आता तर प्रत्यक्ष क्रांती सोडाच क्रांतीचं तत्त्वज्ञान मांडणंही गुन्हा ठरू लागलंय. – मुक्त शब्द ,संपादकीय : १ फेब्रुवारी २०१९

‘India’s revolution is sharpened on the anvil of Teltumbde’s thoughts’—Vijay Prashad
सत्र न्यायालयासमोर साक्ष देताना भगतसिंग म्हणाला होता, ‘क्रांतिकारी म्हणजे पिस्तुल आणि बॉम्ब फेकणाऱ्यांचा पंथ नव्हे; उलट क्रांतीची तलवार विचारांच्या सहाणेवरच धारदार बनवली जाते’. बहिऱ्या ब्रिटिश सरकारला जागं करण्यासाठी भगतसिंगाने सभागृहात बॉम्ब टाकला आणि त्याची शिक्षा म्हणून त्याला फासावर चढवण्यात आलं. त्याच भगतसिंगाला आपल्या बालपणीचा नायक मानणाऱ्या एका विचारवंतावरही आता अशीच वेळ येऊन ठेपली आहे. भारतातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्राध्यापक, विचारवंत आनंद तेलतुंबडे यांच्यावर अटकेची तलवार लटकते आहे. किंबहुना अगदी जाणीवपूर्वक, आपण सर्वांनी पाहात राहावं म्हणून, मागच्या काही महिन्यांपासून, ती लटकवत ठेवली गेली आहे. क्रांतीबद्दलची इतकी स्पष्टता भगतसिंगाच्या काळातच आलेली असताना पुन्हा बॉम्ब आणि पिस्तुलावर कोण विश्वास ठेवेल, पण विचारांच्या सहाणेवर ज्यांनी नेहमीच परिवर्तनाच्या विचाराला धार चढवली, तोच स्वतंत्र भारतात सत्तर वर्षांनंतर मात्र त्यांचा गुन्हा ठरला. कोणालाही हानी होणार नाही याची खबरदारी घेत भगतसिंगाने बॉम्ब टाकला, त्याला फाशी झाली. सरकार इंग्रजांचं होतं. आता मात्र तुम्ही आदिवासी, अल्पसंख्याक, स्त्रिया आणि दलित यांच्यावतीने सरकारांची नुसती चिकित्सा जरी केलीत तरी तुम्हाला अनंत काळासाठी तुरुंगात डांबलं जाऊ शकतं. भगतसिंगांच्या क्रांतीच्या व्याख्येनंतर आता इतक्या वर्षांनी विजय प्रसाद या आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त विचारवंताने भारताच्या क्रांतीसंदर्भात विधान केलं होतं. निमित्त होतं आनंद तेलतुंबडे यांच्या लिखाणाचं. त्यांच्या लेखनाबद्दल बोलताना विजय प्रसाद यांनी असं म्हटलं होतं की, “भारतातल्या संभाव्य क्रांतीची तलवार आनंद तेलतुंबडे यांच्या विचारांच्या सानेवरच धारदार होईल!”

आमूलाग्र बदलाला हा देश नेहमीच घाबरत आलाय. किंबहुना युटोपिया घेऊन जगणं, उदात्त स्वप्न पाहाणं या देशानं कधी केलं नाही. आणि कदाचित म्हणूनच त्या वेळी न्यायालयीन प्रक्रियेत खुद्द न्यायाधीशांनीच भगतसिंगालाही क्रांती म्हणजे काय असा प्रश्न विचारला होता. मात्र आता तर प्रत्यक्ष क्रांती सोडाच क्रांतीचं तत्त्वज्ञान मांडणंही गुन्हा ठरू लागलंय.

आनंद तेलतुंबडे हे नाव मागच्या काही महिन्यांपासून वेगळ्याच अतर्क्य कारणासाठी चर्चेत आहे. ‘अर्बन नक्षल’ नावाचे एक चमकदार संज्ञा-संभाषित या विद्यमान सरकारने चर्चेत ठेवले आहे. जागतिकीकरणाच्या लाटेवर आंधळेपणाने स्वार झालेल्या आपल्या देशाला या नवउदारमतवादाने प्रचंड अशा आर्थिक अरिष्टात ढकलले आहे. आणि त्याची खरी झळ इथल्या दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि गरीब मध्यम जातीय आणि सवर्णांना बसत आहे. मागच्या पंचवीस वर्षांत भारतातील गरीब अधिकच कंगाल आणि श्रीमंत अधिकच अतिश्रीमंत होताहेत. शेतीचं संपूर्ण अर्थशास्त्रच कोलमडून पडलं आहे. आणि बरोबर त्याच वेळी या जागतिकीकरणाचा सांस्कृतिक तर्क एकदम उलट खेळ खेळत आहे. या आर्थिक प्रक्रियेला समांतरपणे परिवर्तनवादी चिकित्सा परंपराही या शतखंडित वास्तवात टिकाव धरत नाहीये. आनंदच्याच भाषेत सांगायचं झाल्यास एकीकडे दरदिवशी श्रमिकांच्या संख्येत, त्यांच्या असुरक्षिततेत आणि अस्थिरतेतही भर पडत असताना त्याच वेळी सामाजिक शास्त्रांतून तो श्रमिक मात्र त्याच्या वर्तमान आणि इतिहासदत्त कर्तव्यासह गायब होताना दिसत आहे. वर्ग आहेत, त्यांच्यातील संघर्षही अटळ आहे पण त्याबद्दलची अकादमिक शास्त्रीय आणि सैद्धांतिक चर्चा मात्र होत नाही. एकूणच सर्वसाधारण चर्चेतून हा वर्ग गायब होतो आहे. आणि यालाच आनंद दृश्य आणि अदृश्य वर्ग म्हणतो. पण शेवटी अपवाद असतातच. अलीकडे अर्बन नक्षलवादी म्हणून ज्या ज्या विचारवंत, कार्यकर्त्यांवर कारवाई केली गेली ते सर्वच जण या अदृश्य होणाऱ्या वर्गाला पुन्हा चर्चेत आणू पाहात आहेत आणि नेमकं हेच सरकारला नको आहे. जो जो कोणी या आत्ताच्या हुकूमशाही काळात दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि गरिबांबद्दल बोलेल त्यांच्यामध्ये या अन्यायी व्यवस्थेबद्दलचे प्रबोधन करेल अशा कोणाचीही टोकाची मुस्कटदाबी हे सरकार करणारच. आणि आनंद तर हे अविरतपणे गेल्या 30 वर्षांपासून करत आला आहे. दलितांच्याच बाबतीत बोलायचं म्हणून नव्हे पण आनंदच्या म्हणण्यानुसार दलितच इथले जैविक सर्वहारा असल्यामुळे आनंद आपसूकच मार्क्सवादी दृष्टिकोनातून या जैविक सर्वहारांबद्दल सैद्धांतिक मांडणी करत राहिला. आणि हे करताना त्याने कधीच कोणाचीही भीड बाळगलेली नाही. कोणत्या एखाद्या तत्त्वज्ञाशी किंवा प्रस्थापित दृष्टिकोनाशी स्वतःला आंधळेपणाने बांधून घेतले नाही. कोणतेही आढेवेढे न घेता केलेली सर्जनशील चिकित्सा हा त्याच्या लेखनाचा स्थायीभाव राहिला आहे. मागच्या तीस वर्षांत भारतासमोर जी म्हणून आव्हाने उभी राहिली आणि जी कोणती वळणं त्याने घेतली त्या त्या टप्प्यावर आनंदने या जैविक सर्वहाराच्या दृष्टिकोनातून या सगळ्याची चिकित्सा केली आहे. त्याच्या चिकित्सेची दिशा आत्मटीकेकडे गेली नसती तरच नवल. डाव्या आणि दलित या दोन्ही समान उद्दिष्टे असणाऱ्या चळवळींचा तो आताच्या काळातला नुसता सर्वांत मोठा भाष्यकारच नव्हे तर तितकाच मोठा चिकित्सकही आहे. आणि याची प्रचंड किंमत त्याने वेळोवेळी चुकवलेली आहे. जवळजवळ दररोज देशासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांना जनसामान्यांच्या दृष्टिकोनातून विश्लेषित करत वेगळे भान देणारे लेख तो कोणत्या ना कोणत्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रात किंवा नियतकालिकात प्रकाशित करतच असतो. त्याचे लेख अगदी त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्याच दिवशी भारतातील इतर प्रमुख भाषांत प्रकाशित होत असतात. पण महाराष्ट्रातील दलित चळवळीत एकूण डाव्या राजकारणाबद्दल जो अस्पृश्य भाव आहे त्यामुळे त्याचे लेख क्वचितच मराठीत प्रकाशित होतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून आनंदचे महत्त्वाचे लेख आणि ‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली’ (इपीडब्ल्यू) या जगन्मान्य सुप्रसिद्ध नियतकालिकात येणाऱ्या त्याच्या ‘मार्जिन स्पीक’ या स्तंभलेखाचे उत्तम मराठी अनुवाद ‘मुक्त शब्द’ने सातत्याने छापले. पुरोगामी महाराष्ट्राला, इथल्या क्रांतिकारी डाव्या राजकारणाला आणि खुद्द बाबासाहेबांची परंपरा असणाऱ्या दलित चळवळीला आनंदच्या निर्भीड आणि सडेतोड चिकित्सेला पचवता आले नाही. स्वप्रबोधनाची लवचीकता अंगी बाणवायला आपण कमी पडलो. अस्तित्वशील जातिव्यवस्था, संघाचा ब्राह्मणी फॅसिझम आणि आत्ताची वित्तीय भांडवलशाही यांच्याबाबतचे त्याचे विश्लेषण केवळ अनन्यच म्हणता येईल. नव्या काळात रूप बदलून विकृत झालेल्या सनातन प्रश्नांना त्याने ज्या क्रांतिकारी सर्जनशीलतेने समजावून घेतले आहे ते निव्वळ थक्क करणारे आहे. मार्क्सवाद आणि आंबेडकरवादात (त्याला हे पटणारे नाही) काळानुरूप जी वैचारिक कुंठितावस्था आली होती तिला त्याने नुसते प्रश्नांकितच केले नाही तर ही कोंडी फोडण्याचा त्याने सातत्याने प्रयत्नही केला. त्याने केवळ एकट्याने निर्माण केलेला बौद्धिक दबाव इतका प्रचंड होता की, डाव्यांना शेवटी जातींचा आणि दलित चळवळीला वर्गीय विश्लेषणाचा दृष्टिकोन स्वीकारावा लागला. एकटा माणूस केवळ तीस वर्षांत इतकं काही करू शकतो यावर विश्वासच बसत नाही. जागतिकीकरणाबद्दल समाजातील जवळजवळ सगळेच वर्ग उत्साही असताना अगदी सुरुवातीपासून त्याची घणाघाती बौद्धिक चिकित्सा आनंद करत आला आहे. आरक्षणाबाबतचं त्याचं विश्लेषण तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चिलं आणि मननीय मानलं गेलं आहे. मानवी हक्क, शिक्षण, दलित-वंचितांच्या प्रत्यक्ष चळवळी या क्षेत्रांतील त्याचा सहभाग आणि हस्तक्षेप त्यांना बळ देणारा होता आणि आहे. त्याच्या शैक्षणिक आणि त्याच्या कामाच्या क्षेत्रातील त्याची उपलब्धी यांच्याबद्दल अनेकवेळा बोललं गेलं आहेच पण व्यवस्थापनशास्त्रात उच्चशिक्षण आणि संशोधन करूनही ज्या सहजतेने त्याने समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विद्याशाखांतील समकालीन चर्चाविश्वात ज्या संख्येनं आणि गुणवत्तेनं भर घातली ती फक्त आश्चर्यचकित करणारी आहे. वेगवेगळ्या परिवर्तनवादी चळवळींना सैद्धांतिक विश्लेषण आणि कृतिकार्यक्रम तर तो सातत्याने पुरवत आला आहे. आपल्या वेगळ्या सैद्धांतिक विश्लेषणामुळे तरुणांच्या राजकीय जाणिवेची गुणवत्ता आणि पोतच त्याने बदलवून टाकला.
त्याच्या योगदानाबद्दल असं अविरत बोलता येईल आणि ते आपण बोलतच राहिलं पाहिजे. त्याने स्वतः जे आवाहन आपणा सगळ्या मित्रांना केलं आहे ते वाचल्यानंतर तर अगदी सगळ्याच गोष्टी स्पष्ट होतात. पण तरीही सत्तापुरस्कृत दमन चालूच आहे. पण आपण आत्ता जर घाबरून बसलो तर काळ आपणाला माफ करणार नाही. आपला मित्र दिनकर मनवर आणि आत्ता नयनतारा सहगल यांच्या बाजूने आपण जोमाने उभं राहिलो. या अतिशय हिंसक काळात आपण दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी-लंकेश यांना विसरलो नाही. म्हणूनच आताही आपणाला उभं राहावं लागेल. आम्हाला आशा आहे तुम्ही यात आमच्या सोबत असाल.

(मुक्त शब्द ,संपादकीय : १ फेब्रुवारी २०१९ )

हे सुद्धा वाचा….

ग.दि. माडगूळकर आणि आजचा काळ – डॉ.दिलीप चव्हाण

आंबेडकरी नॅरेशन म्हणजे नेमकं काय असतं ? (संदर्भ डॉ.आनंद तेलतुंबडे) – केशव वाघमारे

Leave a Reply