नवरात्रोत्सव हा कृषीमायेचा उत्सव आहे.

                                                                         रिबले शुभम

आश्विन मासारंभापासून देशात नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. आपल्या राज्यात हा उत्सव घटस्थापनेचा उत्सव व कृषीमायेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. जगभरात शेतीचा शोध स्त्रियांनी लावल्याची एक आठवण या उत्सवामागील मूळ प्रेरणा आहे. त्यामुळे राज्यातच नव्हे तर देशातील कानाकोपऱ्यात हा उत्सव केवळ स्त्रिया साजरा करत असत याचे अनेक दाखले पुराणशास्त्रांमध्ये मिळतात. अलीकडे या उत्सवाचे चित्रच बदलून गेले आहे.
घटस्थापनेपेक्षा या उत्सवात अनेक नवे फॅड आल्यामुळे मूळ उत्सव आणि त्याचे गांभीर्य लोप पावत चालल्याचे दिसते. कृषीमायेची आराधना करणारी आणि तिचे स्तवन करणारी परंपरा घटस्थापनेच्या प्रतिकांमध्ये थोडीशी शिल्लक होती. ती सध्याच्या नवनवीन फॅडमुळे ती भविष्यात पूर्णपणे लोप पावण्याची भीती वाटते.देशात हा उत्सव साजरा करणाऱ्या विविध परंपरा/पद्धती असल्या तरी सर्वाचा मूळ उद्देश कृषीमायेचे गुणगाण गाणे आणि तिचे स्तवन करुन शेतीच्या शोधाची आठवण करणे असाच आहे. आपल्या राज्यात आपण याला घटस्थापना म्हणून ओळखतो. नवरात्र उत्सवाच्या काळात राज्यात सर्वच जाती-जमातींच्या महिला या काळात नऊ दिवस आपापल्या घरातील देवळी किंवा माजघरात घट बसवितात. यात शेताच्या शेजारी असलेल्या वारुळाची, नदीच्या कडेची , अथवा शेताच्या बांधावरची माती आणून त्यात विविध प्रकारचे धान्य पेरले जाते. या धान्याशेजारी तांब्याचा घट बसवून रोज वेगवेगळी फुले, आणि विशेषत: कवडय़ांची माळ व दिवा लावून त्याची पुजा केली जाते. परडी (तांदूळ, दाळ, पीठ, मिरची, कांदे,डाळ, तेल आदी ठेवलेली एक टोपली) आणि कवडय़ांच्या माळेला त्यात खूप महत्व असते. घटाची सर्व पुजा स्त्रियांकडूनच केली जाते.गळ्यात कवडय़ाची माळ आणि हातात परडी घेऊन प्रत्येक स्त्री किमान पाच घर तरी जोगवा मागतात. त्यानंतरच घरातील घटाची पुजा सुरू होते. पुरूषमंडळीचा त्यात काहीही सहभाग नसतो.

भंडाऱ्याने कपाळ माखलेला आणि गळयात कवडय़ांची माळ असलेला देवीचा भगत किंवा आराध्यांकडून रात्रीला गायन आणि नृत्याचे कार्यक्रम साजरे केले जातात. गुजरातमधील गरबा हा एक त्यातलाच प्रकार आहे, परंतु अलिकडे त्याचेहि बाजारीकरण झाले आहे. मात्र गुजरातमधील आदिवासी महिला अजूनही कृषीमायेचे ऋण
गाणारे गीत गातात.

आपल्याकडे देवीच्या स्तवन किंवा परसू बाळाचे नऊ खंडकरी, खंडोबा, विरोबा, मल्हारी, म्हसोबा
आदींच्या लग्नांच्या, पराक्रमांच्या कथा सांगून भंडारा उधळत बेभानपणे नाचले जाते. पश्चिम महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी गावागावातीलधनगर समाजातील लोक पालखी काढतात.या काळात आदिवासी आणि दलित स्त्रिया रात्रीला देवीच्याच पुजेचा एक भाग म्हणून चौपटाचा खेळ खेळतात. चौपटाच्या खेळात घरातील सर्वात ज्येष्ठ महिलांकडून या खेळाची सुरूवात करण्याची प्रथा आहे. आदिवासी भागात या काळात हा खेळ अजूनही खेळला जातो. चौपट हे स्त्रीसत्ताक राज्यांमध्ये धान्याच्या समान वाटपाचे प्रतिक होते.

भूमातेच्या उदरातून हळूहळू उगवणा-या धान्याची पुजा ही भूमातेची, देवीची पुजा म्हणून केली जाते. हा उत्सव कृषिमायेचा उत्सव असल्याने कृषी आणि देवीशी संबंधित गाणे गाऊन तो साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी हे उगवलेले धान शेतात नेऊन टाकतात. यामुळे शेतीची भरभराट होते . आणि पिक मोठया प्रमाणात येते अशी धारणा आहे. काही जमाती शेतासोबतच ते नदीच्या पात्रातहीसोडतात. नऊ दिवसानंतर ग्रामीण भागात अजूनही हे चित्र पहावयास मिळते.

शेतीचा शोध स्त्रियांनी लावला

जगभरात शेतीचा शोध स्त्रियांनी लावला हे
भारतीयच नाही तर जगभरातील पुराणशास्त्रांमध्ये
मान्य केले जाते. शेतीच्या शोधात पुरूषांचे कोणत्याही प्रकारचे योगदान नव्हते. स्फ्य नावाच्या कठीण टोक असलेल्या काठीने जमिनीत पेरणी, निंदणी व कापणीची सर्व कामे करत. पुरूष मागासलेल्या हत्यारांनी व आगीने जमिनीचा तुकडा साफ करत. भरघोस हंगामाचे फळ मिळविण्यासाठी वैदिक कृषि-मायेचा विधी म्हणून सीता-यज्ञ केले जात होते. ख्रिस्तपूर्व पाचशे वर्षार्पयत हे यज्ञ केवळ स्त्रिया करत होत्या. तो स्त्रियांचाच सण होता. वैदिककृषिदेवता सीता हीचे स्तवन केल्यानंतरच पेरणीला प्रारंभ केला पाहिजे असे आदेश कौटिल्य (२.४०) देतात.

शेतीचा मायाविधी असलेल्या तंत्रात कुलचा अर्थ स्त्री असा होतो. अथर्ववेदाची एक ऋचा सांगते की, स्त्री ही कुलाची मुख्य होती. ती कुलाची पुरोहिता या नात्याने कुल जमिनीची सुपीकता व उत्पादकता संवर्धित करण्यासाठी कृषिमायेचा विधी करी. शक्ती वा मातृदेवतेचे भक्त असलेल्या शाक्तांना त्यांचे धर्मग्रंथ कुलवृक्ष व कुलयोगिनींची पुजा करायची आदेश देतात. अंथरुणातून उठल्याबरोबर शाक्तांनी पार पाडायचा अगदी पहिला विधी म्हणजे कुलवृक्षांना ओम कुलवृक्षेभो नम: या मंत्राने वंदन करणे.

देशात आणि राज्यातही मातृदेवताची देवळे ही अब्राह्मणी आहेत. तुळजापूरची मूळ मातंगी आणि भवानी, माहुरची रेणुका, काळुआई, सप्तश्रृंगी,आदी सगळयाच देवी या आकारहीन दगडाच्याआहेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात कोणत्याही गावात गावाची रक्षणकर्ती म्हणून अशा आकारहीन मरीआई, पोचिम्माची देवळे असतात. त्याशिवाय प्रत्येकांच्या एक कुलदेव्याही अशाच आकारहीन दगडाच्या आणि शेंदूर माखलेल्या अशा स्थितीतमाजघरात किंवा घराच्या शेजारील देवळीत बसवलेल्या असतात.

आकारहीन दगडातील देवता निऋती ही जल किंवा नदीदेवता होती.अप्सरेचे मराठी रूप आहे आसरा नदीतील विशिष्ट दगड वा खडकांना आसरा म्हणून ओळखले जाते. तेथे बाळांतीण बाया अजूनही तान्ह्या मुलांना घेऊन जातात आणि त्याला झोळीत घालून झोके द्यायची नक्कल करतात. प्राचीन काळापासून मातृदेवतांकडे मुलांसाठी ओटी (झोळी) असते. यामुळे रेणुका, मातंगी, मांगम्मा (तिरुपती), धुरपता, महाकाली, आदी देवींची पुजा तिच्या ओटीत खण नारळ टाकल्याशिवाय केली जात नाही.

दुसरे असे की या सर्वच देवीना कोंबडे- बकऱ्यांच्या मासांचा नैवेद्य लागतो. त्याशिवायकोणतीही पुजा पूर्ण होत नाही. बुद्धोत्तर काळाच्यापूर्वी ज्या हरितीची मातृदेवता म्हणून पुजा केली जाई तिच्या ओटीतही मुले टाकली जात असत. आईचे जगातील सर्वोत्कृष्ट प्रतिक म्हणूनही हरितीकडे पाहिले जाते.

देवीचे पुजारी बारा बलुतेदार

आपल्या राज्यात अजूनही ब-याच ठिकाणी मातृदेवींची पुजा करण्याचा मान देवकरीन,पोतराज, आराधी, महायोगिनी, गुरव, मांगीण पुजारी यांनाच आहे. मातृदेवतांचा संबंध शैवांशी,शाक्तांशी आणि तंत्राशी संबंधित असल्याने त्यांची पुजा यांच्याकडून केली जात होती. हे सर्व शिवाचे उपासक होते. कालांतराने अनेक देवींच्या आख्यायिका विकृत करण्यात आल्यामुळे त्यांचे मूळ गांभिर्य खूप कमी अंशी शिल्लक आहे.शैवांशी संबंधित असलेल्या देवींकडून असूराची हत्या करण्याच्या कथा,त्यातून निर्माण झालेलीमहिषासूरमर्दिनी आदी रूपे याचाच एक भाग आहेत.त्यांनाच तो मान होता. महाराष्ट्रात सात मातांची सात देवळे आहेत. सर्वात मोठी बहीण सप्तशृंगीचे देऊळ नाशिक जिल्ह्यात आहे चैत्री पौर्णिमेला तिची भरणारी यात्रा सर्वात मोठी असते. सगळयात धाकटी बहिण एकविरा, हिचे एक देऊळ धुळ्याला स्मशानभूमीशेजारी आणि दुसरे लोणावळा जवळ कार्ला लेणीच्या प्रवेशद्वारावरआहे.या दोन्हीची पुजा गुरव जातीचे भोपे करतात. ठाणे जिल्ह्यातील महालक्ष्मी या आदिवासी देवीचे वंशपरंपरागत पुजारीपण खुद्द आदिवासी वारल्यांचेच कुटुंब करत आहे. चंद्रपूरची धुरपता (महाकाली)चीही पुजा मांगीण जातीची देवकरीन आणि पोतराज करतो. तरतुळजाभवानीचा पुजारी कुणबी, मराठा आहे. परंतु
अलिकडे ब्राह्मण पुरोहित इकडेही ताबा मिळविण्यात यशस्वी होत आहेत. मुळात या देवींच्या पुजेला मंत्र चालत नाहीत परंतु अलिकडे कडव्या विरोधक असलेल्या वैष्णववादी देवादिकांचे मंत्रोच्चार या देवींच्या पुजेप्रसंगी केले जातात हे खरे तर थांबायला हवे. शिवकाळार्पयत आपल्या राज्यात योगींनींचे आणि शाक्त पिठांचे केंद्र हे मांगवाडय़ातून चालत होते. हे प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद् पाटील यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे….

Leave a Reply