|| अयोध्या : एक दिवस ||- डॉम मोरेस /अनु. दीपक बोरगावे

गावाच्या आतील भागात, वेळ ही नेहमी दुपारचीच वाटते.
देवळाभवती टाळांचा गजर सुरू असतो
जिथे एक सूज आलेला सूर्य पोसत असतो
माण्सांचा दुर्गंध आणि कृमी माशा भवताली.
यात्रेकरू तुडवत एकमेकांना, पहारा असलेल्या द्वारांकडे.
बाहेर, एका कपड्यात गुंडाळलेली, एक विधवा म्हातारी
मरत असते, एकटीच, कृमीकीटके तिचे डोळे खात असतात.

आम्ही एक गाईड भाड्याने घेतलेला असतो,
केवळ बारा वर्षाचा एक मुलगा.
हे नागमोडी रस्ते त्याच्यासाठी कलहांचे आणि युद्धग्रस्त असतात.
तो आम्हांला घेऊन जातो
विणत एकएक गल्ली, शिताफिने, काळजीपूर्वक,
लहान मुलासारखे नव्हे.
जेव्हा लहान मुले युध्दाच्या जगात अडकतात,
आताही, कातडीखाली, त्याला कवटी दिसते,
तो कधीतरी हसतो, कारण तुम्ही सुंदर असता.

घनगर्द अंधाराचा एक गडद तुकडा,
साठलेली घाण आणि दुर्गंध,
तुम्हाला लक्षात येतं आजुबाजुला पाहात असताना,
अल्लाहची झोपडी, आता ती नष्ट झालेली असते.
ते सारेच यात्रेकरू
कोल्ह्यासारखे विव्हळत राहातात

त्यांचे कपडे असतात भगवे
काही धोका होणार आहे असे सुचवणारे त्यांचे डोळे असतात,
आणि लगेचच ते धावा करणार असतात देवाचा
जवळच, पक्षाच्या ड्रोनजनी,
म्हणजे दुसऱ्यांच्या श्रमावर मजा मारणारे,
नव्यानी बनवलेल्या, पवित्र विटा,
सजवलेल्या असतात शेल्फवर
मंदिर बनवण्यासाठी.

आम्ही त्या मरणाऱ्या स्त्रिला तिथेच सोडून देतो
आणि त्या मुलाला विचारतो,
तुला हे सारे कसे वाटते आहे,
ही कडवी माणसं प्रथमतःच या गावात आल्यापासून

आणि पांढऱ्या कबुतरांप्रमाणे
शांततेला टराटरा फाडायला लागल्यापासून ?
पण तुलसीराम काहीच बोलत नाही.
तो आम्हाला मुस्लिम राहातात तिथे घेऊन जातो
आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो
पण ते सारे पळून जातात.

संध्याकाळी, आम्ही पोचतो एका टोकाला जिथे हे गाव संपलेले असते.
तुझे नाव हे त्या वाहत्या नदीतून आलं आहे
हिरवीगार झाडं इथं फुलताहेत, हवा आल्हाददायक आहे,
तू चालतो आहेस कसातरी ओढत स्वत:ला
तुझ्या सोनेरी पायांने, या मधुर पाण्यातून,
कालच्या सूर्याने रंगविलेले पाणी उडवत,
पाण्याचे तरंग आणि शिडकावा पसरवत.

तुलसीराम खिदळतो, टाळ्या वाजवतो,
परत एकदा लहान मुलगा होतो,
आणि तुम्ही पश्चिमेकडे वळता
सूर्यप्रकाश तुम्हाला सोडून जात असतो.
हळूवारपणा आता वाहात राहातो माझ्यातून,
तो तुम्हाला चकीत करत राहातो.
तू पाहातो आहेस माझ्याकडे आणि हसतो आहेस.
हे क्षण आम्ही खरंच जगत असतो
ते पुढे पुढे सरकत राहातात,
आणि नंतर ते एक स्मृती होऊन गोठून जातात.

भाड्याच्या एका जीपमधून
आम्ही दुसऱ्या गावाकडे जातो.
वातानुकूलित खोल्या आणि चायनीज अन्न.
बाजारापासून दूर असलेल्या झोपडपट्टीत,
आम्ही हात जोडतो, आणि आम्ही आमच्या पोराचा, म्हणजे आमच्या गाईडचा निरोप घेतो,
आणि प्रार्थना करतो, तो जिवंत राहो म्हणून
कारण, देवाच्या घरट्यात असतात पोरं सुरक्षित अनेक म्हणून,
ज्यांना असतात नवे शब्द शोधायचे, मानवी प्रेमाचे.

———————————————————-

Leave a Reply