ग. दि. माडगूळकर आणि आजचा काळ – डॉ.दिलीप चव्हाण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जेव्हा सामाजिक समरसता मंचाची १९८३-मध्ये स्थापना केली तेव्हापासून दीर्घकाळ समरसता मंचाचे लक्ष्य हे मुख्यत: महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राहिलेले आहेत. फुले आणि आंबेडकरांच्या परंपरेतील आणखी एक नाव हे छत्रपती शाहू महाराजांचे आहे. परंतु, संघाने दीर्घकाळ शाहू महाराजांच्या बाबतीत काही स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. याला अनेक करणे असू शकतात. तूर्तास हा मुद्दा बाजूला ठेवू.
असे असले तरी विशिष्ट अशा कुजबुज पद्धतीने शाहू महाराजांबाबत एक विशिष्ट अशी धारणा ही निर्माण करण्याचा प्रयत्न हा सदोदित महाराष्ट्रातील अभिजनांकडून सुरूच होता. आम्हाला याचा प्रत्यय एका मित्राच्या सत्यशोधक पद्धतीने आयोजित केलेल्या एका लग्नात आला. या लग्नात जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांच्या प्रतिमा दर्शनी ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. तेव्हा संघाच्या एका पूर्णवेळ कार्यकर्त्याने जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमांविषयी पसंती दिली; परंतु छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतीमेविषयी नापसंती व्यक्त केली. त्यांचे आक्षेप ऐकून आम्ही अगदी चक्रावून गेलो!
छत्रपती शाहू महाराजांविषयी विविध अपधारणा पोसण्याचे काम अर्थातच सामाजिक समरसतेची स्थापना करण्याच्या अनेक वर्षांपूर्वीपासून महाराष्ट्रातील सांस्कृतिक अभिजनांकडून सुरू होते.

ग. दि. माडगूळकरांनी छत्रपती शाहू महाराजांविषयी दिलेल्या एका भाषणाचा वृत्तांत नुकताच आमच्या वाचनात आला. हा वृत्तांत नोंदवून ठेवला आहे भाई माधवराव बागल यांनी.

आता बरेच जण म्हणतील कोण हे भाई माधवराव बागल? तर या प्रश्नाचे उत्तर आम्ही देणार नाही. आज कोल्हापूरातील लोकही कोण हे बागल, असे विचारायला कमी करणार नाहीत, तिथे विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या प्रदेशातातील बापड्यांनी विचारले तर काय आश्चर्य? ज्याचे-त्याचे अ/ज्ञान ज्याच्या-त्याच्या कडे! तरीही बागलांविषयी अगदी थोडीफार माहिती ओघाने इथे येईलच!
कोण हे ग. दि. माडगूळकर? असा प्रश्न विचारून कुणीही आपले अज्ञान प्रदर्शित करू इच्छित नसणार. माडगूळकरांविषयी फार माहिती नसली तरी त्यांच्या जन्मजात श्रेष्ठत्वामुळे त्यांच्याविषयी आदरार्थी भाव चेहऱ्यावर आणणारे आपल्या अवतीभोवती काही कमी नाहीत! माडगूळकरांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सांस्कृतिक अभिजनांनी माडगूळकरांच्या स्मृतीला आवर्जून जागविले आहे. लवकरच भाई माधवराव बागल यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्ष सुरू होणार आहे. पण याची जाण कुणाला आहे?
भाई माधवराव बागल हे ग. दि. माडगूळकरांचे समकालीन. माडगूळकरांविषयीची ही आठवण बागलांनी नोंदवून ठेवली आहे. बागल हे सत्यशोधक समाजाचे जातिअंताची भूमिका घेणारे पुढारी. जोतीराव फुल्यांप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकांचे निस्सीम चाहते! फुल्यांच्या पुतळ्यासोबतच डॉ. आंबेडकरांचा पहिला पुतळा त्यांनीच १९५०-मध्ये कोल्हापूरातील बिंदू चौकात दोन सामान्य माणसांच्या हातून बसविला होता.
कोल्हापूरात दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या जयंतीच्या कार्यक्रमात एकदा ग. दि. माडगूळकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाचा वृत्तांत बागलांनी नोंदवून ठेवला आहे. त्यांच्या शब्दांत हा वृत्तांत असा:
“मुख्य पाहुणे होते प्रसिद्ध साहित्यिक श्री. ग. दि. माडगूळकर, उच्च वर्णियातले. त्यांनी आपल्या भाषणाला साहित्याचा रंग चढवला. चढ उतार आवाजाने श्रोत्यांवर चांगलीच छाप पाडली व आपल्या विचाराला ब्राह्मणी धर्माला पोषक ठरतील अशा काही गोष्टी शाहूंच्या जीवनातून शोधून शाहूंना समाज व धर्म क्रांतिकारकाऐवजी अंधश्रद्धेचे पोषण करणारे, धर्माभिमानी असे रंगवले. त्यांच्यावर ब्राह्मणी धर्माचाच शिक्का मारला. खऱ्या पुरोगामी वृत्तीच्या शाहूंना दडवण्याचं जन्मजात कौशल्य त्यांनी आपल्या प्रतिभेने दाखवले.”
बागलांची १६ नोव्हेंबर १९७२ च्या इंद्रधनुष्यमध्ये या भाषणाला प्रतिक्रिया अशी आली:
“व्याख्यानांत दोघांच्या [दुसरे व्याख्याते म्हणजे सभेचे अध्यक्ष : दादासाहेब रुपवते] जन्मजात संस्कारामुळे व जीवनातल्या उद्दिष्टांमुळे उघड उघड फरक दिसून आला. ज्या विचारांमुळे, आचारामुळे, श्रद्धेमुळे व परंपरेमुळे उच्चवर्णीयांचे वर्चस्व टिकून राहील अशाच गोष्टींचा शोध महाराजांच्या जीवनातून हुडकून तो आदर्श माडगूळकरांनी मोजक्या शब्दात सांगितला व आपणही शाहू महाराजांचे एकनिष्ठ भक्त कसे आहोत हे सिद्ध केले.
शाहू महाराज मूर्तीपूजक होते. मीही मूर्तिपूजक आहे. शाहू महाराज हिंदुधर्माभिमानी होते. मीही हिंदू धर्माचा अभिमानी आहे….”
बागल हे स्पष्टवक्ते होते. कोल्हापूरातील शाहूभक्त हे कसे बोलके भक्त होते आणि खऱ्या शाहूचे वैरी होते हे दाखविण्यापासूनही ते चुकले नाही. बागलांनी लिहिले:
“शाहू चरित्राला अनिष्ट वळण देऊन पद्मश्री प्रसिद्ध साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांनी त्यांना समाजक्रांतिकारकातून बाहेर काढले…या माडगूळकरांना शाहू जयंतीच्या संयोजकांनी मुद्दाम बोलावून आणले होते. सारे बोलके भक्त. खऱ्या शाहूंचे वैरी. म्हणून मी म्हटलं शाहू महाराजांचे समाजक्रांतिकारी कोल्हापूर आता उरलं नाही. प्रतिगाम्यांचे केंद्र बनले आहे.”
इंद्रधनुष्यमध्ये जी प्रतिक्रिया बागलांनी दिली त्यात त्यांनी शाहू महाराजांच्या नवसारीत (गुजरात) १४ डिसेंबर १९१८ रोजी दिलेल्या भाषणाची साक्ष काढली. या भाषणात व्यक्त केलेल्या सर्व मतांशी आज सहमत असण्याची काहीही आवश्यकता नाही. तसे पाहू जाता आपण आज कुणाशीशी पूर्णार्थाने सहमत होण्याची आवश्यकता नाही. चिकित्सा करीत आपण ज्ञानव्यवहार पुढे नेला पाहिजे.
आर्य धर्म परिषदेच्या ११-व्या अधिवेशनात शाहू महाराजांनी जे अध्यक्षीय भाषण केले ते मूळापासून वाचणे आवश्यक आहे. हे भाषण अगदी सहज उपलब्ध नसल्यामुळे या भाषणातील अंश इथे देत आहे:
“मनुष्याचे बुद्धीस नीचपणाप्रत नेणारी हलक्या प्रकारची मूर्तीपूजा फार वाढली. त्या मूर्तीचे पूजक आपणांस पवित्र म्हणवून घेऊं लागले….मनुष्य उपजल्यापासून तो मरेपर्यंत त्यांचेकडून निरनिराळे रुपानें पैसे मिळविण्याकरीतां, व्रतें, दानें वगैरे विषयीचे ग्रंथ तयार केले गेले, इतकेंच नव्हें तर मेल्यावरही मृतास पोंचविण्याकरीता म्हणून श्राद्ध, म्हाळ, दान वगैरे मिळावे याकरीता गरूड पुराणासारखे गारुडी ग्रंथ तयार झाले. याप्रमाणे अज्ञान्यांच्या पैशावर ब्राह्मण म्हणविणारांची खूप चंगळ उडाल्याने ब्राह्मणांतील विद्या नष्ट होत चालली. आपले व आपल्या संततीचे तथास्थित चालले पाहिजे या बुद्धीनें ब्राह्मणेतरांचीही विद्या त्यांचेकडून बंद करण्यात आली. पुढे फल ज्योतिषशास्त्र वाढवून निरनिराळ्या ग्रहांची भीती घालून पैसे उपटण्याच्या युक्त्या निघाल्या. अमुक दिवस चांगला व अमुक दिवस वाईट, अमक्या दिवशी प्रवास करावा, लग्न, उपनयन वगैरे अमुक मुहूर्तावर व्हावे, अशी थोतांडे काढून अनेक वेडगळ धर्म समजुतींचा पगडा जनसमाजावर बसविला गेला. ‘उपाध्याय सांगेल ती पूर्वदिशा व भट सांगेल ती अमावास्या’ असे झाल्याने भट सांगेल तसे निमुटपणे वागणें हा आपला धर्म आहे व यानेच ईश्वर प्रसन्न होतो व आपले कल्याण होते अशी ब्राह्मणेतरांची समजूत झाली व निव्वळ नंदि बैलाचे स्थितीस आले….युरोपांत अमेरिकेंत व जपानांत समानतेचे तत्त्व प्रचारांत असल्यानें एकाच कुटुंबांत भाऊ-भाऊ नवरा-बायको वगैरे भिन्न धर्मांचे आढळतात. तसाच प्रकार नवरा आर्यसमाजी तर बायको इतर धर्माची किंवा बायको आर्य समाजी तर नवरा इतर पंथाचा असेही एका कुटुंबात सलोख्याने सांपडणे अशक्य नाही. प्रत्येकास विचार व आचार स्वातंत्र्य पाहिजे. आर्य समाज ते देत आहे. ब्राह्मणी हिंदुधर्म तसे स्वातंत्र्य देत नाही….
नामदार पटेल यांनी हिंदुस्थानचे कायदे कौन्सिलांत आणलेल्या बिलास पुष्टि देण्याचा ठराव आपल्या अधिवेशनांत आपण आणणार आहां हे फार चांगले आहे. जातिभेदामुळे रोटी-बेटी व्यवहारास फार अडचण येऊन समाजांत फार फूट झाली आहे….जातीजातींत विवाह संबंध होऊं लागल्याशिवाय जातिभेदाची तीव्रता कमी होणार नाही….” (डिसेंबर २०१८ मध्ये या भाषणाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. मूळ भाषणासाठी पाहा: “Rajarshi Shahu Chhatrapati Papers : Volume VIII : (1918 and 1919 A.D. : Impetus to Social Legislation and Non-Bramhmin Movement” Ed. Vilas Sangave Kolhapur: Shahu Research Centre, Shivaji University, 2001, 292-8).

चित्रपटांची गाणी आणि गीतरामायण लिहिण्यात व्यस्त असल्यामुळे माडगूळकरांना शाहू महाराजांचे हे भाषण वाचण्यास वेळ मिळाला नसावा. त्यामुळे माडगूळकरांनी आपले मत रेटून मांडले. ज्या रामदासी परंपरेत उभे राहून माडगूळकरांनी गीतरामायण लिहिले त्या परंपरेच्या रामदास स्वामींबद्दल माडगूळकरांना आदर असणारच! त्या रामदासांनी दासबोध या ग्रंथात (दशक दुसरा, समास पहिला) मूर्ख माणसाची लक्षणे वर्णिली आहेत. त्यातील काही लक्षणे अशी:
“अक्षरें गाळून वाची । कां तें घाली पदरिचीं ।
नीघा न करी पुस्तकाची । तो येक मूर्ख ॥ ७०॥
आपण वाचीना कधीं । कोणास वाचावया नेदी ।
बांधोन ठेवी बंदीं । तो येक मूर्ख ॥ ७१॥”
या निकषावर आपण मूर्ख ठरणार नाही याची काळजी माडगूळकरांनी घेतली नाही.
काल (२६ नोव्हेंबर २०१८) राष्ट्रीय संविधान दिनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जेएनयु डायरी हे पुस्तक विकणाऱ्या हरिती प्रकाशनाच्या श्याम घुगे यांच्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. (https://www.indiejournal.in/article/abvp-beats-up-book-seller-on-constitutioadhytB) संदर्भ हा जेएनयुमधील राष्ट्रवादविरोधी घोषणांचा देण्यात आला.

रामदास यांनी मूर्खपणाच्या लक्षणांत एक लक्षण हे “अक्षरें गाळून वाची । कां तें घाली पदरिचीं ।” हे दिले होते. माडगूळकरप्रेमी आजचे संस्कृतीरक्षकांनी त्यांच्याच परंपरेतील दासबोध तरी वाचणे आवश्यक आहे!
फोरेन्सिक तपासणीत कन्हैया कुमार यांच्या भाषणात काही शब्द हे घुसडविण्यात आले होते, हे आता सिद्ध झाले आहे. (https://www.indiatoday.in/india/delhi/story/forensic-experts-say-kanhaiya-video-was-doctored-309626-2016-02-19).
फेसबुकवर उठसूट लाईक करणाऱ्या आणि स्वत:च्या ‘भावमुद्रा’ पोस्ट करणाऱ्या अनेक जणांनी आमच्या यापूर्वीच्या एका लेखात कदाचित माडगूळकरांवर टीका होती म्हणून या लेखाची नोंदच घेतली नव्हती. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्यांची पाठराखण माडगूळकरांनी कशी केली होती, असे आम्ही त्या लेखात मांडले होते. माडगूळकर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आणि असे मौनी वाचक माडगूळकरांच्या बाजूने अशी आजची स्थिती आहे.
बर्टोल्ट ब्रेख्त यांची एक कविता इथे आठवते:
“भिंती रंगविल्या गेल्या आहेत
पांढऱ्या चुन्यात –
‘त्यांना युद्ध हवे आहे’
ज्या व्यक्तीनं
लिहिलं हे वाक्य
ती अगोदरच मारली गेली आहे.”
(अनुवाद: विद्या सुर्वे बोरसे)
आज माडगूळकर आणि श्याम घुगे यांपैकी एकाची निवड करावी लागणार आहे. आमचे जातिअंतावरील आगामी पुस्तकं हे ‘देशद्रोही’ पुस्तके विकण्याचा आरोप असलेल्या श्याम घुगे यांच्या हरिती प्रकाशनाकडून प्रकाशित होत आहे. जातीचा अंत हा जर देशद्रोह असेल तर हा आरोप आम्हाला मान्य आहे! आम्ही माडगूळकरांच्या विरोधात कौल टाकून श्याम घुगे यांच्या बाजूने उभे आहोत. तुम्ही?

दिलीप चव्हाण
dilipchavan@gmail.com

One comment

Leave a Reply