भिमा कोरेगाव कुणी घडविले ? इतिहासातले व वर्तमानातलेही … खरा मुद्दा इतिहास भान रुजविण्याचा आहे !

अनिकेत लखपती

 

३१ डिसेंबर २०१७ वर्षाचा शेवटचा दिवस. या दिवसाची पहाटही माझ्यासाठी इतर अनेक दिवसांप्रमाणेच होती. फक्त त्यात एकाच भावना नवीन होती ती म्हणजे, ‘जी मजा वर्षभर करू शकलो नाही ती आज करू’ आणि आनंदात दिवस घालवू. विचार केल्याप्रमाणे हा शेवटचा दिवस मनापासून जगलो. हे सगळ करत असतांना या वर्षी केलेल्या कोणत्याच चुकीच्या गोष्टी पुढच्या वर्षी करणार नाही हा एकच नेहमीचा संकल्प घेऊन मी २०१८ वर्षात पदार्पण केलं .

नवीन वर्षाच स्वागत मुक्त मनान करावं, नवनवीन संकल्पांचा विचार करून त्या संकल्पांना वर्षभर उराशी जपावं, रागद्वेष यांना त्याच वर्षात सोडून प्रेमभावानं नवीन वर्ष सुरु करावं या सगळ्या गोष्टी माहित होत्या. पण तरीही वर्षाची शेवटची रात्र साजरी करण्यात नव्या वर्षाच्या पहाटे उठायला जरा उशीरच झाला आणि मागच्या वर्षाचे पडसाद पुन्हा नव्या वर्षावर पहिल्याच दिवशी पडले.

 

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी मोबाईल वरून, बातम्यांमधून आणि मित्रांमध्ये होणाऱ्या गप्पांमधून भीमा-कोरेगावमध्ये दोन वेगवेगळ्या धर्माच्या गटांमध्ये काहीतरी भांडण झाल्याचे समजले. या भांडणाची कारण आमच्यापैकी कुणालाच माहित नव्हती. फक्त काहीतरी जातीवाचक बोलण्यामधून दोन स्वतंत्रपणे चालणाऱ्या आंदोलकांनी मारहाण केल्याचे आम्हाला समजले होते. आमच्या चर्चेलाही काहीच महत्व नव्हतं, कारण आमच्यापैकी कुणालाच मुलास घटना काय घडली? व काय घडली? याबद्दल काहीच माहिती नव्हती. फक्त सगळ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे ऐकले तेच तो सांगत होता. त्यामुळे या घडलेल्या घटनेचे निदान त्यादिवशी तरी आमच्यापैकी कुणालाच काही गांभीर्य वाटल नाही. अनेक अनेक ठिकाणी अनेकदा होणाऱ्या जाती-धर्मातील भांडणाप्रमाणे हे ही आज एक नवीन घडल एवढेच त्यात महत्व उरले.

bhima-koregaon0-696x447-539153919.jpg

दुसऱ्या दिवशी मात्र वर्तमानपत्रांतून आणि प्रसारमाध्यमांतून झालेल्या घटनेची गंभीरता लक्षात आली. प्रत्यक्ष घटनेमध्ये हजारोंच्या संख्येचा लोकसमुदाय, तोही दोन वेगवेगळ्या धर्माचा, त्यामध्ये जातीवाचक आणि धर्माधारित लोकांच्या ज्वलंत मनाला कोणत्यातरी कारणावरून मिळालेली ठिणगी, त्यामधून उभ्दावलेली मारहाण, जाळपोळ आणि विध्वंस. हे सगळाच किती भयानक घडल होते हे हळूहळू लक्षात यायला लागल. माध्यमांच्या आधारे हे सगळ माझ्यापर्यंत पोहचले असले तरी त्याबद्दल मनात फार कळवळा निर्माण झाला होता अस नाही. मानवी स्वभावाप्रमाणे जोपर्यंत अशा प्रकारच्या विध्वंसक घटनेत आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत नाही. तोपर्यंत आपण अगदी सहज बेफिकीरपणे त्या घटनेकडे दुर्लक्ष करतो आणि काही वेळात ते विसरूनही जातो. मीही त्याला अपवाद नव्हतो. घडलेल्या घटनेचे बाह्य स्वरूप लक्षात येऊनही मी त्याकडे फारस लक्ष दिले नाही आणि पुन्हा दररोज जगण्याप्राने सगळे व्यवस्थित आहे, असे समजून पुढे सरकलो.

वर्षाचा तिसरा दिवस उजाडला तेव्हा महाराष्ट्रावर ‘महाराष्ट्र बंद’ चे ढग गरजत होते.

263907-rail-roko-zee634360770.jpg

घडलेल्या घटनेला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले होते. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि इतर अनेक सार्वजनिक सुविधा बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरेगाव-भीमा येथे येथे पडलेल्या ठीणग्यांच्या ज्वाला महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळीकडेच पसरल्या. महाराष्ट्राबाहेरही दलित बांधवांमध्ये निषेधात्माक भाव निर्माण झाले होते. त्यामुळे या सगळ्यांचा एकूणच परिणाम कमी-अधिक प्रमाणात भारतात सर्वत्र झाला. कोरेगाव-भीमा पुण्यापासून जवळच असल्याने पुण्यामध्ये अनेक ठिकाणी तोडफोड, आंदोलन यासारखे उद्योग चालूच होते. पुणे शहरातील सर्व महत्त्वाच्या जागा बंद करण्यात आल्या होते. काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता.

 

विद्यार्थी म्हणून पुण्यात शिक्षण घेत असताना या सगळ्याच गोष्टीचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या माझ्याही दैनंदिनी जीवनावर पडला. घराबाहेर पडण्याची भीती निर्माण झाली. महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती. सर्व दुकाने, उपहारगृहे हे सुद्धा बंद होती. एकूणच दररोजच्या जीवनात ज्या मुक्त मनाने मी सगळ्या गोष्टी करू शकतो त्या करण्यात आता भीतीचे भाव निर्माण झाले. या सगळ्यामधून मी आता झालेल्या, चाललेल्या आणि होणाऱ्या प्रकाराकडे अधिक लक्ष देऊ लागलो. कारण आता माझ्या आयुष्यात या घटनांनी अडचणी निर्माण केल्या होत्या. त्यामुळे विशेष काहीही न करताही माझे लक्ष त्याकडे आणि त्यासंदर्भातील घटनांकडे लागून राहिले.

इतिहासाचा विद्यार्थी म्हणून कोरेगाव-भीमा व तेथील विजयस्तंभाचे स्थान याबाबतील एक दिवस महाविद्यालयातील सरांनी आमच्या सोबत चर्चा केली. अर्थातच यामागे कोरेगाव-भीमा येथे जी दंगल घडून आली. त्या ज्वलंत विषयाचा संदर्भ होता. तोपर्यंत मला त्याविषयी विशेष काहीही माहिती नव्हती.

यासंदर्भातील चर्चेत सांगताना सर म्हणाले होते कि, “ब्रिटीश आणि मराठा यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या युध्दामध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांवर जो विजय मिळवला. त्या विजयाप्रित्यर्थ कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभ बांधण्यात आला होता. त्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षीच्या १ जानेवारीला दलित समुदाय मोठ्या संख्येने तिथ उपस्थित राहतो. कारण या युद्धात महार सैनिकांनी ब्रिटीशांच्या बाजूने मोठा पराक्रम गाजविला होता आणि त्यांच्या पराक्रमाचे प्रतिक म्हणजेच तो विजयस्तंभ होय’ ही सगळीच चर्चा आणि माहिती माझ्या दृष्टीने नवीनच होती. परंतु खरेतर या चर्चेने मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण केले. या सगळ्या प्रशांपैकी माझी जिज्ञासा जागृत करणारे दोन सर्वाधिक महत्वाचे प्रश्न म्हणजे माझ्या देशातील महार बांधव ब्रिटिशांच्या बाजूने का लढले? आणि त्यांच्या सन्मानासाठी ब्रिटिशांनी विजयस्तंभ का बांधला असावा? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मी सरांकडे गेलो. त्यावेळी त्यांनी आम्हा सगळ्याच विद्यार्थ्यांना या इतिहासावर आणि १ जानेवारीला घडलेल्या घटनेवर अभ्यास करायला सांगितले. खरेतर त्याचवेळी आम्हाला मूळ इतिहास सांगून आणि आमच्या प्रश्नांची उत्तर देऊन आमच्या सर्व शंकांचे निराकरण सर करू शकत होते. तरीही प्रत्येकाच्या मनातले विचारचक्र सुरु राहावे, जिज्ञासा जागृत राहावी, अनुभव मिळावेत आणि स्वत: त्यातून प्रवास करून नवीन गोष्टी त्यांनी शिकाव्यात अशा प्रकारचे शिक्षण देण्याचा सरांचा विश्वास अधिक होता.

सरांनी सांगितल्या प्रमाणे मी अभ्यासाला सुरुवात केली. तोपर्यंत मलाही त्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यात मूळ इतिहास काय आहे? हे समजावून घेण्याचा मी प्रयत्न केला. माझेच काही मित्र मूळ दंगल कुठून सुरु झाली? प्रत्यक्षात काय घडल? आणि ती इतर लोकांमध्ये कशी पसरली? याचा अभ्यास करत होते. अर्थात अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही एकमेकांशी चर्चा करत होतो. यामधून संभाजी महाराजांचा मृत्यू, त्या मृत्यु संदर्भातील तुळजापूर व वढू-बुद्रुक गावातील वाद, वढू-बुद्रुक गावामधील लोकांमध्ये संभाजी महाराजांच्या समाधीविषयी वाद, आणि त्या वादाचा मराठा आणि दलित समुदायाशी असणारा व प्रत्यक्ष घटनेशी असणारा संबंध हे नवीन मुद्दे अभ्यासासाठी समोर येत गेले. या सगळ्या मुद्द्यांच्या अभ्यासामधून मी हळूहळू उलगडत गेलो आणि नवीन माहिती आमच्यासमोर येत गेली.

 

महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व असलेल्या संभाजी महाराजांच्या समाधीवरून वढू-बुद्रुक या गावामध्ये दोन गटात जुना वाद आहे. यापैकी मराठा समाजाचा एक गट समाधीबाबत म्हणतो कि, ‘वा. सी. बेंद्रे यांनी निवडुंगाच्या अरण्यात शोधून काढलेली संभाजी महाराजांची समाधी हि पूर्वीपासूनच तेथे होती. नंतर संभाजीपुत्र शाहू महाराज जेव्हा समाधी दर्शनासाठी आले. त्यावेळी त्यांनी समाधीची देखभाल करण्याची जबाबदारी गोपाळ गायकवाड या महार माणसाकडे दिली. मराठा समुदायाचे ऐतिहासिक समर्थन डॉ. शिवाडे यांच्या संभाजी चरित्रात पाहावयास मिळते. त्यामध्ये गोपाळ गायकवाड याव्यतिरिक्त गोसावी आणि धर्माधिकारी या दोघांचाही उल्लेख करण्यात आला आहे. गावातील दलित समुदायाच्या मतानुसार, ‘गोपाळ गायकवाड या महार व्यक्तीने औरंगाजेबने निर्दयीपणे संभाजी महाराजांच्या मृत शरीराचे केलले  तुकडे एकत्र करून त्यांना आपल्या स्वत:च्या जागेत सन्मानपूर्वक पुरले व महाराजांची समाधी बांधली. या त्यांच्या साहसाबद्दल दलित समुदायाने गोपाळ गायकवाड यांचीही समाधी संभाजी महाराजांच्या समाधीच्या बाहेर बांधली आहे. कोरेगाव-भीमा येथे प्रत्येक वर्षी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेले लोक वढू-बुद्रुक येथे गोपाळ गायकवाड यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठीही येतात. यावेळी गावातील मराठा आणि दलित समुदायाच्या लोकांमध्ये भांडण निर्माण होतात. हा कलह दरवर्षी १ जानेवारीच्या सुमारास होतो. त्यामुळे गावातील ग्रामपंचायतीकडून शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये समाधीच्या संरक्षणासाठी पत्रही पाठवले जाते.

१ जानेवारी २०१७ ला घडलेल्या दंगलीच्या काही दिवस आधी वढू-बुद्रुक येथे दलित समाजाने गोपाळ गायकवाड यांच्या समाधीचा फलक लावला होता. या फलकावरून पुन्हा गावातील मराठा आणि दलित समुदायायात वाद पेटला. दलित समुदायाकडून अनेक जणांवर अट्रोसिटी दाखल करण्यात आली होती. परंतु नंतर पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला होता. यानंतर ३१ डिसेंबरला ‘संभाजी महाराजांची समाधी धोक्यात आहे’ अशी अफवा गावामध्ये पसरली. समाधीच्या रक्षणासाठी मराठा समुदाय १ जानेवारीला मोठ्या संख्येने तेथे उपस्थित होता. चिडलेला आणि रागामध्ये असलेल्या मराठा समुदायाने आपला मोर्चा तसाच कोरेगाव-भिमाकडे वळवला. प्रत्यक्ष कोरेगाव-भिमामध्ये १ जानेवारी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने दलित समाजाचे लोक उपस्थित होते. नव्याने आलेला मराठा आंदोलक आणि दलित समाजामधील चकमकीतून ही दंगल सुरु झाली. या दंगलीने कोरेगाव-भीमा व आसपासच्या गावामध्येही हिंसक स्वरूप धारण केले.

264172-koregoanbhima-124101999.jpg

 

कोरेगाव-भीमा येथील ग्रामपंचायतीने १ जानेवारीला गाव बंदचा आदेश काढला होता. यामागे सहा महिन्यांपूर्वी झालेली एक घटना कारण म्हणून सांगण्यात येते. सहा महिन्यांपूर्वी स्त्री-सरपंच भालेराव यांना भ्रष्ट्राचाराच्या आरोपावरून सरपंच पदावरून काढण्यात आले होते. त्यांच्या जागी चांभार समाजातील स्त्रीला सरपंच म्हणून निवडण्यात आले होते. या वादाचा गंभीर परिणाम १ जानेवारीला होऊ नये म्हणून गाव बंद ठेवण्यात आले. याशिवाय गावामध्ये आधीच दोन गटांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाल्याचही सांगता येत. अशा सगळ्या कारणांच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारीला कोरेगाव-भीमा येथे प्रचंड मोठी दंगल उद्भवली. त्याचा प्रसार महाराष्ट्रभर झाला. कोणतीही घटना अचानक घडत नसते. तर त्यामागे अनेक दिवसांच्या घटनांची पूर्वतयारी असते. आपल्याला त्या घटनेचा ‘कार्यकारणभाव  समजून घ्यावा लागतो. हाच कार्यकारणभाव आता आम्हाला समजला होता.

 

हा सगळा अभ्यास चालू असतानाच कोरेगाव-भीमा मधील आत्ताची मूळ स्थिती काय आहे हे पाहण्यासाठी आणि आमच्याच अभ्यासाचा एक भाग म्हणून आम्ही गावामध्ये जाण्याचे ठरविले. मूळ घटनेनंतर ८ ते १० दिवसांनी आम्ही तिथे जात होतो तरी मनात एक भीती होतीच. जातांना आम्ही महाविद्यालयाचे पत्र आणि ओळखपत्र सोबत घेऊन गेलो. गावात जाण्याआधी विजयस्तंभाजवळ गेलो. तिथे पोलिसांचा पहारा होता. बाहेरूनच त्याची पाहणी केली आणि गावात गेलो. मूळ घटना कशी व का घटली? याबद्दल आम्ही गावकऱ्याना विचारलं तेव्हा कोणताच व्यक्ती आमच्याबरोबर बोलायला तयार नव्हता. झालेल्या जाळपोळीच, तोडफोडीच विध्वंसक रूप समोर होतेच, लोकांच्या मनात भीती होती, गावामध्ये चार-पाच ठिकाणी पोलिसांचे तळ होते, अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते, एवढ्या दिवसांनंतरही संशयित लोकांना उचलून तुरुंगात टाकण्याचा उद्योग पोलिसांनी चालूच ठेवला होता. गावातील काही वृध्दाच्या बोलण्यानुसार,’गावातील मूळ लोकांचा दंगलीमध्ये काहीच सहभाग नव्हता’. पण जेव्हा आम्ही त्यांना काही दिवसांआधी गावातील दोन गटांमध्ये झालेल्या तणावाविषयी आणि ‘गाव बंद’ विषयी विचारले तेव्हा ते काहीच बोलले नाही. या काही वृद्धांशिवाय गावातील तंग वातावरणाने आणि भयाण शांततेने आम्हाला बऱ्याच गोष्टी समजावल्या. तेथील लोकांच्या व्यवहारावर, स्वातंत्र्यावर आणि दैनंदिन जीवनावर या दंगलीचा किती वाईट परिणाम झाला होता. याची अनुभूतीच आम्ही त्यावेळी घेत होतो. गावातील परिस्थिती तेथील मूळ लोकांसाठी आणीबाणी सदृशच वाटत होती. या घटनेने त्यांच्या जीवनावर, त्यांच्या मनावर जे घाव घातले, ते वेळ जाईल तसे भरून निघालेतही. पण त्या खुणा मात्र पुन्हा-पुन्हा इतिहासाला घटनेची साक्ष देत राहतील. असा विचार माझ्या मनात त्यावेळी येऊन गेला.

 

प्रत्यक्ष गावाला भेट दिल्यानंतरही मी पुढे बरेच दिवस यासंर्भात अभ्यास करत होतो, यादरम्यान मी अनेक इतिहासतज्ञ, राजकीय विश्लेषक आणि पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो, वृत्तपत्रांचे अनेक लेख पहिले, अनेक संस्था व संघटनांच्या प्रसिध्द झालेल्या अहवालांचाही अभ्यास केला, यामध्ये प्रत्येकाने घडलेल्या घटनेला आपापल्या पध्दतीने पाहिले. अनेक नवे विचारही मला या सगळ्यांमधून मिळत गेले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या इतिहास विभागाच्या प्राध्यापकांच्या मते, ‘हे सगळ लोकांपर्यंत मूळ इतिहास पोहचला नाही म्हणून घडल होत.’ तो इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आपणच कमी पडलो अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. दलित चळवळीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सत्यशोधक समाजाच्या अहवालानुसार या सगळ्यामध्ये मराठा समाजाची चूक दाखविण्यात आली तर धर्मवीर संभाजी स्मृती सामितिनुसार दलितांना मुळ घटनेचं दोषी मानण्यात आले. FINS (FORUM FOR INTERGRATED NATIONAL SECURITY) च्या अहवालामध्ये स्मिता गायकवाड यांनी दंगलीचा संबंध थेट नक्षलवाद्यांशी लावला. या सगळ्या बाबींचे पार्श्वभूमीवर कोणत्या विशिष्ट कारणांमुळे हे सगळ घडल हे सांगण अवघड आहे. बहुदा तस सांगितले तरी वरील अनेक कारणांपैकी माझ एक नवीन कारण होईल एवढेच. तरीही या दंगलीच्या केंद्रस्थानी असणारी गोष्ट सांगायची झाली तर ती म्हणजे ‘लोकांपर्यंत चुकीचा पोहचवला गेलेला इतिहास’ आणि अजूनही स्वजाती-धर्माबद्दल लोकांच्या मनात असलेला ज्वलंत अभिमान. आमच्या मनाला ही गोष्ट इतकी चिटकून राहिली आहे कि, कोणत्याच महापुरुषाचे कोणतेच विचार आमच्या मस्तकात शिरत नाही. मस्तकात जातात ते फक्त या महापुरुषांच्या नावाने साजरे होणारे उत्सव आणि तेही या महापुरुषांची जाती धर्म संप्रदाय यांच्यामध्ये विभागणी करूनच….

 

या सगळ्या प्रवासात मी प्रत्येकवेळी उलगडत गेलो, भावनिक होत गेलो. आणि म्हणूनच काही गोष्टींच्या बाबतीत अधिकाधिक समजदार होत गेलो. या सगळ्या गोष्टी घडण्याच्या आधी किंवा घडताना प्रत्येकवेळी अज्ञनाने घेरलेल्या समाजाला नाव ठेवण्यात आणि शिव्या देण्यात माझा वेळ गेला. पण आता मी वैयक्तिक किती सुधारलो, माझ्या किती जबाबदाऱ्या व कर्तव्य पूर्ण झाले या गोष्टींचा विचार करण्याची मला अधिक गरज वाटते. यामध्ये मी इतिहासाचा विद्यार्थी होतो म्हणून इतिहास समजावून घेतला, गरज होती म्हणून वर्तमानातल्या घडामोडी समजावून घेतल्या पण यानंतरही एक प्रश्न उरतोच आणि तो म्हणजे मी माणूस होतो तर मग मी माणूस किती समजावून घेतला? कारण झालेल्या दंगलीमध्ये फक्त दुकान, घर किंवा वाहनच जवळ नव्हती तर जळत होता तो मानवी एकतेचा विचार, जी तोडफोड झाली त्या अनेक गोष्टींमध्ये मानवी मुल्यांवरही अनेक आघात झाले. झालेला संघर्ष फक्त दोन जाती धर्मातला संघर्ष नव्हता तर तो होता मानवाचा मानवाशी झालेला संघर्ष ! यामधून आम्ही ज्या इतिहासाने आमच्यावर संस्कार केले त्याचं इतिहासाच्या विचारांचे मुडदे पाडले. बहुदा आम्ही माणूस म्हणून ज्यांना मारहाण करत होतो तोही माणूसच आहे हे आम्ही विसरलोच ! आमचा आवेश, आमचा संकुचित अभिमान आमच्याच प्रगतीच्या मार्गात अडथळा होत आहे. याचाही आम्हाला भान उरल नाही. यामध्ये माझ्या धर्माचा, जातीचा विजय झाला असेलही पण माणूस म्हणून मी हरतोच आहे. आणि जोपर्यंत हा संकुचित विचार अभिमानाच्या रूपाने आमच्या मनात जागृत राहणार तोपर्यंत आम्ही हरतच राहणार.

 

आता पुन्हा वर्षाचा शेवट समोर दिसतो आहे. पण आतापासूनच मनात भीती निर्माण झाली आहे. या भीतीच कारण म्हणजे पुन्हा एखाद्या राहुल फटांगडे चा मृत्यू होऊ नये किंवा एखादा विशाल जाधव गंभीर जखमी होऊ नये. या सगळ्याच भीतीमुळे कदाचित माझा ३१ डिसेंबर वर्षाचा शेवट म्हणून धम्माल करू असा नक्कीच होणार नाही. नवीन वर्षाची १ जानेवारी उशिरा उठूनही होणार नाही. आता आयुष्याच्या सगळ्या १ जानेवारीच्या दिवशी माझ लक्ष कोरेगाव-भीमा मधेच असणार आणि तिथ सगळ आनंदात होऊ दे अशी प्रार्थना मी सर्व धर्माचा एकच असलेल्या अशा ईश्वराजवळ करणार !

 

(लेखातील सर्व फोटो समाजमाध्यमातून साभार)

 

लेखक इतिहास विभाग,एस पी कॉलेज, पुणे येथील विद्यार्थी आहेत..

2 comments

Leave a Reply