‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’- डाॅ. सोपान रा. शेंडे (भाग तिसरा)

आझाद हिंद सरकार:-

                २१ ऑक्टोबर १९४३ रोजी (झाशीची राणी लक्ष्मी बाई जन्म दिवस )  रोजी सिंगापुरात दूरपूर्वेतील हिंदी प्रतिनिधींची परिषद आयोजित केली होती. ‘ कॅथे ’नामक इमारतीच्या तळमजल्यावरील विस्तीर्ण सभागृहातच परिषदेचे अधिवेशनाचे आयोजन केले होते. ठिकठिकाणचे हिंदी प्रतिनिधी सिंगापुरात येऊन दाखल झाले.जापनी सरकारतर्फे ‘हिकारी कीकान’ चे मुख्य मेजर जनरल यामामाटो हे व्यासपीठावर होते. २१ आॅक्टोबर रोजी सकाळी हिंदी प्रतिनिधी, हिंदी स्वातंत्र्यसेनेचे वरिष्ठ अधिकारी इत्यादी लोक सभागृहात जमले. श्री. रासबिहारी बोस हे प्रकृती ठिक नसल्याने येऊ शकले नाही. सकाळच्या अधिवेशनात नेताजींनी त्या वेळपर्यंतच्या स्वातंत्र्य चळवळीचा आढावा घेतला. दुपारी बरोबर चार वाजून पाच मिनिटांनी नेताजींनी ‘‘ हिंदी स्वातंत्र्य – सरकारच्या स्थापनेची ’’ घोषणा केली. त्यांनंतर नेताजींनी आझाद हिंद सरकारमधील मंत्र्यांची व मुख्य व्यक्तींची नावे वाचून दाखविली, त्यामध्ये, सुभाषचंद्र बोस – हिंदी स्वातंत्र्य सरकारचे राष्ट्रपती, पंतप्रधान, युद्धमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि स्वातंत्र्यसेनेचे सरसेनापती ; डाॅ. लक्ष्मी स्त्रीसंघटना मंत्री ; एस्. ए. अय्यर – प्रचार आणि प्रसिद्धी खात्याचे मंत्री ; ले. कर्नल ए. सी. चतर्जी – अर्थमंत्री ; या शिवाय हिंदी स्वातंत्र्यसेनेचे आठ प्रतिनिधी मंत्रिमंडळावर घेतले होते. त्यामध्ये – ले. कर्नल जगन्नाथराव भोसले, ले. अझीझ अहमद, ले. कर्नल भगत, ले. कर्नल गुलझारसिंग, ले. ए कर्नल म् झेड. क्यानी,ले. कर्नल. ए. डी. लोकनाथन्; यांचा समावेश होता. ले. कर्नल एहसास कादर, ले. कर्नल शहानवाझ, आनंद मोहन सहाय हे मंत्रिमंडळाचे चिटणीस म्हणून नेमले होते. त्यांनाही मंत्र्याचा दर्जा देण्यात आला होता.

श्री. रासबिाहारी बोस हे सर्वश्रेष्ठ सल्लागार व करीम गनी, देवनाथ दास, ईश्वरसिंग, डी. एम्. खान, येल्लप्पा थिवी हे सामान्य सल्लागार आणि ए. एन्. सरकार यांची कायदयाचे सल्लागार, अशा नेमणूका झाल्याचे जाहीर करण्यात आले. नेताजींच्या नंतर त्या सर्वांनीपथा घेतल्या.सर्वांनी शपथा घेतल्यानंतर नेताजींनी घोषणा वाचून दाखविली ती अशी, ‘‘ ….हिंदुस्थानचे स्वातंत्र्य परत मिळविण्या करीता. आम्ही आमचे व आमच्या सैनिकांचे प्राण पणास लावण्याची प्रतिज्ञा करितो.’’ हिंदुस्थानच्या पारतंत्र्याच्या इतिहासात स्वातंत्र्य सरकारच्या स्थापनेचा हा प्रसंग अपूर्व होता.

आझाद हिंद सरकारला जपानने २३ आॅक्टोबर १९४३ रोजी, जर्मनी, स्वतंत्र बर्मा आणि फिलिपाइन्स सरकारांनी २९ आॅक्टोबरला, आयर, क्रोषिया, मॅंचुरिया, नानकिंग, सयाम यांनी नोव्हेबरला मान्यता दिली. जपान सरकारतर्फे जनरल टोजो यांनी अंदमान व निकोबार बेटे आझाद हिंद सरकारच्या ताब्यात देण्यात आली असल्याचे जाहिर केले. नेताजींनी अंदमानचे नाव ‘ स्वराज्य’ ठेवले. कर्नल लोकनाथन् यांची तेथे चीफ कमिशनर म्हणून योजना केली. कारभार व्यवस्थित चालविण्ययासाठी कर्नल लोकनाथन् यांच्या बरोबर मेजर आलबी, ले. सुभानसिंग, ले. महंमद इकबाल आणि स्टेनोटायपिस्ट श्रीनिवासन यांना बरोबर घेवून गेले होते. मेजर आलबी यांच्याकडे शिक्षण, ले. सुभानसिंग यांच्याकडे अर्थ व कर वसूली, ले. महमद इकबाल यांच्याकडे पोलिस अणि न्याय अशी खात्यांची वाटणी करण्यात आली. दर महिन्याला नेताजींकडे अहवाल पाठविण्यात येतअसे.
झियावाडी येथील ५० चैरस मैल क्षेत्रफळ असलेली इस्टेटही आझाद हिंद सरकारच्या अंमलाखाली होती.या छोटया संस्थानात १५ हजार हिंदीवस्ती होती. तेथे कारभार चालविण्यासाठी अर्थ खाते, भरती ट्रेनिंग, प्रचार व प्रकाशन, आरोग्य वगैरे प्रत्येक विभागासाठी एक एक अधिकारी नेमण्यात आला. जे हिंदीलोक युद्ध चालू झाल्यानंतर मालमत्ता सोडून हिंदुस्थानात निघून गेले होते, त्यांच्या मालमत्तेची व इष्टेटीची काळजी घेण्यात येत होती. सुताच्या कांबळी, जूटाची पोतीकरण्याचे कारखाने उघडण्यात आले होते. एक मोठे मध्यवर्ती हाॅस्पीटल उघडण्यात आले.चिनीमाती कामाचेही कारखाने काढले होते. अशारितीने हस्तगत केलेल्या प्रदेशांची उत्कृष्ट व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न आझाद हिंद सरकार करीत होते. त्यासाठी एक खास ‘ आझा हिंद दल ’ स्थापन करण्यात आले होते.या दलाचे प्रमुख लेफ्टनंट विठ्ठलराव हे होते. जनरल चटर्जी याना झियावाडीचे गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले.श्री. बी. घोश यांच्याकडे पब्लिकर्वक्स डिपार्टमेंट, शेती व सॅनिटेशन ही खाती देण्यात आली होती. छोटे खटले चालविण्यासाठी तहसीलदार नेमण्यात आले होते. त्यावर सर्व अधिकार आझाद हिंद सरकारचा असे. आझाद फौज इंग्रजांच्या हातून हिंदुस्थानचा प्रदेश काबीज करीत जाईल तसा तेथे आझाद सरकारचा अंमल स्थापन करण्यात येईल, यास जपानने मन्यता दिली होती. ‘आझाद हिंद राष्ट्रीय बँकेची ’ स्थापना ही देखील सुभाषबाबुंवरील विश्वासाची निदर्शक आहे. आझाद हिंद सरकारसाठी बँकेची आवश्यकता आहे, असे विचार प्रगट करताच आणि त्यासाठी ५० लाख तरी लागतील असे म्हणताच एका कोटयाधिशाने ताबडतोब ३० लाख नेताजींच्या हाती ठेवले व उरलेले २० लाख एका आठवडयात जमविण्याचे आश्वासन दिले. या ५० लाखाच्या निधीवर एप्रिल १९४४ पासून बॅंकेने आपला कारभार सुरू केला. बँक कायदेशीर रजिस्टर करण्यात आली. श्री. एस् . ए. अय्यर, श्री. दीनानाथ, श्री.एस्. एम्. रशीद, एच्. आर. बेताई, एच् . ई. मेहता आणि कर्नल अलगप्पन हे या बँकेचे डायरेक्टर होते. ताबडतोब या बँकेच्या तीन शाखा निघाल्या.

आझाद हिंद सरकारने केलेले कायदे दोन प्रकारचे होते. एकीकडे या सरकारने युद्धासाठी फौज उभारली व त्या फौजेच्या कामासाठी रसद, शिक्षण, भरती, अर्थ जमाखर्च वगैरे खाती उघडून फौजेची सर्व संघटना पद्धतशीर बनविली. त्याचबरोबर आझाद हिंदसरकारने राष्ट्र निर्मितीच्या सर्व कार्याकडे पूर्ण लक्ष दिले होते. नागरिकांचे शिक्षण, आरोग्य, संरक्षण, चारित्र्य संवर्धन, महिला जागृती सामाजिक सेवा वगैरे कामे करण्यासाठी स्वतंत्र खाती निर्माण करण्यात आली होती.जे प्रश्न आम्हाला आज बिकट वाटतात ते त्यांनी चुटकीसरशी सोडविले. जातीयता आणि अस्पृष्यता यांचे आझाद सरकारने पूर्ण उच्चाटन केले होते. शाकाहारी व मांसाहारी एकत्र बसून भोजन करीत. आपण हिंदुस्थानी आहोत याशिवाय दुसरी काही भावना त्यांनी ठेवली नाही.ज्यांना कामधंदा नव्हता त्यांना कामे देण्यात आली. मलायात अशा रीतीने दोन हजार एकर जमीन शेतीला देण्यात आली. शेतीचे सामान, घर,बांधण्याची सामाुग्री व शिवाय काही रोकड रक्कम देण्यात आली. क्विनाईन वाटण्यात आले. क्वालालंपूर, केलेवा, मेमयो येथील केंद्रातून हजारो लोकांना दररोज वैद्यकीय मदत मिळे. मलाया , ब्रह्मदेश आणि थायलंडमध्ये तर दवाखान्यांचे जाळेच निर्माण झाले. या कामासाठी दर महिन्याला 75 हजार डाॅलर खर्च करण्यात येत.या कार्यामुळे हिंदुस्थानी लोकांप्रमाणेच ब्रह्मदेश व मलायांतील लोकांनाही प्रेम वाटू लागले होते. हिंदुस्थानातील कलकत्ता, जमषेदपूर, मद्रास वगैरे शहरावर जर्मनीने लंडनवर, इंग्लंडने बर्लिनवर, अमरिकेने टोकियोवर केले तसे भीषण बाॅंब हल्ले तसे हल्ले जपानकडून झाले नाहीत याचे सर्व श्रेय नेताजींना आहे.

२२ आॅक्टोबर १९४३ रोजी ‘ राणी झाशी ’ रेजिमेंटची ट्रेनिंग कँप औपचारीकरित्या उघडून, स्त्री सैनिक नोंदवून त्यास लष्करी शिक्षण देण्यास प्रत्यक्ष सुरूवात झाली. स्त्रियांच्या सर्व कार्यात प्रथमपासून डाॅ. लक्ष्मी यांचा प्रमुख भाग होता. २३ आॅक्टोबर १९४३ रोजी, जपानने हिंदी स्वाातंत्र्य सरकार मान्य केल्याची तार सिंगापुरातील जपानी राजप्रतिनिधीने आणून दिली. यानंतर एकामागून एक जर्मनी, इटाली, फिलिपीन्स, मांचुरिया, चीन, क्रोशिया, सयाम, ब्रम्हदेश या राष्ट्रांनीही नेताजीस तारा पाठवून हिंदी स्वातंत्र्यास मान्यता देऊन शुभेच्छा व्यक्त केली. २४ आॅक्टोबर रोजी म्युनिसीपल इमारतीच्या समोरील मैदानावर सर्व हिंदी लोकांची जाहिर सभा बोलावण्यात आली होती.हिंदी स्वाातंत्र्य सेनेचे सर्व सैनिक, झाशीची राणी पथकातील स्त्रीसैनिक व बालसेना आणि सिंगापुरातील इतर हिंदी नागरिक या सभेस हजर होते. व्यासपीठावार नेताजी व इतर सन्मान्य व्यक्ती स्थानापन्न झाल्या होत्या. या सभेपुढे भाषण करताना नेताजींनी, हिंदी स्वातंत्र्य सरकारने ग्रेटब्रिटन व अमेरिका यांच्याविरूद्ध आदल्या रात्री केलेल्या युद्ध घोषणेचा वृत्तांत सर्वांस निवेदन केला. दूरपूर्वेतील कोठल्याही देशातील हिंदी लोक तद्देशीय सरकारचे नागरिक नसून यापुढे ते हिंदी स्वातंत्र्य सरकारचे नागरिक म्हणून गणले जाऊ लागले. जपान,चीन, मांचुरिया, फार्मोसा, हागॅंकाॅंग, इंडोचायना, सयाम, ब्रह्मदेश, मलाया , सयाम, सुमात्रा , जावा, बोर्निओ. इत्यादी सर्व देशातील पंचवीस लाख हिंदी लोक यापुढे हिंदी स्वातंत्र्य सरकारच्या अधिपत्या खाली होते.
नेताजींनी आपल्या नव्या सरकारची प्रतिष्ठा कधीही किंचितही कमी होवू दिली नाही. युद्ध सामुग्रीसाठी त्यांनी जपान्यांकडून नेहमी रोख मोबदला देऊन घेतली. आझाद हिंद फौजेला शिक्षण देण्यासाठी जपानी अधिकाऱ्यास नेमले नव्हते. आझाद फौज इंग्रजांच्या हातून हिंदुस्थनचा प्रदेश काबीज करीत जाईल तसा तेथे आझाद सरकारचा अंमल स्थापन करण्यात येई.

६ नोव्हेबरला टोकिओ येथे पूर्व आशियातील राष्ट्रांची एक परिषद भरविण्यात आली होती. नेताजी आपल्या सहकाऱ्यांसह त्या परिषदेस हजर होते. सुभाषबाबूंप्रमाणेच इंग्रजांच्या कैदेतून मंडालेच्या तुरूंगातून निसटलेले ब्रह्मदेशचे माजी मंत्री डाॅ. बा. मा. व इतर प्रतिनिधींनी पूर्व आशियातील शांतता व स्वातंत्र्य रक्षण करण्याच्या दृष्टीने हिंदुस्थान स्वतंत्र होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांचे उपमंत्री मात्सुओ मोतो यांनी लष्करी कोर्टापुढे दिलेल्या साक्षीत आझाद हिंद सरकारला अनेक राष्ट्रांच्या सरकारांनी मान्यता दिली होती असे निवेदन केले.
२५ आॅक्टोबर १९४३ रोजी स्वतंत्र हिंदुस्थानच्या सरकारने ब्रिटन व अेरिकेविरूद्व युद्ध पुकारले त्याच दिवशी सायंकाळी, सिंगापुरातील जालनबझार वस्तीतील माक्या क्रीडोद्यानात मलायातील सर्व धनाढय हिंदी व्यापाऱ्यांची सभा बोलावण्यात आली होती. या धनाढय लोकांच्या सभेत नेताजींनी भाषण केले. ते म्हणाले, ‘‘आपले स्वाातंत्र्य सरकार स्थापन होऊन आपण युद्धाची घोषणा केल्यामुळे आपल्यावर आता एक नवीन जबाबदारी येऊन पडली आहे. अडतीस कोटी हिंदी प्रजेस दास्यातून मुक्त करण्याचे आपले पवित्र व्रत आहे. अडतीस कोटी लोकांचे स्वातंत्र्य ही एवढी अमोल गोष्ट आहे की, तेवढयाकरिता दूरपूर्वेतील पंचवीस लाख लोक भिकेस लागले किंवा मेले तरीसुद्धा आपल्या साध्याच्या दृष्टीने हा स्वार्थत्याग अत्यल्पच ठरेल !
२६ जानेवारी १९४४ च्या स्वातंत्र्यदिनाच्या (भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेसने २६ जानेवरी १९३० रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला होता.) च्या सभेत नेताजींनी आपल्याला मिळालेल्या हारांचा लिलाव केला. त्याची मागणी एक लाखापासून सुरू होऊन वाढत – वाढत सात लाखांवर जाऊन पोहचली. एक लाखाची पहिली बोली एका पंजाबी तरूणाने केली होती. सात लाखाला नेताजींचा हार दुसऱ्याच्या हाती जात आहे हे त्याला सहन झाले नाही. त्याने व्यासपीठावर जाऊन या हारासाठी आपली सर्वसंपत्ती पणाला लावली. आपली सर्व संपत्ती त्याने आझाद हिंद फौजेला देऊन टाकली. नेताजींनी त्याला अलिंगन देऊन तो हार त्याच्या गळयात घातला. आज आपण कृतार्थ झालो असे त्याला वाटले.
४ जुलै १९४४ ला नेताजी आझाद हिंद सरकारचे राष्ट्रपती व फौजेचे सरसेनापती होण्याला एक वर्ष झाले. त्यानिमित्त ज्युबिली हाॅलमध्ये समारंभ झाला. या दिवशी नेताजीचे सोने व जवाहिरांनी तुला करावयाची असा लोकांनी निश्चय केला. स्त्रियांनी या उत्सवात पुढाकार घेतला. बांगडया, नेकलेस, अंगठया यांचा वर्षाव होऊ लागला. एका मद्रासी स्त्रीने तर आपली सर्व संपत्ती देऊन टाकली. यावेळी नेताजींचे भाषण झाले. त्यात गांधीजींचे आशिर्वाद मागताना नेताजी म्हणाले ,‘‘ हे राष्ट्रपिता, (नेताजींनी १९४४ साली या सभेत महात्मा गांधी यांचा उल्लेख ‘राष्ट्रपिता’ असा केला ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.) भारतमातेच्या स्वातंत्र्याच्या या पवित्र संग्रामात आम्ही आपल्या आशिर्वादाची आणि शुभेच्छेची याचना करतो. .. ’’ नेताजीेच्या सन्मानार्थ पाळण्यात आलेल्या सप्ताहात एका मुस्लीम कोटयाधिशाने आपले घरदार, स्थावर – जंगम इस्टेट, अलंकार भूषणे सर्व नेताजींना अर्पण केले. त्यांना नेताजींनी ९ जुलैला लक्षावधी लोकांच्या विराट सभेत ‘ सेवक -ए हिंद ’ हा बहुमानाचा किताब दिला. नेताजींना आपली सर्व संपत्ती देणाऱ्या मद्रासी महिलेचा ता. २१ आॅगष्ट १९४४ ला सन्मान करून तिलाही ‘ सेवक – ए हिंद ’ही पदवी देण्यात आली.

आझाद हिंदची फौजेची रचना:-

हिंदी स्वातंत्र्य सैन्याच्या दहा -दहा हजारांच्या तीन डिव्हिजन्स होत्या. उरलेले दहा हजार काही चवथ्या डिव्हिजनमध्ये सामील केले जाणार होते. तर काही सैन्य स्वातंत्र्यसेनेच्या सर्वोच्च अशा मुख्य मध्यवर्ती केंद्राच्या हाताखाली होते.प्रत्येक डिव्हिजन – रेजिमेंट, बँटलियन्स, कंपनी व सेक्षन्स याप्रामणे उतरत्या क्रमाने विभागलेली असे. हिंदी स्वातंत्र्य सैन्याच्या प्रत्येक डिव्हिजनमध्ये सर्वसाधारणपणे तीन पायदळ तुकडया असत. शहानवाझ हे क्र.१ च्या पायदळ तुकडीचे मुख्य होते. या तुकडीस ‘ सुभाष रेजिमेंट ‘ असे म्हणत. सुभाष , गांधी, नेहरू, आझाद अशी पहिल्या चार पायदळ तुकडयास नावे दिलेली असून कागदोपत्री आणि बिनतारी संदेशात त्यांचा क्रमांक १/ २/ ३/ ४ असा उल्लेख करीत. धिल्लन हे क्र. ४ तुकडीचे व सहगल हे क्र. ५ तुकडीचे मुख्य अधिकारी होते. एका डिव्हिजनमध्ये तीन पायदळ – तुकडया व इतर तोफखाना, चिलखती गाडयांच्या तुकडया अथवा रेजिमेंट्सचे अधिकारी असत. त्यांस ‘ रेजिमेंटल कमांडर ’ म्हणत. हे सर्व रेजिमेंटल कमांडर त्या- त्या डिव्हिजनल कमांडरच्या हाताखाली काम करीत. तिन्ही डिव्हिजनल कमांडर हे जनरल जगन्नाथराव भोसले यांच्या हाताखाली व या सर्वांवर हिंदी स्वातंत्र्यसैन्याचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस. अषा तऱ्हेची हिंदी स्वातंत्र्यसैन्याची अधिकार श्रेणी होती. प्रत्येक डिव्हिजनमध्ये हजार – हजाराच्या तीन तुकडया, एक तोफखान्याची सव्वाशे माणसांची तुकडी; पूल, रस्ते इत्यादी तयार करणा-या इंजिनिअरिंग खात्याच्या माणसांची एक तुकडी, मोटार वाहकांची तुकडी, चिलखती गाडया व रणगाडयांची एक तुकडी, धान्यपुरवठाखात्याची एक तुकडी युद्धसामुग्री – दारूगोळा, कपडे, बंदुका, बूट इत्यादी पुरविणाऱ्यांची एक तुकडी, एक वैद्यकीय पथक व हेरांचे एक पथक असे. अशा तऱ्हेने सैन्यातील प्रत्येक डिव्हिजन हा सर्व दृष्टीने परिपूर्ण आणि स्वावलंबी असा विभाग होता.
पहिल्या डिव्हिजनचे मुख्य अधिकारी महंमद झमान क्यानी हे होते. दुसऱ्या डिव्हिजनचे मुख्य अझीझ अहमद व तिसऱ्या डिव्हिजनचे मुख्य अधिकारी गणपतराव नागर होते. सुरूवातील या तिघांचाही हुद्दा लेफटनंट कर्नल हाच होता. पुढे क्यानी हे कर्नल होऊन मेजर जनरलच्या हुद्दयावर पोहचले. श्री. नागर हे कर्नल झाले.
सैन्यात त्या त्या सैन्याचे फौजी पोलिस खाते असे. हे फौजी पोलिसखाते प्रत्यक्ष मध्यवर्ती केंद्र कचेरीच्याच अनेक खात्यांपैकी एक असे. प्रत्येक डिव्हिजनला किंवा रेजिमेंटला या मध्यवर्ती पोलिसांची एक तुकडी बंदोबस्तासाठी जोडलेली असे. किंवा डिव्हिजन किंवा रेजिमेंट आपल्यातीलच काही सैनिकांस फौजी पोलिस नेमून त्यांच्याकडे हा बंदोबस्त सोपवित असे.. ‘ न्यायखात्या’कडे गुन्हेगारांची चौकशी करून न्याय देणे, शिक्षा ठोठावणे अशा प्रकारचे काम असे. मध्यवर्ती कचेरी – हिंदी स्वातंत्र्यसेेनचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस – चीफ आॅफ स्टाफ – कार्याध्यक्ष, मेजर जनरल जगन्नथ कृष्ण भोसले -ए. डी. सी. व खागी चिटणीस ले. पु. ना. ओक – युद्ध खाते, सेनाभार खाते, नेमणूक व बदल्या खाते – मेजर प्रेमकिशन सहगल. सेनाभार खात्यात कारभारी, कोठारी, कोष, न्याय, वैद्याक, पोलिस यांचा समावेश असे.
हिंदीसैनिकांचा पोशाख म्हणजे गुडघ्यापर्यंतची खाकी चड्डी, अर्ध्या बाहयांचा खाकी सदरा, डोक्यावर खाकी कापडाची घडीची टोपी, टोपीवर हिंदुस्थानचा नकाश कोरलेला व तीवर विश्वास, एकता आणि स्वातंत्र्य असे ध्येयवादी शब्द कोरलेले, एक काळ्या पत्र्याचे चिन्ह, उजवे बाजूस छातीवर लावलेले पत्र्याचे एक गोल तिरंगी चिन्ह, पायात मोजे आणि लांब बूट असा असे.अधिका-यांचा पोशाख म्हणजे लांब खाकी विजार, खाकी बुशशर्ट, घडीची खाकी टोपी, पायात मोजे व नेहमीचे बूट असा असे. त्यांच्या हुद्दयाची निदर्शक अशी चिन्हे त्यांच्या खांदयावर असत. इतर छातीवरील आणि टोपीवरील चिन्हे ही नेताजींपासून साध्या सैनिकांपर्यंत सर्वांस सारखीच असत. काही वरिष्ठ अधिकारी ब्रीचेस – खालपासून गुडघ्यापर्यंत घट्ट व माांडयांशी फुगीर असलेल्या विजारी व त्यावर आरी लावलेले गुढग्यापर्यंतचे लांब बूट घालीत असत.
हिंदी स्वातंत्र्यसैन्यात मात्र इंग्रजी प्रथेप्रमाणे सेकंड लेफटनंटपासून तो वरच्या सर्व अधिका-यांस सर्व कनिष्ठांनी सलाम करावा आणि त्या दर्जाच्या खालच्या सैनिकास कोणीही सलाम न करण्याची पद्धत होती. सलाम करतानासुद्धा दर वेळेस ‘जयहिंद ’ हे म्हणावे लागे. स्वातंत्र्य चळवळीत कोणीही, कोणास भेटो अथवा कोणाचाही निरोप घेवो, ‘ जयहिंद ’ हा एकच प्रघात होता. हे अभिवादन फारच लोकप्रिय ठरले.

आझाद हिंद सेनेची दुसऱ्या महायुद्धातील प्रवेश:-
२५ आॅक्टोबरला स्वतंत्र हिंदुस्थानच्या सरकारने ब्रिटन व अमेरिकेविरूद्व युद्ध पुकारले. बारा वाजून पाच मिनिटांनी म्हणजे २३ तारखेची मध्यरात्र उलटून गेल्यानंतर, नभोवानी केंद्रावरून जाहिर केले की, ‘ हिंदुस्थानातून इंग्रज व त्यांचे मदतनीस अमेरिकन या दोघांस घालवून हिंदुस्थान पूर्णपणे स्वतंत्र करण्याकरिता सर्वानुमते स्थापन झालेले हे हिंदी स्वातंत्र्य सरकार या क्षणापासून ग्रेटब्रिटन व अमेरिका या विरूद्ध युद्धाची घोषणा करीत आहे.
४ फेब्रुवारी १९४३ ला स्वतंत्र रितीनेच हिंदुस्थानवर स्वारी केली. ३ फेबु्रवारी १९४३ पर्यंत सर्व तयारी झाली. कालाडान, पालेटावा, हाका, फालम, कालेवा, वंथो, काथा, भामो,मोंगाॅंग, मिचीना या मुख्य – मुख्य शहरी स्वातंत्र्यसैन्याचे व जपानी फौजेचे प्रमुख तळ स्थापन करण्यात आले. प्रत्येक शिपायाच्या पाठीवर सामानाने भरलेली एक खाकी पिशवी पट्टयांनी बांधलेली असे. या पिशवीत एक कांबळे, एक खाकी अर्धी विजार, सदरा, एक गरम स्वेटर,मच्छरदानी, गंजीफ्राॅक वगैरे सामान असे.गळयात पाण्याकरीता प़त्र्याची कापड गुंडाळलेली बाटली व रेस्पिरेटर – विषारी वायुपासून संरक्षण करणारा मुखवटा ; हातात बंदुक, कमरेला संगीन, तरवार, किंवा पीस्तुल असा एकंदर प्रत्येक सैनिकाचा शस्त्रसंभार असे. एवढया सामानानिशी खडे पहाड चढणे व उतरणे शक्य नसे शिवाय तोफा वगैरे इतर सामान त्या वाटेने जाणे शक्य नव्हते. वाटेत अन्न वगैरे मिळण्याची काही सोय नसल्यामुळे प्रवासापुरते धान्य , औषधे वगैरे सामान बरोबर घ्यावे लागे. ३ फेब्रुवारीला रात्री आघाडीवरील प्रत्येक तुकडीच्या मुख्याने आपापल्या सैनिकांस जमऊन दुसऱ्या दिवशी शत्रूवर हल्ला करण्याच्या तयारीने राहावयास सांगितले. ‘ उदया आपण हिंदुस्थानच्या , आपल्या मातृभूमीच्या रोखाने शत्रुवर चाल करून जाणार. हिंदुस्थानात लवकर प्रवेश करणे हे आता सर्वस्वी आपल्या वीरश्रीवर अवलंबून राहील. अनिश्चितता व तयारीचा काल आता संपला आणि आता प्रत्यक्ष युद्धाचा दिवस येऊन ठेपला. त्यामुळे जिकडे तिकडे उत्साह दिसू लागला. आपण यापुढे इंग्रजांचे गुलाम म्हणून हिंदुस्थानात प्रवेश करणार नसून आपल्या बाहूबलाने आपल्या हक्काच्या जमिनीवर पाय ठेवणार आहोत. आपण गुलामगिरीतून मुक्त होऊच परंतु आपल्या असंख्य बांधवांनाही दास्यातून मुक्त करू. असेच त्या दिवशी प्रत्येकाचे विचार होते. ३ फेब्रुवारीला रात्री पालेटावा येथील हिंदी स्वातंत्र्यसैन्याच्या एका छावणीत रात्री दहा वाजता एकाएकी, शिटी वाजली. छावणीच्या मुख्याने आपल्या दुय्यम अधिकाऱ्यांस आज्ञा केली की, ‘‘ आपापल्या तुकडयांची हजेरी घेऊन मला कळवा. त्यानुसार प्रत्येक नायकाने आपापल्या पथकातील सैनिकांची हजेरी घेतली.प्रत्येक नायकाने हाताखालच्या सैनिकांच्या पाठीवरील पिशव्या तपासल्या. प्रत्येकाची बंदुक , मशिगन तपासून प्रत्येकाजवळ बंदुकीच्या शंभर गोळया देण्यात आलेल्या होत्या. सर्व नायकांनी आपापल्या पथकातील सैन्याबाबतची माहिती छावणीच्या मुख्य अधिकाऱ्यास कळविली. छावणीच्या मुख्याने सर्वांस आपल्या भोवती बोलावून त्यांना उपदेश केला आणि कोणत्याही क्षणी तुम्हाला कामगिरीवर जावे लागेल, असे सांगून टाले. ३ फेब्रुवारीस पहाटे तीन वाजल्यापासूनच छावणीत हालचाल दिसू लागली. जो – तो आपापले सामान पाठीवर घेवून सज्ज झाला. छावणीच्या मुख्य अधिकाऱ्याने प्रत्येक नायकास आपापले पथक घेऊन नेमून दिलेली कामगिरी पार पाडण्यासाठी कूच करण्यास सांगितले. हेरांनी आणलेल्या माहितीनुसार चार मैलावर शत्रूचे एक ठाणे होते. त्याच्यावर तोफांचा भडीमार सुरू झाला.तोफेचे गोळे नेमके शत्रुच्या अंगावर पडून त्यांची दाणादाण होत असताना त्याच वेळेस आपले सैनिकही त्याच रोखाने शत्रुच्या त्या ठाण्याच्या दिशेने कूच करणे योग्य असते. ४ फेब्रुवारी १९४३ ला पहाटे स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले. १९४३ च्या आॅक्टोबरमध्ये नेताजी जपानला गेले. तेथले ‘टोजो सरकार ’ बदलून त्याच्या जागी ‘ कोईसी’ सरकारची स्थापना झाली होती.
सारांश :-
आझाद हिंद सरकार व फौज हयांच्या माध्यमातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी साम्राज्यवादाच्या विरोधात आग्नेय आशियात जी आघाडी उघडली आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जी लोकजागृती केली. आग्नेय आशियात निरनिराळया देशात वास्तव्यास असलेल्या हिंदी राष्ट्र प्रेमाने भारावून टाकले. आझाद हिंद सरकारच्या माध्यमातून एक आदर्ष राज्य निर्माण करण्याचे प्रयत्न केले. त्यामध्ये सामाजिक ऐक्य, बंधूभाव, देशप्रेम हया भावनांना सशक्त बनविण्याचे कार्य केले. ही बाब नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याची महती स्पष्ट करणारी आहे. ही बाब समान्य नागरिक, अभ्यासक, विचारवंत, राजकारणी नेते हयांना प्रेरणादेणारी व मार्गदर्शक ठरो.

डाॅ. सोपान शेंडे
मो.. 8983370495

लेखाचा पहिला व दुसरा भाग वाचण्यासाठी…. 

‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ – डाॅ. सोपान रा. शेंडे

‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ – डाॅ. सोपान रा. शेंडे भाग दुसरा

Leave a Reply