‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ – डाॅ. सोपान रा. शेंडे भाग दुसरा

आग्नेय आशियातील हिंदी लोकांची स्वातंत्र्य चळवळ:-

दुसऱ्या महायुद्धात जपानने , इंग्रजांच्या ताब्यातील जे प्रदेश जिकून घेेतले. त्यामध्ये १५ फेब्रुवारी १९४२ ला मलाया, सिंगापूर पडले आणि त्याचे ‘शोनान ’ झाले. ७ डिसेंबरला जपान्यांनी पर्ल बंदरावर हल्ला चढविला. १३ डिसेंबरला ग्वाम, २० ला पेनांग, २२ डिसेंबरला ला बेक, पेनांग बेट २२ डिसे., हाॅंगकाॅंग बेट, २५ डिसे. ला हांगकाॅंग, २६ ला ईपोह आणि २ जानेवारीला मॅनीला, मलाया द्विपकल्प १ फेब्रु., सिंगसपूर १५ रंगून मार्च महिन्यात आणि अंदमान-७ मार्च ला अंदमान, निकोबार बेटे २३ मार्च व २९ एप्रिलला लाशिओ व बर्मा रोड आणि १ मे ला मंडाले ही ठिकाणे जपानच्या हाती आली. इग्रजांचे सैन्य जपान्यांचे युद्धबंदी झाले.
१७ फेबु्रवारी १९४७ रोजी सकाळी नऊच्या सुमारास सर्व हिंदी युद्धबंदी आपापले सामान पाठीवर घेवून फॅरर पार्क नावाच्या सिंगापूर शहरातील विस्तीर्ण मैदानावर आले. ते सुमारे साठ हजार हिंदी सैनिक होते. कॅप्टन मोहनसिंग व त्यांचे दोन चार सहकारी, ले. कर्नल हंट या गो-या अधिकारी यांना तेथे आणण्यात आले . सर्व जपानी अधिकारी व व मोहनसिंग आपल्या सहकाऱ्यांसह स्थानापन्न झाल्यावर ले. क. हंट यांचे युद्धबंदयास उद्देशून भाषण केले, त्याचा आशय असा,‘‘ परवापर्यंत म्हणजे सिंगापूरच्या पाडावापर्यंत तुम्ही सर्वजण आमच्या अधिकाराखाली होता; परंतु त्या दिवसापासून तूम्ही सर्व जपन्यांचे युद्धबंदी झालेले आहात. यापुढे आमचा तुमच्यावर काही अधिकार नाही. इंग्रजांतर्फे मी आज तुम्हा सर्वांना युद्धबंदी म्हणून जपान्यांच्या हवाली करतो. यापुढे तुम्हा सर्वांना जपान्यांच्या हुकमाप्रामणे वागावे लागणे भाग आहे. त्यानंतर हिकारी किकान खात्याचे प्रमुख मेजर फूजीवारा यांनी भाषण केले, त्यात , ‘‘ सिंगापूर पडले त्या दिवसापासून इंग्रजांचे या भागातील वर्चस्व नष्ट झाले आणि तुम्ही आमचे युद्धबंदी झाला आहात. आमचा विजय म्हणजे आशियातील प्रत्येक राष्ट्राचा विजय आहे, कारण इतके दिवस पाश्चात्यांच्या गुलामगिरीत सर्व आशियायी लोक खितपत होते. त्याचा भविष्यकाल यापुढे फार उज्वल आहे. एकमेकांशी सहकार्य करून प्रत्येकास आपली उन्नती करून घेता येईल. दूरपूर्वेतील सर्व आशियाई राष्ट्रांची एक जोरदार संघटना निर्माण करण्याचे एकमेव ध्येय डोळयासमोर ठेवूनच आम्ही हे युद्ध सुरू केले आहे. हिंदी लोकही आपल्या स्वातंत्र्याकरीता इंग्रजांशी बऱ्याच वर्षापासून झगडत आहेत, हे आम्ही पहात आहोत तेंव्हा, आम्ही पाश्चात्य साम्राज्यशाहीविरूद्ध सुरू केलेल्या या लढयाचा तुम्ही फायदा घ्यावा, व तुमच्यापासून हिरावून घेतलेले तुमचे स्वातंत्र्य परत मिळवून घेण्याची सुवर्णसंधी वाया जाऊ देवू नये. या कार्यात तुम्हाला मनमोकळेपणाने जरूर ते सर्व सहाय्य देण्याचे आम्ही वचन देतो. त्यानंतर कॅप्टन मोहनसिंग यांनी भाषण केले. ते म्हणाले, ‘‘ मित्रहो, ….. तुम्ही इतके दिवस इंग्रजांचे गुलाम होता. आता त्यांचे या भागातील साम्राज्य नष्ट होत आले आहे. या संधीचा योग्य तो उपयोग करून घेऊन हिंदुस्थानातूनही त्यांस घालवून देणे व आपले स्वातंत्र्य मिळविणे हे आपले कर्तव्य ठरते. इतके दिवस मी जपान्यांचे वर्तन बघितले आहे. त्यांस सर्व आशियायी लोकांबद्दल एकप्रकारची आपुलकी व जिव्हाळा वाटतो. हिंदुस्थानाबद्दल तर त्यांस विषेश आदर आहे. आपले गेलेले स्वातंत्र्य परत मिळविण्याकरीता जरूर ते सर्व साहाय्य मिळऊन देण्याचे त्यांनी आपल्याला वचन दिले आहे. …..’’ त्यानंतर ग्यानी प्रितमसिंग या पंजाबी गृहस्थाने अशाच आशयाचे भाषण पंजाबी भाषेतून केले.
हे साठ हजार युद्धबंदी प्रत्येक छावणीत दहा -दहा , बारा बारा हजार असे वाटून दिलेले होते. त्या छावण्यांची नावे ‘सेलेतार छावणी’,‘ क्रांजी छावणी’,‘ बिद्याधारी छावणी’ ,‘ बुलन छावणी’ इत्यादी होती. कॅप्टन मोहनसिंग यांस जपान्यांनी सर्व हिंदी युद्धबंदयांचे मुख्य ( जी. ओ .सी. ) म्हणजे जनरल आॅफिसर कमांडिंग नेमले. त्यांना जनरल मोहनसिंग असे संबोधित असत. मोहनसिंगांनी शिंघारसिंग यास फौजी पोलिसांचा मुख्य म्हणून नेमले होते.
जपानी मलायात शिरताच त्यांच्या ‘ हिकारी कीकान ’ या खात्याच्या प्रोत्साहनाने ‘ इंडियन इंडिपेन्डन्स लीग ’ म्हणजे हिंदी स्वातंत्र्य संघ, पेनांग, इ्रपो, कोलालंपूर, सिंगापूर इत्यदी प्रमुख शहरातून स्थापन झाले. या सर्व शाखा एकाच प्रकारचे काम , आपापल्या प्रांतात स्वतंत्रपणे करू लागल्या. तेथील हिंदी जनतेत प्रसंगाप्रसंगाने पुढारी म्हणून पुढे आलेले श्री. एन् राघवन् व पी. के. मेनन हे मलबारी बॅरिस्टर्स, श्री गोहो हे बंगाली बॅरिस्टर इत्यादी गृहस्थ त्या- त्या शाखेचे प्रमुख होऊन इतर सहकाऱ्यांच्या साहाय्याने तेथील काम बघू लागले. मुख्य – मुख्य अशा प्रत्येक गावातील हिंदी लोकांनी हिंदी स्वातंत्र्य संघाच्या कचेरीत जाऊन आपापली नावे नोंदविली. त्यांना हिंदी स्वातंत्र्य संघाच्या मुख्य अधिका-यांच्या सहीची छापील कार्ड देण्यात आली. यावरच नागरिकत्व सिद्ध होत असे. उलट कार्ड नसलेला मनुश्य संशयीत म्हणून पकडला जाण्याचा संभव असे. दूरपूर्वेतील सर्व प्रदेशात जपान्यांचा अंमल सुरू झाल्यानंतर त्यांनी जिकडे तिकडेे हिंदी स्वातंत्र्य संघ स्थापण्यास उत्तेजन देऊन सर्व हिंदी माणसांची नोंद करून घेतली. त्यामुळे या विस्तीर्ण प्रदेषातील हिंदी नागरीकांना एकवटण्याची एक अमोल संधी प्राप्त झाली. जहाल क्रांतीकारक व देशभक्त रासबिहारी बोस हे अर्थातच या नव्या संघटनेचे एकमेव पुढारी होते. जपानमधील हिंदी स्वातंत्र्य संघाचे अध्यक्षपद व दूरपूर्वेच्या यच्चयावत सर्व हिंदी संघटनांचे प्रमुख अशी दुहेरी जबाबदारी त्यांच्यावर पडलेली होती. ती त्यांनी नेताजी सुभाशचंद्रबोस याच्या आगमनापर्यंत उत्कृष्टपणे पार पाडली होती.
जपानने युद्धाची घोषणा करताच रासबिहारी बोस यांनी एक जबरदस्त संघटना उभी करण्याचे काम हाती घेतले. दूरपूर्वेतील सर्व हिंदी लोकांच्या संघटनेकरिता रासबिहारी बोस यांनी टोकियोस एक लहानषी परिशद बोलाविण्याचे ठरविले. ही परिशद २८ मार्च ते ३० मार्च १९४२ पर्यंत चालली. मलायाच्या हिंदी नागरिकांत फेगोहो, मेनन, राघवन् हे टोकियो परिषदेस हजर राहिले. ज. मोहनसिंग व ले. कर्नल गिल हे दोघे सैनिकांचे प्रतिनिधी या नात्याने त्या परिषदेस हजर राहिले. जपानमधील प्रमुख नागरिकही या परिषदेस हजर होते. याशिवाय हाॅंगकाॅंग, शांघाय, मांचुरिया येथील हिंदी प्रतिनिधीही परिषदेस हजर राहिले. या परिषदेत मुख्य चार ठराव संमत झाले. ते अत्यंत महत्वाचे होते.

त्यात,

१ – दूरपूर्वेत ठिकठिकाणी हिंदी स्वातंत्र्यसंघ स्थापन करून हिंदी लोकांची संघटना करावी व हिंदुस्थानचे गेलेले स्वातंत्र् परत मिळवावे.

२- हिंदी स्वातंत्र्य सेनेची उभारणी करावी.

३ – या सैन्याने हिंदुस्थानाच्या भूमिवर व सर्वस्वी हिंदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली लढाई लढवावी; आणि

४ – या गोष्टीबद्दल पूर्ण विचार करण्याकरता सयामची राजधानी बॅंकाॅक या शहरी एक मोठी परिषद बोलवावी. बॅंकाॅक येथे भरणारी परिषद जास्त प्रातिनिधीक स्वरूपाची व्हावयाची होती.फिलीपिन्स, बोर्निओ, मलाया, जावा, सुमात्रा, इंडोचायना ,चीन , सयाम, ब्रह्मदेश इत्यादी देशातील सर्व हिंदी लोकांनी आपली संघटना करून आपापले प्रतिनिधी निवडले.
१५ जून १९४२ पासून २३ जून १९४२ पर्यंत दूरपूर्वेतील सर्व हिंदी लोकांची एक मोठी प्रातिनिधिक परिषद सयाम देशाची राजधानी बॅंकाॅक येथे भरली. सयाम, मांचुरिया, ब्रह्मदेष, मलाया, जावा, सुमात्रा, बोर्निओ, फिमिीपिन्स, चीन, इंडोचीन, मांचुरिया, जपान इत्यादी सर्व देशातील एकंदर सव्वाशे प्रतिनिधी या सभेस हजर होते. पिबुल संग्राम हे त्यावेळेस सयामचे पंतप्रधान होते. त्यांच्या सरकारने ही परिषद भरविण्याच्या कामी सर्व प्रकारची मदत केली होती. रासबहारी बोस हे अध्यक्षस्थानी होते. परिषदेच्या सात दिवसांच्या अधिवेशनात रासबिहारी बोस, ज. मोहनसिंग, श्री. देवनाथ दास इत्यादींची वीरश्रीपूर्वक आणि घ्येय्य निर्षक व्याख्याने झाली. या परिषदेत महत्वाचे वीस ठराव संमत करण्यात आले. त्यामध्ये,१- हिंदुस्थानचे पूर्ण स्वातंत्र्य हेच आमचे उद्दिष्ट आहे आणि ते साध्य करून घेण्याची वेळ येवून ठेपलेली आहे. ३ – स्वातंत्र्य संपादनार्थ योग्य ती चळवळ या परिषदेने हाती घ्यावी. ३ – अ – आपल्या ध्येयपूर्तीवर अढळ विश्वास, सर्व हिंदी लोकांचे संपूर्ण ऐक्य आणि पराकोटीचा त्याग या तीन मुख्य तत्त्वावरती चळवळ आधारलेली असावी. ब – हिंदुस्थानचे तुकडे न पाडता हिंदुस्थान अखंड ठेवण्यात यावा. क- सर्व गोष्टी राष्ट्रीय तत्त्वावर आधारलेल्या असाव्यात. त्यात कोणत्याही प्रकारचे जातीय, प्रांतीय किंवा पंथीय भेदभाव असू नयेत. ड- हिंदुस्थानातील राष्ट्रभाषा ही स्वदेशातील एकमेव राष्ट्रीयसंस्था असल्यामुळे त्या संस्थेच्या उद्दिष्टाशी आपल्या कार्याची रूपरेषा जुळती ठेवली पाहिजे. ई – हिंदुस्थानची भावी आणि कायम स्वरूपाची राज्यघटना हिंदी जनता ठरवील तीच राहिल. त्या बाबतीत ढवळाढवळ करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. ४ – हिंदी स्वातंत्र्य संघातर्फे स्वातंत्र्य चळवळ चालविण्यात येईल. ५ – स्वातंत्र्य युद्धाकरीता हिंदी स्वातंत्र्य सैन्य उभारण्यात यावे. ६ – हिंदी स्वातंत्र्य संघाचे खालीलप्रमाणे विभाग पाडण्यात येतील. अ- कार्यकारी मंडळ, आ- प्रतिनिधी मंडळ, इ- प्रांतिक समित्या, ई- स्थानिक शाखा. ७ – कार्यकारी मंडळात अध्यक्षांव्यतिरिक्त चार सभासद असावेत. पैकी कमीतमी दोन सभासद हिंदी स्वातंत्र्य सैन्यातील असावेत.कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्री रासबिहारी बोस यांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच श्री राघवन्, श्री. के. पी. के. मेनन, ज. मोहनसिंग व कर्नल गिलानी हे त्याचे चार सभासद म्हणून निवडले गेले आहे. ८ – या परिषदेकडून आखून देण्यात येणा-या रूपरेषेप्रमाणे सर्व कामकाज पार पाडण्याची जबाबदारी या कार्यकारी मंडळावर राहील. पुढचा कार्यक्रम आखण्याचे काम प्रतिनिधी मंडळ करील. या कार्यक्रमानुरूप कार्य करण्याची व ज्या नवीन बाबी उद्भवतील त्या योग्य तऱ्हेने निकालात काढण्याची जबाबदारी सर्वस्वी कार्यकारी मंडळावर आहे. ९ – दूरपूर्वेतील सर्व हिंदी युद्धबंदी आमच्या ताब्यात देण्यास ही परिषद निप्पाॅन सरकारला विनंती करीत आहे. १० – हिंदी स्वातंत्र्य सैन्याच्या कोठल्याही पदावर अन्यदेशीय इसमाची नेमणूक होणार नाही किंवा त्याचा कसल्याही प्रकारचा संबंध असणार नाही. ११ – हिंदी स्वातंत्र सैन्याच्या स्थापनेपासूनच त्यास स्वतंत्र राष्ट्रीय फौजेचा दर्जा आणि आनुशंगिक सर्व सत्ता राहिल. म्हणजे हिंदी स्वातंत्र्यसैन्य हे जपान किंवा स्वतंत्र राष्ट्राच्या फौजेच्या दर्जाचे राहील. १२ – अ- हिंदी स्वातंत्र्य सैन्य हे हिंदुस्थानच्या भूमिवरच लढेल व तेसुद्धा इंग्रज आणि त्यांस मदत करणाऱ्या राष्ट्राविरूद्धच. आ – हिंदुस्थानाचे स्वातंत्र मिळवून ते टिकविणे याच एका अंतिम ध्येयास अनुसरून जे काही करावे लागेल ते सर्व हिंदी स्वातंत्र सैन्य करील, परंतु अन्य कोणत्याही हेतूस धरून हिंदी स्वातंत्र्य सैन्याचा उपयोग करता येणार नाही. १३ – हिंदी स्वातंत्र सैनिक, हा हिंदी स्वातंत्र्य संघाचाही सभासद समजण्यात येईल आणि त्या संघाशी एकनिष्ठ राहणे हेे त्याचे कर्तव्य ठरेल. १४ – जनरल आॅफिसर कमांडिंग मोहनसिंग हे हिंदी स्वातंत्र सेनेचे मुख्य अधिकारी राहतील व कार्यकारी मंडळाच्या सल्ल्यानुरूप ते या सैन्याचे कार्य चालवितील. १५ – इंग्रजांविरूद्ध युद्धपुकारण्यापूर्वी हिंदी राष्ट्रीय सभेच्या ध्येयाशी आपले ध्येय जुळत असल्याची, कार्यकारी मंडळाने खात्री करून घ्यावी. १६ – कार्यकारी मंडळास योग्य वाटेल त्या वेळेस व वाटेल त्या प्रकारची मदत इतर राष्ट्रांकडून घ्यावयास हरकत नाही. १७ – दूरपूर्वेतील सर्व हिंदी लोकांकडून जरूर तितके द्रव्य जमविण्याचे सर्व अधिकार कार्यकारी मंडळास देण्यात येत आहेत. १८ – या परिषदेची निप्पाॅन – जपान – सरकारला अधी विनंती आहे की, दूरपूर्वेतील कोणत्याही निरापराध हिंदी माणसास त्यांनी शत्रू समजू नये व त्याची मालमता ही शत्रूची म्हणून समजू नये. १९ – आमच्या तिरंगी झेंडयास मान्यता देण्याची ही परिषद सर्व मित्रराष्ट्रास विनंती करीत आहे. २० – श्री. सुभाषचंद्र बोस यांनी या प्रदेशात यावे व निप्पाॅन सरकारने त्यांस इकडे आण्याची सर्व प्रकारची व्यवस्था करावी . हा या परिषदेतील विशेष महत्वाचा ठराव होता.

सप्टेबर १९४२ च्या सुमारास ले. क. जगन्नाथराव भोसले( मलायातील सर्व हिंदी फौजी अधिका-यात ले. क. भोसले हेच हुद्दयाने सर्वात वरिष्ठ होते )हे स्वातंत्र्य चळवळीस मिळाले होते. श्री. रासबिहारी बोस यांनी हिंदी स्वातंत्र्यसेनेचे धुरीणत्व स्वतःकडे घेण्याची त्यास विनंती केली. ती त्यांनी मोठया आनंदाने मान्य करून १९४३ च्या फेब्रुवारी महिन्यात , पुनश्च या सेनेची जुळवाजुळव करण्याचे कार्य स्वीकारले. नंतर १० फेब्रवारी १९४३ रोजी झालेल्या सर्व फौजी अधिकाऱ्यांच्या बैठकीत ले. क. भोसले हे डी. एम्. बी. म्हणजे ‘डायरेकटर आॅफ मिलीटरी ब्यूरो ’ झाल्याचे जाहीर झाले.
आझाद हिंदचे प्रमुख म्हणून नेताजींची जपान मधील कामगिरी:-जर्मनी व जपान सरकारने परस्परांच्या सहकार्याने नेताजींना अतिपूर्वेला पाणबुडीतून पोहचविण्याची योजना आखली. ८ फेब्रवारी १९४३ किलला गेले. किल कालव्यातून यू – १९० हया पाणबुडीने त्यांच्या अविस्मरणीय प्रवासाला प्रारंभ झाला. हा सुमारे तीसहजार सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करण्यास त्यांला एकंदर साडेतीन महिने लागले. मादागास्करच्या दक्षिणेला जर्मन पाणबुडीने जेंव्हा नेताजींना जपानी पाणबुडीच्या हवाली केले. मे १९४३ मध्ये नेताजी हे सिंगापूरला सुरक्षितपणे पोहचले. जपान सरकारतर्फे कर्नल यामा मोटो हयांनी त्यांचे तेथे स्वागत केले.
२० जून १९४३ रोजी जनबा अबीद हसन नावाच्या एका मुसलमान युवकासह सुभाषबाबू एका पाणबुडीतून टोकिओला येऊन पोहचले. जनरल टोजो स्वतः सुभाषबाबूंच्या स्वागताला हजर होते. याच दिवषी नेताजींनी टोकिओ रेडिओवररून जर्मनी व जपान या देषांना उद्देशून भाषणे केली. जर्मनांसाठी केलेले भाषण त्यांच्याच भाषेत होते. त्यांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासंबंधी जर्मनांनी दाखविलेल्या कळकळीबद्दल आणि त्यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानून ‘ उभयतांचे उद्दीष्ट साध्य होईपर्यंत आम्ही आपल्याशी सहकार्य करू याची खात्री असू दयावी ’, अषा आशयाचे निवेदन केले. जपान्यांना उद्देशून केलेल्या भाषणात, त्यांनी केलेल्या हार्दिक स्वागताचा व पाहुणचाराचा उल्लेख करून त्यांचे त्यांनी आभार मानले.
जपानचे मुख्यमंत्री जनरल तोजो व युद्धमंडळातील इतर अधिकारी यांच्याबरोबर या वाटाघटी केल्या. त्यातील मुख्य आशय हा की, ‘ जपानला हिंदुस्थानवर स्वामीत्व मिळवावयाचे नाही. उभयतांचे समान शत्रू म्हणून केवळ सहकार्याने इंग्रजांशी दोघांनी लढायचे’ या बाबतीत सुभाषबाबूंची पूर्ण खात्री झाल्यावरच त्यांनी दूरपूर्वेतील हिंदी स्वातंत्र्य चळवळीचे धुरीणत्व पत्करावयाचे असे निश्चित केले. या सर्व वाटाघटीत श्री. रासबिहारी बोस यांचे प्रमुख अंग होतेच.सुभाषचंद्रांनी टोकियो रेडिओवरून सर्व हिंदी लोकांस उद्देशून एक भाषण केले. त्यात , ‘ हिंदुस्थानचे स्वातंत्र्य परत मिळविण्यासाठी जपानी राष्ट्र सर्व तऱ्हेची मदत देण्यास तयार आहे. , तरी या संधीचा आपल्याला पुरा फायदा करून घेतला पाहीजे. ’ असे त्यांनी निवेदन केले.
२ जुलै १९४३ ला सुभाषबाबू रासबिहारी बोस यांच्याबरोबर विमानाने शोनानला (सिंगापूर ) पोहचले. विमान तळावर कर्नल जगन्नाथराव भोसले व इतर ८-१० प्रमुख अधिकारी स्वागतासाठी हजर होते. सुभाषबाबूंचे पहिले दोन दिवस भेटीगाठीतच गेले. हाॅंगकाॅंग, थायलंड, ब्रह्मदेश, बोर्निओ इत्यादी ठिकाणाहून आलेल्या आझाद हिंद संघाच्या कार्यकत्र्यांशी व आझाद हिंद फौजेच्या पुढाऱ्यांशी चर्चा केली. सिंगापूरमधील ‘कातोंग’ विभागात असलेला एक भव्य बंगला त्यांना दिला गेला. तो बंगला पूर्वी ‘मेयर’ नावाच्या एका जू कोटयाधिशाचा होता. सुरीन बोस हे बराच काळ मलायात वास्तव्यास असलेले गृहस्थ सुभाषबाबूंचे गृहव्यवस्थापक होते. दूरपूर्वेतील हिंदी लोकांनी सुभाषचंद्र बोस यांना ‘नेताजी ’ ही उपाधी दिली तर जपान मधील लोक त्यांना ‘ चंद्रबोस ’ असे म्हणत.
दि. ४ जुलै १९४३ रोजी दूरपूर्वेतील सर्व हिंदी लोकांच्या प्रतिनिधींची एक मोठी परिषद हे टोकियोतच भरवावी श्री. रासबिहारी व श्री. सुभाषचंद्र यांच्या परस्पर अनुमतीने ठरलेले होते.परिषदेच्या व्यासपीठावर महात्मा गाांधींचे विषाल चित्र उभारण्यात आले होते. परिषदेसाठी हिंदी स्वातंत्र्यसेनेचे शंभर दिडशे वरिष्ठ अधिकारी प्रतिनिधी म्हणून हजर होते या परिषदेत श्री. रासबिहारी बोस यांनी आपल्या भाषणात दूरपूर्वेतील हिंदी स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास निवेदन केला. त्यात त्यांनी , ‘ सर्व एशियाटिक राष्ट्रात जपानने स्वतः प्रबल होऊन व पुढाकार घेऊन इंग्लंड आणि अमेरिका यांसारख्या बलाढय पाश्चात्य राष्ट्रांशी सुरू केलेल्या युद्धाचा आपण पूर्ण फायदा घ्यावा व आपले गमावलेले स्वातंत्र्य परत मिळविण्याची सुवर्ण संधी वाया घालवू नये. अशी सर्वाना कळकळीची विनंती केली.तसेच त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे आझाद हिंद संघाचे अध्यक्षपद देण्यात आल्याचे जाहिर केले. सुभाषबाबूंनी आपल्या भाषणात आझाद हिंद सरकारची स्थापना करण्याचा उद्देश जाहिर केला. ते म्हणाले की, ‘‘… आता माझया बाबतीत बोलायचे म्हणजे, सशस्त्र लढा पुकारल्याशिवाय कोणालाही स्वातंत्र्य प्राप्त झालेले नाही व म्हणून त्या शिवाय हिंदुस्थानास गत्यंतर नाही, अशी माझी बालंबाल खात्री झाली आहे.त्यासाठी स्वदेशांतच राहून जमवाजमव करणे अशक्य होते; म्हणून युक्तीयुक्तीने देशाच्या बाहेर पडून, इंग्रज – अमेरिकनांच्या शत्रुपक्षातील कोणकोणती राष्ट्रे आपल्याला मदत करू शकतील,हे पाहण्याचा माझा मुख्य हेतू होता.त्याप्रमाणे मी युरोपातील राष्ट्रांचे निरिक्षण करून त्यांचे मत अजमावण्यासाठी, आजपर्यंत तिकडे राहिलो.जपानमध्ये जाऊन , तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाटाघाटी केल्या, या सर्वांचा निष्कर्श मी असा काढला आहे की, हिंदुस्थान इंग्रजांच्या मगरमिठीतून सुटून स्वतंत्र व्हावा, हीच त्या सर्वांची मनापासून इच्छा आहे व ती फलद्रुप होण्याकरीता ते हिंदी लोकांस सर्व तऱ्हेचे साहाय्य देण्यास तयार आहेत. इंग्रज व त्यांचे पित्ते, फॅसिस्ट राष्ट्रांकडे आमचा ओढा असल्याबद्दल नेहमी बोटे मोडतात; परंतु आम्हास त्यांच्या अंतस्थ राज्यतंत्राशी काही कर्तव्य नसून आमच्या कार्यात जो कोणी आम्हास मदत करील तो आमचा मित्र होय, असे आम्ही समजतो. स्वातंत्र्याच्या या अखेरच्या लढाईत आम्हाल भूक, तहान व सर्व प्रकारचे कष्ट आणि अखेर मृत्यूशीही सामना करावा लागेल. त्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही. … या कामी आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशाची अपेक्षा करण्यासाठी मला काहीच हरकत वाटत नाही. … ’’ त्याप्रतिनिधींनी त्या -त्या प्रांतातील खेडोपाडी जाऊन सर्वत्र स्वातंत्र्य संघाची केंद्रें स्थापन करून एकसुत्री संघटनेचे जाळे पसरावे, असे त्यांनी सुचविले. .’’
५ जुलैला टाउनहाॅल समोर आझाद हिंद फौजेची भव्य परेड झाली. सर्व सैनिकांनी नेताजींना सलामी दिली. हिंदी स्वातंत्र्यसेनेचा ‘मिलिटरी रिव्हयू ’ झाला.ता. ६ जुलैला जपानचे मुख्य प्रधान जनरल टोजो शोनानला आले. त्यांनी सुभाषबाबू यांची भेट व आझाद हिंद फौजेची सलामी घेतली. नेताजींनी यावैळी केलेल्या भाषणात पूर्व आशियातील तीस लक्ष हिंदी लोकांमधून तीन लक्षांची फौज व एक कोटी डाॅलरचा निधी उभारण्याची घोषणा केली. १८५७ च्या युद्धातील झाशीच्या राणीच्या तेजस्वी पराक्रमाची आठवण करून स्त्रियांच्याही पलटणी उभ्या झााल्या पाहिजेत, असे त्यांनी आवाहन केले. सुभाषबाबूंच्या ओजस्वी वाणीचा प्रभाव इतका की, सभेतच अनेक स्त्रियांनी आझाद हिंद सरकारसाठी आपले अलंकार काढून दिले. संघाच्या शाखा आणि ५० जागी उपशाखा स्थापन झाल्या. ता. ९ जुलै १९४३ रोजी मुख्यतः सिंगापूरच्या हिंदी नागरिकांकरीता, सायंकाळी नेताजींचे जाहीर व्याख्यान झाले. ते म्हणाले,‘‘मित्रहो, …. ‘ हिंदुस्थानचे स्वातंत्र्य ’ याशिवाय माझया रोमारोमात दुस-या विषयास थारा नाही.आणि तीच स्थिती तुम्हा सर्वांची असावी , अशी माझी उत्कट इच्छा आहे. ते साध्य करण्यासाठी मला तुमच्याकडून तीन लाख सैनिक व तीन कोटी रूपयांची आवश्यकता आहे. तुम्ही रक्त सांडण्याची तयारी करा म्हणजे मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची हमी देतो. या पुढे संपूर्ण स्वार्थ त्याग हेच प्रत्येक हिंदी मनुष्याचे ध्येय असले पाहिजे.
१२ जुलै १९४३ रोजी नेताजींनी हिंदी स्वातंत्र्य संघाच्या स्त्री शाखेतर्फे सर्व स्त्रियांस उद्देशून त्यांचे भाषण झाले त्यात, नेताजी म्हणाले, ‘‘ हिंदी स्त्रियांच्या शौर्याची परंपरा फार जुनी आणि उज्जवल आहे.हिंदुस्थानातील आजपर्यंतच्या दुर्गावती, चांदबिबी, पन्नादाई, अहिल्याबाई, जोहारास तयार असलेल्या रजपूत स्त्रिया आणि झाशीची राणी यांची स्फूर्ती तुमच्या अंतःकरणातसतत जागृत आहेच.१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धात एकच झाशीची राणी झाली ; परंतु आपल्या आगामी स्वातंत्र्य लढयात त्या प्रकारच्या हजार राण्या तुमच्यातून उत्पन्न झाल्या पाहिजेत ; तरच त्या स्मृतीचे सार्थक तुम्ही केल्यासारखे होणार आहे. … ‘तुमच्यापैकी कितीजणी सैन्यात दाखल होण्यास तयार आहेत ’, असा प्रश्न नेताजींनी करताच, एकूण एक सर्वांचे हात वर झाले व सर्वांनी एकमताने आपण तयार असल्याचे सांगितले. नंतर चार पाच दिवसांनी (सुमारे १७ जुलै) दूरपूर्वेतील दक्षिणेकडील जावा, सुमात्रा, बोर्निओ इत्यादी भागातील जनतेस कार्यप्रवण करून त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी नेताजी विमानमार्गे सिंगापूरातून रवाना झाले. जावा, सुमात्रा, बोर्निओ इत्यादी बेटातील प्रमुख शहरी त्यांनी जाहीर व्याख्याने दिली. या दौ-यात लोकांनी त्यांना स्वयंस्फूर्तिने संघशः व वयक्तिशः त्यांस जडजवाहीर, अलंकार आणि पुष्कळ द्रव्यही अर्पण केले. सैनिकांप्रमाणेच सर्व हिंदी लोकांस म्हणजे बायका, पुरूष, मुलगे, मुली, म्हातारे कोतारे इत्यादी सर्वांस सैनिकाचे प्राथमिक शिक्षण द्यावे, ही त्यांची इच्छा होती.यामुळे त्यास व्यक्तिशः फायदा काही नाही असे जरी धरून चालले तरी त्यामुळे सबंध समाजाचा दृष्टीकोन बदलण्यस मदत होते.
९ आॅगस्टला हिंदी क्रांतीचा वर्षदिन सर्वत्र समारंभाने पाळण्यात आला. पूर्व आशिया आणि मलायाच्या कानाकोप-यात अनेक सभा झाल्या. शोनानच्या विराट सभेत महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांची चित्रे लावण्यात आली होती या सभेत सुभाषबाबूंनी, ‘ दोन महिन्यात आझाद फौज ब्रह्मदेशात कूच करून हिंदुस्थानवर चढाई सुरू करील अषी घोषणा केली. आझाद हिंद सरकारचे मुख्य ठाणेही रंगूनला हलविण्यात येणार असल्याचे जाहीर केले. २५ आॅगस्टला सुभाषबाबूंनी आझाद हिंद फौजेचे नेतृत्व आपल्या हाती घेतले. या दिवशी काढलेल्या पत्रकात सुभाषबाबू म्हणतात, ‘‘ हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा लढा व आझाद हिंद फौजेचे कार्य पुढे चालविण्यासाठी मी आज फौजेचे नेतृत्व स्वीकारीत आहे. या फौजेपुढे एकच ध्येय आहे. हिंदुस्थानचे स्वातंत्र्य. आम्हाला आज आमच्या स्वातंत्र्याच्या हक्कापासून वंचित करू शकेल अशी एकही शक्ती या जगात नाही. …’’ शोनान, क्वालालंपूर, सलेम्बान, इपोह इत्यादी सर्व जागी शिक्षण शिबिरे उघडण्यात आली. व प्रत्येक शिबिरात शेकडो हिंदी सैनिकांना विविध प्रकारचे लष्करी शिक्षण देण्यात येऊ लागले. एकीकडे नेताजींनी स्वातंत्र्य सैनिकांची संख्या तीन लाखापर्यंत वाढविण्याचे योजिले होते. प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी बालकसेनाही उभारण्यात आलेली होती. यात सामान्यतः वय बारा ते अठरा वर्षे वयाच्या दरम्यान असलेली मुले घेण्यात. पेनांग येथे जपान्यांनी हिंदुस्थानवर चढाई करण्याच्या उद्देशाने एका गुप्त लष्करी शिक्षणाची शाळा सुरू केली होती. ही शिक्षणसंस्था ज. मोहनसिंग आणि त्यांच्या वेळच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतर पुढाऱ्याच्या हाताखाली होती, छत्रीसैनिकाचे (पॅराटप्स) शिक्षणही हिंदी स्वातंत्र्य सैन्यातील दोन तुकडयांस दिले गेले होते. या तुकडयांचे शिक्षण सुमात्रा बेटात झाले.छत्रीसैनिकाचे एक महत्वाचे कार्य म्हणजे शत्रूस नकळत रात्री अपरात्री छत्र्यांच्या मदतीने शत्रुव्याप्त प्रदेशात उतरावयाचे व तेथे राहून उत्पात, हेरगिरी, शत्रुची रसद तोडणे इत्यादींसारखी कामे करणे. ले. वामनराव देशमुख हे अमरावतीचे गृहस्थ या तुकडीचे मुख्य होते. दूरपूर्वेतील दोन वर्षाच्या स्वातंत्र्य चळवळीत अशा दहा लष्करी शिक्षणकेंद्रातून एकंदर वीस हजार स्वयंसेवक सैनिक म्हणून तयार झाले. २६ सप्टेबरला हिंदुस्थानचे अखेरचे बादशहा बहादूरशहा जफर यांचा स्मृतीदिन सन्मानपूर्वक पाळण्यात आला.
२ आॅक्टोबरला महात्मा गांधीचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. त्या दिवशी घरोघर रष्ट्रीय झेंडे उभारण्यात आले. प्रभातफेऱ्या आणि मिरवणूका निघाल्या. गांधीजींना आदरपूर्वक अभिवादन करताना नेताजींनी अत्यंत मार्मिक भाषण करून गाांधीजींच्या विविध कार्याचे विवेचन केले. गांधीजींचे नाव देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीले जाईल असे उद्गार नेताजींनी काढले.
आॅक्टोबर महिन्याच्या. ११-१२ तारखेस नेताजींनी सिंगापूरमधील निरनिराळया बंदी छावण्यात व्याख्याने झाली. प्रत्येक छावणीतील दहा -बारा हजार लोक त्या छावणीतील मैदानात जमत असत. युद्धबंद्यांस उद्देशून नेताजींनी सांगितले, ‘‘मित्रहो, … आता अशी वेळ येऊन ठेपलेली आहे की तुमच्यापैकी प्रत्येकास आपला एक काहीतरी विचार ठाम केला पाहिजे. आम्ही आमचा कार्यक्रम आखलेला आहे. हे वर्ष संपण्याच्या अगोदर म्हणजे ३१ डिसेंबर १९४३ चे आत आम्ही हिंदुस्थानच्या भूमिवर आमचा पाय रोवू. ‘ चलो दिल्ली ’ हेच आमचे ब्रीदवाक्य आहे. दिल्ली काबीज करून हिंदुस्थानचे स्वातंत्र्य तेथील जनतेच्या विश्वासातील नेत्यांच्या स्वाधीन केले म्हणजे हिंदी स्वातंत्र्यसेनेचा कार्यभाग संपला. तदनंतर हिंदी स्वातंत्र्यसेना स्वतःकडे कोणत्याही प्रकारचे अधिकार ठेवणार नाही. या कार्यात तुम्हास सहभागी व्हावयाचे असेल तर आम्हाला आनंदच आहे. नेताजींची व्याख्याने जेंव्हा निरनिराळया बंदीछावण्यात झाली, तेंव्हा प्रत्येक छावणीतील नेताजींच्या भाषणानंतर सर्व युद्धबंदयांस स्वातंत्र्य सैन्यात सामील होण्याची संधी देण्यात आली. त्या संधीचा फायदा घेऊन सुमारे दीड हजार सैनिक स्वातंत्र्य चळवळीत आले. हिंदी स्वातंत्र्यसैन्याची संख्या युद्ध संपण्याच्या सुमारास ४० हजार होती. पैकी वीस हजार युद्धबंदयांतून हिंदी स्वातंत्र्य सैन्यात सामील झालेले होते.

पहिला भाग वाचण्यासाठी….

‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ – डाॅ. सोपान रा. शेंडे

One comment

Leave a Reply