धम्मचक्र पवत्तन दिन विशेष : धर्माच्या नव्या भूमिकेचा शोध

महात्मा बुद्धांनी धर्म आणि धार्मिक पंथात बोकाळलेल्या जातीभेदाला आव्हान देत आपल्या पंथाचे दरवाजे निम्न,वंचित जातींकरीता खुले केले. त्यामुळे या जातीमध्ये बौद्ध धर्माप्रती मोठे आकर्षण निर्माण झाले होते.बुद्धांच्या संघात महत्त्वपूर्ण व्यक्तीमध्ये उपाली हे एक होते. ते बुद्धोतर काळात संघाच्या नियमानुसार वरिष्ठ स्थानी पोचले.ते पूर्वाश्रमीचे न्हावी होते. त्यांचा व्यवसाय घृणास्पद मानल्या जात असे. याचप्रकारे सुनीत हा पुक्कुस या जातीतून आला होता. त्याच्या रचनाना थेरीगाथेत समाविष्ट करण्यात आले. जबरदस्त नास्तिकतेचा प्रचारक सती हा प्रचारक ढिवर जातीतून आला होता.नंद हा गवळी होता. दोन पंथी तर एका उच्चभ्रू परिवारातील तरुणीचे दासांशी आलेल्या संबंधातून जन्मास आलेली अपत्ये होती. चापा एका शिकाऱ्याची मुलगी होती. पून्ना आणि पुन्निका ह्या दासपुत्री होत्या. सुभा एका लोहाराची मुलगी होती. या प्रकारची असंख्य उदाहरणे आहेत. यामुळेच बुद्धांनी मोठ्या प्रमाणावर अस्पृश्य,पददलित-वंचितांना आपल्याकडे आकर्षित केले.सामाजिक परात्मता व वंचिततेपासून मुक्ती दिली. हिंदू धर्म असे करण्यात अयशस्वी ठरला.

बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुद्ध आणि त्याच्या धम्माचे भवितव्य’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. सदर लेख महाबोधी संस्थेच्या मासिकात 1950 साली प्रकाशित करण्यात आला होता.यामध्ये त्यांनी आपल्या दृष्टिकोनातून बौद्ध धर्माच्या विचारांची मांडणी केली होती.

१. समाजाच्या स्थैर्याकरीता कायदा किंवा नीतीमत्तेचा आधार असणे गरजेचे आहे. यापैकी एकाच्या अभावी समाज निश्चितच अस्ताव्यस्त होईल.

२. धर्माचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर तो बुद्धीप्रामाण्यवादी असला पाहिजे.विज्ञान हे बुद्धीप्रामाण्याचे दुसरे नाव आहे.

३. धर्माकरीता त्याच्याकडे फक्त नैतिक संहिता असणे पुरेसे नसून त्यास स्वातंत्र्य,समता व बंधुतेची जोड असली पाहिजे

४. धर्माने गरिबीला पवित्र मानता कामा नये व तिचे उदात्तीकरण करू नये.

(जगदीश्वर चतुर्वेदी यांच्या लेखाच्या आधारे)

One comment

Leave a Reply