भीम आर्मी : सर्वस्पर्शी तत्वज्ञानासह विधायक नकाराची गरज !

महेंद्र लंकेश्वर

पश्चिम उत्तरप्रदेशातील सहाराणपूर जिल्ह्यात , त्यातील घडकौली गावात दलितांच्या सामूहिक हत्येचे , त्यांची जवळपास शंभरावर घरे , झोपड्या जाळण्याचे , लूटण्याचे जे अमानवीय , भीषण कांड घडले त्यांच्या मुळाशी ठाकूर , राजपु्त , सरंजामी जमीनदार आहेत हे लपून नाही उघड आहे पण त्यांना पाठीशी घालून चिथावणी देणारे उत्तरप्रदेशचे भगवी कफनीधारी सरकार आहे हेही राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावर लपून राहिलेले नाही….

अर्थात दलित अत्याचाराच्या या घटना या देशात सुसूत्रपणे , संघटीतपणे , ना थांबता ,प्लँनिंगपूर्वक चालूच आहे.
दलितावरील अत्याचाराचा हा सिलसिला या देशात सनातन चालू आहे. या पार्श्‍वभूमीवर जातीय अत्याचाराच्या मुळाशी जी भौतिक , मानसिक कारणे असतात त्याचा वेध घेणे क्रमप्राप्त असते.
खैरलांजी अमानवीय हत्याकांड जमिनीच्या मालिकेत वरुन घडले म्हणजे गावात, वस्तीवर एकाकी राहणाऱ्या एकाकी दलित कुटुंबाला त्याचे एकमेव असणारे उपजीविकेचे साधन असणारी जमीन द्यायला जातसामंती मानसिकता नकार देते. वर ज्या गावात हे देशाला हादरवून टाकणारे क्रौर्य घडते त्या गावाला याच देशात आदर्श गावाचा पुरस्कार दिला जातोय….. ही कसली क्रूर चेष्टा केली जातेय…

जे दलितसमूह भौतिक गरजांच्या पूर्ततेसाठी लढत आहेत त्यांच्यावर जसा हा अत्याचार दिसून येतो तसे ज्यांच्या भौतिक गरजा थोड्याफार प्रमाणात पूर्ण झाल्या आहेत ते मानसिक गरजांच्या पूर्ततेसाठी उभे आहेत त्यांच्यावरही हा अत्याचार कायम आहे.

दर २८ मिनिटाला देशभरात एक जातीय अत्याचार घडतोय यावरून याची भयानक लक्षात यावी.

दलित अत्याचाराच्या कथा कितीही दिल्या तरी कमी पडतील .दलित अत्याचाराच्या कथा वाचण्याचा या लेखाचा विषय नाही.

या देशात हा जूलूम फक्त दलिताबाबतच घडतोय असं नाही तर इथे प्रत्येकाला वेगवेगळी ट्रीटमेंट आहे..
दलित -आदिवासींनी हक्क अधिकार मागितला की नक्षली कनेक्शन शोधले जाते….
मुसलमानांना आतंकवादी , दहशतवादी , देशद्रोही म्हणून कलंकित केले जातेय…
ख्रिश्चनांना धर्मांतरवादी म्हणून सर्टीफाय केले जातेय..
शीखांना खलिस्तानवादी म्हणून गप्प केले जातेय….
नवबौद्धांना आरक्षणाच्या कुबड्यावर जगणारे परजीवी म्हणून हिणवलं जातंय….

हे एक कलंकीकरण (Stagmanisation) आहे , ज्यातून विद्रोह करण्याची शक्तीच हिरावून घेतली जाते .या कलंकीकरणातून जी अवस्था येते ती खच्ची केलेल्या बैलापेक्षा वेगळी नसते.

तर पश्चिम उत्तरप्रदेशातल्या सहाराणपूर जिल्ह्यात नुकतेच एक दलित हत्याकांड झाले ,या हत्याकांडाचा घटनाक्रम घडकौली या गावापासून सूरू झाला .गावात दलित बहुसंख्य चमार आहेत .

गावात ठाकूर जमिनदारांचे सरंजामी वर्चस्व आहे हे वर्चस्व काही स्वाभिमानी दलित तरुणांनी मानण्यास नकार दिला परिणामी संत रविदास व बाबासाहेबांच्या पुतळ्यास काळे फासले गेले त्यावरून वातावरण खरे पेटले .संताप , क्रोधाची एक उष्णलहर देशभर पसरली.

सतीशकुमार यांनी चार वर्षापुर्वी या अन्यायाला प्रतिकार करत “भीम आर्मी” या विद्रोही दलित तरुणांच्या संघटनेची स्थापना केली होती.

या अन्यायाविरोधात घडकौलीतील काही चर्मकार विद्रोही तरुण पेटून उठले व भीम आर्मीत जॉईन झाले ही गोष्ट ठाकुरांच्या पथ्यावर पडली व त्यांनी घरे पेटवत दंगल माजवली. दलित तरुणांनी लगेच मोटारसायकल रँली काढत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

१३ मे या तारखेला दिल्लीतील उत्तरप्रदेश भवन समोर मोठ्या जमावाने प्रक्षुब्ध होऊन निदर्शने केली. भिम आर्मीने केलेल्या पुढाकारास राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय पातळीवर दलित बुद्धीजीवी , संघठना व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त समर्थन दिले , परंतु विशेष बाब अशी की भारतातील कोणत्याही दलित बहुजनांचे नेत्रुत्व सांगणाऱ्या पक्षाने , संघटनेने याचा निषेध केला नाही यावरुन ते किती सरंजामांच्या चापलूसीचे राजकारण करत आहेत याची कल्पना करता येते.

भीम आर्मी हा छोट्याशा गावातील अनुसूचित जातीच्या सुशिक्षित तरुणांचा एल्गार आहे , अस्मितेचा हुंकार आहे , ते काय करतात , ते काय करु शकतील याचे त्यांना भान आहे . ते जे करतील त्यातून येणारे परिणाम स्विकारण्याचे ,त्याची दायित्व घेण्याची त्यांना जाणीव आहे .डॉ.भिमराव आंबेडकर ,संत रविदासांना त्यांनी आपले प्रेरणास्थान बनवले आहे , परंतु आता ते याच शिकवणुकीनुसार कोणताही अन्याय , अत्याचार सहन करण्यास तयार नाहीत उलट ” जेव्हा सर्व उपाय संपतात तेव्हा शस्त्र उचलने नैतिक आहे ” हे “गुरुवाणी” तले गुरु गोविंदसिंहाचे वचनही त्यांचे प्रमाण बनले आहे …

भीमआर्मीच्या संदर्भात दलित पँथरसंबंधी चर्चेचे प्रयोजन

जातीय अत्याचाराच्या विरोधात आज जरी भीम आर्मी प्रयत्नरत असली तरी तिच्यासारखे प्रयत्न यापूर्वी दलित पँथर या विद्रोही तरुणांच्या संघटनेनेही महाराष्ट्रातही केले होते ज्याचे पडसाद देशभर उमटले होते .या पार्श्‍वभूमीवर दलित पँथर व भिमराव आर्मीच्या तुलनात्मक चर्चा देशभर सुरु झाली.

आज भीम आर्मीची चळवळ जातीय लढा देणारी असली तरी आणि तिचा द्रुष्टिकोण जातीअंतक सकारात्मक असला तरी,हे प्रयत्न मर्यादित अर्थाने आहेत ते या अर्थाने की “द ग्रेट चमार” या नावानेच त्यांची जातीय मर्यादा स्पष्ट होते.

आज भीमआर्मी असली तरी दलित अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आत्मसन्मानाच्या पूर्तीसाठी आक्रमक तरुणांचे एक संघटन महाराष्ट्रात १९७० च्या दशकात उभारले गेले ते म्हणजे दलित पँथर होय. देशभरात सातत्याने होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात प्रबळपणे उभ्या राहणाऱ्या संघटनेची गरज दलित पँथरने भागवली.

दलित पँथर परत मूळ जागेवर प्रस्थान झाली ,ती का व कशी झाली ?? तिचे योगदान काय ?? मर्यादा काय ?? तिने कोणत्या सर्वंकष आरिष्ठ्याला हात घालण्याचा प्रयत्न केला ?? तिच्या पदरी वैफल्य का आले ??कोणती कोंडी ते तरुण फोडू शकले नाहीत ?? हा प्रश्न एका जातीचाच आहे का ??

महापुरुषांच्या वारसदारांचा हा जातीय अभिनिवेश ठिक आहे ??
कोणत्या सर्वहारांचे नेतृत्व तुम्हाला करायचेय ?? या प्रश्नांचे आकलन सद्यस्थितीत भीमआर्मीच्या संदर्भात करणे आपल्याला आवश्यक आहे.

दलित पँथरच्या विद्रोहाची उद्दिष्टे व वाटचाल

दलित पँथरची स्थापना लोकशाही मध्यवर्तीत्व हे मूलभूत तत्व घेऊन झाली. १९७० नंतरच्या काळात देशात जातीय अत्याचाराच्या घटनांनी उच्चांक गाठला होता. यासंबंधीचा अहवाल तत्कालीन पेरुमल समितीने दिला आहे त्यातून जातअस्मितेचा नवा भडका उडाला. अशातच १९७२ ला वरळीला दंगल झाली तिथे सिद्धार्थ विहार येथे काही विद्रोही ९ जुलै १९७२ ला पहिली बैठक घेतली त्यानंतर १५ अॉगस्ट १९७२ ला दलित पँथरच्या संस्थापकापैकी एक असलेले राजा ढाले यांचा “काळा स्वातंत्र्यदिन” नावाचा लेख “साधना” या मासिकात छापून आला. या लेखाने विचारविश्वात प्रचंड मोठ्या प्रमाणात घुसळन केली व समाजाच्या मुख्य प्रवाहाला जोरदार मुसंडी देत आपली दखल घ्यायला भाग पाडले. यानंतर हजारो तरुण या आक्रमक विचारांकडे आकर्षित होऊ लागले, याला १९७२ च्या दुष्काळाचीही पार्श्वभूमी होती, गावखेड्यात उपजीविकेचे कोणतेही साधन नसलेला सुशिक्षित वैफल्यग्रस्त तरुण बाबासाहेबांच्या “शहरांकडे चला” या वाक्याला प्रमाण मानून शहराकडे स्थलांतरित होऊ लागला होता. पोटात भुकेची आग व डोळ्यात नवनिर्माणाचे स्वप्न जाणवणारा तरुण दलित पँथरची पॉवरस्टेशन बनला. यात काळात नायगाव, वरळी व पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा गावात दलित वस्तीवर सरंजामी लोकांनी टाकलेला सामाजिक बहिष्कार हे निमित्त कारण घडले. यातूनच २३ मे १९७२ ला दलित पँथरने आपला जाहिरनामा प्रसिद्ध करून आपल्या लढ्याची दिशा स्पष्ट केली. हा जाहीरनामा वाचल्यास आपल्याला दलित पँथरची ध्येय, उद्दिष्टे आणि रणनीती स्पष्ट होते. त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे

” दलितांचा मुक्तिलढा सर्वंकष क्रांती इच्छितो. भागश: बदल आम्हाला नको… आम्हाला आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांत वरिष्ठ स्थानांवर आमचे प्रभुत्व स्थापन करावे लागेल. आता आम्ही अल्पसंतुष्ट राहणार नाही. आम्हाला ब्राह्मण आळीत जागा नको. आम्हाला सार्‍या देशाचे राज्य पाहिजे. आमचे लक्ष्य केवळ व्यक्ती नसून व्यवस्था आहे. हृदयपरिवर्तनाने, शिक्षणातील उदारमतवादाने आमच्यावरील अन्याय, आमचे शोषण थांबणार नाही. आम्ही क्रांतिकारक समूह जागे करू, संघटित करू. या प्रचंड समूहांतील संघर्षामधून क्रांतीची लाट येईल. सनदशीर अर्ज, विनंत्या, सवलतीच्या मागण्या, निवडणुका, सत्याग्रह यामधून समाज बदलणार नाही. आमच्या समाजक्रांतीच्या कल्पना व बंड या कागदी जहाजाला पेलणार नाही. त्या मातीत रुजतील, मनात फुलतील, पोलादी वहानातून सणसणत अस्तित्वात येतील.

दलित पँथरची भुमिका आरपीआयच्या सौदेबाजीविरोधात आहे. आमचे आंदोलन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भूमिहीन, श्रमिक, गरीब शेतकरी, शेतमजूर व पीडित वंचित स्त्रियांसाठी आहे. हे सर्व आमचे मित्र आहेत. जमीनदार, भांडवलदार, सावकार, आणि त्यांचे दलाल व सरकार जे शोषणाच्या तत्वाचे समर्थन करतात आम्ही त्यांचे शत्रू आहोत. ब्राम्हणाच्या आळीला राहायला जाणे हा आमचा उद्देश नाही.

कोणतीही समाजव्यवस्था सामाजिक दर्जाची याचना, निवडणूक आणि सत्याग्रहाने बदलत नसते तर सामाजिक क्रांतीचा विद्रोही विचार आपल्या लोकांच्या मनात निर्माण होईल व ते क्रांतीप्रवण होतील त्याच दिवशी आमच्या दास्यत्वाच्या श्रुंखला तुटतील व सामाजिक बदल होईल.

माणूस म्हणून जगणे आमचा हक्क आहे आणि म्हणून आम्ही चित्त्याचा पवित्रा घेऊन लढू…!!!!!! ”

दलित पँथरच्या या जाहिरनाम्यामुळे तत्कालीन पँथर्स पुढे कोणकोणती ध्येय उद्दिष्टे होती हे स्पष्ट होते ती थोडक्यात पुढीलप्रमाणे मांडता येतील.
१) जातवर्गांताचे उद्दिष्ट सर्वस्पर्शी क्रांतिकारी तत्वज्ञानाच्या अधिष्ठानाशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही तर ते उभारण्याची गरज…
२) माजी अस्पृश्य जाती (सामाजिक सर्वहारा) व शेतकरी, शेतमजूर, कामगार व इतर ओबीसी वंचित हे (आर्थिक सर्वहारा) यांच्या क्रांतीदोस्तीची जी क्रांतिकारी आंबेडकरी व्यूहरचना होती तिला वास्तवात उतरवून पुढे नेणे.
३) भौतिक मुक्तीच्या सर्वंकष लढ्यासाठी सांसदीय मार्गावरच विसंबून न राहता आक्रमक क्रांतिकारी आंदोलन उभारण्याची आवश्यकता…
४)आरपीआयचे संसदीय राजकारण अपयशी झाले आहे व ते उजवीकडे व वळतावळता कधी उजवे बनू लागले हे समजून घेत त्याला नकार देत नवीन क्रांतिकारी पक्ष उभारण्याची गरज….
या काही महत्वपूर्ण गोष्टी या जाहीरनाम्यात दिसून येतात.

एवढे महान उद्देश घेऊन दलित पँथर्स आंदोलनात उतरले तेव्हा देशभरात या उद्दिष्टाची, विचारविश्वाची व उद्दिष्टपूर्ती साठी आक्रमक पवित्र्याची घमासान चर्चा झाली.

सम्यक लढ्याचे शत्रू ब्राम्हणाच्या व भांडवलशाही आहे असे बाबासाहेबांनी म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर दलित पँथरनेही जी व्यूहरचना, डावपेच, प्रचारसंघठन व जनआंदोलने करावी लागत होती तीही दलित पँथरने उभारल्याचे आपल्याला दिसते.

परंतु जातवर्गांताचे उद्दिष्ट या तरुणांनी लोहियाप्रणित लोकशाही समाजवादात जसे पाहिले तसे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पारंपारिक ऐतिहासिक भौतिकवादी तत्वज्ञान कर्मठ वर्गवादातही पाहिले असे रावसाहेब कसबेंनी “आंबेडकर आणि मार्क्स” या पुस्तकात दाखवले परंतू या तत्वज्ञानाच्या अपुरेपणातून व परस्परवर्जकतेतून दलित पँथर फुटली असे कॉ. शरद पाटील यांनी “दलित पँथर बद्दल माझी भूमिका :दुसऱ्या तत्वज्ञानात्मक विद्रोही गरज” या दाखवले आहे, कारण याच अपूरेपणामुळे त्याचा आंबेडकरवादाशी समन्वय होऊ शकत नव्हता…. परिणामी याच शोधाच्या वैफल्यातून हे विद्रोही तरुण आपल्या प्रस्थानबिंदूकडे आंबेडकरवादाकडे वळणे अपरिहार्य होते.

भारतीय संविधानाने २२.५ %असलेल्या अनुसूचित जाती जमातींना आरक्षण दिले. मंडल आयोगाने ५२ % असलेल्या सर्वधर्मीय ओबीसीना आरक्षण देण्याची शिफारस केल्यामुळे भारतीय समाजातील जातीव्यवस्थेच्या बळींची संख्या ७४.५ % होते म्हणजे हा देश मूलत: जातीव्यवस्थाक असून नंतर तो वर्गव्यवस्थाक आहे हे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे म्हणून जात्यंताशिवाय या देशात समाजवाद येणार नाही हे बाबासाहेबांचे भाकीत खरे ठरले आहे.

या पार्श्वभूमीवर भीमआर्मीचा अभ्यास करताना हेही लक्षात आले की जातीय अत्याचाराच्या पटलावर भिम्आर्मीला मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा मोठ्या प्रमाणावर असला तरी त्याला क्रांतिप्रवण करणे हेच तिच्या समोरचे सर्वात मोठे आव्हान आहे.

कोणत्याही तत्वज्ञानाचे उद्दिष्ट असते की पूर्वीच्या प्रयत्नानंतरही ज्या काही समस्या तशाच पडून राहिल्या आहेत त्यांना नव्या दृष्टीकोनाने उचलने, समस्येला अनित्यात्मक भावाने बघणे व त्या सोडवणुकीसाठी सातत्याने प्रयत्नरत राहणे.

दलित पँथरला भौतिक लढ्याची जाण व समज होती म्हणून तिने या प्रश्नाला हात घातला पण भौतिक लढ्याच्या गरजेची पूर्तता झाली नाही त्यामुळे ते आंदोलन नकारात्मकतेकडे वळले.
या संदर्भात भीमआर्मीची समीक्षा करणे व तिला काही उपाय सुचवणे आपल्याला आवश्यक बनते.

भीमआर्मीसाठी विधायक नकारासहीत भौतिक लढ्याची गरज

सामाजिक सर्वहारा व आर्थिक सर्वहारांच्या क्रांतिकारी ध्रुवीकरणाशिवाय भारतातील जातीअंताची समाजवादी क्रांती संभव नाही हे सर्वप्रथम भिम्आर्मीने समजून घेणे अत्यावश्यक आहे किंबहुना ही क्रांतीची पूर्वशर्त आहे. तुम्हाला जर संपूर्ण क्रांतीचे नेतृत्व करायचे नसेल तर “द ग्रेट चमार” हा एकजातीय अभिनिवेश ठिक आहे पण समग्र सर्वंकष क्रांतीलढाईला सर्व शस्त्रास्त्रांसहित उतरायचे असेल तर मात्र पहावे लागेल सामाजिक सर्वहारामधले किती पासी, किती जाटव, किती वाल्मिकी किती मेहतर आले?? जर येत नसतील तर प्रबोधनात कोणती कमतरता आहे??? हे तपासून, समीक्षा करून पाहावे लागेल कारण हा एकट्या हा प्रश्न जसा महाराष्ट्रात एकट्या महारांचा नाही तसा उत्तरप्रदेशात एकट्या चमारांचा नाही तर सर्व सामाजिक सर्वहारांचा आहे. ही परिस्थिती ना कॉंग्रेसने बदलली ना समाजवादींने बदलली याचे भान कांशीरामजींना होते तशा प्रकारचे प्रयत्न त्यांनीही केलेत पण मायावतींच्या कालखंडात जातीय अत्याचाराची तीव्रता कुठे कमी झालीय याची नोंद नाही.

सामाजिक सर्वहारांच्या एकजुटीला हात देत असतानाच आर्थिक सर्वहारातून नवे नेतृत्व घडवावे लागेल. या निम्न ओबीसी जाती, शेतकरी जातीतील निम्नस्तरीय, शेतमजूर, कामगार व सर्वजातीय पीडित स्त्रीयांना या लढ्यात उतरावे लागेल.

आर्थिक सर्वहारांना साथ द्यावी लागेल त्यासाठी भौतिक साधनांच्या मुक्ततेसाठी जमिनमुक्तीचा लढा उभारावा लागेल. असा दलित पँथरसारखा गायरान किंवा पडीक जमिनीचा न देता उपजाऊ जमिनीचा द्यावा लागेल. सामाजिक सर्वहारा व आर्थिक सर्वहारांना हे कॉमन उद्दिष्ट, लक्ष्य द्यावे लागेल.

ही गुलामी निमसरंजामी जमिनदारीतून आली आहे. ठाकूर, राजपूत हे मिरासदार शेतकरी जातीचे उच्चभ्रू आहेत. जमिनीच्या अधिपत्यातून हे सत्तेचे केंद्रीकरण मर्यादित लोकांकडे झाले आहे. जमिनीच्या प्रभुत्वातून ते बलशाली व क्रुर बनले आहेत. सरंजामी व्यवस्थेतून ही क्रुरता येत असते.

या प्रकारे दिला जाणारा लढा जातीच्या भौतिक पायाला हात घालेल. जुने सरंजामी उत्पादन साधनसंबंध उखडवून टाकण्यास मदत करेल. नव्या उत्पादनशक्ती नवे उत्पादनसंबंध निर्माण करतील व यातून दमनकारी निमसरंजामी व्यवस्था संपायला मदत होईल व स्वातंत्र्य, समता मित्रतेच्या दिशेने आपण जाऊ शकू.

अन्यथा काल एक दलित पँथर होते आज एक भीमआर्मी आहे परत पुन्हा एक दलित पँथर व पुन्हा एक भीमआर्मी निर्माण होईल ही एक एन्डलेस स्टोरी होईल…!

हे सुद्धा वाचा…

जात्योन्नती, जातीयुद्ध, जातीअंत: पुढील दिशा काय असेल !

Leave a Reply