इंग्रजी ही ज्ञानभाषा कशी बनली ?

संजय सोनवणी

ज्ञानाची रचना हे जगातील उपलब्ध ज्ञान समजावुन घेतल्याखेरीज होणार नाही. इंग्रजी ही ज्ञानभाषा बनली कारण प्राकृत, संस्कृत, अरबी, चीनी ते पार आपल्याल माहितही नसलेल्या भाषांतील उपलब्ध प्राचीन साहित्य, शिलालेख ईत्यादी इत्यादी सर्व त्यांनी आपल्या भाषेत तर नेलेच पण त्यावर अभ्यासपुर्ण प्रस्तावना/विश्लेषने लिहिली. कथासरित्सागर असो कि गाथा सप्तशती, मीडोज ओफ़ गोल्ड हे अल मसुदीचे प्रवासवर्णन असो कि रिचर्ड बर्टनचे अरेबियन नाइट्स….अगणित उदाहरणे आहेत. त्याहीपेक्षा उत्खनने, पुराणवस्तुंचे संशोधन यात युरोपियनांनी आघाडी घेतली. नियाच्या Aurel Stein यांनी शोधलेल्या प्राकृत भाषेतील (ज्या पुरातन मराठीशी साधर्म्य दाखवतात) लाकडी संदेशवाहक पाट्या असोत कि अशोकाचे पार विस्मरणात गेलेले शिलालेख…त्यांनी शोधले, वाचले आणि वर्गीकरनेही केली. लेणी असोत की स्तूप…यातही त्यांनी आघाडीच घेतली. एका फ्रेंच तरुणाने अवेस्त्याचा फ्रेंचमद्ध्ये अनुवाद करण्यासाठी काय कष्ट उपसले हे पाहिले तर थक्क आणि नतमस्तक व्हायला होते. ते जाऊद्या, आपल्याच येथल्याच खरोष्टी आणि ब्राह्मी लिपीतील लेख शोधून ते वाचायला ब्रिटिशच आले होते. येथले मुखंड त्यात कामी आले नाहीत.

जिज्ञासा म्हणजे काय हे तर त्यातून दिसतेच पण आपल्याला आपली शरम का वाटायला हवे तेही यातून ठळक होते. आम्ही आमचे काही जतन करण्याचा प्रयत्न करणे तर दूर त्याचे वाटोळे कसे करता येईल हे पाहण्यात आम्ही धन्यता मानली. १८८३ साली प्रसिद्ध झालेले मल्हारराव होळकरांचे मराठी चरित्र मला भारतात नाही तर टोरोंटो विद्यापिठाच्या वेबसाईटवर डिजिटल स्वरुपात मिळाले….. आम्ही फक्त पुरातनाचा गवगवा करण्यात धन्यता मानली. बोगसपणा करत “आमचे वेद किती पुरातन आहेत आणि राम किती जुना…” याच्या छातीफोड गप्पा हाणण्यात धन्यता मानली. प्रसंगी खोटेपणा व फोर्जरीचाही वारेमाप उपयोग केला. सिंधू संस्कृतीच्या मुद्रांतही अशीच फोर्जरी करुन जगभर लाज घालवली. वैदिक विमानांचे लाज काढणारे प्रकरण तर अगदीच अलीकडचे.

कशाला हे? आम्हाला सत्य का नको आहे? आम्हाला ज्ञान का नको आहे? आम्हाला जागतिक ज्ञानावर कुरघोडी करायची असेल तर आमच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवायला हव्यात हे का समजत नाही? कोठे मेलीत आमची विद्यापीठे आणि कोठे डुबल्यात त्यांच्या कोट्यावधीच्या ग्रांटी?

मात्र निरर्थक रिकामटेकडेपणा भारतात किती आहे ते व्यस्त आणि व्यस्त असलेल्या व्हाट्सप ते फेबुवरुन दिसतेच. हे लोक त्याच इंटरनेटचा उपयोग आहे त्या ज्ञानासाठी किती करतात हा प्रश्न विचारला तर उद्वेगजनक उत्तर मिळेल. पण मुळात प्रश्नच विचारायचे आम्ही विसरून गेलोत. आणि आमच्याकडे सारीच उत्तरे आहेत या शेखचिल्ली स्वप्नांत दंग राहत थोडा तरी अभ्यास करायला पाहिजे याची जाण घालवून बसलोत. स्वजाती्च्या महापुरुषांचा उदो उदो आणि शत्रु जाती/धर्माच्या महनीयांची निंदा नालस्ती…कधी उघड तर कधी छुपी करत बसण्यातच यांनी उर्जा वाया घालवण्याचा चंग बांधला आहे. यात इतिहास हरवुन बसला आहे आणि इतिहासाचे अवमुल्यन करण्याचे महापाप हाच समाज एकमेकांवर डाफरत करत आला आहे. अशा लोकांना चाप बसवत ज्ञान पुढे न्यावे तर शिक्षण खातेच एवढे अडानी आहे की ते बरखास्त केले तरी विद्यार्थ्यांचे काही अडु नये! सारे आपापल्या कंपुंत मस्त आहेत.

आमचे सारे काही असे आहे…म्हणून काहीच नाही. गतकाळातल्या गमजा थापा मारून टिकत नाहित. आणि अशा लोकांना भविष्यकाळ काय असणार? आपल्याला सावध व्हायला हवे. आम्हाला नेमके कोठे जायचे आहे हे एकदाचे ठरवायला हवे.

हे वाचलंत का…?

भाषा आणि संस्कृतीचे आदान प्रदान हे विषमता व सत्तावर्चस्वाच्या आधारे होता कामा नये – नगुगी वा थियोन्गो

Leave a Reply