आंबेडकरी नॅरेशन म्हणजे नक्की काय असतं.? – केशव वाघमारे

या देशातल्या संघ भाजपा सत्ताधारी वर्गाने स्वतःच्या सोयीनुसार राष्ट्रवादाची व देशभक्तीची एक कल्पना उभी केली आहे .समस्त भारतीय लोकांनी त्यांनी ठरवलेल्या राष्ट्रवादाच्या व देशभक्तीच्या कल्पनेशी मानसिक रित्या जोडून घेतले पाहिजे किंवा त्याच्या प्रति पूर्णपणे निष्ठा ठेवली पाहिजे असा सत्ताधारी संघ आणि भाजप परिवाराचा आग्रह आहे .जे कोणी त्याच्याशी या बाबतीत सहमत होणार नाही त्यांना ते देशद्रोही ठरवू लागले आहेत. त्यांना तुरुंगात डांबू लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांच्या अटकेचा प्रयत्न चालवला आहे असे आम्हास वाटते .

भिमा कोरेगाव संदर्भाने उसळलेल्या हिंसाचाराच्या संदर्भाने म्हणजे भिमा कोरेगाव हिंसाचाराचे माओवादी कनेक्शन जोडत डॉ.आनंद तेलतुंबडे यांना त्यात गोवण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवरून होतो आहे. या कारस्थानाविरोधात आवाज उठविण्याची गरज असताना फेसबुक माध्यमातुन डॉ. तेलतुंबडे हे आंबेडकारवादी आहेत का.? त्यांचे नॅरेशन आंबेडकरवादी आहे का.? ते एलिट की आहेत की दलित.? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे प्रश्न पुरेशा तार्किक भूमीवर उभे राहून करण्याची गरज असताना स्वयंघोषित उंटावरून शेळ्या हाकणारे फेसबुकी विचारवंत डॉ.आनंद तेलतुंबडे यांच्या आंबेडकरी नॅरेशन बद्दल प्रश्न उपस्थित करीत आहेत. जितेंद्र आव्हाड ते अशोक चव्हाण यांच्यासाठी सोशल मीडिया मॅनेजमेंटचे काम करणाऱ्या व ‘स्वतःच्या पोटापाण्याची सोय या पलीकडे आंबेडकरवादाचा अर्थ न समजलेल्या प्रवृत्ती या मोहिमेच्या नेतृत्वस्थानी आहेत हे मी नमूद करू इच्छितो.

उगाच आपण चर्चेत यावे या साठी डॉ .आनंद ने आंबेडकरा विषयी केलेल्या अथवा इतर वक्तव्याचा संदर्भहीन वापर करत दलित जनतेच्या भावना चाळवण्याचा उद्योग महाराष्ट्रातील काही भाषणखोर ,पाळीव बुद्धिवंत अधून मधून करतच असतात. खरे तर ज्ञानाच्या क्षेत्रात वाद -प्रतिवादाचे एक अन्यसाधारण असे महत्व असते .त्या मुळे विचारांचा ,ज्ञानाचा विकास होण्यास मदतच होत असते .महाराष्ट्राच्या विचारविश्वात आंबेडकरी चळवळीचे डाव्या चळवळीशी, तिच्या विचारधारेशी असलेल्या मतभेदावर अनेक वाद प्रतिवाद झाले आहेत .राजा ढाले ,नामदेव ढसाळ प्रा .अरुण कांबळे ,गौतम शिंदे ,सुधाकर गायकवाड ,उद्धव कांबळे यांनी आपले मतभेद वेळोवेळी नोंदविलेले आहेत .पण या त्यांच्या मता मागे अभ्यास ,वाचन आणि वाद प्रतिवाद करण्याची एक वैज्ञानिक समाजशास्त्रीय चिकित्सा होती .पण हे अलीकडच्या काळात आमचे काही तरुण मित्र आंबेडकर वादाचे टिनपाठ ठेकेदार बनून आंबेडकरी विचारविश्व अत्यंत गबाळग्रंथी करून टाकत आहेत याचे वैषम्य वाटते .महापुरुषाच्या चिकित्सेचा अर्थ ते महापुरुषाचे आणि त्यांच्या विचारांचे जाणून-बुजून केलेले अवमूल्यन असा लावत आहेत .चिकित्सा करणाऱ्याच्या विचारांचा विपर्यास करत त्याच्या सामाजिक निष्ठेवर संशय घेत , त्यांना सामाजिक जीवनातून उठवू पाहत आहेत .आंबेडकर विचार अभिनिवेशी ,हटवादी आणि गबाळग्रंथी बनवणारा भक्ती संप्रदाय महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे . डॉ. आनंद पारंपारिक आंबेडकरवाद्यांच्या भक्तीरसाच्या चौकटीत कधीच लिहीत नाही . बोलत नाही. सर्वसाधारण लोकांना त्यांच्या चुकीच्या धारणेच्या झोपेतून जागे केलेले कधीच आवडत नाही. आणि आनंद कायम तेच करत आला आहे ..त्यांच्या पारंपरिक धारणा तोडत आला आहे . प्रसंगी कठोर ही झाला आहे असा माझा अनुभव सांगतो.
अज्ञानातुन ,चुकीच्या आकलनातुन अथवा वेगवेगळ्या हितसंबंधाच्या निर्माण झालेल्या चौकटी तोडणे अवघड जात असेल म्हणून काही का असेना गेली 50 -60 वर्ष डावे अथवा आंबेडकरवादी ज्या धारणा कवटाळून बसले आहेत त्यांना तो प्रश्नांकिंत करू पाहतो .कवटाळलेल्या धारणा आजच्या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा तपासून पाहण्याचा आग्रह करतो आणि तेच आंबेडकरवाद्यांना आवडत नाही असे दिसते .महाराष्ट्रातील आंबेडकरवाद्यांना सेलिब्रेट करायला खूप आवडते आणि याच सेलिब्रेशन मधुन त्यांनी स्वतःचे गौरविकरण करणारे आत्मचरित्रात्मक वाङ्मय खूप मोठ्या प्रमाणात निर्माण केले आहे .शिवाय आपले पांडित्य दर्शवणे या एकमेव हेतूने दलित चळवळ आणि डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल ही अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. आजही लिहिताहेत. बरेच काही महत्त्वाचे सांगितल्याचा आभास निर्माण केल्या जातो मात्र सांगितले काहीच जात नाही. याउलट डॉ .आनंद कोणत्याही हितसंबंधाची भीडभाड न बाळगता सतत बोलत आला आहे .प्रचलित समजांना,कवटाळलेल्या अनेक पूर्वग्रहांना तो सतत धक्के देत आला आहे .या त्याच्या धक्का देण्याच्या मांडणीवर दलितांची तीव्र प्रतिक्रिया उमटणे साहजिकच असले तरी त्या प्रतिक्रियेचा पोत काय असला पाहिजे होता ह्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे.

पूर्वग्रहदूषिततेच्या पुढे जाऊन परिस्थितीला समजून घेत त्यात हस्तक्षेप करण्याची ज्यांची कुवत असते ते नवे समाजभान विकसित करण्याच्या प्रयत्नात असतात. विविध मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यात उच्चपदस्थ म्हणून काम करीत असताना नेहमी सर्वहारा दलित शोषित समाजाच्या समस्यांच्या सोडवनिकीसंदर्भाने मूलगामी चिंतन करण्याचे काम डॉ. आनंद ने केले आहे.

डॉ .आंबडेकर यांच्या भक्तीच्या पलीकडे जाऊन दलितांच्या खऱ्या खुऱ्या मुक्ती प्रति कमालीची निष्ठा ठेवतात तेच आनंदच्या भूमिकेला लिखाणाला समजून घेऊ शकतात. आनंद जातीअंत बद्दल बोलतो ..जात पितृसत्ते बद्दल बोलतो हे आंबेडकरवादी नॅरेशन नाही का ?दलित हिंसेची अर्थ -राजकीय उकल करून सांगतो हे आंबेडकरवादी नॅरेशन नाही का ?आनंद जात-लिंग -वर्गाच्या शोषणाला समजावून सांगतो हे आंबेडकरवादी नॅरेशन नाही का? शोषणाची अर्थ राजकीय व्यवस्था समजावून सांगतो हे आंबेडकरवादी नॅरेशन नाही का ? कल्याणकारी राज्याचा प्रवास एका दमनकारी राज्याकडे आणि भांडवलदारांच्या एजंट बनण्याकडे कसा होतो आहे हे समजावून सांगणे हे आंबेडकरवादी नॅरेशन नाही का? जागतिकीकरणामध्ये दलितांच्या मुक्तीच काय होणार ? याबद्दल तो सांगतो हे आंबेडकरी नॅरेशन नाही का ? दलित आदिवासी यांच्या हिंसेबद्धल खेड्यापाड्यात फिरून त्यांच्या न्यायाची भूमिका घेतो ..(सोंनाखोटा इथे दादाराव डोंगरे च्या खुणा वेळी डॉ .आनंद वडवणी ते सोंनाखोटा हे 15 किलोमीटर अंतर पायी चालत सोंनाखोटा या गावी आला होता ) तेलंगणा ,आंध्रा,कर्नाटक,बंगाल,ओरिसा,छत्तीसगड इथे चालणाऱ्या जनतेच्या लढ्यात सहभागी होतो .त्यांच्या मुक्तीच्या संघर्षाला तत्वज्ञानाचा भक्कम आधार देण्यासाठी झटतो. उभा करतो. डॉ .आंबेडकरांच्या समग्र साहित्याचे जगात सर्वप्रथम डिजिटायझेशन करतो, देशातील आणि देशाबाहेरच्या लोकांपर्यंत आंबेडकरी वाङ्मय पोहचले पाहिजे या साठी धडपड करतो ..जगातल्या ऑक्सफर्ड पासून केंब्रिज पर्यंतच्या सर्व विद्यापीठांमध्ये जाऊन दलित असर्शन बद्दलची मांडणी करतो . समग्र शोषणाचा अंत झाला पाहिजे यासाठी नेहमी लिहीता राहतो.कृतीशील भूमिका घेत राहतो हे आंबेडकरी नॅरेशन नाही का? की आरक्षण ,अस्मिता ,नामदेवच्या कॉपी केलेल्या कविता ,पडद्याआड जगण्यासाठी नको त्या तडजोडी, प्रस्थापित होण्याची केविलवाणी धडपड आणि फेसबुक वरच्या टिनपाट पोस्ट हे आंबेडकरी नॅरेशन आहे ..?

लेखक सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आणि अन्वीक्षण या अनियतकालिकाचे कार्यकारी संपादक आहेत

Leave a Reply