डॉ.दीपक बोरगावे यांच्या दोन कविता

  1. अस्मिता

त्याने दरवाजा उघडला.

बाहेर

अस्मितेचं एक झाड उभं होतं.

त्या पलिकडे होती

अनेक झुडपं वेली गवत
कचरा
आणि तत्सम असे बरेच काही…

वाराही होता
विरुद्ध दिशेने.

अस्मितेवर काय होणार परिणाम त्याचा ?

शून्य.

ती असते भिनलेली डोक्यात
मेंदूच्या उघडलेल्या कुपीत
बंद
आतल्या वाहिन्यांच्या रस्त्यांवर
असतं तिचं
तिथंच उठणं बसणं
खाणंपिणं आणि लोळणं.

जात वर्ग वरचढपणा
मुजोर कुंपणं चालढकलपणा.

वरचष्मा,
तुडव खाली तिला
कुळ इज्जत खानदान औकात
आॅनर बॅनर गनर
आणि सीनर.

हा प्रश्न
थोडा भावनेचा
थोडा अभिमानाचा
थोडा चिखलाचा
थोडा धुसमुसणाऱ्या मनातल्या खेळाचा
थोड्या चटणी मीठाचा

आणि मसाल्याचासुध्दा असतो
बऱ्याचदा.

गोडं तेलाची वरुन धार असणाऱ्या तेलाच्या भांड्याचाही
हा प्रश्न असू शकतो.

अस्मिता

ही शाळेत असल्यापासून
किंवा नसल्यापासून
बिंबते
किंवा बिंबवली जाते.

शरीराच्या हरएक भागात
मनामनाच्या सांदरीत लिंपून राहते.

दरवाजा उघडला काय
आणि
बंद ठेवला काय
तिला काही फरक पडत नसतो.

अस्मितेची झाकणं
लहानपणीच बंद करता यायला हवीत,
खेळ सुरू होण्याअगोदरच
असे ते म्हणत असतात अधेमधे.

पण हे कधी घडत नाही
आणि
घडणारही नसते

2.पाथरवट

आरशातल्या प्रतिमांवरुन
ते
बोलत असतात
नेहमी
रस्त्यावरच्या शेवटच्या माणसाबद्दल
आणि बापूंचे नाव घेऊन
तर जोर देऊन बोलत असतात ते.

दुपारचे झोंबणारे उन
किमान दोनवेळा तरी
रक्तपात घडवते
नाकाच्या सांदरीतून.

तो पाथरवटी तरुण
आणि तरुणीसुध्दा
दिवसाकाठी
पत्थर तोडताना
आपली दहाही बोटे
दहावेळा चेंबवून घेतात.

तुमचे
ते शुभ्र उत्थान तर्क
आणि
तुमचे
ते पाषाण अर्क
थोडे राहू द्या बाजूला.

आत्ताच त्यांनी तारुण्यात पाय ठेवला आहे.

मला हे पैले सांगा,
त्यांनी
आरशाबाहेरच्यांवर विश्वास ठेवायचा ?
का
तुमच्या आरशाच्या
आतील
प्रतिमांना
त्यांनी कवटाळायचे ?

•••

■ डॉ.दीपक बोरगावे हे कवी,लेखक,अनुवादक व समीक्षक आहेत आणि ‘असंतोष’ चे एक सल्लागार आहेत.

ही कविता वाचलीतं का ?

मार्क्स काय म्हणाला ? – डॉ.दीपक बोरगावे

You may also like...

3 Responses

  1. October 22, 2018

    […] डॉ.दीपक बोरगावे यांच्या दोन कविता […]

  2. November 22, 2018

    […] डॉ.दीपक बोरगावे यांच्या दोन कविता […]

  3. November 26, 2018

    […] डॉ.दीपक बोरगावे यांच्या दोन कविता […]

Leave a Reply

%d bloggers like this: