जोतिबांना पगडीत आणि सावित्रीबाईंना कुंकवाच्या चिरीत नका अडकवू!

प्रगती बाणखेळे 
आपला समाज परंपरेने प्रतीकांमध्ये रमणारा आहे. सामाजिक चळवळीही याला अपवाद नाहीत. ही प्रतीकं त्या त्या काळात समाजाला एकत्र आणायला, लोकांना प्रेरणा द्यायला खूप महत्त्वाची ठरली हे निःसंशय. खादी आणि चरखा हे स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे ठरले. सारा देश गांधींच्या विचारांकडे आकर्षित करण्यात या प्रतीकांचा मोठा वाटा होता.

पण काळ बदलला आहे. प्रतीकं ही अस्मितांची ओळख बनलीत. त्या व्यक्तीचे विचार, त्यांचं काम याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत प्रतीकं मिरवणं खूप सोपं झालंय. एकदा का अशी प्रतीकं हाताशी असली की ती लोकप्रिय करणं आलंच. त्या व्यक्तींचं सुलभीकरण आणि पुढे विकृतीकरण करण्याचा हा राजमार्ग होऊन जातो.

आज सावित्रीबाई जन्मल्या त्या महाराष्ट्रात मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. गेल्या वर्षी वस्त्या, पाड्यांवरच्या अनेक शाळा बंद झाल्या. त्यात शिक्षण सोडावं लागलं ते मुलींना. बालविवाहांमध्ये आजही महाराष्ट्राचं नाव आघाडीवर आहे. आजही लैंगिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्यांमध्ये इथल्या मुलींचे आक्रोश मोठे आहेत…या साऱ्या परिस्थितीत कृतिशील संघर्षाची गरज आहे. आजूबाजूची राजकीय परिस्थिती इतकी विपरीत असताना आपण संघर्षात कुठे कमी पडलेलो नाही. मग नेमक्या अशा वेळी आपल्याला उत्सवीकरण आणि प्रतीकांचा मोह का पडावा?

आजवर जोतिबा- सावित्री यांच्यासारखी माणसं, त्यांचं काम परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्यांना प्रेरणा द्यायला पुरेसं होतं, तिथे इतक्या वर्षांनी पर ही प्रतीकं रुजवून आम्ही काय साध्य करणार आहोत?

ज्या समाजात सावित्रीबाई जन्मल्या त्या माळी समाजानेही आडव्या चिरीची पद्धत कधीच बंद केली आहे. अन्य समाजापेक्षा हे दृश्य वेगळेपण त्यांना गरजेचं वाटलं नसेल. आणि हे योग्य आहेही. मग एका दिवसापुरतं तरी हे कशासाठी?

बदलांचे वाहक होऊनच जोतिबा-सावित्री यांच्या पावलावर पाऊल टाकता येईल. त्यांना पगडी आणि चिरीत अडकवून नाही.

प्रगती बाणखेळे  यांच्या  फेसबुक भिंतीवरून साभार 

हे सुद्धा वाचा …

रामलाल गणपत शेंडे : महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्वप्न साकारणारा हमाल   

ग. दि. माडगूळकर आणि आजचा काळ – डॉ.दिलीप चव्हाण

       भिमा कोरेगाव कुणी घडविले ? इतिहासातले व वर्तमानातलेही … खरा मुद्दा इतिहास भान रुजविण्याचा आहे !

Leave a Reply