मराठी अशी आमची माय बों(बल)ली.. -अॅड.महेंद्र कवचाळे

यवतमाळ येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सेहगल यांच्या हस्ते होणार होते. परंतु त्या इंग्रजी भाषेच्या साहित्यिक असल्यामुळे ऐनवेळी त्यांना नाकारण्यात ( आधी निमंत्रण देऊन) आले. साहित्य महामंडळ असो किंवा आयोजक असो, त्यांना नाकारण्यामागे जे कारण देत आहेत ते मनाला न पटण्यासारखे आहे. नयनतारा या पंडित नेहरू यांची भाची आणि इंदिरा गांधी यांच्या आते-बहीण आहेत. मोदी सरकारच्या धोरणामुळे देशात जी असहिष्णुता निर्माण झाली त्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी पुरस्कार वापसी चे आंदोलन चालवले. याच कारणामुळे संघ, मोदी सरकार आणि फडणवीस सरकार यांनी दबाव आणून नयनतारा यांचे निमंत्रण ऐनवेळी रद्द केले. साहित्य महामंडळ आणि आयोजकांनी संघ आणि भाजपा यांच्या पायावर अक्षरशः लोटांगण घातलेलं आहे. त्यांच्या या लाचारीचे निषेध करण्यासाठी माझ्या कडे शब्द अपुरे पडत जरी असले तरी हा शुद्ध हलकटपणा आणि निचपणा आहे. स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की महाराष्ट्राचे साहित्यिक आणि त्यांचे महामंडळ हे मणकाहिन बुजगावणे असतील म्हणून.

नयनतारा यांची साहित्यिक उंची आणि वैचारिक प्रगल्भता ज्यांना सोसवत नाही,मानवत नाही अश्या कूपमंडुकी प्रवृत्तीला पायदळी तुडवलं पाहिजे. नयनतारा यांनी संमेलनाचं उदघाटन केलं असतं तर त्या मोठ्या झाल्या नसत्या, तर त्यांनी उदघाटन केलं म्हणून संमेलन आणि महामंडळ मोठं झालं असतं हे अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्या या झारीतील शुक्राचार्यांना कसं समजणार? नयनतारा यांना विरोध करण्यापूर्वी त्या कोण आहेत आणि त्यांची तपश्चर्या किती आहे याचा अंदाज तरी घ्यायचा होता. पंडित नेहरू यांची भाची, विजयालक्ष्मी पंडित यांची कन्या, इंदिरा गांधी यांची आते-बहीण जरी असल्या तरी त्यांनी नेहरू-गांधी परिवाराचे कधीही भांडवल केले नाही. उलट आणीबाणी मध्ये त्या जय प्रकाश नारायण यांच्या बाजूने आणि इंदिरा यांच्या विरोधात उभ्या ठाकल्या. आणीबाणी विरुद्ध परखड लेख लिहिले. परखड पणा त्यांच्या नसानसात भिनलेला आहे. राज्यकर्त्यांसमोर लाळ घोटाणाऱ्या या दांभिक साहित्यिकांना हा परखडपणा कसा दिसणार?

साहित्यिक हा समाजाचा आरसा असतो. जस Arts for Arts Sake तसेच Literature for Literature sake आहे, तसेच Literature for Society’s sake पण आहेच. साहित्यिकालासुद्धा सामाजिक अंग असतो. त्याने त्याचे कर्तव्य प्रामाणिक पणे पार पडायचे असते. परंतु आजची घटना पहिली तर बाळासाहेब ठाकरे यांचे एक वक्तव्य आठवते. आजचे साहित्यिक म्हणजे आम्ही टाकलेल्या तुकड्यावर जगणारी कुत्री आहेत असे ते म्हणाले होते. परंतु आजच्या घटनेने मन उद्विग्न झाले असले तरी ठाकरे यांच्या वक्तव्याला आजही मी समर्थन देऊ शकत नाही ( परिस्थिती अगदी तशीच असली तरी) कारण ३५ वर्षे साहित्याची उपासना करणाऱ्या एका शिक्षकाचा मी मुलगा आहे.

कारण काय देतात? नयनतारा इंग्रजी भाषेत लिहितात. निमंत्रण देताना माहीत नव्हतं का? निमंत्रण देऊन ऐनवेळी हा अपमान कशासाठी? बरं, इंग्रजीत लिहितात म्हणून काय फरक पडतो. ज्या वि.वा.शिरवाडकर यांना मराठी साहित्याचे पितामह म्हटले जाते त्यांनी सुद्धा Shakespeare च्या King Lear चे भाषांतर करून मराठीत राजा लियर हे नाटक लिहून पुढे त्याचे रूपांतर नटसम्राट या नाटकात केलेच ना? इतकेच काय अमेरिकन साहित्यिक Ernest Hemingway यांच्या The Old Man and the Sea या कादंबरीचे भाषांतर करून महाराष्ट्राचं लाडकं (?) व्याक्तिमत्व म्हणून संबोधले जाणारे पु. ल.देशपांडे यांनी ‘ एका कोळीयाने ‘ लिहिलेच ना? Henrik Ibsen च्या Doll’s House पासून प्रेरणा घेऊनच हरी नारायण आपटे यांनी ‘ पण लक्षात कोण घेतो ‘ हे लिहिलेच ना? Doll’s House मधील Nova आणि ‘ पण लक्षात कोण घेतो ‘ यातील यमु यांच्यात काही फरक आहे का? आहे तो फक्त भाषेचा… विचार एकच.

हिंदी चित्रपटांवर सुद्धा इंग्रजी साहित्याचा प्रभाव लपलेला नाही. Thomas Hardy याच्या The Mayor of the Casterbridge वरूनच राजेश खन्ना यांचे ‘ दाग ‘ हे चित्रपट निर्माण झाले होते. या महान विभूतींना कधी इंग्रजी भाषेचे अडसर आले नाही तर साहित्य संमेलनाच्या नावाखाली भंपकपणा करणाऱ्या या टुकार आयोजकांना इंग्रजीचा कोणता अडथळा आला?

भाषा हे व्यक्त होण्याचे एक साधन आहे. साध्य करायचे असते ते विचार , ज्याला Aristotle म्हणतो Idea is Central.

कुरुक्षेत्रावर श्रीकृष्ण यांनी पांडवांना सांगितलं होतं की ज्ञान हे शत्रूकडून जरी मिळालं तरी ते स्वीकारायचं असतं कारण ज्ञान हे ज्ञान असतं.( म्हणूनच पांडवांना घेऊन कृष्ण युद्धाच्या आदल्या रात्री सर्व कौरव प्रमुखांना भेटायला त्यांच्या छावणीत गेला होता). भगवद्गीतेवर प्रवचन फक्त पोट भरण्यासाठी देऊ नये, थोडं त्यातून अक्कल सुद्धा शिकावी.

ज्यांना राजदरबारी हुजरेगिरी आणि मुजरेगिरी करायची असते त्यांच्या कडून स्वतंत्र विचारांची काय अपेक्षा करायची? त्यामुळेच सध्याच्या मराठी साहित्याचा दर्जा अगदी सुमार आहे . मराठी साहित्य आज अक्षरशः शरपंजरी पडलेले आहे….. उत्तरायणाची वाट पहात…..!

हे सुद्धा वाचा….

ग. दि. माडगूळकर आणि आजचा काळ – डॉ.दिलीप चव्हाण

Leave a Reply