कविता : जेव्हा माझीचं मुलं विचारतात मला माझी जात

परवा समाज शास्राच्या तासाला
डॉ.आंबेडकरांच्या अभ्यासावरुन चर्चा
थेट माझ्या मार्कापर्यंत घसरली.

मुलांना ही उत्सुक्ता होती
माझ्या गुणीची टक्केवारी जाणून घेण्याची.
आडेओडे न घेता
मी सरळ सांगून टाकला
माझ्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख
बारावीत मारलेल्या डुबकी सह

तेव्हा वर्गात कधीच न बोलणा-या
मुलीने प्रश्न केला.
सर, ” मग तुमची जात कोणती ? ”
आमचे नव्याण्णववाले लागतं नाहीत
म्हणून विचारलं.

मी गडबडून, गोंधळून गेलो.
गळून पडला हातातला खडू
ओठातच अडखळले तोंडातले शब्द.

जडपावलाने गाठलं स्टाफ रुम ,
पुसला घाम, घटाघटा प्यालो
लिटर दिडलिटर पाणी.

आणि विचार करू लागलो
तिच्या अस्वस्थतेला
काही अंशी मी ही जबाबदार आहे
शिक्षक म्हणून, पालक म्हणून
समाजाचा घटक म्हणून ………

—– लक्ष्मण खेडकर

Leave a Reply