धम्मचक्र पवत्तन दिन : कालबाह्य विचारांचे नव्हे, तर कालातित विचारांचे वारसदार व्हा !

सुभाषचंद्र सोनार

तथागत गौतम बुद्धांनी भिक्खुंना ‘माझ्या कालबाह्य विचारांचे नव्हे, तर कालातित विचारांचे वारसदार व्हा!’ असा मोलाचा संदेश दिला होता. त्यांच्या अनुयायांनी त्या संदेशाचं डोळ्यात तेल घालून पालन केले. त्यामुळेच भिक्खुसंघात स्रियांना प्रवेश दिल्यावर ‘माझा धम्म जो हजार वर्षे टिकला असता, तो आता पाचशेच वर्ष टिकेल,’ ही तथागतांनी व्यक्त केलेली भीती निराधार ठरुन, त्यांच्या निर्वाणानंरही धम्म १५०० वर्षे टिकला.

तथागतांच्या निर्वाणानंतर दबा धरुन बसलेल्या प्रतिपक्षाने आपली प्रतिचढाई तीव्र केली. तेव्हा महायानी आचार्यांनी बुद्धांच्या ‘अनित्यवादा’च्या जोडीला नवीनतम दर्शने निर्मून प्रतिपक्षीय वैदिक छावणीचे सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले. बौद्धवादाच्या या विकासामुळे धम्म दीर्घ आयुष्मान बनला.

तथागतांचा भिक्खुसंघ ही दार्शनिक, साहित्यिक, कलावंत, स्थापत्यविद अशा प्रतिभाशाली विद्वानांची मांदियाळी होता. तथागतांनी अखंड प्रयोगशीलतेने त्यांच्या मन आणि मेंदूची मशागत केल्यामुळे त्यांच्या बुद्धीला गंज चढला नाही व त्यांच्या निष्ठाही अभंग राहिल्या. कॉ. शरद् पाटील म्हणतात, ‘मन शरीरासमोर वाकते हे बुद्धाला माहीत होते; म्हणून समाजासमोर न वाकणारे शरीर तयार करायचा उपदेश तो भिक्षूंना करीत असे.’ तर महाभिक्खु नागसेन राजा मिलिंदला म्हणतात,

‘तसेच, महाराज, जसा सिंह त्याच्या आयुष्याचा अंत जरी जवळ आला, तरी कोणाही समोर वाकत नाही, तसा, महाराज, कर्मरत व प्रयत्नशील भिक्षू श्रमणाला आवश्यक अशी अन्नवस्रे, निवारा, व औषधे मिळणे जरी बंद झाले, तरी कोणाही माणसासमोर वाकत नाही.’

त्यामुळेच शंकराचार्यप्रणित प्रतिक्रांतीच्या ‘सरफरोशी अभियानाला’ दाद न देता, बौद्ध भिक्षूंनी विदेशी स्थलांतर पसंत केले. याउलट जैनांनी मात्र वैदिकांशी तडजोड करुन त्यांचेसमोर गुडगे टेकले.

बौद्धवादाच्या कसोटीवर आज आंबेडकरवाद घासून पाहणे जरुरीचे आहे. बुद्धाप्रमाणेच बाबासाहेबांनीही अनुयायांना बजावले होते की, ‘मी आज जे सांगतोहे त्यापेक्षा उद्या जे सांगेल ते महत्वाचे आणि उद्या जे सांगणार त्यापेक्षा परवा जे सांगणार ते महत्वाचे मानावे.’

पण परवानंतर म्हणजे निर्वाणानंतर काय? इथेच अनुयायांची खरी कसोटी लागते. त्यासाठी अभ्यासाची कास धरावी लागते. आजचे प्रश्न-समस्यांबाबत बुद्ध-आंबेडकर हयात असते तर त्यांनी काय मत माडले असते, कोणती भूमिका त्यांनी घेतली असती, हे केवळ आणि केवळ अभ्यासामुळेच शक्य आहे. दुर्दैवाने त्याचीच मोठी वाणवा आहे, असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते.

बाबासाहेबांनी धम्माबरोबरच ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ लिहून धम्माचे परिष्कृत रुप अनुयायांच्या हाती दिले होते. हा बौद्धवादाचा त्यांनी केलेला विकासच होता. ही प्रक्रिया तिथेच थांबणारी नव्हती. पण बाबासाहेबांना तेवढे आयुष्य लाभले नाही.

बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर बौद्धवादाचा विकास आणि आंबेडकरवादाचा विकास अशा दुहेरी विकासाची जबाबदारी अनुयायांवर येऊन पडली. ती त्यांना पेलली नाही, त्यामुळे त्यांनी ती स्वीकारली नाही. त्याची परिणती व्यक्तीपूजा, कर्मठपणा, अहंमन्यता, आत्ममग्नता व अखेर निष्क्रियतेत झाली. श्रीमंत बापाच्या मुलांनी जसे आता आम्हाला काहीही करायची गरज नाही, असे समजून बापाच्या ठेव्यात भर न घालता आरामात दिवस घालवण्यासारखाच हा प्रकार आहे.

बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर निष्ठावंत अनुयायी घडवणारी पीठं उभारली असती, तर सांप्रदायिक ब्राह्मणी छावणीच्या वळचणीला जाणारे घरभेदे निपजलेच नसते. त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे या घरभेद्यांना चेले मिळणे हे होय. असल्या चेलेचपाट्यांमुळेच खाल्ल्या ताटात छेद करायचं धाडस घरभेद्यांना येते.

आज गणपती बसवणा-या नवबौद्धाविरुद्ध जितक्या तीव्रतेने व कटुतेने बोलले जाते, त्यांना वाळीत टाकायची धमकी दिली जाते. अशी भाषा, असे वर्तन घरभेद्यांविरुद्ध केले जाते का? नाही केले जात. कारण सामान्य नवबौद्धापेक्षा घरभेद्यांचे उपद्रवमूल्य जास्त आहे.

भाबड्या आंबेडकरवाद्यांना मशगूल ठेवण्यासाठी संविधानरक्षण, भारत बौद्धमय करणे, सत्ताधारी जमात बनणे या घोषणा मधून मधून करत राहणे आणि आक्रमक आंबेडकरवाद्यांना खुष करण्यासाठी अधूनमधून ब्राह्मणांना शिव्या देणे. याला बौद्धवाद आणि आंबेडकरवादाचा विकास म्हणायचे का? धम्मचक्र प्रवर्तनदिनी तरी याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे.

3 comments

Leave a Reply