गोडसे @ गांधी.कॉम

डॉ. प्रेरणा उबाळे

महात्मा गांधी आपले व्यक्तिमत्व, विशिष्ट जीवन पद्धत, कार्य, आचरण आणि विचारांच्या असामान्यतेमुळे जगन्मान्य झाले. एक व्यक्तिविशेष असूनदेखील ते आज सत्य, अहिंसा, करुणा अशा मानवी जीवनाच्या शाश्वत आणि उदात्त मूल्यांचे प्रतीक बनले आहेत. एवढेच नाही तर भारतात न्याय, राजकारण, समाज, वैयक्तिक जीवनामध्ये नैतिक अधिष्ठानासारखे ते प्रतिस्थापित झाले आहेत. कोर्ट, सरकारी कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमांची स्थापना हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.केवळ सत्य आणि अहिंसाच नाही तर त्यांची सावली, आकार, काठी, चष्मा, बकरी, चरखा, गांधी टोपी, खादीचे वस्त्र अशा अनेक वस्तु त्यांची ओळख बनले आहेत.
वैश्विक इतिहासातून कधीही न पुसले जाणारे महात्मा गांधींचे असामान्य व्यक्तिमत्व महामानवाच्या रुपात प्रतिस्थापित आहे. त्यांचा केवळ जनमानसावरील प्रभाव नाही तर त्यांच्या नैतिकतेची, तत्वांची ताकदच इतकी आहे की त्यांच्या काळानंतरसुद्धा ते आज सर्वांना आकर्षित करत आहेत.त्यांचे व्यक्तिमत्व आणि विचारांमध्ये शाश्वत मूल्यांची देणगी आहे जे अखिल मानव- समाजासाठी आलोकस्तंभ आहेत. हिंसेचा प्रतिकार प्रेम आणि शांततेच्या मार्गाने करणे, विपरीत परिस्थितींच्या सामंजस्यासाठी परस्पर संवादाचे महत्व, माणसातील चांगुलपणावर प्रगाढ निष्ठा आणि हृदय- परिवर्तनावर विश्वास, समाजाच्या नैतिक विकासासाठी हिंस्त्रपणाचा त्याग करणे – ही त्यांची अशी काही जीवनमूल्ये आहेत की जी प्रत्येक देश, प्रत्येक समाज आणि प्रत्येक काळात निश्चित दिशा देऊ शकतात.

महात्मा गांधी आधुनिक काळातील असे लोकनायक आहेत जे अनेक पौराणिक, ऐतिहासिक व्यक्तिमत्व, महापुरुष, दंतकथांच्या नायकांना मागे टाकून पुन्हा समाज- जीवनात परतत आहेत. गांधींच्या प्रतिमा, मूर्ती, शिल्पे, छायाचित्रे, पुस्तकेन, संग्रहालये, प्रदर्शने, अनेक भाषांमधील नाटक हे सर्व एक मुखाने गांधींची कालातीतता प्रकट करते. महात्मा गांधींना नव्या रुपात प्रस्तुत करणारी विधू विनोद चोपडा यांचा “लगे रहो मुन्नाभाई” सिनेमाचा उल्लेख इथे केलं पाहिजे. ज्यानी गांधीवादापेक्षा गांधीगिरी हा हा नवा शब्द आपल्याला दिला आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे गांधीवादाला पाखंड बनवणार्या प्रवृत्तीवर कठोर व्यंग करतो. गांधीगिरी आणि या फिल्मच्या या प्रभावामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी विनम्रतेच्या मार्गातून आपल्या अधिकाऱ्यांना समस्यांवर उपाय शोधण्यासाठी भाग पाडले. महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव असलेली अशी अनेक उदाहरणे समाजात पहावयास मिळतात. जसे की- उत्तर प्रदेशातील साठ वर्षीय दयाराम सिंह यांनी गांधी तत्वांचे अनुसरण करत गावातील पाणी, रस्ते, आरोग्य इ. विषयक गरजांची पूर्तता केली. भारतातील भ्रष्टाचाराच्या विरोधात अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी महात्मा गांधींच्या दांडी यात्रेपासून प्रेरणा घेऊन २४ मैल यात्रेचे आयोजन केले होते. इजिप्तमध्ये २०११ मध्ये लोकांनी म. गण व मार्टिन ल्युथर किंग यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अन्यायी सरकारविरोधात अहिंसेच्या मार्गाने आवाज उठवला.

येरवडा कारागृहातील एक हत्या करणाऱ्या, कैदी नंबर तेरा- संतोष भिंताडे नावाच्या एका युवकाने नारायणभाई देसाई यांच्याकडून गांधी-कथा ऐकल्यानंतर आपले संपूर्ण जीवन गांधी- विचाराच्या प्रसारासाठी समर्पित केले आहे आणि विपुल साहित्य- लेखन करत आहे.

तो आज गांधी रिसर्च फौंडेशनचा लीडर बनला आहे. येरवडा कारागृहातील हा कैदी तेथील इतर अनेक कैद्यांकडून रचनात्मक कार्य करवून घेत आहे. “गुन्हेगार व्यक्तीला रुग्णाप्रमाणे वागवले पाहिजे आणि त्याची मानसिकता बदलली पाहिजे”- गांधींचे हे शब्द आज सत्य होताना दिसतात. शत्रू आणि नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण हे अशाच प्रकारचे म्हणता येईल.

पाकिस्तानच्या स्वात प्रदेशात मलाला युसुफजाई नामक पंधरा वर्षांच्या मुलीने संयुक्त राष्ट्रसंघामध्ये म. गांधींना आपले आदर्श म्हणून सांगणे हे सुद्धा विशेष महत्वाचे आहे. याशिवाय अफगाणिस्तान, इराक, लिबिया, सीरियाच्या अनेक अनुभवांमधून आणि वर्तमान काळातील या अनेक घटनांमधून हे सिध्द होते की म. गांधींचे विचार मनुष्य जातीसाठी कल्याणकारी आहेत. या दृष्टीकोणातून महात्मा गांधी प्रत्येक काळात आणि समाजात कालातीत राहतील, यात दुमत नाही.

आज जिथे संपूर्ण जग हिंसा, भय, युद्धाने ग्रासले आहे शिवाय अतिभौतिकता, भ्रष्टाचार आणि नैतिक पतनाच्या भयावह वातावरणात जगणे अपरिहार्य झाले आहे त्यावेळी महात्मा गांधींचे स्मरण होणे सहज- स्वाभाविक आहे. हे महत्वाचे आहे की मार्टिन ल्युथर किंग,नेल्सन मंडेला, मदर तेरेसा, बाबा आमटे एवढेच नाही तर अण्णा हजारे यांच्या सारख्या व्यक्तिमत्वांची उदाहरणे देता येतील, ज्यांनी गांधी तत्वांवर आपले आयुष्य जगले आणि जगत आहेत, संघर्ष करत आहेत. त्यामुळे गांधी तत्वे काळोखातसुद्धा जिवंत आहेत आणि भविष्यातही जिवंत राहतील. भौतिक आणि आर्थिक विकासाच्या स्पर्धेमध्ये त्यांचे संपूर्ण जीवन, तत्वे, अठरा सूत्री कार्यक्रम हे शाश्वत सिद्धांतावर, नैतिकतेवर आधारित आहेत, जे समाजाच्या स्थायी परिवर्तनासाठी प्रेरित करतात.
असं विशाल औदात्य लाभलेल्या महात्मा गांधींचे मुळातच संपूर्ण जीवन संघर्षपूर्ण आणि नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले आहे. त्यांच्या आयुष्यातून नथुराम गोडसेला वजा करणे शक्यच नाही. महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे ही दोन नावे एकत्र येताच अनेक विवाद, प्रश्ने, मत-मतांतरे, गांधी- हत्या, त्याची अनेक कारणे, त्याकाळातील परिस्थितीचे एक स्पष्ट-अस्पष्ट, गूढ, अनाकलनीय चित्र उभे राहते. नथूरामची हिंदू, हिंदुत्व, धर्म, राष्ट्र, राष्ट्रीयता इत्यादींबद्दलची स्वतःची वेगळी भूमिका, वेगळे विचार होते. अखंड भारताची झालेली फाळणी, भारतीय नेत्यांनी व गांधींनी काही प्रसंगी घेतलेले निर्णय, त्यांची राजकीय भूमिका आणि दृष्टी, त्याकाळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती, झालेल्या दंगली, भारतीय जनमानसावर झालेला या सर्वांचा परिणाम आणि शेवटी झालेली गांधी हत्या …… या सर्वांमुळे भारत भरडून निघाला होता. एक नवा देश म्हणून जन्म झालेल्या भारताचा अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरुवातीलाच असा अडखळत झाला होता…….. भारताने आपली सर्व परिस्थिती सावरली तरीही गांधी आणि गांधी – हत्येचा विवाद आजतागायत आहे. हे मात्र नाकारता येत नाही की गांधी पहाडासारखे आजही उभे आहेत.
महात्मा गांधींनी शांतता आणि प्रेम या मार्गांमधूनयश मिळवले त्यामुळे जगभरात ते कौतुकाचा विषय बनले आहेत आणि त्यांच्या अनेक वस्तु सुद्धा आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. गांधींचे दक्षिण आफ्रिकेतील घर, त्यांनी लिहिलेली पत्रे, त्यांचे मृत्युपत्र, त्यांनी बनवलेले खाडीचे वस्त्र, त्यांच्या रक्ताचे केलेल्या परीक्षणाचे रिपोर्ट, अनेक नेता- कार्यकर्ता, इंग्रज अधिकाऱ्यांच्या बरोबरची छायाचित्रे, त्यांचा चष्मा, चरखा, त्यांच्या हत्येच्या ठिकाणची माती आणि गावात इ. अनेक वस्तूंवर अक्षरशः करोडो रुपये मिळणे…….. हे गांधींचे महत्वच दर्शवते.
साहित्य आणि कलेच्या प्रांतात देखील गांधी केंद्रीभूत आहेत आणि ते समाजाच्या धर्मबुद्धीला जागृत करत त्यांना नैतिकतेच्या मार्गाने कर्तव्यपूर्ती करण्यासाठी प्रेरणा देतात. गरज इतकीच आहे की गांधींची विभूतीपूजा, प्रतिमापूजा न करता त्यांच्या विचारांच्या योग्य मीमांसा करण्याची आणि अनुसरणाची, जी मनुष्याला अंतर्मुख करण्यात सक्षम आहे. खरंतर भारतातील अनेक भाषांमध्ये महात्मा गांधींवर मोठ्या प्रमाणात कविता, नाटके लिहिली गेली आहेत. असे असताना मराठीमध्ये प्रेमानंद गज्वी यांचे “गांधी आणि आंबेडकर”, प्रदीप दळवींचे चर्चित “मी नथुराम गोडसे बोलतोय”, अजित दळवींचे “गांधी विरुध्द गांधी”, आसक्तचे “महादेवभाई” अशा काही मोजक्या आणि महत्वाच्या नाटकांचा उल्लेख करता येईल. मी पीएचडी चे संशोधन करत असताना हिंदीमध्ये मात्र गांधींचे पात्र असलेली आणि त्यांच्या चरित्राचा उपयोग करून लिहिलेली अशी जवळपास तीस नाटके मिळाली यांशिवाय महात्मा गांधींच्या विचारांचा पूर्णपणे, प्रत्यक्ष प्रभाव असलेली १०० हून अधिक नाटके हिंदी भाषेमध्ये मिळाली. ही सर्व नाटके अत्यंत महत्वाची आहेत. एका नाटकाची चर्चा मात्र इथे वेगळी करावी लागेल. ते नाटक म्हणजे

“गोडसे @ गांधी.कॉम”.

हिंदीतील सुप्रसिध्द लेखक असगर वजाहत यांनी लिहिलेले “गोडसे @ गांधी.कॉम” हे नाटक २०१२ साली प्रकाशित झाले. यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या “जिन लाहौर नईं वेख्या वो जन्म्या ई नईं” या नाटकाने रंगभूमी गाजवली आहे. असगर वजाहत यांच्या प्रतिभेने नेहमीच आपल्या साहित्यातून शाश्वत मूल्यांचे समर्थन केले आहे. “गोडसे @ गांधी. कॉम” हे नाटक गांधी विचारांना केंद्रित ठेऊन लिहिले आहे. इतिहासाकडे ते अनेक दृष्टीनी पाहते. एक वेगळीच कल्पना आणि प्रसंग घेऊन महात्मा गांधी व गोडसेला नाटकामध्ये असगर वजाहत यांनी प्रस्तुत केले आहे. असे असले तरी ती काल्पनिक वाटत नाही, इतक्या सहजपणे- जिवंतपणे ती मांडली आहे.
या नाटकाच्या संदर्भात आणि एकूणच आज समाजात पसरत असलेल्या वैचारिक तेढेबद्दल मी असगर वजाहत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले की हे नाटक अत्यंत गंभीर आहे, ज्यामध्ये भावनांपेक्षा विचारांवर अधिक जोर दिला आहे. त्यांना गांधी आणि गोडसेमध्ये संवाद होण्याची आवश्यकता वाटते. त्यांच्या मते गांधीवाद ही एक प्रक्रिया होती ……आदर्श, यथार्थ, कल्पना, धर्म व राजकारणात ये- जा करणारी ती एक जिवंत प्रक्रिया होती. याशिवाय गांधी, आंबेडकर किंवा इतर महापुरुष खर्या अर्थाने समाजात कधी येतील या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले होते – “दोन प्रकारांनी ते समाजात परततील….. साहित्यामध्ये ते आले आहेत आणि त्यांची आवश्यकता स्थापित होत आहे तर समाजातदेखील ते नक्कीच परततील.” नाटककाराच्या या दृष्टीमुळे हे नाटक अत्यंत महत्वाचे आहे.
असगर वजाहत यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिल्ली, पटना, नोइडा, हैदराबाद, नैनिताल अशा ठिकाणी मंचन झाले आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र हे नाटक अद्याप पाठ्य किंवा रंगभूमीच्या माध्यमातूनदेखील पोहचू शकले नाही याची खंत आहे. म्हणूनच या नाटकाचे भाषांतर मी लवकरच मराठीमध्ये आपल्या भेटीला आणत आहे. या नाटकातील काही अंशाचे भाषांतर रसिक वाचकांसाठी येथे प्रस्तुत करत आहे –

(रंगमंचावर अंधार. हळू-हळू प्रकाश पसरतो.)

उद्घोषणा – देशाच्या संसदेत विरोधी पक्षाचे नेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी सरकारला
धारेवर धरत अशी शंका व्यक्त केली की राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांना एकाच वार्डमध्ये ठेवणे भयंकर होईल. नॅशनल हेराल्डचे संपादक चेलापती राव यांनी लिहिले की गांधी असं काहीतरी करणार आहेत जो त्यांच्या सत्याशी सर्वांत मोठा प्रयोग असू शकेल. संसद आणि वर्तमानपत्रांमधून होणारी चर्चा देशात अगदी गल्लो-गल्ली पोहोचली पण वार्ड नंबर पाचमध्ये सर्वांचे जीवन सामान्य गतीनेच चालत राहिले.
( रंगमंचावर प्यारेलाल, बावनदास, निर्मलादेवी आणि सुषमा येतात. सुषमा खूप अशक्त आणि आजारी दिसत होती. चेहऱ्यावर निराशा आणि उदासपणा आहे. निर्मलाबाई गोडसेकडे बारकाईने पाहते. ती दुधाचे भांडे गांधींच्या दिशेने पुढे सरकवत म्हणते… )
निर्मला– घे…… महात्मा दूध घे….. (गोडसेकडे पाहत प्यारेलालना म्हणते-) ह्यो त्योच हाय ना?……. ज्यान महात्म्यावर गोळी चालवली होती (कुणी काहीच बोलत नाही) दिसायला तर चांगला वाटतोय ……कशापायी मारायला चाल्ला होता महात्म्याला….. बघू की, किती जोर हाय त्याच्या अंगात !……(गांधींना उद्देशून) …… पन महात्मा तू बी लई येगळाच हायस………..स्वतःच्याच खुन्याबरोबर………
गांधी – (सुषमाला) ……बाई ….याला घेऊन जावा….. उद्यापासून तू दूध आण…..दोन ग्लास
आण…….
निर्मला – माजं तर नशीबच फुटलंय रं महात्मा…….सापालाच दूध पाजतेय.
(सुषमा निर्मलाबाईंचा हात धरून निघून जाते….)
गांधी – (प्यारेलालना) पत्र आणली ?
प्यारेलाल– आज पोतं मिळालंच नाही.
गांधी– पोतं?
प्यारेलाल– चार मण पत्रे आली आहेत तुमच्या नावाने.
बावनदास – ठीक आहे, तुम्ही जा सगळे.
(बावनदास आणि प्यारेलाल जातात.)
गांधी– (गोडसेला)……. क्षमा असावी…. अडाणी, न शिकलेली बाई आहे ती. पण मनाने चांगली आहे…… तुम्हाला उलट-सुलट बोलली म्हणून मी क्षमा मागतो.
गोडसे- नाही…. ती जे काही म्हणाली ते सत्यच आहे. देशातील अनेक सरळ- साध्या लोकांना
हे माहीत नाही की तू हिंदुविरोधी आहेस.
गांधी – काय म्हणतोस गोडसे ?
गोडसे– एक – दोन नाही तर शेकडो उदाहरणं दिली जाऊ शकतात….. सर्वांत महत्वाचं तर हे आहे की तू म्हणाला होतास की पाकिस्तान विभाजनाला तू सहमती दिली.
गांधी – गोडसे…… मी जे म्हटलं होतं ….ते सत्य आहे…. सावरकर म्हणाले होते की ते अखेरच्या श्वासापर्यंत पाकिस्तान विभाजनाचा विरोध करतील……. पण बघा …..मी जिवंत आहे. सावरकरही छान श्वास घेत आहेत. पण एक गोष्ट आहे गोडसे ……..
गोडसे – काय ?
गांधी – मी पाकिस्तान बनवण्याचा विरोध करत होतो आणि करतोच. मला हे उमजतं की ……पण मला हे सांग की सावरकर पाकिस्तानचा विरोध का करताहेत?
गोडसे – म्हणजे ?……मातृभूमीचे तुकडे……
गांधी – (बोलणं थांबवत….) ……सावरकर तर हे मानतात की ……त्यांनी लिहिलंय की मुसलमान आणि हिंदू दोन वेगवेगळ्या राष्ट्रीयता आहेत….असा विचार केला तर त्यांनी तर पाकिस्तानचे स्वागत करायला हवं होतं……
गोडसे – हे अशक्य आहे….. हा गुरुजींवर आरोप आहे…
गाँधी – सावरकरांचे पुस्तक “हिन्दू राष्ट्रदर्शन”…..मी पुण्यात जेलमध्ये असताना ऐकले
होते …..पहा…. जर तुम्ही कुणाला परकं मानलं आणि तो बाहेर निघून गेला तर काय
फरक पडणार आहे? आणि हो, फाळणीचे दु:ख तर मला आहेच. कारण मी हे तत्व
मानतच नाही की हिंदू आणि मुसलमान दोन वेगवेगळी राष्ट्रे आहेत.
गोडसे– जर तुम्ही पाकिस्तानच्या इतक्या विरोधात आहात तर तुम्ही पंचावन्न करोड रुपये
दिले जाण्याबद्दल आमरण उपोषण का केलं होतं ?
गांधी – “रघुकुल रीति सदा चली आई I प्राण जाए पर वचन न जाई ll” पाकिस्तान-
हिंदुस्तान असा काही प्रश्नच नव्हता. प्रश्न होता, तो वचन तोडण्याचा ……..
समजलं?……
गोडसे – तू तर स्वतःच्या आदर्शांच्या आड नेहमी मुसलमानांचे तुष्टीकरण केले आहे.
गांधी – दक्षिण आफ्रिकेमध्ये जे मी केले ते काही फक्त मुसलमानांसाठीच होते,अहमदाबादची आंदोलनं काय फक्त मुसलमानांसाठी होती का ? हरिजन उध्दार आणि स्वराज्याचे केंद्र फक्त मुसलमान होते का हो ?
हो, पण जेव्हा मुसलमान ब्रिटीश साम्राज्यवादाच्या विरुध्द खिलाफत चळवळीत उभा राहिलो तेव्हा मी त्यांना साथ दिली…….आणि मला याचा अभिमान आहे.
गोडसे – खिलाफत चळवळीत प्रेम आणि अखंड भारताची घृणा, हेच तुमचे तत्व-दर्शन होते…..
हिंदू राष्ट्रासाठी तुझ्या मनात कुठलीच सहानुभूती नाही.
गांधी – हिंदू राष्ट्र म्हणजे काय गोडसे ?
गोडसे – ते पहा समोर….. मानचित्र लावले आहे ….अखंड भारत….
(गांधी उठून नकाशा पाहतात.)
गांधी – गोडसे…. तुमचा अखंड भारत तो सम्राट अशोकाच्या साम्राज्याएवढेसुद्धा नाही….
तू अफगाणिस्तान तर सोडूनच दिला आहेस. …….ते क्षेत्र वगळलेलेच आहेत, जे आर्य
लोकांचे मूळ स्थान होते. तू तर ब्रिटीश इंडियाचा नकाशा टांगून ठेवला होता. यात
कैलास पर्वत नाही आणि मानसरोवरदेखील नाही.
गोडसे – बरोबर म्हणतोयस गांधी….. हे सर्व आमचं आहे.
गांधी – गोडसे…. तुझ्याही आधी आमच्या पूर्वजांनी म्हटलं होतं की “वसुधैव कुटुंबकम”…..
म्हणजे हे विश्वची माझे घर….कुटुंब….कुटुंबाच्या नियमांचे पालन करावे लागते.
—————————————————————–
(मंचावर अंधार)
(गायन)
उद्घोषणा – कागा सब तन खइयो, चुन चन खाइयो
दो नैना मत खइयो, पिया मिलन की आस ll
एकवीस वर्षांच्या हसणाऱ्या- खिदळणाऱ्या सुषमाच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे
झाली होती. तिचा ओजस्वी चेहरा काळवंडून गेला होता………..
तिच्या कपाळावर आठ्यांनीच घर बनवलय. तिचं खाणं- पिणं, झोपणं, उठणं….
सर्व कठीण झालंय. डोळ्यातलं पाणी तिची कहाणी सांगण्यासाठी पुरेशी आहे.
(मंचावर फक्त सुषमा बसली आहे. तिच्यावर प्रकाशझोत. अनेक प्रकारचे इफेक्ट्स
आपला प्रभाव दाखवतात.)
आपल्या मुलीची ही अवस्था निर्मलाबाईंना पाहवली गेली नाही. खरंतर ती
गांधींकडे रोज दोन ग्लास दूध घेऊन जायची आणि गांधी तिच्याकडे दुर्लक्ष करत.
एके दिवशी निर्मलाबाईंचा राग गांधींच्या हट्टाला येऊन धडकलाच. (हळू-हळू प्रकाश
येतो) गांधी प्रार्थना सभेत होते. भजन सुरु होतं. प्यारेलाल, बावनदास आणि
सुषमाशिवाय एक-दोन दुसरे कैदी ही भजन गात होते. निर्मलाबाई रागात उभी
उभी आहे. ती भजन गाऊ शकत नाहीये आणि भजनी मंडळातही बसली नाहीये.
भजन संपते.
निर्मलाबाई– महात्मा, आज मला तुझ्याशी एक बोलायचं आहे ……. झालंच तर सर्वांसमोर
बोलू की नंतर ?
गांधी – मी कुठली गोष्ट वैयक्तिक मानत नाही…… माझं संपूर्ण आयुष्य पुस्तकाप्रमाणे आहे
ज्यामध्ये फुलं आणि काटेसुद्धा आहेत……. पण तुला आज जे काही म्हणायचंय, मी
ते सांगू शकत नाही…… (सगळे रंगमंचावरून जातात.)……..की जेणेकरून मनापासून
मनापर्यंत पोहचेल.
निर्मला- हे बघ महात्त्मा, मी बुकं शिकली नाही….. तू तर सात समुद्राइतकं शिकलाय असं
म्हनत्यात.
गांधी – तू तुझं म्हणणं मांड.
निर्मला – तेच तर …..मला तुझ्यासारखं बोलायला नाई येत. पन ऐक, माज्या पोरीला जर काई झालं तर मी तुला सोडनार नाई.
गांधी – तू हे काय म्हणतेयस ?
निर्मला – आता माजं म्हननं तुला नाय तर कुनाला कळायचं?
गांधी – तुझी काय इच्छा आहे ?
निर्मला – बघ, माझ्या पोरीला काई झालं तर मी तुला सोडणार नाही.
गांधी – अरे झालंय काय ?
निर्मला – तुला सारं म्हाईत हाय …..तुझं तूच समजून घे …… म्या जाती आता.
( निर्मला निघून जाते. गांधी विचारात पडतात. प्यारेलाल येतात.)
गांधी – प्यारेलाल, नवीनला बोलवा.
प्यारेलाल – काय बापू ? नवीनला…..
गांधी – होय….. नवीनला …….
प्यारेलाल– पण का बापू ?
गांधी – तू….. सुषमाची स्थिती पाहतोयस…..
प्यारेलाल – पण तुमची तत्व……
गांधी – प्यारेलाल……सिद्धांत आयुष्याला सुंदर बनवण्यासाठी असतात …… कुरूप बनवायला नाही .
प्यारेलाल – ठीक आहे, तिला तार पाठवतो.
(प्यारेलाल उठून जातात. गांधी फेऱ्या मारू लागतात. त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आहे.
गोडसे आत येतो.)
गांधी – एक विचारू का गोडसे ……
गोडसे – हो विचार……
गांधी – प्रार्थना सभेमध्ये तू का बसत नाहीस ?
गोडसे – साधी-शी गोष्ट आहे …… तुझ्या प्रार्थनेवर माझी काही आस्था नाही.
गांधी– श्रद्धा सुद्धा नाही ?
गोडसे – नाही…… मी हिंदू आहे….आणि हिंदू धर्मामध्ये आस्था आहे.
गांधी– तू मला हिंदू मानतोस ?
गोडसे – ( अस्वस्थ होऊन )….. हो, मानतो.
गांधी – बावनदासला हिंदू मानतोस ?
गोडसे – हे सगळं तू का विचारतोयस ?
गांधी– कारण जर तू या सगळ्यांना बरोबरीचे हिंदू मानलं नसतं तर तू स्वतः सुद्धा हिंदू नाहीस ? तू पहिल्यांदा देशाला लहान केलंस…..आता हिंदुत्वाला लहान करू नकोस.
हिंदू धर्माला इतकं संकीर्ण बनवू नकोस. इतरांना उदारता सांगण्यासाठी पहिल्यांदा स्वतः उदार झालं पाहिजे.
( बावनदास पाठीवर मोठी पिशवी घेऊन येतो. ज्यात गांधीना लिहिलेली पत्रे आहेत.)
बावनदास – चार ठो बोरा और है….. बापू, आणखी आणतो.
गांधी – थांबा बावनदास ……. उद्या आणखी पत्रे घेऊन या….. …… पाच मणभर पत्रे तर मी काही एका दिवसात वाचू शकणार नाही………….
———————————————————–

लेखिका मॉडर्न महाविद्यालय पुणे येथील हिंदी विभागप्रमुख असून हिंदी-मराठी कवी आणि अनुवादक आहेत.

(पूर्वप्रसिद्धी :पृथा दिवाळी २०१८ संपा-मोहिनी कारंडे)

11 comments

 1. महात्मा गांधीजी च्या जीवनावर आजपर्यंत अनेक लेखकांनी आपले विचार प्रस्तुत केले आहेत.
  प्रेरणा आज तुझा लेख वाचूनही खुप आनंद झाला. कॉलेज मधे असताना हिंदी हा विशेष विषय निवडूनही मराठी भाषेवरचं तुझ प्रेम काही कमी झाल नाही. गोडसे @ गांधी.कॉम या नाटकाचा अनुवाद वाचून एक मैत्रीण म्हणून तुझा खूप अभिमान वाटला.

 2. आजतक गांधी जी पर लिखे अनेकों लेख पढें है फिर भी आपके लेख में बहुत खास बात है आपको ह्रदय से अभिनन्दन आप इसी तरह लिखती रहें आप जैसे लेखकों की बहुत जरूरत है देश को बहुत-बहुत बधाई के साथ

 3. महात्मा गाँधी एक युगपुरुष हैं । उनके जीवन-मूल्य सनातन धर्म के मूलभूत सिद्धांतों से ही उद्भूत हुए हैं । ” वसुदेव कुटुम्बकम ” ही उनकी एकमात्र विचारधारा थी । वे धर्म ( Righteousness ) की साक्षात मूर्ति थे ।
  डॉ. प्रेरणा जी ने उनके उदात्त चरित्र, व्यक्तित्व और मानवीय गुणों को अनुवाद के माध्यम से मराठी भाषी पाठकों तक पहुँचाने का जो प्रयास किया है, वह सचमुच सामयिक होने के साथ ही अत्यंत प्रशंसनीय भी है ।
  मैं इतने सुन्दर और जनोपयोगी कार्य के लिए उन्हें हार्दिक बधाई देता हूँ ।

  —-रमाशंकर व्यास

  • उपर्युक्त टिप्पणी में टायपिंग की गलती से ‘ वसुदेव ‘ शब्द लिख गया है । कृपया इसे ” वसुधैव ” पढ़ा जाए ।

 4. महात्मा गाँधी एक युगपुरुष हैं । उनके जीवन- मूल्य सनातन धर्म के मूल सिद्धांतों से ही उद्भूत हुए थे । ” वसुधैव कुटुम्बकम ” ही उनकी एकमात्र विचारधारा थी । वे धर्म (Righteousness) की साक्षात मूर्ति थे ।
  डॉ. प्रेरणा जी ने उनके उदात्त चरित्र और गुणों को मराठी भाषी पाठकों तक पहुचाने का जो प्रयास किया है, वह सचमुच सामयिक होने के साथ-साथ अति प्रशंसनीय भी है । इतने सुन्दर कार्य के लिए उन्हें बधाई देता हूँ ।
  – रमाशंकर व्यास

 5. प्रेरणा उबाळे –
  या नाटकाचा अनुवाद करून आपण फार महत्वाचं काम केलय . अभिनंदन !
  या आधी ‘ राहीले दूर घर माझे ‘ द्वारे वजाहत मराठी स्टेजवर आले आहेतच . त्यानंतर हे नाटक ! हे नाटक मराठीत येणं ही आपली सगळ्यांची गरज होती . ती तूम्हि पूर्ण केलीत . सध्याच्या भयावह वर्तमानात हे नाटक महत्वाचं ठरतं . . मराठी स्टेजवर जो डोळ्यावर कातडं ओढून ‘ सारं काही छानछान ‘ अश्या गूलूगूलू संस्कृतीचा वावर आहे त्यावर हे नाटक एखाद्या शहाण्या माणसानं चरचरीत कोरडे ओढावेत असं स्थान मीळवेल यात शंका नाही .
  याआधी असगर वजाहत त्यांच्या कथांद्वारे मराठीत आलेत त्यामूळे ‘ चांगलं ‘ मराठी वाचणाऱ्यांना हा अनुवाद वाचण्याची ओढ लागली होती . ती तूम्हि पूर्ण केलीत .

  असगर वजाहत यांच्या लघूकथांचा अनुवाद करत असताना हा हिंदी लेखक वैश्विक असूनही भारतीय मातीतला , भारतीय समाजाशी किती जोडलेला आहे याचा अंदाज आला होताच .
  तूमचं पून्हा अभिनंदन .

 6. आदरणीय प्रेरणाजी उबाळे
  आपण महात्मा गांधीजी यांच्या वरील हिंदी नाटक मराठी मधे अनुवादित करत आहात, हे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे मराठी भाषा सम्रुद्ध होत आहे. आपण आंतरभारतीचे काम करत आहात.

Leave a Reply