रात्र कितीही असू दे वैऱ्याची घनघोर
मी शाबूत ठेवीन तू हातात दिलेला कंदील
वादळे कितीही येऊ दे अंताची अजस्त्र
मी पुसत राहील कंदीलाच्या काचेवरील काजळी
तू विणून दिलेल्या तात्विक रुमालाने
तू वापरलेल्या शाईचा वास आहे ज्याला
तेच रॉकेल टाकेल मी माझ्या कंदिलात
तू मास्तर झालास
अन् तुझ्या खडूने उजळवलेस आयुष्य
हजारो वर्षे धूळ साचलेल्या फळ्याचे
तू डॉक्टर झालास
अन् बंडखोरीचे इंजेक्शन शक्तिशाली
टोचलेस माझ्या सहिष्णू नसांनसांत
जुलूमाच्या मगरमिठीत सर्वंकष
जेव्हा जेव्हा आम्ही वेढल्या गेलो
तेव्हा तूच खरा सेनापती झालास
मानवमुक्तीच्या लढ्याचा
गेल्या शतकाने जेथे कूस बदलली
तेथेच बदलत गेले आपल्या दुष्मनाचे स्वरूप
त्याने अडॉप्ट केलेले नवे नवे डावपेच
आम्ही भुलणार नाही तरीही
हा चक्रव्यूह भेदण्याचा मार्ग
जो शिकवून ठेवलायस तू
माझ्या जन्मापूर्वीच
बाबा,
ज्यांनी तुझे तळे राखले
तेच पाणी चाखत राहीले
त्यांना कधी कळलाच नाही
पाण्याच्या चवदारपणाचा अर्थ
आता आम्ही बदलू तळ्याचे राखणदार
आणि अपॉईन्ट करण्याआधी मेडिकल करू
शोधू तुझे खरे अंश त्यांच्या रक्तात
निराशा, स्वार्थ अन् दुफळीच्या प्रतिरोधात
अमर राहोत तुझी संघर्षप्रवण जनुकं
अखंडित राहो माझ्यात निरंतर
तुझी प्रज्ञा, शील करूणेची भक्कम अनुवंशिकता
समतेच्या जिंदाबाद बुलडोजरने कोसळोत
शोषणकर्त्या जुन्या गढ्या अन् नवे टावर्स