इतके दिवस संघाच्या इशाऱ्यावर नाचता-नाचता तो खरोखर मतांधळा झाला असेल ! 

जगदीश्वर चतुर्वेदी

कालपासून मोदीच्या अंधभक्तांनी फेसबुकपासून ते टिव्ही चॅनलवर जी राष्ट्रवादी नागडेपणा चालविला आहे तो अत्यंत लज्जास्पद आहे.ह्या साऱ्या बाबी देशाच्या जनतेने किती भयंकर लोकांच्या ताब्यात सत्ता दिली आहे याकडे वारंवार इशारा करीत आहेत.

यावरून एक निष्कर्ष असाही निघतो की,टीव्ही न्यूज चॅनल हे बातम्या देण्याच्या आपल्या कामापासून खूप दूर गेले आहेत. जे लोक मोदींच्या हातात देश सुरक्षित असल्याचे मानीत होते तेही आपण कुण्या कमअक्कल माणसाच्या हाती देश सोपवून बसलो आहोत म्हणून चिंताग्रस्त आहेत.

तुम्ही सर्जिकल स्ट्राईक च्या बाजूने आहात.? तुम्ही याचे स्वागत करता का ?असे प्रश्न विचारले जाताहेत.माझ्यामते हे दोन्ही प्रश्न मूर्खपनाचे व चुकीच्या उद्देशाने प्रेरित आहेत.लेखक-बुद्धिजीवी व शांतिप्रिय जनतेला असे प्रश्न आवडत नाहीत.लेखक म्हणून आम्ही सदासर्वकाळ जनतेच्या बाजूने व शांततेच्या बाजूने आहोत.आमच्याकरिता शांतता ही राष्ट्र,राष्ट्रवाद आणि सेनेपेक्षा सर्वोपरी आहे. जेनुइन लेखक कधीही सेना,सरकार व युद्धाच्या बाजूने राहिलेले नाहीत. जेनुइन लेखकानी प्रत्येक वेळी दहशतवादी व सांप्रदायिक शक्तिना जोरदार विरोध केला आहे. भाड्याचे बोरूबहाद्दर हेच फक्त युद्ध आणि उन्मादाच्या बाजूने आहेत.

जेनुइन लेखकाला सत्य आणि शांतता यांची काळजी असते.या सत्याला फेसबुक आणि मीडिया मध्ये सक्रिय मतांधळे लोक समजूच शकत नाहीत. महत्वाची बाब ही की टीव्ही मीडिया या मतांधळ्या लोकांना भरपूर आणि नियमित कव्हरेज देत असून याने देशातील शांतिपूर्ण वातावरणाचे नुकसान केले आहे. टीव्ही न्यूज चॅनल आणि मोदींचे अंधभक्त ज्यात त्यांची पेड इंटरनेट आर्मी सुद्धा आहे, मागच्या तीन वर्षात कुठल्याही प्रकारे अशांती कायम ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत. खेदाची बाब ही की केंद्र सरकार सुद्धा ह्या मतांधळ्या इशाऱ्यावर नाचत असते. केंद्र सरकारचे मंत्रीसुद्धा मतांधळ्या लोकांसारखे बोलायला लागले आहेत.
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही स्थितीत शांतता प्रस्थापित व्हावी असे आपल्याला वाटते. परंतु संघ परिवारास अशांतता कायम रहावी असे वाटते. याकरिता पाक विरोधी घृणा निर्माण करण्याकरीता संघाच्या प्रचारयंत्रणेद्वारे रोज नवनवे मुद्दे छेडले जात आहेत.हे मुद्दे नियोजित पद्धतीने प्राईम टाईम डिबेटचे विषय बनविले जात आहेत. जवळपास सर्वच चॅनल्सच्या टॉक टाईम ला ठेक्याने विकत घेण्यात आले आहे.प्रत्येक चॅनल हे संघी असत्याचे प्रभावी सादरीकरण करण्याच्या स्पर्धेत उतरले आहे.संघाच्या प्रचारयंत्रणेची इलेक्ट्रॉनिक प्रचारयंत्रणा उभी करण्यात आली आहे.आपल्या सर्वांसाठी हे गंभीर आव्हान आहे.टीव्ही न्युज चॅनल अशा पध्दतीने संघाच्या प्रचारयंत्रणेचा भाग बनून निरंतर सामान्य जनतेवर,शांतीच्या समर्थकावर हल्ले करीत राहतील याची आपण कल्पनाही केलेली नव्हती. जनतेवर या प्रकारचे हल्ले प्रसारमाध्यमाच्या आचारसंहिताना मोडून केले जात आहेत. खरेतर टीव्ही न्यूज चॅनल च्या अशा वागणुकीचा लेखक- बुद्धिजीवी आणि मीडियात काम करणाऱ्या लोकांनी संयुक्तपणे विरोध केला पाहिजे.सामान्य जनतेमध्ये जाऊन या चॅनेल्सचा बुरखा फाडला पाहिजे.राज्य-जिल्ह्याच्या पातळीवर न्यूज चॅनल्सच्या विरोधात संमेलने आयोजित केली पाहिजेत,सभा घेतल्या पाहिजेत.सर्वसामान्य जनतेला
या वृत्तवाहिन्याच्या कारनाम्याविरोधात जागृत व संघटित करण्याची गरज आहे. प्रसारमाध्यम साक्षरतेला मुख्य अजेंड्यावर आणण्याची गरज आहे.
भारत-पाक कशारीतीने सामान्य होतील यावर सरकारने विचार करावा.मजेशीर बाब ही की दोन्ही देशातली सरकारे उन्मादी,दहशतवादी व सांप्रदायिक शक्तीच्या हाती आहेत. हे लोक अमेरिकीचे शेपूट आहेत. भारत आणि आसपासच्या देशातील मित्रत्वाचे वातावरण संपावे अशी अमेरिकेची ईच्छा आहे.योगायोगाने दोन्ही देशाची सरकारं जाणीवपूर्वक भारतीय उपखंडातील वातावरण बिघडविण्याच्या मागे लागलेली आहेत.
मोदी सरकार व सेनेच्या बाजूने उभे राहणे ही काही लेखकाची जबाबदारी नाही.सामान्य जनतेच्या बाजूने उभे राहणे ही त्यांची जबाबदारी आहे. भारतीय उपखंडातील जनतेच्या बाजूने उभे राहणे ही त्यांची जबाबदारी आहे. या उपखंडात शांतता निर्माण करण्याच्या प्रत्येक प्रयत्नांच्या बाजूने त्यांनी उभे राहिले पाहिजे. सेनेने दहशतवादी मारावेत,देशाच्या सीमांचे रक्षण करावे हे त्यांचे काम आहे. याकरिता सेनेची जय हो,जय हो करीत बसण्याची गरज नाही.
जसे की मी एक शिक्षक असून नियमित वर्गात जाऊन शिकविणे माझ्या नोकरीचा भाग आहे . हे काम करून मी काही महान गोष्ट करीत नाही. याकरिता माझी प्रशंसा होण्याची गरज नाही . तसेच सेनेचे काम आहे.सीमेवर पहारा देने,शांतता ठेवणे,दहशतवादी हल्ल्यास परतवून लावणे ही कामे सेना करीत राहते.सेनेने याआधीही कित्येक वेळा सर्जिकल स्ट्राईक केली आहे.ही विशिष्ट प्रकारची हल्ला करणारी एक युध्दनीती आहे.याकरिता युध्दउन्माद निर्माण करण्याची गरज नाही.भारताच्या शांतताप्रिय जनतेवर,धर्मनिरपेक्ष बुद्धिजीवीवर,जेएनयू,जादवपूर,हैद्राबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर वैचारिक हल्ले करण्याची गरज नाही .
काल मी टाईम्स नाऊ वर अर्णव गोस्वामी ला देशातल्या शांतिप्रिय लोक,जेएनयू इत्यादीवर हल्ले करताना बघितले.या पद्धतीचे हल्ले हे आरएसएस चे लोक हे आतपर्यंत कीती ओंगळवाणे झाले आहेत आणि अक्कलीच्या बाबतीत दिवाळखोर झाले आहेत हे दिसून येत.,टीव्ही एंकर जेव्हा एखाद्या मतांधळ्यासारखे बरळत असतो तेव्हा तो तेच सांगत असतो जे आरएसएस च्या लोकांनी त्याला बोलायला सांगितले आहे. तो बिचारा संघाचा भोंगा आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही संघाची प्रचार करण्याची पद्धती,त्यांचा कंटेंट बघू शकता. आणि हेही शक्य आहे की इतके दिवस संघाच्या इशाऱ्यावर नाचता-नाचता तो खरोखर मतांधळा झाला असेल !
■ लेखक हे कलकत्ता विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.
■ कार्टून प्रसिद्ध कार्टूनिस्ट सतीश आचार्य यांचे.इंटरनेटवरन साभार
■ मूळ हिंदी लेख मीडियाव्हिजिल वरून साभार
■ अनुवाद – दयानंद कनकदंडे