संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कार्यरत कॉम्रेड शांताबाई रानडे यांचे निधन

  •  

टीम असंतोष

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) च्या पुण्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्या कॉ. शांताबाई मधुकर रानडे यांचे दि.5 डिसेंबर रोजी सायंकाळी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे एक मुलगी सुषमा दातार, जावई, डॉ.अभय दातार आहेत.

त्यांचे वडील कै. गणेश रामचंद्र साठे हे साठे बिस्कीट कंपनीचे संस्थापक आणि नामवंत कारखानदार होते. शांताबाईंचे शिक्षण एस.एन.डी.टी महाविद्यालयात झाले. महाविद्यालयीन काळात त्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्या आणि मार्क्सवादाकडे आकर्षित झाल्या. १९४७ पासून मृत्युपर्यंत त्या भाकपच्या सक्रिय सदस्य होत्या. पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या त्या काही काळ सदस्य होत्या. कॉ. श्रीपाद अमृत डांगे, भाई विष्णुपंत चितळे, कॉ. ए.बी. बर्धन, कॉ. गीता मुखर्जी आदिंसोबत त्यांनी काम केले.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तीचा सत्याग्रह, बेळगाव सत्याग्रह यात त्यांचा सहभाग होता आणि त्यासाठी त्यांनी तुरुंगवास देखील भोगला. तसेच पक्षाच्या विविध आंदोलनांदरम्यान देखील त्यांना अनेक वेळा तुरुंगवास झाला. कॉ. रानडे यांचा भारतीय महिला फेडरेशन, श्रमिक महिला समिती आदि विविध महिला संघटनांच्या कामात सक्रीय सहभाग होता. तसेच पुण्यातील विविध डाव्या लोकशाहीवादी संस्था-संघटनांच्या कार्यात त्यांचा सहभाग होता. गेली अनेक वर्ष पुण्यात आयोजित होत असलेल्या लोकशाही उत्सवाच्या आयोजनात त्या पहिल्यापासून सहभागी होत्या.

संयुक्त महाराष्ट,गोवा मुक्ती संग्राम चळवळीत कार्यरत असलेल्या लोकांची माहिती ते निधन पावल्यानंतर मिळते.त्यांच्या कार्याचे दस्तावेजीकरन होण्याची गरज आहे .

शांताबाई या रशियन भाषेच्य़ा अभ्यासक होत्या. त्यांनी मॉस्को विद्यापीठातून रशियन भाषेच्या अध्यापनाचा अभ्यासक्रम पुर्ण केला तसेच पुणे विद्यापीठातून रशियन भाषेत एम.ए केले. पुण्यात त्यांनी काही काळ रशियन भाषेचे अध्यापन केले. नामवंत रशियन कादंबरीकार कॉन्सटांटिन पाऊस्तोवस्की यांच्या एका कादंबरीचा मराठीमध्ये ‘सागराचा जन्म’ हा अनुवाद केला होता. या अनुवादासाठी त्यांना सोव्हिएट लँड नेहरु पुरस्कार मिळाला होता. या बरोबरच त्यांनी इतर अनेक पुस्तिका लिहिल्या आणि अनेक पुस्तकांची भाषांतरे केली. महाराष्ट्र भाकपच्या युगांतर या मुखपत्रासाठी त्या नियमितपणे लेख अनुवादित करीत असत.

  •  

One Comment

Leave a Reply

%d bloggers like this: