जपानी कंपनीच्या शिष्टमंडळापुढेही पालघर जिल्ह्यातील ग्रामस्थांची ‘ बुलेट ट्रेन नकोच नको ! ‘ ची भुमिका

समीर वर्तक

बुधवार दिनांक 23 जानेवारी 2019 रोजी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन साठी सुमारे 88,000 कोटी कर्ज देणारी जपानची JICA कंपनीचे प्रतिनिधी पालघर जिल्ह्यात “बुलेट ट्रेन” विरोधातील नागरिकांना भेटण्यास आलेले होते. त्यांनी हनुमान नगर, मान व नागझरी या गावातील नागरिकांना भेट दिली.
आम्ही आमची एक इंचही जमीन देणार नाही, बुलेट ट्रेन पासून आम्हाला काहीही फायदा नाही, आम्हचे आयुष्य या बुलेट ट्रेन मुळे उध्वस्त तर होईलच परंतु पालघर जिल्ह्याच्या पर्यावरणाचा संपुर्ण विनाश होऊन जाईल तसेच सत्तेतील सरकार हे जनतेसाठी नाही तर मूठभर श्रीमंतांसाठी काम करीत आहे. ही बुलेट ट्रेन देखील फक्त श्रीमंतांसाठीच आहे ज्यासाठी पालघरमधील आदिवासी व भूमिपुत्रांना आणि पर्यावरणाला उध्वस्त करण्याचे या सरकारचे कारस्थान आहे. फक्त एका माणसाच्या हौसेसाठी आम्हाला उध्वस्त करू नका असे सर्व आदिवासी बांधवानी ठणकावून सांगितले. जिल्हाधिकारी याना दिलेले बुलेट ट्रेन विरोधातील ग्रामसभेचे ठरावही JICA च्या प्रतिनिधींना देण्यात आले.

यावेळी भूमीपुत्र बचाओ आंदोलनातर्फे बुलेट ट्रेन विरोधातील पत्रही JICA च्या प्रतिनिधींना देण्यात आले. या भेटीच्या वेळी भूमीपुत्र बचाओ आंदोलनाचे नेतृत्व करणारे आदिवासी एकता परिषद व भूमीसेनेचे संस्थापक काळुरामकाका धोदडे, पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर सुभाष वर्तक, आदिवासी एकता परिषदेचे राजू पांढरा, वसईचे अध्यक्ष दत्ता सांबरे, पर्यावरण संवर्धन समितीचे मॅकेन्झी डाबरे व दर्शन राऊत, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, जेष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, शेतकरी संघर्ष समितीचे संतोष पावडे, कमलाकर अधिकारी, मान गावाचे सरपंच आणि अनेक मान्यवर तसेच शेकडो गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply