जेष्ठ भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांच्यासोबत मराठी कला-साहित्य विश्वातील लेखक-कवी,रसिक यांच्या संवादाचा कार्यक्रम ‘चला एकत्र येऊ या!’ चे आयोजन मराठी साहित्य आणि कलाविश्वातील लेखक-कलावंत आणि रसिक यांनी एकत्र येऊन २९ जानेवारीला सायंकाळी शिवाजी मंदिर, दादर इथे केले आहे. नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा करणारा हा संवाद मेळावा पार पडणार आहे.
९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण ज्येष्ठ भारतीय लेखिका श्रीमती नयनतारा सहगल यांना दिले गेले होते. मात्र संमेलनाच्या आयोजकांनी ते निमंत्रण ऐनवेळी रद्द केले. या घटनेचा निषेध अनेक पातळ्यांवर आणि खुद्द संमेलनातही विविध प्रकारे झाला. अनेकांनी संमेलनावर बहिष्कार टाकला तर अनेकांनी संमेलनस्थळी जाऊन या कृतीला आपला विरोध दर्शवला. परंतु या घटनेमुळे, मराठी माणसांनीच एका ज्येष्ठ साहित्यिकाला अवमानित केल्याचा संदेश सर्वत्र गेला, याचा सल सर्व मराठी भाषिकांच्या मनात कायम राहीला.या लज्जास्पद घटनेबद्दल नयनतारा सहगल यांची माफी मागून मराठी जगतात त्यांचे स्वागत करावे या उद्देशाने मराठी लेखक, कलावंत, वाचक आणि रसिक यांनी २९ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता शिवाजी मंदिर, दादर, मुंबईमध्ये नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे.
हा कार्यक्रम म्हणजे सर्व साहित्य आणि कलाप्रेमी मराठी भाषिकांचा मेळावा आहे. त्याच्या आयोजनामागे कोणीही राजकीय व्यक्ती, पक्ष वा संघटना नाही. या कार्यक्रमाला कोणी उद्घाटक वा प्रमुख अतिथी असणार नाहीत. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पाठिंबा असलेला साहित्य आणि कला प्रेमी मराठी भाषिकांचा हा उत्स्फूर्त मेळावा आहे. या कार्यक्रमास सन्माननीय नयनतारा सहगल यांच्या बरोबर भालचंद्र नेमाडे, पुष्पा भावे, डॉ गणेश देवी, हरिश्चन्द्र थोरात, अरुण खोपकर, सुनील शानभाग, चंद्रकांत कुलकर्णी, राजीव नाईक, येशू पाटील, टी.एम. कृष्णा, सिद्धार्थ वरदराजन, प्रज्ञा दया पवार, जयंत पवार, ज्ञानेश महाराव, संध्या नरे पवार, समीना दलवाई, अनंत भावे, अमोल पालेकर, अतुल पेठे, किशोर कदम, इंद्रजीत खांबे, डॉ विवेक कोरडे, गणेश विसपुते, संजीव खांडेकर, सुबोध मोरे, आशुतोष शिर्के, अविनाश कदम, इत्यादी मान्यवर लेखक, कवी, कलावंत, विचारवंत उपस्थित असतील. हा कार्यक्रम मराठी साहित्याच्या वाचकांसाठी खुला असेल.
हे सुद्धा वाचा…