अनिल प्रकाश/अनुवाद – डॉ.प्रेरणा उबाळे
अनेक लोकांना गांधींचा मार्ग अव्यावहारिक वाटतो. मी जेव्हा शाळेत शिकत होतो तेव्हा गांधीजींची आत्मकथा (सत्याचे प्रयोग) वाचली होती आणि त्यामुळे मी खूप भारावून गेलो होतो. त्या वेळी मी त्यांची शिकवण प्रत्यक्ष आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न केला मात्र मी अयशस्वी झालो ; उपरोध आणि निराशा मिळाली. तेव्हा मलाही असे वाटू लागले होते की गांधींचा मार्ग कदाचित व्यावहारिक नाहीये. माझं किशोर मन समाज- परिवर्तनाची स्वप्ने घेऊन नव्या मार्गाच्या शोधात होते. १९६८-६९ चे वर्ष असेल. मी महाविद्यालयीन शिक्षणासाठी गावाकडून मुजफ्फरपुरला आलो होतो. तेव्हा मुजफ्फरपुर (बिहार) च्या मुशहारी विभागात आणि मुंगेर जिल्ह्याच्या सूर्यगड विभागात सशस्त्र नक्षलवादी आंदोलन मोठ्या प्रमाणात होत होते. नक्षलवाद्यांनी जेव्हा काही सर्वोदय कार्यकर्त्यांची हत्या करण्याचे मनसुबे व्यक्त केले आणि त्यांची लिस्ट प्रसिद्ध केली तेव्हा जयप्रकाश नारायण आपल्या पत्नी प्रभावती देवी यांच्यासह मुशहारी येथे पोहचले. त्यांची तरुण शांती सेना देखील आली. हे लोक अहिंसक क्रांतीचा संदेश देऊ लागले. तेव्हा मुजफ्फरपुरच्या भिंतीवर दोन प्रकारच्या घोषणा लिहिलेल्या असत. नक्षलवादी सशस्त्र क्रांतीमध्ये विश्वास असणाऱ्या लोकांची घोषणा असे- “खून खून पूंजीपतियों का खून”. आणि दुसरीकडे जेपी च्या तरुण शांतीची घोषणा असे- “जुल्म करो मत, जुल्म सहो मत”. त्यावेळी आमचे किशोर मन या दोन्ही प्रकारच्या घोषणांनी भारावून गेले होते. जयप्रकाश नारायण यांनी सशस्त्र संघर्षातील लोकांशी बोलणे सुरु केले. ते गावा-गावांमधून फिरू लागले आणि मूळ स्थिती पाहिली. त्यांनी अनुभवले की सामाजिक, आर्थिक विषमता आणि शोषण चालू असताना समाजात शांती निर्माण होणे शक्य नाही. परिवर्तनासाठी शांतीपूर्ण जन-आंदोलन आवश्यक आहे. मुशहारीच्या अनुभवाने जेपीला नवीन मार्ग मिळाला आणि त्यांनी “फेस टू फेस” नावाची पुस्तिका लिहिली. नवीन पिढीचे लोक हे पाहून आश्चर्य व्यक्त करतील की जेपीच्या त्या पुस्तिकेची भूमिका श्रीमती इंदिरा गांधी यांनी लिहिली होती. या पुस्तीकेने माझ्यासारख्या अनेक युवकांना भविष्यातील मार्ग दिसला. या प्रसंगाला आता इथेच विराम देऊ.
१९७७- ७८ मध्ये आम्ही गांधींचा खूप आदर करत असू. पण त्यांना क्रांतिकारी मानत नसू. मात्र जेव्हा सामाजिक वास्तव अनुभवयास मिळाले आणि मूळ संघर्षाशी लढू लागलो तेव्हा कळले की ज्या मार्गाने आपण जात आहोत तो तर गांधींचा मार्ग आहे. बिहारमध्ये जमिनीवर अशा जमीनदारांचा कब्जा होता जे स्वतः शेती करत नाहीत. बिहारमध्ये पूर्वापार चालत आलेली जातीयवादी मानसिकता आणि सामंतवादी शोषणाचा हा एक खूप मोठा आधार आहे. बिहारच्या आर्थिक प्रगतीमध्येही यामुळे अनेक अडचणी येत होत्या. स्वातंत्र्याच्या आंदोलनादरम्यान स्वामी सहजानंद सरस्वती यांनी भूमिहीन शेतकऱ्यांसाठी लढाई सुरु केली होती. समाजवादी आणि कम्युनिस्टांनीदेखील या लढाईमध्ये महत्वाची भूमिका बजावली. तेव्हा हे सर्व लोक काँग्रेसमधून स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होते. स्वातंत्र्यानंतरही पूर्ण बिहारमध्ये भूमी आंदोलन झाले पण जमीनीचे पुनर्वितरण अत्यंत कमी झाले. पूर्णिया जिल्ह्यामध्ये नक्षत्र मालाकर यांनी शोषक जमीनदारांच्या नाकी नऊ आणले होते. त्यावेळी भूमी आंदोलनाचा विरोध करणारे उपरोधाने हसत असत आणि म्हणत की “संपत्ती आणि जमीनीच्या वाटण्या होत राहतील, आम्ही- तुम्ही सोडून”. हे एक कटू सत्य आहे की त्या काळामध्ये भूमी आंदोलन करणाऱ्या मोठ्या नेत्यांनी आपल्या जमिनीपैकी थोडीशी सुद्धा जमीन भूमिहीन शेतकऱ्यांना दिली नाही. अपवाद फक्त जयप्रकाश नारायण होते. स्वातंत्र्याच्या खूप पूर्वी एकदा त्यांनी बिहारच्या गया जिल्ह्यातील भूमी आंदोलनाचे नेतृत्व केले होते. ते पहिल्यांदा आपल्या गावी गेले.त्यांनी आपली 200 एकर वंशपरंपरागत असलेली जमीन आपल्या गावातील ४०० भूमिहीन शेतकर्यांना दिली. त्यानंतरच ते भूमी आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी गेले. ही गोष्ट १९७५ च्या सुरुवातीला या लेखकाला तिथल्या गावातील लोकांनी सांगितली होती. खूपशा नेत्यांच्या बोलण्या आणि वागण्यातील अंतर हेच खरेतर शेतकऱ्यांचे आंदोलन अयशस्वी होण्यामागचे मुख्य कारण आहे. विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनादरम्यान बिहारमध्ये जवळपास २२ लाख एकर जमीन दान म्हणून मिळाली होती. पण खूप कमी जमीन भूमिहीनांना मिळाली. बरीच जमीन नदी किंवा डोंगरावरची होती, काही नापीक होती.आजही लाखो भूदान शेतकरी असे आहेत की ज्यांना जमिनीचा तुकडा मिळाला पण भूदात्यांनी आपला अधिकार सोडला नाही. अशा स्थितीमध्ये १९६७ च्या आसपास पश्चिम बंगालच्या नक्षलवादी क्षेत्रामधून नक्षलवादी आंदोलन सुरु झाले होते जे नंतर बिहार आणि देशाच्या इतर भागात पसरले. परंतु देशाच्या गुंतागुंतीच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व्यवस्थेला ते न समजू शकल्याने आणि त्यानुसार धोरण निर्माण न करण्यामुळे हे अत्यंत कमी प्रभाव निर्माण करू शकले आणि ते हळूहळू संपुष्टात आले. भारतीय समाज सशस्त्र आंदोलनाचा तणाव जास्त वेळ स्वीकारू शकत नाही. बिहारमध्ये मठ, मंदिरांच्या नावावर लाखो एकर जमिनीवर भूमिपतींचा अधिकार राहिला आहे. असाच एक मठ आहे – बोधगया येथील शंकर मठ. १९७८ मध्ये या मठाचे धनसुख गिरी हे महंत होते. पण मठाची खरी सत्ता मठाचे व्यवस्थापक जयराम गिरी यांच्या हातात होती. जयराम गिरी बिहार सरकारमध्ये धार्मिक न्यास मंत्री होते. मठाकडून त्यांना दूध पिण्यासाठी एक गाय दिली जात असे. या मठाच्या ताब्यात साधारणपणे १० हजार एकर जमीन २२ नकली ट्रस्ट आणि आणि ४४८ नकली नावांवर होती. भूमिहीन मजुरांचे ( जे भुइया जातीचे होते ) भयंकर शोषण होत होते. उदाहरण सांगायचे झाले तर कुणाची मुलगी किंवा मुलगा ८-१० वर्षांचा असेल तर त्याचा विवाह करून दिला जात असे. विवाहासाठी मठातून काही धान्य आणि पैसे मिळत असत. त्याबदल्यात मुलगा आणि मुलगी दोघांना मठाचे मजूर बनवले जायचे. शेतात दिवसभराच्या मेहनतीनंतर ३ शेर (कच्चे) म्हणजे साधारणपणे ४५० ग्राम धान्य मिळत असे. त्याबरोबरच अर्धा शेर (कच्चे) म्हणजे २२५ ग्राम भुशाचे मिश्रण असलेले सत्तू मिळत असत. याशिवाय महुआ विकत घेऊन दारू बनवण्यासाठी थोडे पैसे मिळत असत, ज्याला पियांकी म्हणत. तीव्र ऊन, पाउस किंवा कडाक्याच्या थंडीत दिवसभराच्या कठोर मेहनतीनंतर भुइया लोक मातीच्या भांड्यात घरी बनवलेली दारू पिऊन आपल्या पत्नीला आणि मुलांना मारहाण करत. आपल्यावर होत असलेल्या अन्यायावर किंवा शोषणावर विचार करण्याची त्यांची बुद्धीच नष्ट करून टाकली होती. प्रत्येक गावामध्ये मठाकडून भुइया जातीचा एक मांत्रिक ठेवलेला असे. जेव्हा एखाद्याच्या पोटात दुखू लागत असे, उलटी होत असे, कुणाला खूप ताप आला असेल तर याला बोलावले जाई. तो एक बाटली दारू आणि एक कोंबडा घेत असे आणि मग तो देवता किंवा भुताला खेळवण्याचे नाटक करत असे. तो सांगायचा की या व्यक्तीने मठाच्या जमिनीचे धान्य चोरले आहे. त्यामुळे याला देव किंवा भुताने पकडले आहे. असे सांगून मांत्रिक भुताला पळवून लावायचा. ….असं असायचं मठाच्या शोषणाचं चक्र.
अशा परिस्थितीत आम्ही लोकांनी जेव्हा ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’ आणि ‘मजूर शेतकरी आंदोलन समिती’ कडून मठाच्या भूशोषणाविरुद्धच्या आंदोलनाची तयारी सुरु केली तेव्हा गावामध्ये मीटिंग करणेदेखील कठीण असे. संध्याकाळी बैठक सुरु झाल्यावर लोक आपापसात भांडत असत. त्यामुळे मीटिंगमध्ये खंड पडत असे. अशावेळी दारूबंदीसाठी पहिले अभियान चालवणे गरजेचे आहे असे लक्षात आले. ज्या महिला आणि मुले दारूमुळे त्रस्त होते. ते एकत्रित आले आणि आपल्या मातीच्या घरांतून दारूचे हंडे काढून फेकू लागले. बोधगयाच्या शेजारील एका गावात मस्तीपुरमध्ये ज्या दिवशी हे सुरु झाले तेव्हा दारू पिणारे पुरुष आपल्या बायका-मुलांना मारू लागले पण हंडे फोडणे काही थांबले नाही. पाहता-पाहता हंडे फोडून दारूबंदीचा कार्यक्रम चालूच राहिला आणि शेकडो गावात तो चालू झाला. आमच्या मग असे लक्षात आले की गांधींच्या नशा बंदीच्या कार्यक्रमाला केवळ एक सुधारवादी कार्यक्रम म्हटले जायचे तो केवढा क्रांतिकारी सिद्ध झाला. जर दारूबंदी आणि मांत्रिकच्या अंधश्रद्धेला समाप्त करायचे हे सांस्कृतिक अभियान चालू झाले नसते तर शोषित लोक संगठीत होऊ शकले नसते आणि मठाच्या भूशोषणाला उखडून टाकून समाप्त करू शकले नसते.या शांततापूर्ण भूमी आंदोलनामध्ये १६७ खटले चालले. मोठ्या संख्येने लोक तुरुंगात गेले. अहिंसक प्रतिरोध करत रामदेव माझी आणि पांचू माझी हे गुंडांच्या पिस्तुलाने मारले गेले आणि अनेकजण जखमी झाले. पण शेवटी १० हजार एकर जमिनीवर भूमिहीन शेतकऱ्यांनी अधिकार मिळवला. नंतर सरकारने पुरुषांच्या नावे जमिनीची कागदपत्रे दिली. ही सरकारी कागदपत्रे या अटीवर परत केली गेली की महिलांच्या नावे दिली गेलेली पत्रेच स्वीकारली जातील. काही दिवसांच्या संघर्षानंतर सरकारने प्रत्येक महिलेच्या नावावर जमिनीची कागदपत्रे दिली. बालवयात होणाऱ्या विवाहांवर बंदी आली. नंतर या आंदोलनाचा प्रभाव इतका झाला की पूर्ण जिल्ह्यातील भूमिहीन शेतकऱ्यांनी साधारणपणे १५ हजार एकर जमीन मोठ्या भूमिपतींच्या ताब्यातून सोडवली. या भूमी सत्याग्रहाच्या दरम्यान हेदेखील लक्षात आले की, जातींची विविधता असणाऱ्या आपल्या समाजात अहिंसापूर्ण संघर्षाचा मार्ग अत्यंत व्यावहारिक आहे. आज पूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंगला तोंड देत आहे. निसर्गाची सुंदरता त्याच्या वैविध्यामध्ये आहे. भौगोलिक विविधता, हवामानाची विविधता आणि जैविक विविधता यांवर निसर्गाचे अस्तित्व टिकून आहे. निसर्गाशी जेव्हा प्रतारणा सुरु होते तेव्हा त्याचे रौद्र रूप प्रकट होते. गांधीजींनी याचा इशारा खूप आधीच दिला होता. भारताच्या शेकडो जाती, धर्म, समुदायांच्या रंग-रूपाच्या वैविध्यतेमध्ये निसर्गाची सुंदरता आणि शक्ती समाविष्ट आहे. ज्यांना हे कळत नाही ते एका रंगात रंगून जाण्याचा बालीश प्रयत्न करत आहेत. पण आशा ठेवली पाहिजे की लोकांनीच जागे होऊन देश आणि समाजाला अधोगतीकडे जाण्यापासून वाचवले पाहिजे.
(नवजीवन.कॉम वर प्रकाशित लेखाचा अनुवाद )
………………………………………………………………हे सुध्दा वाचा…
..जागृत अज्ञानी जनतेचा असंतोष मजबूत बळाची सत्तासुद्धा रोखू शकणार नाही- महात्मा गांधी
[…] […]