केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते -सुधाकर सोनवणे

काही व्यक्तींनी सोशल मिडियावरून व्हायरल केलेले श्रामनेर शिबिराचे फोटो पाहण्यात आले. त्यात श्रामनेर म्हणून बसलेल्या व्यक्तीचे महिलांनी पाय धुणे आणि ते पुसणे अशा बाबी स्पष्ट दिसत होत्या. यासंदर्भात भंतेजी बरोबर येथील सामाजिक न्यायभवनात मी त्यांच्यासोबत चर्चाही केली. मात्र “पाय धुणे-पुसणे योग्य असल्याचा निर्वाळा करत अनुयायांनी हे केलेले कृत्य त्यांच्या श्रद्धेचा विषय असल्याच त्यांनी सांगितलं.” दरम्यान एका व्यक्तीने भंतेजींना फोन दिला आणि बोला असं सांगितलं.

फोनवरून समोरच्या व्यक्तीला बोलताना भंतेजींनी त्यांच्याकडे एका तेलाच्या डब्याची मागणी केली. फोन ठेवल्यावर मी भंत्तेजींना विचारले की,

“भंतेजी असे मागणे योग्य आहे का?”

त्यावर भंते म्हणाले, “मी माझ्यासाठी मागतोय का?, मी माझ्या समाजासाठी मागतोय.” मी त्यांना विचारले, “तुमचा समाज म्हणजे काय. ? ते म्हणाले उद्या ग्रामीण भागातून माझ्या समाजाचे लोक इथे धम्म-देसना घेण्यासाठी येणार आहेत. ते हॉटेलामध्ये जेवू शकत नाहीत. त्यांना इथे भोजन देण्याची व्यवस्था केली आहे.” यावर मी त्यांना म्हणालो ‘तुम्ही जातीचेच काम करता का?’ जातीच्या बाहेर येवून समस्त मानव कल्याणाकरिता तुम्ही केव्हा काम करणार?, ते म्हणाले ‘माझा समाज आजही बकरे, कोंबडे कापतोय ते, देव सोडायला तयार नाहीत. अगोदर त्यांना बदलायचे आहे नंतर बाकीचे पाहू.’ मी त्यांना म्हणालो, ‘म्हणजे तुम्ही जातीच्या कक्षेतच अजून काम करतात?’ ते म्हणाले “हो” ‘आम्ही जातीतच काम करतो.’ मी त्यांना म्हणालो, ‘बाबासाहेबांनी जाती नष्ट करा असं सांगितलं.’ ‘यावर ते मला म्हणाले की ,याचमुळे बाबासाहेब म्हणाले होते की, मुझे पढे-लिखे लोगोने धोका दिया, ते पुढे म्हणाले ‘हा धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इथे प्राध्यापक, अधिकारी, वकील, शिक्षक हे काम करतात. ते काय मुर्ख दिसतात काय तुम्हाला?’ धार्मिक शब्द त्यांनी वापरल्यामुळे मी त्यांना विचारले. धर्म आणि धम्म यातला फरक काय? त्यावर भंते म्हणाले तुम्ही वाचलाय धम्म मग मला का विचारता? या उद्या कार्यक्रमाला बसा येथे दिवसभर.. मग कळेल तुम्हाला धम्म आणि धर्मातला फरक.’ मी त्यांना म्हणालो ‘बुद्ध म्हणतात, भिक्षुंनो! माझ्या कालातीत धम्माचे दायाद व्हा, कालबाह्य नाही. मग याचे उत्तर काय? त्यावर भंतेंनी गोंधळून माझा विषय बाजूला ठेवून ते दुसर्‍यासोबत बोलू लागले आणि मी ‘जयभीम’ म्हणून निघून आलो. (ही सर्व चर्चा भंत्तेजींनी माझ्यासोबत मोठ्या आवाजात आणि चिडून केली. त्यांचा आवाज इतका मोठा होता की, मंडपातले सर्व लोक आमच्या अवतीभोवती येवून उभे राहिले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन सोहळा घडवून आपल्या 5 लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. दुसर्‍या दिवशी दि.15/10/1956 रोजी मार्गदर्शन करणारे ऐतिहासिक, स्फूर्तिदायक व ओजस्वी भाषण दिले. बाबासाहेब त्या भाषणात म्हणाले होते की, आम्ही हिंदू धर्म त्यागाची चळवळ 1935 पासून येवले येथे एक ठराव करुन हाती घेतली. अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती आणि काल मी ती खरी करुन दाखविली. मला इतका आनंद झाला की, हर्षवायुच झाला आहे. नरकातून सुटलो असे मला वाटते. पुढे बाबासाहेब म्हणतात की, ‘मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौध्द धम्मात यावयाचे आहे, त्यांनी जाणिवेने आले पाहिजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे.’

धम्माच्या आधारावर जगाची पुनर्बांधणी करणे ही डॉ.आंबेडकरांची भूमिका होती. मात्र आज धम्मचळवळ धर्म चळवळ झाली आहे का? यासंदर्भात आपल्याला विश्‍लेषण करावे लागेल. किंबहुना ते विश्‍लेषण धर्माचे समाजशास्त्र, मानसशास्त्र व नितीशास्त्र अशा परिप्रेक्षात असेल तरी पण ते विश्‍लेषण बाबासाहेबांच्या विचारांच्या संदर्भात वा त्या चौकटीतच असेल. तसेच धर्मांतरानंतर भारतात किंबहुना जगात मोठे राजकीय सामाजिक व आर्थिक बदल झालेले आहेत. 62 वर्षापूर्वी धर्मांतराला असलेले संदर्भ बदललेले आहेत. जागतिकीकरणात नितीशास्त्राचा पाया बदलला आहे. अशा बदललेल्या संदर्भात गुणात्मकदृष्ट्या धर्मांतराचं विश्‍लेषणही करावं लागेल. अर्थात हे विश्‍लेषण तुम्ही वापरत असलेली अभ्यासपद्धती, तुमचा दृष्टीकोन व प्रश्‍नाचे आकलन यावर अवलंबून असते. आपणाला मग बाबासाहेबांच्या अभ्यास पद्धतीने त्याचे विश्‍लेषण करावे लागेल. अभ्यास पद्धती अथवा अन्वेशन पद्धती ही केवळ वास्तवाचे आकलन करण्यास मदत करत नाही तर ती तुमच्या विचाराची दिशा व मार्ग हेही स्पष्ट करीत राहते.

‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ मध्ये डॉ.बाबासाहेबांनी धम्माची पुनर्मांडणी केली आणि समाजाला नव्या रूपातील बुद्ध धम्माचा संदेश दिला. या सार्‍या प्रक्रियामागे डॉ.आंबेडकर यांचा दृष्टीकोण काय होता, अपेक्षा कोणत्या होत्या? आणि त्यांच्या अपेक्षेची पूर्तता झाली का? याचा शोध घेवू. भंत्ते धम्मानंद यांच्या मताप्रमाणे श्रामनेरला बसलेल्या व्यक्तीचे पाय धुणे आणि पुसणे ही त्यांची भक्ती आहे असे आपण मानले, दुसरी बाब ही की जातीच्या कक्षेत धम्माचे कार्य याकडे पाहिले तर हे प्रकार हिंदु धर्मात आहेत हे पहावयाला मिळते. (भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात भाग दुसरा पान क्र.386) वर बुद्धाने भिख्खु आणि ब्राह्मण यांच्यातील फरक स्पष्ट केला आहे. ब्राह्मण हा पुरोहित असतो. जन्म, विवाह आणि मृत्यू याचे अनुशंगीक संस्कार करणे हे त्याचे मुख्य कार्य होय. आता याप्रमाणे हिंदु धर्मात विधी, पूजाअर्चा, पाय धुणे, ते पाणी पिणे, गोमुत्र पिणे हे चालते. हा त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे. संघात प्रवेश करताना भिक्षुंनी आपली जातीची ओळख पूर्ण टाकून दिली पाहिजे असा नियम होता. स्त्रिया आणि पुरुष या दोघांनाही याच जीवनात निर्वाण प्राप्ती होवू शकते असा बुद्धाचा दृष्टीकोन होता. मग माझा प्रश्‍न आहे की भन्ते धम्मानंदनी जातीच्या कक्षेत काम करण्याचा केलेला शब्दप्रयोग धम्मविरोधी नाही का? भंत्तेच धम्मविरोधी असतील तर वास्तवात धम्म न राहता धर्म होणार नाही का? पाय धुणे, पुसणे हे पूजेचे प्रकार आहेत. भंत्ते श्रद्धेचा भाग म्हणून ते योग्य आहे असे म्हणत असतील तर हा बोगसपणा नाही का? आज भंत्ते जातीनिर्मूलनाचे काम करतात की जातीयता मजबूत करण्यासाठी? जातीमध्ये विवाह लावणे, जातीमध्येच पोथीयुक्त भाषण देणे हे कशाचे लक्षण आहे. आज सर्वत्र दुष्काळ पडला आहे. वर्षा म्हणजे पाऊस. पाऊस नसताना वर्षावासाचा कार्यक्रम घेणे योग्य की अयोग्य यावर मी बोलणार नाही पण भंत्तेंना वर्षा नसताना वास कशाचा येतोय? कालबाह्य गोष्टी सोडून विज्ञानाच्या आधारावर तरलेला बौद्ध धम्म समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्वाचा पुरस्कार करणारा धम्म या भंत्यांना कोठे घेवून जायचा आहे. धम्माचे फक्त स्पष्टीकरण करायचे मग बदलाचे काय? या सर्व भानगडीत धम्म चळवळीचे चाक उलट्या दिशेने फिरत आहे का? दु:खाचे कारण आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे असे डॉ.आंबेडकर सांगतात मग भंत्तेकडे याचा कृती कार्यक्रम काय आहे? असे अनेक प्रश्‍न आहेत पण जे भंत्ते दुसर्‍याकडे तेलाचा डब्बा मागतात त्या भंत्तेंनी हे लक्षात घ्यावं की भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यात (पंचम खंडातील भाग दुसरा पान क्र.380) वर जो मनुष्य दुसर्‍याजवळ नेहमी भीक मागतो म्हणून तो भिक्षू होवू शकत नाही. जो धम्माचे पालन करतो तोच भिक्षू होय. केवळ भिक्षा मागणारा भिक्षू ठरत नाही. ज्याच्या वाणीत संयम आहे, जो विचारपूर्वक बोलतो, जो लीन आहे, जो धम्म स्पष्ट करतो अशा भिक्षूंचे भाषण मधूर असते. असे असताना भंत्ते धम्मानंद चिडून मोठ्या आवाजात युक्तीवाद कसा काय करू शकतात? पत्रकार परिषदेत भंत्ते धम्मानंद एका प्रश्‍नाला उत्तर देताना म्हणाले होते की, माझा पाचवा खंड वाचन सुरू आहे, अजून दोन खंड बाकी आहेत नंतर सर्व धम्मज्ञान लक्षात येईल. या वक्तव्यावर बुद्धाचेच उदाहरण द्यावे लागेल.

बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पाचवा, पान क्र.278
1) एकदा भगवान बुद्ध कोसांबीच्या ‘सुस्वर’ विहारात राहात होता. तेथे जमलेल्या ज्या लोकांना तो उपदेश करीत होता, त्यांच्यामध्ये एक ब्रम्हचारी होता

2) त्या ब्रम्हचार्‍याला अभिमान वाटत असे की वेदज्ञानात आपण अद्वितीय आहोत. वादविवाद हरविणारा कोणी न आढळल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्यात्या ठिकाणी हातात मशाल घेवून मिरवत असे.

3) एके दिवशी एका शहराच्या चौरस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला. त्याने त्या ब्रम्हचार्‍याला त्याच्या त्या विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले. त्यावर तो ब्रम्हचारी म्हणाला.

4) जग अंधकारमय व लोक भ्रांत आहेत. त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका करण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेत असतो.

5) त्याला (जमलेल्या लोकात) पाहिल्यावर भगवान बुद्धाने हाक मारून विचारले, ‘या मशालीने तू काय करीत आहेस’?

6) त्या ब्रम्हचार्‍याने उत्तर दिले लोक (सर्व) अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत असल्यामुळे, त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मी ही मशाल धारण केली आहे.

7) नंतर तथागताने त्याला परत विचारले, ‘खरोखर तू इतका विद्वान आहेस का?धर्मग्रंथातील चार विद्या, म्हणजे शब्दविद्या, ज्योतिर्विद्या, राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस काय?’

8) विदयार्थी आपण अपरिचित असल्याचे त्या ब्रम्हचार्‍याला कबुल करावे लागले. त्याने ती मशाल फेकून दिली. भगवान बुद्धाने त्याला उपदेशून म्हटले

9) ‘मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्याइतका स्वत:ला मोठा मानू लागला, तर तो हातात मेनबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वत: आंधळा आणि इतरांना तो काय प्रकाश दाखविणार?.

माझ्या मते धम्माची स्थिती, धम्मचळवळ कशी गतिमान करायची आणि बदल कसा घडवायचा या संदर्भात व्यापक आणि गंभीर अशी चर्चा करण्याची गरज आहे.

प्रतिसादाच्या अपेक्षेत…

लेखकाचा भ्रमणध्वनी : 9763434239

( लेखक बीड येथून प्रकाशित होणाऱ्या सूर्योदय या सायंदैनिकाचे कार्यकारी संपादक आहेत.)

हे सुद्धा वाचा….

कालबाह्य नव्हे तर कालातीत विचारांचे वारस व्हा..

धर्माच्या नव्या भूमिकेचा शोध….

Leave a Reply