अमेरिका-चीन ताणतणाव : “शीतयुद्ध” दुसरी आवृत्ती होईल का ? (भारतासाठी काही दखलपात्र प्रश्न)

संजीव चांदोरकर

डोनाल्ड ट्रम्पनी सत्तेवर येतांना केलेल्या टीकेत मुक्त व्यापाराच्या तत्वांवर टिक्का असायची. त्यात देखील त्यांनी चीनला “जागतिकीकरणाच्या” चित्रपटातील खलनायक उभा केला. त्यावेळी अनेक टीकाकार असे म्हणत कि समजा ट्रम्प सत्तेवर आलेच तर नंतर निवळतील. एव्हढे टोकाचे आर्थिक निर्णय ते अमलात आणणार नाहीत.

ट्रम्प यांच्या मीडियातील प्रतिमा काही काळ बाजूला ठेवूया. ज्या कामगार वर्गाने त्यांना निवडून आणण्यात मदत केली त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं हा प्रश्न बाजूला ठेवूया. पण एक मात्र नक्की कि ट्रम्प यांनी चीनबद्दलच्या धमक्या प्रत्यक्षात आणायला अंशतः तरी सुरुवात केली आहे.

गेली काही महिने व्यापार युद्ध, चलन युद्ध, मध्यंतरी उत्तर कोरियावरून झालेले ताणतणाव, चीन विरुद्ध युरोपियन युनियनला हाताशी धरून आघाडी उघडणे, दक्षिण चीनच्या समुद्रात आपल्या दोस्तांकरवी चीनला आव्हान देणे इत्यादी नाना मार्गानी ट्रम्प यांनी चीनच्या तोंडास फेस आणला आहे.

पण हे असेच सुरु राहिले तर दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेचा गट व सोव्हियेत युनियनच्या गटात जसे अनेक दशके शीतयुद्ध सुरु राहिले, त्याची दुसरी आवृत्ती पुढच्या काळात सुरु होईल कि काय अशा चर्चाना सुरुवात झाली आहे.

शीतयुद्ध हा अतिशय गंभीर, रक्त साखळवणारा प्रकार असू शकतो. भारतासाठी लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे आशिया खंड त्या युद्धाचा रंगमंच असेल. म्हणून हे आपल्यासाठी गंभीर प्रकरण आहे.
___________________________________________

हे कितपत शक्य आहे याची पडताळणी करण्यासाठी आधीच्या शीतयुद्ध युगात व दुसरे शीतयुद्ध छेडले गेलेच तर आताच्या युगात काय फरक आहेत ते समजून घ्यायला पाहिजे. एकच शब्दात सांगायचे तर जमीन अस्मानाचा फरक आहे.

(१) पूर्वी अमेरिका-रशियातील शीतयुद्ध हे प्रायः दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपात तयार झालेल्या राजकीय पोकळीतून कोण किती साठमारी करतो यावरून झाले. तो संदर्भ आता नाही. आजच्या काळात जागतिक साम्राज्यवादी मध्ये असणारी वर्गीय प्रगल्भता पराकोटीची आहे. त्या शक्ती माल वाटून खातात.

(२) पूर्वी अमेरिका-रशियातील आर्थिक स्पर्धेला एक जडशीळ वैचारिक / आयोडिओलॉजिकल आयाम होता. कोणते आर्थिक तत्वज्ञान मानव जातीसाठी फलदायी या चर्चा अकॅडेमिक राहिल्या नव्हत्या. आजच्या काळात सार्वजनिक व्यापसपीठांवरील भाषा सोडली तर आर्थिक तत्त्वज्ञानाच्या बाबतीत चीनला अमेरिकेसमोर आयडॉलीजिकली काहीही सिद्ध करण्याची महत्वाकांक्षा नाहीये. कम्युनिस्ट झी जिनपिंग, भांडवलदार डोनाल्ड ट्रम्प नव्हे, मिळेल तेथे मुक्त व्यापार व जागतिकीकरणाची भलावण करत असतात.

(३) पूर्वी अमेरिकेच्या प्रभावाखालील गट व रशियन गट जणू काही परस्परसंबंध नसलेल्या दोन कंपार्टमेंट मध्ये कार्यरत होते. आता ट्रम्प काहीही म्हणोत गेल्या चाळीस वर्षात जागतिकीककरणाची प्रक्रिया फार पुढे गेलीय एव्हढेच नव्हे तर अमेरिका व चीनच्या अर्थव्यवस्था अनेक अंगानी एकरूप व परस्परावलंबी झाल्या आहेत. त्यांच्यापैकी जो कोणी दुसऱ्यावर जीवघेणा वर करेल त्याच वाराने वार करणारा देखील घायाळ होणार हे नक्की आहे.

(४) याची जाण दोन्ही देशातील शासनाला आहे. मीडियामध्ये कोण काय बोलते हे बाजूला ठेवूया, उदा. अमेरिका व चीन यांच्यामध्ये इतक्या विविध पातळ्यांवर सतत, औपचारिकपणे सल्ला मसलत होत असते ज्याची कल्पना आपल्याला असणे शक्य नाही. एका रिपोर्टप्रमाणे वर्षाच्या बारा महिन्यात अमेरिका व चीनचे अधिकारी, शिष्टमंडळे, राजकीय नेते किमान १००० (एक हजार !) वेळा विचारविमर्श करतात. आपल्यात ताणतणाव आहेत पण ते हाताबाहेर जाऊ न देणे हे दोघांच्याही हिताचे नाही याचे दडपण दोघांवरही आहे.
_______________________________________

मग हे जे काही सुरु आहे ते काय नाटक म्हणायचे ? तर तसे देखील नाही.

चीनने जागतिकीकरणाची व्यासपीठ आपल्या हितासाठी वापरली असा ग्रह अमेरिकेलाच नाही तर युरप जपानचा देखील आहे. चीनने आवळा देऊन जगाकडून कोहळा काढला अशी भावना आहे. त्याच्या या पद्धतीला अटकाव होणार हे नक्की

चीनच्या “बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह” मधून चीनच्या साम्राज्यवादी आकांक्षाचे दात बाहेर दिसू लागले आहेत. त्याला अनेक राष्ट्राकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत

चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेन अर्थव्यवस्थेच्या ६० टक्के आहे. ती वाढली कि चीनच्या राजकीय महत्वाकांक्षा अजून वाढणार. त्याकडे कानाडोळा करणे अमेरिकादी राष्ट्रांना परवडणारे नाही
______________________________________

परत एकदा शेवटचा शब्द जागतिक अर्थव्यवस्थेवर आज मांड ठोकून असणाऱ्या दोन शक्तीकडे असेल:

(एक ) जागतिकीकरणाचे ड्रायव्हिंग इंजिन व सर्वात जास्त लाभार्थी असणाऱ्या विशेषतः अमेरिकेन, बहुराष्ट्रीय कंपन्याकडे
(दोन) जगातील सर्व वित्त भांडवल आपल्या पोटात रिचवून, पूर्वीच्या युगात भांडवलाला असणारे राष्ट्रीय रंग मोठ्या प्रमाणावर मिटवून टाकणाऱ्या आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था, मल्टी लॅटरल वित्तसंस्थाकडे

कितीही म्हटले तरी आजच्या घडीला डोनाल्ड ट्रम्प आहेत जास्तीत जास्त अजून दोन वर्षाचे पाहुणे !

बहुराष्ट्रीय कंपन्या व आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था यांचे आयुष्यमान असते किमान काही दशकांचे !
जागतिक भांडवलशाहीला फक्त भांडवलशाहीचे साम्राज्य असे म्हणतात, अमेरिकन व युरोपियन व चिनी साम्राज्ये म्हणत नाहीत. त्याचे अन्वयार्थ असे लागतात

राज्य आहे जागतिक भांडवलाचे ! कोणत्याही राष्ट्राचे राज्यकर्ते, राष्ट्राध्यक्ष भांडवलसमोर दुय्यम असतात
राज्यकर्ते टेम्पररी असतात, भांडवल पर्मनंट !

Leave a Reply