( आज कॉम्रेड राजीव कालेलकर यांचा स्मृतिदिवस आहे. स्त्री मुक्ती चळवळ, मागोवा,लालनिशान,युवा भरात,श्रमिक मुक्ती दल आदी संघटनांचे ते सक्रिय पाठीराखे होते. कला,साहित्य,राजकारण इत्यादी वर भरभरून बोलणारे व लिहिणारे ते कार्यकर्ते विचारवंत होते. त्यांनी विविध विषयावर लिहिलेल्या लेखांचे पुस्तक “हरिती प्रकाशन” ह्या संस्थेने प्रकाशित केले. त्यांच्या राहत्या घरी पुस्तक प्रकाशन झाल्याच्या काही वेळांनी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात डॉ. कुंदा प्र .नी यांनी लिहिलेला व प्रेरक ललकारीच्या जानेवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित लेख असंतोष च्या वाचकांसाठी आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने प्रकाशित करीत आहोत. )
३१ डिसेंबर २०१४ रोजी पहाटे आमचा स्त्रीवादी मित्र राजीव कालेलकर गेला. गेले वर्षभर तो अन्ननलीकेच्या कॅन्सरने आजारी होता. मे २००१४ मध्ये त्याचे पहिले ऑपरेशन झाले तेंव्हा आम्हाला वाटायचे, हा आजार बरा होण्यासारखा आहे, होईल राजू बरा. पण तसे झाले नाही. महिन्याभरापूर्वी त्याचा आजार जेंव्हा खूप बळावला तेंव्हा मात्र वाटले की गेल्या वर्षभरापासून ‘हरिती प्रकाशनाने’ प्रकाशित करायचे ठरवलेले राजूचे पुस्तक लवकरात लवकर छापून यायलाच हवं. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्याचे दुसरे ऑपरेशन झाले तेंव्हा डॉक्टरांनी बॉम्बच टाकला, म्हणाले, “आता राजू काही दिवसांचाच सोबती. त्याला घरी जाउदेत, शांतपणे डोळे मिटूदेत!” हे कळताच पुण्याच्या अनिल जायभाये, दीपक कसाळे, विलास सोनावणे यांनी प्रेस मध्ये धाव घेतली आणि पुस्तक छपाईला वेग दिला. अखेर ३० डिसेंबरला राजूच्या घरी प्रकाशनासाठी संध्याकाळी राजूचे सगळे जुने नवे मित्र भेटलो. ठरवले होते चेहऱ्यावर दु:ख आणायचे नाही. राजूला आनंद वाटेल असे बोलायचे आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचे. आणि तसेच घडले त्यांच्यासोबतच्या आमच्या आठवणी ऐकता ऐकता तो खूप खुलला, हसला. आम्ही निरोप घेऊन आपापल्या घरी परतलो आणि पहाटे त्याच्या घरून फोन आला, कळले की, राजू गेला.
राजू हा एक पुरुषमित्र आहे असं कधी जाणवलेच नाही. एखाद्या जीवाभावाच्या मैत्रिणीसारखा वाटायचा तो. त्याच्याशी मनातलं सगळं दिलखुलासपणे बोलता यायचं. मला आठवतं त्याची आणि माझी भेट त्याच्याच घरी १९८० साली झाली. त्याचं असं झालं की मी मुंबईतल्या समग्र सडक नाटक चळवळीने केलेलं ‘बिगी बिगी मार वल्ह’ हे सडक नाटक पाहिले होते. आणीबाणीच्या काळात लोकशाही हक्कांवर जी गदा आणली गेली होती त्याविषयी असलेले हे सडक नाटक मुंबईत ठीकठिकाणी केले जात होते. त्या नाटकानंतरच्या झालेल्या चर्चेत मी भाग घेतला तेंव्हा त्या मंडळींनी विचारले की तुझे विचार स्त्रीमुक्तीवादी दिसतायत तू आमच्या स्त्रीमुक्तीविषयीच्या दुसऱ्या नाटकात काम करशील का? मी लगेच हो म्हटले. मी विचारलं ‘कोणी लिहिलंय?’ तर कुणीतरी म्हणाले “आमच्यात कोणी एकच लेखक नसतो तर आम्ही सामूहिकरित्या नाटकं लिहितो आणि बसवतो. फक्त राज्यनाट्य स्पर्धेत आम्ही एखाद्या नाटककाराने लिहिलेली नाटकं बसवतो.” मला पहिला धक्का बसला. ‘सामूहिकरित्या नाटय लेखन? कसं शक्य आहे? त्यात काय सर्जनशीलता असणार? अशी नाटकं तर प्रचारकीच असणार!” नाटक लिहिण्याच्या प्रक्रियेत सामील करून घेण्यासाठी त्या ग्रूपमधल्या एकाने मला राजीव कालेलकरचा पत्ता देऊन त्याच्याकडे यायला सांगितले. दुसऱ्या दिवशी मी ऑफीस सुटल्यावर बरोब्बर सहा वाजता राजीव कालेलकरच्या घरी पोहोचले. सेरेब्रल पाल्सीमुळे दोन्ही पायाने अधू असलेल्या राजूने माझे हसत हसत स्वागत केले. त्यात एकप्रकारचा आपलेपणा होता, गप्पागोष्टी करण्याचा उत्साह होता.
नाटकाच्या ग्रुपमधले इतर लोक जमा होईपर्यंत खूप वेळ असायचा. त्यामुळे गच्चीवरच्या त्याच्या अभ्यासिकेत आम्ही गप्पा मारत बसलो. त्या दरम्यान माझ्या मनात आलेले सगळे प्रश्न त्याला सांगून टाकले. त्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा त्याचा उत्साह पाहून मला जाणवले की हा माणूस अगदी आपल्यासारखाच विचार करतो. त्याचं प्रचंड वाचन आहे. मी उल्लेखिलेल्या सगळ्या लेखकांची अगदी रा. भा. पाटणकरांच्या सौन्दर्यशास्त्रापासून ते गौरी देशपांडेचे सगळे कथा संग्रह त्याला माहित होते. तेंव्हा पासून आमची चांगलीच गट्टी जमली.
त्यानंतर दररोज चर्चा चालायच्या. प्रत्यक्ष नाटक लिहिण्यापेक्षा चर्चाच अधिक. त्यावेळी मला अनेक प्रश्न पडायचे. कारण एकतर मी ‘एमए वुईथ मराठी’, त्यामुळे पूर्णपणे मध्यमवर्गीय ब्राम्हणी साहीत्य-संस्कृतीचे संस्कार डोक्यात फिट्ट बसलेले आणि दुसरे नुकतीच सरकारी नोकरी सोडून एका अमेरिकन ऑईल कंपनीत नोकरीला लागलेले. त्यामुळे कुटुंब आणि नातेवाईकाना कधीच परिचित नसलेली इंग्रजाळलेल्या वागणुकीची तऱ्हां आणि संस्कृती अंगीकारण्याची मला जबरदस्त हौस ! त्यामुळे माझ्याकडून ठराविक मध्यमवर्गीय साच्याचे भरपूर प्रश्न यायचे. ग्रुपमधले कुणीतरी माझ्यावर मध्येच शिक्कामोर्तब करूनही टाकायचे, “ही बुर्ज्वा आयडीयोलोंजी आहे !” माझा चेहरा पडायचा, अस्वस्थ वाटायचं. राजूला ते कळायचं. तो प्रेमळपणे पेशंटली माझ्या बोलण्याचे स्वरूप काय आहे ते समजावून सांगायचा.
माझ्यासारख्या अनेकांचा मार्क्सवादी विचारांचा पाया पक्का करण्याचे श्रेय राजूला जाते कारण आमची गाडी नेमकी कुठे अडकून राहिलीय हे त्याला बरोब्बर समजायचे. सोपी सोपी पुस्तकं तो मला वाचायला द्यायचा. रोझा लक्झेम्बर्ग असो वा अलेक्झांद्रा कोलांताय, त्यांची मराठी आणि इंग्रजीतली पुस्तकं तो आवर्जून माझ्यासाठी काढून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी मी लवकर आल्यावर देऊन चर्चाही करायचा. जगातल्या श्रमिक स्त्रियांच्या हक्काचा जाहीरनामा लिहिणारी क्लारा झेटकीन आणि श्रमिक स्त्रियांना बाळंतपणाची रजा मिळवून देणारी अलेक्झांड्रा कोलांताय आहे हे मला पहिल्यांदा राजुनेच सांगितलं. मराठी स्त्रीलेखिकांच्या साहित्याच्या निमित्ताने स्त्रीपुरुष नात्याविषयी माझ्याशी निर्मळ आणि मोकळेपणाने चर्चा करणाराही राजूच होता. त्याने आणि सुजाता गोठोस्करने स्त्रियांच्या प्रश्नावर ‘जाळण’ नावाचे नाटकही लिहिले होते. तो म्हणायचा तुमच्याशी चर्चा केल्यामुळे माझ्या स्त्रीमुक्तीबद्दलच्या जाणीवा समृद्ध होतात.
राजूच्या घरी जमणारे लोक कम्युनिस्ट पक्षांच्या प्रवाहांबाहेरचे, ‘मागोवा’ या मार्क्सवादी अभ्यास परंपरेतले होते. म्हटलं तर पारंपरिक कम्युनिस्टांपेक्षा वेगळे, खूप जास्त ओपन, आणि लवचिक अशा विचारांचे होते. राजीव कालेलकरसारखाच मागोवां परंपरेचा वारसा मानणारे भारत पाटणकर, अनिल सावंत, सुधाकर बोरकर, शहाद्याच्या आदिवासीमध्ये, श्रमिक संघटनेत काम केलेले रंजना कान्हेरे, विक्रम कान्हेरे, तर सखाराम बाईंडरच्या काळात आधुनिक व प्रायोगिक नाट्य परंपरेचा वसा घेतलेले, अविनाश कदम, क्रांती बांदेकर आणि शिवराम सुखी हे होते. राजूसहित या सगळ्यांना जवळ आणणारा, घट्ट जोडणारा एक जबरदस्त धागा होता तो म्हणजे ढसाळांपासून सुरु झालेली प्रस्थापितविरोधी बंडखोर कविता, लिटील मॅगेझीनची बंडखोर साहित्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून फुललेली आधुनिक लोककलेची परंपरा आणि पुरुषप्रधानतेचा ढाचा बदलला पाहिजे असं मानणारी आणि त्यासाठी रोजच्या आयुष्यात धोके पत्करण्याची हिम्मत ठेवणारी स्त्रीवादाची मांडणी. थोडक्यात सांगायचं तर पर्यायी कला, साहित्य, नाटक, संगीत आणि समतावादी फुले आंबेडकरवादी विचार हा तो धागा होता. या सगळ्या विषयाचं राजूने प्रचंड वाचन केलेलं होतं.
राजूच्या घरी चाललेली सामूहिक नाटयलेखनाची प्रक्रिया जवळ जवळ एक वर्षभर चालली. हे म्हणजे जरा अतीच झालं! कारण राजू कालेलकरला गप्पा मारण्याची भारी हौस. कित्येकदा चर्चा भलतीकडेच भरकटत जायच्या. पण खरंतर ते भरकटत जाणे अजिबात चूक नव्हतं कारण ती एका संक्रमण काळातली गरजही होती. ती नुसती भरकटलेली चर्चा नसायची तर एक सांस्कृतिक परिवर्तनाची प्रक्रिया होती. वैकल्पिक संसकृतीविचाराची सैधान्तिक तयारी होती. आणीबाणी नंतर निर्माण झालेल्या वादळाची घडी बसविण्याचा तो प्रयत्न होता. नुकताच ‘प्रतिशब्द ८०’ हा वैकल्पिक संसकृतीचा महोत्सव होऊन गेला होता. प्रस्थापिताना अनेक प्रश्न विचारले जात होते. डाव्या पक्षांची तोडमोड झाली होती. मुख्य म्हणजे ‘मागोवा’ तुटलं होत. ८०च्या दशकात पर्यायी कला-साहित्य, संस्कृती सन्दर्भात जी प्रचंड उलथापालथ घडून येत होती त्याचा मागोवा घेत पारंपरिक फॉर्मसना झुगारून देत, नव्या प्रक्रियेची, पर्यायी कलेची परंपरेची सैधान्तिक मांडणी करणारे ते विचारमंथन होते. या विचारमंथनातून आणि नव्या मुशीत घडलेले विचारच राजीव कालेलकर आणि मित्रांनी पुढे विस्ताराने मांडत नेले.
नंतर आम्ही सारे वेगवेगळ्या दिशांना पांगलो, थोडेफार मतभेद झाले तरी 80च्या दशकातल्या कला आणि संस्कृतीच्या संक्रमण काळात तयार झालेली ‘वैकल्पिक विचारांची’ बैठक, पुढच्या काळात आम्हा सर्वांनाच ठामपणे उभं करून गेली. आमच्यापैकी प्रत्येकाकडून वेगवेगळ्या फॉर्ममध्ये पर्यायी सांस्कृतिक मांडणी करण्याचा प्रयत्न झाला. मला आठवते, गणपती उत्सवाचे मोठे स्तोम माजू लागले होते. पर्यायी उत्सव आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी काहीतरी करुया म्हणून आम्ही राजूच्या घरी पुन्हा एकदा जमलो होतो. तेंव्हा आदिम टोळीबद्ध समाजातील गणपतीची कुळकथा सांगुया असे राजू म्हणाला. आम्ही जयंत गडकरी आणि डी डी कोसंबीची पुस्तके काढून त्यातले उतारे लिहून चित्रमय पोस्टर प्रदर्शन तयार केले. गणेशोत्सव हा ‘गणराज्य दिवस’ साजरा करायचे ठरवले. क्रांती बांदेकर आणि राजूने गणपतीची कुळकथा सांगणारे छोटेसे सडक नाटकही लिहिले ते नाटक आणि पोस्टर प्रदर्शन साऱ्या महाराष्ट्रभर फिरले.
राजूने ९०च्या दशकात ‘सकल’ साहित्य समेलनाच्या स्वरूपात पर्यायी मांडणी केली. थोड्या मतभेदातून विद्रोही संमेलनाची मांडणी भारत पाटणकरने केली, मीही स्वत: दलित बहुजनवादी स्त्रीवादाची मांडणी करू लागले. पुढे श्रमिक मुक्ती दलात राजूने पर्यायी सांस्कृतिक प्रश्नावर, स्त्रीमुक्तीच्या विविध भूमिकांवर राजूने भाष्य केले, लिहीले. ९० नंतर युवा भारत, विलास सोनावणे आणि त्याने चालविलेली मुस्लीम ओबीसींची चळवळ, अनेक आंबेडकरवादी कवी, मावा (मेन अगेन्स्ट व्ह़ॉयलेन्स एँन्ड अब्यूज) ही स्त्रीवादी विचारांना मानणारी पुरूषांची संघटना स्थापन करण्यात राजूचा पुढाकार होता. पुरुषांच्या स्त्रियांबाबत संवेदनशीलता वाढायला हवी असं राजूचं प्रामाणिक मत होतं. त्यादृष्टीने मावाचा ‘पुरूष स्पंदन’ हा अंक काढण्यासाठी खूप मेहनत घेतली. स्त्रीमुक्ती संघटनेच्या प्रेरक ललकारीत लेखन तसंच ‘परिवर्तनाच्या वाटसरू’ मध्ये अधूनमधूम लेखन करीत राहीला.
राजूचा चळवळीत नव्याने आलेल्या अनेक तरुण कवी, कलावंताशी सातत्यपूर्ण संवाद असायचा. अत्यंत माणुसकीपूर्ण संवाद हेच राजूचं वैशिष्ट्य. त्याला गप्पा मारायला सतत माणसं हवी असायची. त्यामुळे प्रचंड मोठ्या परिवाराशी राजूचे सौहार्दाचे संबध होते. अनेक वेळा खूपवेळ फोनवर बोलणा-या राजूला थांबवून मला कामाला जायचंय असं सांगितलं की तो हिरमुसायचा. मग आपल्या मनाला वाईट वाटून आपण परत फोन केला की स्वारी खूष. गप्पांच्या ओघात राजूने स्वतःला बदलण्यासोबतच आम्हाला सर्वांना स्वत:मध्ये बदलाची प्रक्रिया घडवायला भाग पाडले आहे.असा हा परममित्र राजू एक चालता बोलता संगणक होता. त्याच्या अपंगत्वाच्या काही मर्यादामुळे चळवळीतले कित्येक लोक त्याच्या घरी बसून योजना आखायचे. चर्चेच्या ओघात थोडा उशीर झाला तरी त्यांच्या जाणीवा सर्वांगाने विस्तारलेल्या असायच्या. त्यामुळे एवढच सांगायचं आहे की या सर्वसमावेशक जाणिवांच्या रुपात राजू आमच्या सोबतच आहे. नेहमीच राहील.
पूर्व प्रसिद्धी : जानेवारी २०१५ प्रेरक ललकारी (स्त्री मुक्ती संघटना )
Email- kundapn@gmail.com
राजीव कालेलकर लिखित ‘ हि व्यवस्था काय आहे ? ‘ पुस्तकाच्या खरेदीसाठी https://amzn.to/2RuiNqc ह्या लिंकला भेट द्या
प्रेरणादायी जीवन