Follow Us
asantoshwebmagazin October 11, 2018

99999

 सरफराज अहमद  

 

                      सोलापूर सिद्धेश्वर बँक व्याख्यानमाला  सोलापूर येथे आजपासून (दि. ११ ऑक्टो ) सुरु झाली आहे. सिद्धेश्वर  बँकेचे अध्यक्ष हे सोलापूर शहर कॉंगेसचे अध्यक्ष आहेत. या बँकेचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार शिवदारे आहेत जे सोलापूर शहर कॉंगेसचे सुद्धा संस्थापक होते. सदर व्याख्यानमालेत दि.१२ ऑक्टो. रोजी शहरी नक्षलवादाचा भस्मासूर या विषयावर तुषार दामगुडे आणि भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत हे मते मांडणार आहेत. सदर विषयाच्या निमित्ताने सोलापूर येथील इतिहास संशोधक सरफराज अहमद यांनी शहर कॉंगेसला लिहिलेले खुले पत्र वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. तुषार दामगुडे यांच्या एफआयआर च्या आधाराने देशातील मानवाधिकार कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती.

 

सोलापूर शहर काँग्रेसला खुले पत्र

सोलापूर हि कष्टकरी, कामगारांची नगरी. कष्टाने कुटुंब पोसणाऱ्या कामगारांनी समाजाची धुरा देखील तितक्याच सहजतेने पेलली. स्वातंत्र्य आंदोलनाला गती दिली. मार्शल लॉच्या काळात संपूर्ण चळवळीत कामगारच अग्रभागी होते. यंत्रमागाचे धोटे चालवणारे हात तितक्याच सहजतेने स्वातंत्र्यासाठी लेखणीसुध्दा चालवत राहिले. समाजाभिलाषी साहित्य हा गिरणसंस्कृतीचा एक अविभाज्य अंग होता. ‘शोक करीती जननी’ हे स्वातंत्र्यगान लिहिणारे कवी संजीव, हुतात्मा कुर्बान हुसेन, कृ.भी.अंत्रोळीकर, शिवदारे हि स्वातंत्र्याभिलाषी गिरणसंस्कृतीची प्रतिकं आहेत. तत्कालीन काँग्रेसमध्ये गिरण्यात राबणारे अनेक कामगार कार्यकर्ते, नेते म्हणून सहभागी होते. गिरण्यांमुळे इथे कामगार चळवळ जोमात होती. अनेक कामगार नेते थेट साम्यावादी विचाराने तर काही काँग्रेसच्या पुरोगामी प्रवाहात सहभागी होते. त्यामुळे सोलापूरचे राजकारण पुरोगामी व डाव्या विचारानेच चालत राहिले आहे. अभावानेच इथे उजव्या विचारांना थारा मिळाला आहे. कालांतराने गिरण्या बंद पडल्या. गिरणगाव म्हणून असणारी त्याची ओळख केंव्हाची पुसली गेली. हा इतिहास हृदयात जपत, इतिहासाचे भग्न अवशेष पाहत इथला कामगार सोलापूरकर जगतोय. कामगारांना पोसणाऱ्या यंत्रांची धडधड थांबली. तशी राजकीय पक्षांमधल्या कामगारनेत्यांची संख्या कमी होत गेली. काँग्रेसच्या मुख्य प्रवाहातून विचारांवर निष्ठा असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना बाजूला फेकण्यात आले. विचार केंद्रस्थानी मानून राजकीय प्रवास करणाऱ्या काँग्रेस पक्षात व त्याच्या कार्यकर्त्यांत राजकारण आणि राजकीय करीअर हे मुद्दे आता शिर्षस्थानी आले आहेत.
गांधी प्रणित पुरोगामी विचारांपासून शहरातला काँग्रेस पक्ष आज कोसो दूर उभा आहे. विचारांशी फारकत घेतली तरी पक्षाची भूमिका आजपर्यंत डाव्या बाजूच्या पुरोगामी विचारांशी निष्ठा ठेवणारी होती. वि.गु. शिवदारे, दिनानाथ कमळे गुरुजी, बाबुराव चाकोते, ब्रम्हदेव माने हि मंडळी गांधी व पुरोगामी डावा विचार प्रमाण मानत होती. त्यांच्या उक्ती आणि कृतीतून हा विचार व्यक्त व्हायचा. त्यांच्या संस्थांमधून याच विचारांचा जागर व्हायचा. शिवदारे, काडादी, माने यांनी स्थापन केलेल्या संस्थातून अनेक पुरोगामी प्राध्यापकांना जपले. निर्मलकुमार फडकुले, के. भोगिशियना, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, नरेश बदनोरे अशा कित्येक विचारवंत, साहित्यिक प्राध्यपकांची नावे सांगता येतील.
वि.गु. शिवदारें अण्णांनी स्थापन केलेल्या सिध्देश्वर सहकारी बँकेनेही आजतागायत पुरोगामी विचारांना सहाय्य करणारे वर्तन ठेवले आहे. त्या बँकेचे बहुतांश संचालक काँग्रेसचे सदस्य आहेत. आता अध्यक्ष हे पुरोगामी विचारांचे व शहर काँग्रेसचे अध्यक्ष असणारे प्रकाश वाले हे आहेत. सिध्देश्वर बँकेकडून शरदोत्सव व्याख्यानमाला आयोजित केली जाते. आजतागायत या व्याख्यानमालेत पुरोगामी विचारांचे जागर होत आले आहे. यंदादेखील हि व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. दुर्दैवाने यंदाच्या व्याख्यानमालेत विचारांशी आणि मुल्यनिष्ठांशी फारकत घेत बँकेने 12 आक्टोबरला ‘शहरी नक्षलवादाचा भस्मासूर’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. वक्ते आणि प्रमुख पाहुणे हे उजव्या विचारांवर (जे काँग्रेसच्या विचारधारेविरोधात आहेत.) निष्ठा ठेवणारे आहेत. त्यामध्ये भाजपचे एक माजी खासदार देखील आहेत.
डाव्या विचारांच्या, पुरोगामी विचारांच्या संघवादी असहिष्णू, अमानवी राजकारणाविरोधात लढणाऱ्या अनेक प्राध्यापकांना विचारवंतांना भाजप व भाजपप्रणित संघटना ‘शहरी नक्षलवादी’ ठरवत आहेत. देशातल्या त्यांना अकारण तुरुंगात डांबून विवेकवादाचा बळी घेत आहेत. डाव्या व पुरोगामी विचारांचा गळा घोटत आहेत. रोमिला थापर, गिरिश कर्नाड, खा. कुमार केतकर, गोपाळ गुरु,शम्सुल इस्लाम असे कित्येक विचारवंत या मोहीमेच्या विरोधात जीवाच्या आकांताने लढत आहेत. पुण्य प्रसुन वाजपेयी, निखिल वागळे, संजय आवटे अशा कित्येक पत्रकारांना देखील त्यांच्या नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागले आहे. ‘शहरी नक्षलवाद’ हा शब्द प्रयोग करणाऱ्या गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे सनातन्यांनी देशातल्या चार प्रमुख विचारवंताच्या हत्या करण्यापर्यंत मजल मारली आहे. देश झुंडीच्या हाता सोपवला आहे. अशा काळात काँग्रेस च्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या बँकेने ‘शहरी नक्षलवादाचा भस्मासूर’ या विषयावर व्याख्यान आयोजित करणे योग्य वाटत नाही.
शिवदारेंपासून काडादी, चाकोते आणि मानेंपर्यंतच्या समृध्द वारश्याला काळीमा फासला आहे. कॉंग्रेस प्रणित पुरोगामी संस्थांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. स्वतःचा समृद्ध पुरोगामी वारसा उजव्या विचारांच्या खाईत लोटणारा आहे. आपल्या या कृतीवर आम्ही पुरोगामी विवेकवादी सोलापूरकर आपल्या क्षुब्ध भावना व्यक्त करत आहोत.

 

Leave a Reply

%d bloggers like this: