केली. त्या कृतीचे सर्वात वाईट परिणाम पुरस्कार परत करणारे भोगत आहेतच. वारंवार अत्यंत अश्लाघ्य अशा ट्रोलिंगला त्यांना सामोरं जावं लागलेलं आहे. पुरस्कार परत करणारे, दक्षिणायनमध्ये सक्रीय असणारे अनेक लेखक हिंदुत्ववाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत आणि पोलिसांच्या संरक्षणात फिरत आहेत. ज्यांनी पुरस्कार परत केला नाही त्यांना कणा नाही, भूमिका नाही असं कोणी, कधी म्हटलं होतं ? मानसिक खच्चीकरण पुरस्कार परत करणाऱ्यांचं झालं की न करणाऱ्यांचं झालं ? फुर्रोगामी, सिक्युलर, खान्ग्रेसी असं कोणाला उद्देशून म्हटलं गेलं? त्याबाबत नीरजाचं काय म्हणणं आहे ? पुरस्कार परत करुन तुमची जबाबदारी संपली का, असं पुरस्कार परत न करणारे वारंवार विचारत असताना जणू पुरस्कार परत न करुन आपण काहीतरी भयंकर थोर असं नैतिक कार्य केलं आहे अशा विभ्रमात कोण असत आलंय?

भगिनीभाव ही एक व्यापक अशी राजकीय संकल्पना आहे. त्या संकल्पनेमध्ये सर्व स्त्रियांच्या हिताला, आकांक्षांना, अभिव्यक्तीस्वातंत्र्याला जागा तर आहेच पण त्याचबरोबर त्यांच्यातील परस्परसंबंधांना, सहकार्याच्या भावनेला व कृतीला कळीचं स्थान आहे. नीरजाने महाराष्ट्रातील कवयित्रींची परंपरा सार्थ शब्दांत मांडली आहेच. पण नयनतारा असो की त्यांचा मुखवटा धारण करणाऱ्या त्या तीन कवयित्री असोत, त्यांची झालेली प्रच्छन्न दडपणूक लक्षात न घेता कवयित्रींची नावं घेणं हा केवळ उपचार ठरेल.

( प्रज्ञा दया पवार यांच्या फेसबुक भिंतीवरून साभार )

 

नीरजा यांचा लोकसत्ता चतुरंग मधील लेख :      भगिनीभाव     

हे सुद्धा वाचा

लेखक हस्तिदंती मनोऱ्यामध्ये राहात नसतात. त्यांच्या लिखाणातून सुष्ट आणि दुष्ट, उचित आणि अनुचित यांच्या द्वंद्वामध्ये ते ठामपणे एक बाजू घेत असतात.

 

Leave a Reply