‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ – डाॅ. सोपान रा. शेंडे

२०१८ हे आझाद हिंद सरकारच्या स्थापनेचे अमृतमहोत्सवी वर्ष. २१ आॅक्टोबर हा १८५७ च्या स्वातंत्र्संग्रामातील रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाईचा जन्म दिवस. त्या दिवसाचे औचित्य साधून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानमध्ये २१ आॅक्टोबर १९४३ रोजी आझाद हिंद सरकारच्या स्थापनेची घोषणा केली. आझाद हिंद सरकारच्या स्थापनेचीही घटना तत्कालीन जगातील अत्यंत महत्वाची व प्रभावी घटना होती. दुस-या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर या घटनेचा विचार केला तर असे दिसून येते की, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स या मित्र राष्ट्रांनी लोकशाहीच्या रक्षणाचा बुरखा घेऊन आपल्या स्वार्थी, भांडवलशाही व साम्राज्यवादाच्या रक्षणासाठी इटली , जर्मनी , जपान हयांना हुकुमशाहीचे लेबल लावून त्यांच्या विरोधात युद्ध चालविले होते. परंतु इंग्रजांच्या प्रभावाखालील आशियायी देशांनी मात्र कमी अधिक प्रमाणात स्वातंत्र्याच्या चळवळींना गती दिली होती. सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीत जाऊन हिटलरच्या मदतीने जर्मनी व इटाली, हयांच्या कैदेत असलेल्या हिंदी सैनिकांना बरोबर घेऊन, स्वतंत्र भारत केंद्र स्थापन केले व फौज उभारण्याचे काम सुरू केले होते. भारतामध्ये भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस व म. गांधी यांच्या नेतृत्वाखाली आॅगस्ट १९४२ मध्ये इंग्रजांना ‘चले जाव’ ! चा आदेश दिला होता. दुस-या महायुद्धात जपानने आग्नेय आशियातील जे प्रदेश इंग्रजांकडून जिंकून घेतले, तेथील हिंदी लोक स्वातंत्र्याने आनंदी झाले होते. जपानमध्ये रासबिहारी बोस ,कॅ. मोहनसिंग, कॅ. जगन्नाथ भोसले इत्यादींच्या नेतृवाखाली ‘इंडियन इंडिपेन्डन्स लीग ’ च्या नेतृत्वाखाली आग्नेय अषियायी देषांतील हिंदी लोक एकत्र आले होते. या प्रतिक्रियेचा ऐतिहासिक मागोवा घेतला तर हे स्पष्टपणे समोर येते की, वसाहतवादी व सम्राज्यवादी भांडवलशाही राष्ट्रांच्या जोखडाखाली पिचलेल्यांनी दुस-या महायुद्धाची संधी साधून साम्राज्यवादाच्या विरोधात मोठी आघाडी उभी केली होती आणि सर्वांच्या सहकार्याने पारतंत्र्यातून मुक्ती मिळवायची, असा ध्यास घेतला होता. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानमध्ये आझाद हिंद सरकार स्थापनेची घोषणा करणे आणि आग्नेय आशियातील सर्व हिंदी बांधवांना एकत्र आणून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्लंड व अमेरिका यांच्या विरोधात युद्धप्रवेशाची घोषणाा केली. ही बाब चिंतनीय आहे. आजच्या परिस्थितीत ‘ आझाद हिंद आणि दुसरे महायुद्ध’ असा विचार केला तर इतिहासातील अनेक प्रश्नांची उकल होण्याची शक्यता आहे.
२०१८ हे वर्ष ‘ आझाद हिंद सरकारची ’ स्थापना या जागतिक पातळीवर महत्वाच्या असलेल्या ऐतिहासिक घटनेचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. स्वातंत्र भारताच्या दृश्टीने या घटनेला अनेक अंगाने महत्व आहे. या ऐतिहासिक प्रसंगाच्या निमित्ताने आझाद हिंद सरकार, आझाद हिंद सेना, त्याचे निरनिराळे नेते, असंख्य कार्यकर्ते, सैनिक , शिपाई, इत्यांदींचे भारतमातेबद्दलचे प्रेम, त्यांचा अतुलनिय त्याग, दुस-या महायुद्धात पराभव झाल्यानंतर पदरी आलेली कैद, कारावास आणि त्यातील यातना, अवहेलना, सुभाषचंद्र बोस हयांचे गायब होणे आणि त्यानंतर उठलेल्या अफवांच्या वावडया या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आझाद हिंदी चा ऐतिाहसकि मागोवा घेण्यासाठी लेखन प्रपंच.
जयहिंद, आझाद भारत केंद्र, इंडियन इंडिपेन्डन्स लीग, आझाद हिंद सरकार, आझाद हिंद सेना, तुम मुझो खून दो! मैं तुम्हे आजादी दूंगा !!, चलो दिल्ली, कदम कदम बढाये जा, खुषी के गीत गाये जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाये जा, इत्यादी सारख्या अनेक बाबी आपणास आझाद हिंदची आठवण करून देतात. परंतु १९४७ पर्यंत आपण पारतंत्र्यात होतो. १५ आॅगस्ट १९४७ ला आपण स्वतंत्र झालो आणि स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक प्रश्न सोडविण्यात अडकून गेलो. भारताची लोकशाही विकसित होत गेली तशी सत्ता आणि संपत्ती मिळविण्याची स्पर्धा वाढीस लागली. त्यात स्वातंत्र्याची सत्तरी कधी ओलांडली हे देखील कळले नाही. त्यामुळे ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी यातना सहन केल्या, बलिदान दिले. अशांच्याबाबत जयंती पूण्यतिथी यापलीकडे जाऊन विशेष गांभिर्याने विचार झाल्याचे आढळत नाही. विषेशतः ‘आझाद हिंद’ काय होते ? याचा मागोवा कितपत घेतला गेला, याबाबत शंका उपस्थित करण्यास जागा आहे. असो.

आझाद हिंद सरकार स्थापनेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्याच्या इतिहासाचा मागोवा घेता अनेक बाबी समोर येतात. त्यामध्ये

१- आझाद हिंद काय होते? त्याची स्थापना कोठे व कोणी केली? त्याचे नेते सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस की मोहनसिंग.,

२- तत्कालीन जागतिक राजकारणात हिटलर, मुसोलिनी, जन. तोजो ( जर्मनी, इटली, जपान) हे हुकुमशहा होते, त्यांची मदत घेऊन सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न योग्य होते की अयोग्य ?

३- सुभाषचंद्र बोस यांचे आझाद हिंद मधील योगदान कोणते?

हे व यासारखे अनेक प्रश्न उभे राहू शकतात.
एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस कटक शहरात २३ जानेवारी १८९७ रोजी जन्मलेल्या, कलकत्ता (कोलकाता) शहरात वैचारिक जडणघडण झालेल्या आणि विसाव्या व एकविसाव्या शतकातील भारतीय व जागतिक राजकारणावर प्रभाव टाकणारे सुभाषचंद्र जानाकीनाथ बोस ऐतिहासिक हे व्यक्तीमत्व भारताच्या तसेच जगाच्या इतिाहामध्ये अजरामर ठरलेे आहे. वसाहतकालीन भारतातील सामाजिक, राजकीय, आर्थिक व धार्मिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतात सुरू झालेले स्वातंत्र्य आंदोलन आणि त्याचे काळानुसार बदलत गेलेले स्वरूप, या प्रक्रियेतील नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रखर राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्यनिष्ठा, स्वतंत्र विचारसरणी, इत्यादींमुळे तत्कालीन काॅंग्रेसच्या राजकारणावर त्यांनी आपल्या विचार व कार्याने ठसा उमटविला. नेताजींच्या कार्याला जागतिक पातळीवर महत्व प्राप्त झाले ते त्यांच्या दुस-या महायुद्धात इंग्लंड व अमेरिका यांच्या विरोधात जपानच्या बरोबरीनेे घेतलेल्या सहभागामुळे. ‘‘दुसरे महायुद्ध, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सरकार ’’ ही त्रिसुती इतिहास अभ्यासाच्यादृष्टीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ऐतिहासिक महत्व जाणून घेण्याच्या दृष्टीने महत्वाची ठरावी. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझादहिंद सेना हे भारतीय स्वातंत्र्याला पडलेले एक सोनेरी स्वप्न होते. वासहातिक मानासिकतेत रूतलेला भारतदेश साम्राज्यवादी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सशस्त्र क्रांतीशिवाय दुसरा पर्याय नाही ! शत्रुचा शत्रु हा मित्र असतो! या क्रांतीकारी विचाराने भारावलेल्या सुभाषचंद्रांनी जानेवरी १९४१ मध्ये अज्ञातवास स्वीकारला आणि बर्लिन रेडिओवरून प्रगट झाले ते आझाद हिंदचे नेते म्हणून! नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना यांचा इतिहास अतिशय प्रेरणादायी व देशप्रेमाने भारावलेला आहे. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील प्रभावी व्यक्तीमत्व, भारतातील तरूणांचे प्रेरणास्थान, आधुनिक भारताच्या जडघणीसाठी प्रयत्न करणारे नेते, प्रखर देशभक्त व भारतमातेचा सुपुत्र सुभाषचंद्र बोस. १९३९ साली भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले असताना पक्षांतर्गत राजकारणाचा वीट येऊन त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि काॅंग्रेसअंतर्गत ‘फाॅर्वर्डब्लाॅक ’ची स्थापना करून जागतिक राजकारणाच्या व दुस-या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर इंग्रजांना कोंडीत पकडून , त्यांच्या शत्रुंची मदत घेऊन सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून देशाला इंग्रजांच्या गुलागिरीतून मुक्त करण्यासठी जानेवारी १९४१ मध्ये अज्ञातवास स्वीकारला.

आझाद हिंद चा इतिहास:-

आझाद हिंद ची स्थापना व तिची प्रभावी वाटचाल आणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलानातील तिचे योगदान महत्वाचे आहे, असे असले तरी त्याचा इतिहास वरवर पाहाता तितका सरळ किंवा सोपा नाही. आझाद हिंदसेनेची स्थापना ही एक आग्नेय आशियायी देशांमधील हिंदीजनतेची साम्राज्यवादाविरूद्धची सामुहीक व प्रभावी प्रतिक्रिया होती, ही बाब विचारात घ्यावी लागते. या प्रक्रियेचा प्रारंभ १९४१ मध्ये नेताजी जर्मनीमध्ये गेले आणि त्यांनी ‘‘स्वतंत्र भारत केंद्राची’’स्थापना केली. जर्मनी व इटालीच्याकैदेत असलेल्या हिंदी युद्धकैदयांना बरोबर घेऊन सशस्त्र सेना उभी करावी व इंग्रजांविरूद्ध स्वातंत्र्याचा लढा सरू करावा आणि भारतमातेला इ्रग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करावे, यासाठी प्रयत्न सुरू केले. इटालीमध्ये वास्तव्यास असलेले भारतीय तरूणही त्या दिशेने वाटचाल करीत होते. तशाच प्रकारचे प्रयत्न जपान मध्ये राबिहारी बोस व कॅप्टन मोहसिंग यांनी जपानच्या कैदेत असलेल्या हिंदी कैद्यांना बरोबर घेऊन . ‘इंडियन इंडिपेंडन्स लिग ’ च्या माध्यमातून सुरू केले होते. त्यांनी या संघटनेच्या माध्यमातून आग्नेय आशियातील हिंदी जनतेला एकत्र केले होते. जपानमध्ये झालेल्या आग्नेय आशियातील देशांच्या परिषदेत रासबिहारी बोस यांनी आझादहिंद सेनेची सूत्रे नेताजी सुभाषचंद्र बोस हयांच्या हाती सोपविली. त्यामुळे नेताजी केवळ भारतीय नव्हे तर साम्राज्यवादाचे बळी ठरलेल्या आग्नेय आशियायी देशांतील हिंदी जनतेचे कंठमणि ठरले.
नेताजींचे जर्मनीतील कामगिरी:-

27 मार्च 1941 रोजी विमानाने सुभाषचंद्र माॅस्कोहून निघालेे आणि दुस-या दिवशी ते बर्लिनला पोहचले. तेथे त्यांनी रा़त्रीच्या रात्री जागून काढून आपल्या कामाचे अनेक आराखडे तयार केले. शेवटी असा निष्कर्ष काढला की, युरोपमध्ये जे कित्येक भारतीय लोक राहात आहेत, त्यांना एकत्र जमवून ‘ स्वतंत्र भारत केंद्र ’ स्थापन करावयाचे आणि त्यांच्या मार्फत आपण योजलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करावयाची. त्यांना हया केंद्रामार्फत मुख्यत्वेकरून दोन कार्ये करावयाची. १ – आकाशवाणी द्वारा प्रचार आणि २ – भारतीय सैनिक दलाची संघटना. हया दोन कामांपैकी पहिले काम त्यामानाने सोपे होते. आकाशवाणीच्या तांत्रिक सोयी करणे जर्मन अधिका-यांना फारसे अवघड नव्हते पण ‘ भारतीय सैनिक दलाच्या संघटनेला जर्मनांकडून पाठिंबा मिळणे कठीण होते. ब-याच वादविवादानंतर सुभाषबाबूंना आपल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारी सर्व मदत आणि व्यवस्था करण्याचे हिटलरने स्वतः कबूल केले. स्वतंत्र राष्ट्राचा नेता म्हणून सुभाषचंद्रांचा दर्जा मान्य करण्यात आला. त्यांना त्याबाबतच्या सर्व राजकीय सवलती देण्यात आल्या. सुभाषचंद्रांच्या स्वतंत्र भारत केंद्रा च्या मध्यवर्ती कार्यालयासाठी, आकाशवाणीसाठी आणि सैनिक दलासाठी लागणारा जो सर्व खर्च, ‘ राष्ट्रीय कर्ज ’म्हणून समजण्यात यावे व कार्य यशस्वी झाल्यानंतर ते जर्मनीला परत देण्यात यावे असे ठरले.
१९४१ च्या आॅक्टेबर महिन्यात त्या ठिकाणी ‘ स्वतंत्र भारत केंद्र ’ सुरू केले. नेताजींच्या ‘स्वतंत्र भारत केंद्र’ सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून त्याला एखादया स्वतंत्र राष्ट्राच्या वकीलातीचा दर्जा देण्यात आला होता नोव्हेंबर १९४१ रोजी ‘ स्वतंत्र भारत केंद्राची ’ पहिली सभा भरली. या पहिल्याच सभेत चार गोष्टी मुक्करर करण्यात आल्या, ज्या कालांतराने भारताच्या राष्ट्रीय जीवनात अमर झाल्या. १ -‘जयहिंद ’(जयहिंद या अभिवादनाची निर्मिती जर्मनीतील अॅनाबर्ग येथील छाावणीत झाली. त्याचा निर्माता अबीद हसन ठरला.)ही अभिवादनाची घोशणा ठरली. २ – ‘नेताजी ’ ही सुभाषबाबूंना पदवी देण्यत आली. ३ -‘ जन गण मन ‘ हे राष्ट्रगीत मान्य करण्यात आले. ४ – हिंदुस्थानी ही भारताची राष्ट्रभाषा असावी, असे एकमताने ठरविण्यात आले. भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सर्वांनी सुभाषबाबूंना नेते म्हणून स्विकारले आणि निष्ठा, प्रामाणिकपणा, गुप्तता या बाबतची षपथ घेतली. १९४२ मध्ये ‘ इंडो – जर्मन सांस्कृतिक समिती ’ च्या उद्घाटन समारंभात ‘हॅंम्बुर्ग ’ येथे ‘जन गण मन ’ हे राष्ट्रगीत वाद्यवृंदांच्या साथीने प्रथमतः गाण्यात आले. हया प्रसंगी भारताचा राष्ट्रध्वजही प्रथमच फडकाविण्यात आला. राष्ट्रध्वज तिरंगी असून त्यावर झोपावणा-या वाघाचे चित्र होते.

आकाशवाणीचा कार्यक्रम सुभाषबाबूंनी प्रथम हाती घेतला. आपल्या देशबांधवांच्या हृदयात प्रवेश करण्याचे ‘आकाशवाणी’ हे प्रभावी साधन त्यांनी हाती घेतले. आकाशवाणीच्या कामासाठी अनेक तरूण पुढे आले. नेताजींनी बर्लिन रेडिओवरून स्वतंत्र भारत केंद्रासाठी एक स्वतंत्र ‘ वेव्ह लेंन्थ ’ देण्यात आली होती. त्याला ‘ आझाद हिंद रेडिओ ’ हे नाव देण्यात आले. नोव्हेंबर १९४१ मध्ये ‘आझाद हिंद रेडिओ’वरून सुभाषबाबूंनी पहिले भाषण केले. आझाद हिंद रेडिओच्या जोडीला ‘ आझाद मुस्लिम रेडिओ ‘ आणि ‘ काॅंग्रेस रेडिओ ’ अशी दोन स्वतंत्र ध्वनीक्षपणे सुरू करण्यात आली. आझाद हिंद रेडिओवरून इंग्रजी, हिंदी, फार्शी, पुश्तु, तामीळ आणि तेलगू या भाषांतून नियीमत आणि गुजराथी, नि मराठी भाषांतून एक दिवसआड असे कार्यक्रम देण्यात येऊ लागले. ‘ काॅंग्रेस रेडिओ वरून फक्त इंग्रजी आणि हिंदी या दोनच भाषांमधून कार्यक्रम होऊ लागले. आझाद हिंद रेडिओवरील भाषणे लिहिण्याचे काम दोन हिंदी विद्यार्थ्यांनी सर्वस्वी स्वीकारल. त्यापैकी एक विद्यार्थी केमिस्ट्रीचा व दुसरा वृत्तपत्रविद्येचा होता. हिंदी कार्यक्रम प्रक्षेपित करण्याचे काम एका दिल्लीच्या तरूणाकडे होते. तो हाॅलीवूडमध्ये चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेऊन जर्मनीत आलेला होता. वार्ता विभाग एका गुजराती तरूणाकडे सोपविण्यात आला. ‘काॅंग्रेस रडिओ’वर दोन हिंदी तरूणांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना भारतातील काॅंग्रेस चळवळीचा पूर्वीचा अनुभव होता. ‘आझाद मुस्लिम रेडिओ’ वर काम करणारा एक हैद्राबादचा मुसलमान तरूण होता. तो अलिगड विद्यापीठाचा पदवीधर होता. मॅंचेस्टरमध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास करून तो जर्मनीमध्ये आला होता. केवळ नेताजींच्या प्रेरणेमुळे तो क्रांतीकार्यात सहभागी झाला. सुभाषबाबूंना पॅरीसमध्ये इक्बाल शेदाईहा माणूस भेटला. तो रोममध्ये ‘हिमालय नभोवाणी केंद्र ’ चालविले होता.. या तिन्ही नभोवाणी केंद्रासाठी सुभाषबाबूंनी भिन्नभाषीक निवेदकांचा चांगला संच उभा केला. डाॅ. गिरिजाकुमार मुखर्जी, डाॅ. एम्. आर. व्यास, पी. बी. शर्मा, बी. एल्. केणी, प्रमोद सेनगुप्त, डाॅ. जे. के. बॅनर्जी, डाॅ. अंबिक मुजुमदार, ए. एम्. सुलतान, डाॅ. सुरेशचंद्र, ए. नायडू, बी. मूर्ती, डाॅ. कल्याण बोस, ए. हकिम, गुरूलाल आणि डाॅ. ए. एन् अहुजा हे पंधरा जण प्रत्येक भाषेतील प्रक्षेपण प्रभावी पद्धतीने केले जाईल अशी व्यवस्था करीत होते..
७ जानेवारीपासून १९४२ पासून ‘आझाद हिंद रेडिओ ’ कार्यन्वीत झाला होता.‘ दररोज कार्यक्रमाचा प्रारंभ मुघल बादशहा बहादुरशहा जफर यांच्या ‘ गाझिाओंमे बू रहेंगी जबतलक इमानकी, तबतक लंदनतक चलेंगी तेग हिंदुस्थानकी या प्रसिद्ध काव्याने होई आणि समारोप ‘ मजा आयेगा जब हमारा राज देखेंगे, की अपनीही जमीं होंगी अपना आसमां होगा, शहीदोंकी चिताओंपर लगेगे हर बरस मेले, वतनपर मरनेवालोंका यही नामोनिशां होगा या काव्याने होत असे. ‘ काॅग्रेस रेडिओ’ आणि ‘ आझाद मुस्लिम रेडिओ ’ हया केंद्रावरून स्वतः नेताजी भारतीय जनतेला आवाहने करीत असत. एकदा ते म्हणाले की , ‘‘ माझे सबंध आयुष्य म्हणजे ब्रिटिश साम्राज्याविरूद्ध एक दीर्घ, अखंड आणि बिनतडजोडीचा झगडा आहे. माझ्या प्रामाणिकपणाची हयाच्यापेक्षा निराळी हमी ती काय द्यावी.’’
१९४३ मध्ये नेताजी जर्मनीमधून जपानमध्ये गेल्यानंतर हे आकाशवाणी केंद्र युद्ध परिस्थितीमुळे बर्लिनहून हाॅलंडमध्ये हालविण्यात आले. १९४४ मध्ये दोस्त राष्ट्रांच्या सेना जेंव्हा हाॅलंडच्या सीमेवर येऊन धडकल्या तेंव्हा ही आकाषवाणी केंद्रे जर्मनीमध्ये ‘ हेल्मअेट ’ या गावी हालविण्यात आली. ९ एप्रिल १९४४ रोजी हया केंद्रापसून दोस्तांचे सैन्य अवघे पन्नास किलो मिटरवर आले असता आणि दिवसरात्र बॉंम्बचा धूमधडाका चालू असता ‘ आझाद रेडिओ ’ एका हाॅटेलच्या इमारतीतून भारताला जागृत करण्याचे आपले कार्य धैर्याने करित होता.
फौजची उभारणी:- दुस-या महायुद्धाच्या काळात जर्मनीत अॅनाबर्गच्या व इतर लश्करी तुरूंगात जवळ जवळ दहा हजार भारतीय कैदी होते. भारतीय युद्धकैद्यांना आपण सोडवून त्यांची भारतदेषाच्या मुक्ततेसाठी एक राष्ट्रीय फौज उभारावी. त्या दृष्टीने नेताजींनी जर्मन सरकारच्या परराष्ट्रीय खात्याकडे बोलणी सुरू केली.एक गोष्ट नेताजींनी जर्मन सरकारला स्पष्टपणे सांगितली की, ‘ मी ही जी भारतीय पलटण उभारू इच्छितो आहे ती तुमच्या लढाया लढण्यासाठी नव्हे तर भारत स्वतंत्र करण्यासाठी , ब्रिटिशांशी लढण्यासाठी मी हे सैन्य तयार करीत आहे. यातूनच पुढे स्वतंत्र भारताचे सैन्य तयार होईल . ’ सैन्य उभारण्याबाबत नेताजी आणि जर्मन सरकार हयांच्यामध्ये या पलटणीबाबत पाच मुद्यांवर करार झाला. १- जर्मन सैन्याने भारतीय पलटणीला आधुनिक पद्धतीने लष्करी शिक्षण देण्यासाठी लायक आणि समजूतदार अधिकारी पुरवायचे. २ – जर्मन सैनिकांना ज्या त-हेचे अद्यावत शिक्षण मिळते, अगदी तसेच पायदळाचे आणि मोटार दळाचे शिक्षण भारतीय सैनिकांना मिळाले पाहिजे. ३- कोणत्याही जर्मन पलटणीशी भारतीय सैनिकांची गल्लत होता कामा नये. ४ – जर्मनीच्या दुस-या कोणत्याही आघाडीवर भारतीय सैनिक लढणार नाहीत. फक्त ते भारताच्या आघाडीवर ब्रिटिश सैन्याशी लढतील. ५ – अन्न, पोषाख, पगार आणि रजा हयांबाबत जर्मन सैनिकांना ज्या सवलती मिळतात , त्या सर्व हिंदी सैनिकांना मिळावयास हव्यात. या सर्व अटी जर्मन सरकारने मान्य केल्या आणि युद्धकैदयांपैकी हवे ते सैनिक राष्ट्रीय पलटणीसाठी निवडण्याची मुभा दिली.
अॅनाबर्गच्या तुरूंगातील भारतीय युद्धकैद्यांना भेटून त्यांच्याशी त्या बेताबाबत बोलणी केली. या भारतीय पलटणीत केवळ युद्धकैदीच घेतले होते असे नव्हे तर , बर्लिनमध्ये शिकत असलेल्या चाळीस भारतीय विद्यार्थ्यांपैकी दहा विद्यार्थी हया पलटणीत दाखल झाले. हे दहा विद्यार्थी आणि पाच युद्धकैदी अशा पंधरा जणांच्या लहानशा गटाने ‘ आझाद हिंद फौजेचा ’ पहिला मुहूर्त केला. २५ डिसेंबर १९४१ रोजी बर्लिनमधील स्वतंत्र भारत केंद्राने निरोप दिला त्यावेळी झालेल्या समारंभातच या फौजेचे नामकरण ‘ आझाद हिंद फौज ’ असे करण्यात आलेे. चार महिन्यांच्या कालावधीत फौजेत दाखल झालेल्या सैनिकांची संख्या तीनशे पर्यंत पोहचली. आझाद हिंद फौज स्थापन झाल्यानंतर एका वर्षाच्या आत म्हणजे डिसें. १९४२ पर्यंत हया फौजेच्या एकंदर चार पलटणी तयार झाल्या. एका वर्षात सैनिकांची संख्या तीनहजार पाचशेपर्यंत वाढली. अधिक सैन्य मिळविण्यासाठी नेताजींनी इटालीत आलेल्या भारतीय युद्धकैदयांना आझाद हिंद फौजेसाठी जर्मनीत घेऊन येण्यासाठी एक शिष्टमंडळ रोमला पाठविले. इटालीतील भारतीय युद्धकैदयांना जर्मनीत पाठवून देण्याचे इटालीयन सरकारने कबूल केले. त्यानुसार त्यांना जर्मनीत आणण्यात आले. प्रारंभी सैनिकांनी जे राष्ट्रगीत म्हटले ते असे होते. ‘‘ हमे सुख को अब भूल जाना पडेगा, वतनके लिये दुःख उठाना पडेगा, ए आझाद हिंदीओ उठो कमर बांधो ! वतन लूट रहा है बचाना पडेगा’’. एप्रिलमध्ये सुभाषबाबू रोमला गेले आणि त्यांनी तेथे आझाद हिंद संघाची शाखा सुरू केली.
जर्मन सैनिकांना देतात तसले सैनिकी गणवेश भारतीय सैनिकांना देण्यात आले. फक्त त्यांच्या छातीवर झेप घेणा-या वाघाचे चित्र आणि त्याच्या खाली ‘आझाद हिंद फौज ’ ही अक्षरे काढण्यात आली होती. हया सैनिकांना शिकविण्यासाठी जर्मन अधिकारी नेमण्यात आले. यापेक्षा अधिक सैनिकांना सामावून घेणे फ्रॅंकेनबबर्गमधील प्रशिक्षण केंद्रास शक्य नव्हते. त्यामुळे सैनिकांची संख्या वाढल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून सॅक्सनी परगण्यातील ‘कोनिग्जब्रूएक’ च्या विस्तीर्ण लश्करी केंद्रात सर्व सैनिकांना हालविण्यात आले. या सैन्याचा पगार सुरूवातीला ‘ स्वतंत्र भारत केंद्रा’ कडून दिला जात असे. जर्मनीत आल्यानंतर ‘ आझाद हिंद रेडिओ ’ आणि ‘आझाद हिंद फौज ’हया दोन्ही गोष्टी नेताजींनी यशस्वी रितीने करून दाखविल्या. ’
७ मे १९४५ रोजी जर्मन राष्ट्र दोस्त राष्ट्रांना शरण गेले आणि युरोपातील युद्धावर शेवटचा पडदा पडला तथेच ‘आझाद हिंद फौजेच्या ’ अस्तित्वाची इतिश्री झाली आझाद हिंद सैनिक अमेरिकन आणि फ्रेंच सैनिकांच्या हाती पडले. फ्रेंचांनी त्यांना अमानुशपणे छळले. काहींना त्यांनी गोळया घालून ठार केले. तर काहींना छळ आणि उपासमारीने मरण पत्करावे लागले. या सर्व यातना अवहेलना सहन करताना त्यामागे होते देशप्रेम, प्रेरणा होती नेताजींची आणि ध्यास होता भारतमातेच्या मुक्तीचा.

\

2 comments

Leave a Reply