हु किल्स सुमित …? -भागवत तावरे

विषमतेचा अनभिज्ञ प्रवास जातीय ते आर्थिक असाही होतोय का ?

तो इंजिनियर होणार अन ती देखील , नव्या पिढीचे नेतृत्व करताना लग्नासारखा निर्णय घेणारे ते दोघे शारीरिक व मानसिक सदृढ . तेरे मेरे बीच मे असणारे बंधन त्यांनी डॉ . आंबेडकरांच्या कायद्याकडून संमत करून घेतले .दोन मनातील रेशीम बंध त्यांनी रेशीम गाठीत बांधून देखील घेतले . व्यवस्थेत संपन्न जीवन जगावे म्हणून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करायचे होते म्हणूनच भाग्यश्री – सुमित वाघमारे महाविद्यालयात आलेले . तथागतांच्या साक्षीने आरंभ झालेले वैवाहिक जीवन कुठल्याच अडथळ्याशिवाय यशस्वी होईल असे वाटत असताना धारधार शस्त्र अनपेक्षित पणे समोर आले अन सुमितचा जीव घेऊन गेले . ज्याच्या सोबत जीवन अन जगण्याचे स्वप्न जगले त्याचा मृत्यू पाहण्याचा दुर्दैवी प्रसंग त्या रमाईच्या लेकीवर व जनतेच्या डोळ्यावर ओढवला . कधी काळी जातीचे बंध बांध जपणारी व्यवस्था काल आर्थिक विषमतेवरून रक्ताळलेली ? मात्र कालच्या घटनेतील विषमता जातीय नाही तर पैसा अन प्रतिष्ठेदरम्यानची. बाबासाहेबांच्या समतेला जातीवरून नाही तर आता आर्थिक विषमतेवरून देखील परीक्षा द्यावी लागणार आहे कारण स्वजातीय असणारा भाऊच तिचा खून करण्यास टपला आहे .
तिच्या डोळ्यात जी कोरड होती ती तिच्या शरीराचा भाग नाही तर समाजाचा भोग होती . प्रगतीच्या नावाखाली आम्ही जीन्स झालेलो असलो तरी आमचे जीन्स अद्याप किती बुरसटलेल्या स्थितीत आहेत , हे लक्ष्यात घेतले पाहिजे . म्हणजे कधीकाळी मधुसुदन जो बहिणीला म्हणजे सुभद्रेला अर्जुनाच्या रथात पाठवणारा आमच्या पुराणात सापडतो मात्र त्या पुराणांना नाकारत मानवतेच्या समानतेसाठी पुरोगामी झालेल्या समाजात बालाजीने मात्र बहिण भाग्यश्रीची पाठवणी नाही तर तिच्या नवऱ्याची कायमची पाठवणी करतो . याच वेळी आम्हाला विचार करावा लागेल कि कालच्या हत्येचा घटनेच्या पलीकडे जाऊन सामाजिक पंचनामा केला पाहिजे . मुलींनी आपला नवरा स्वत निवडला याचा राग मनात धरून हत्या झाली म्हणावी तर समाजात अनेक प्रेमविवाह समाजमान्य झालेले आहेत . मुलींनी निवडलेले अनेक जावई वधुपित्याकडून बी लेट का होईना स्वीकारले गेले आहेत . म्हणून कुठल्या एका घटनेवरून पूर्ण समाज आरोपी ठरवणे ” सयुक्तिक ठरणार नाही . म्हणजे आंतरजातीय विवाह देखील समाजमान्य नसले तरी शेकडो आंतरजातीय विवाह समाजआश्रित झालेले आहेतच , मात्र एखादा सुमित किवा एखादीच आयुषी कशी बळी ठरते यासाठी काय जबाबदार आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे . कुटुंब संमतीशिवाय होणारे विवाह त्या कुटुंबास आपला अवमान वाटणे साहजिक आहे , जेव्हा लेकरांना हाताच्या फोडावनी जपायचे अन आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय कुटुंबास विश्वासात न घेता घ्यायचा हे देखील असह्य होणारेच , मात्र त्यामुळे हत्या समर्थनीय होऊ शकत नाही . जिथे आंतरजातीय विवाह समाजमान्य होत आहेत तिथे जातीतल्या मुलाला पती म्हणून निवडणे का पटू नये . ज्याने खून केला तो बालाजी देखील शिक्षित मग त्याने शिक्षणातील आधुनिकता का बळी द्यावी अन बहिणीचे कपाळ पुसताना सुमितचा बळी का घ्यावा ? चर्चेचा मागोवा घेतला तर तो दारू पीत होता अन त्याला त्याच्या मित्राने तुज्या बहिणीने कसे लग्न केले म्हणून डिवचले , ज्यामुळे त्याचा राग अनावर अन स्वाभिमान जागा झाला , च्या नंतरची हत्या करण्यात मग त्याला कोण सहआरोपी ठरले , व्यसन का संगत ? समाजाने याचा देखील विचार केला पाहिजे कि आपली संतती कुठल्या आचार विचाराच्या संगतीत वाढत आहे . कारण कुठल्याच एका घटनेचा निकष सर्वमान्य व सर्व घटनेसाठी कारणी धरता येणार नाही . सुमित ची हत्या जातीय असमानतेतून नाही तर आर्थीक विषमतेच्या शल्यातून झालेली आहे . प्यार झुकता नही किवा एक दुजे के लिये वाल्या पिढीची दुसरी आवृत्ती स्वतलाच हिरो समजत असताना मै तेरा खून पी जाउंगा वाली बनू कशी शकते . कौटुंबिक अनुमोदनाशिवाय झालेली विवाह असंख्य आहेत अगदी गरीबातल्या गरीबात आहेत मात्र शहराच्या परिघात शिकलेली क्लास वन वृत्ती आरुषी हत्याकांड करते कशी ते आमच्या दिल्लीने पाहितलेले आहे . आपल्या लेकराने प्रेम करू नये असे वाटणारा पालक कुणी असू शकतो का ? मात्र आपल्या पाल्याने आपली परवानगी घ्यावी पालक म्हणून लेकराने केलेली निवड आम्ही पडताळली पाहिजे , असे वाटणे गैर नाही . म्हणूनच कालच्या हत्येला सामाजिक कंगोरे देता येत नाहीत प्रत्येक घटनेची प्रासंगिक भिन्न कारणे असतात , म्हणून ठरवून कुठल्या निकष मापदंडाखाली घटनेकडे पाहणे अपराध ठरतो .
घटनेवरून चर्चेचा सूर व्यवस्थेला प्रभावित करत असतो , समजा कालच्या घटनेत विवाह आंतरजातीय असता तर आरोपी भावाकडे मुलीच्या कडून जातीय चेश्मे लावून आम्ही पाहितले असते अन आरोपी मुलाच्या जातीच्या नावाने खडे देखील फोडले असते. मात्र कालच्या घटनेतील दोन्ही एकाच जातीचे असल्याने हत्या जातीय विषमतेच्या परिघात येत नाही तर आर्थिक विषमतेतून घडलेली आहे , हे मान्य करावे लागते . मुलीचा वृत्तवाहिनीवरचा जबाब पाहितला तर तिने घेतलेली नावे नात्यातली आहेत , त्यांना सदरील निर्णय आवडलेला नव्हता म्हणूनच त्यांना अनेकदा मारण्याचा प्रयत्न झालेला होता ? एव्हाना जेव्हा पोलीस प्रशासनाकडे भाग्यश्री व सुमित ने संरक्षण मागितले तेव्हा त्यांच्या विरोधात राजकीय प्रेशर होता म्हणून मदत मिळाली नाही असे रडताना भाग्यश्री म्हणाली . जीवाच्या आकांताने रडणारी भाग्यश्री मला न्याय मिळाला पाहिजे असे म्हणते तेव्हा कोण न्याय देणार हा मोठा प्रश्न ठरतो . तिच्याशी विवाह करण्याची कुण्या तिसऱ्याची इच्छा होती काय ? तिच्या भावाकरवी हत्या करवून घेणारी , उकसवनारी शक्ती देखील कटघऱ्यात उभी झाली पाहिजे . माझ्या भावाला फाशीला लटकवा असे म्हणणारी बहिण उभ्या महाराष्ट्राने पाहितली आहे . हत्या कुठली सैराट चित्रपट प्रकारची नव्हती तर एकाच जातीतलेच नाही तर कौटुंबिक जवळीक असलेल्या लोकांनी घडवून आणलेली ती हत्या आहे म्हणूनच तिची बातमीदारी निर्दोष होणे देखील गरजेचे होते जे झालेले नाही .

सैराट झाला मिडिया

आमच्या सकट काहींनी सदरील हत्येला सैराट ची किनार दिली , ती बिलकुल चुकीची आहे . भाग्यश्री ने सुमित शी विवाह करू नये असे वाटणारी मानसिकता जातीय नाही तर आर्थिक संपन्न असणारी व गरिबीची घृणा करणारी वृत्ती आहे . आम्हा सर्वांना टी आर पी हवा असतो , डोळ्यातून वाहणाऱ्या आसवात देखील आम्ही ब्रेकिंग शोधत असतो . बातमीदारी करतो का स्पर्धा ? याचे भान विसरून कधी कधी उध्वस्त झालेल्या माणुसकीचा बाजार करत असतो . समाजातील बघ्यांना जश्या आम्ही शिव्या घालतो तेव्हा आम्ही देखील उध्वस्त आयुष्याची मार्केटिंग कशासाठी करत असतो याचा देखील विचार करणे गरजेचे असते . कालच्या घटनेत फक्त मुलगा पटत नव्हता म्हणा किवा भाग्यश्री ने अमुक शी विवाह करावा या आग्रहात सुमित संपवला गेला आहे . मात्र आम्ही घटनेला चक्क सैराट चे लेबल लावून जातीय सरंजाम दाखवण्याचा यत्न केला मात्र वास्तवात असे काहीच नव्हते . पाटलाची पोरगी व मागास जातीतील मुलगा म्हणून सैराट मध्ये झालेली हत्या अन सम जातीतल्या सुमितच्या हत्येत समतुल्य होऊच शकत नाहीत मात्र आम्ही अनेकांनी सैराट च्या लेबलने बातमी चालवली – खपवली ज्याची आम्ही माफी मागितली पाहिजे

लेखक दैनिक लोकाशा येथे कार्यरत उपसंपादक आहेत

Leave a Reply