भाषा आणि संस्कृतीचे आदान प्रदान हे विषमता व सत्तावर्चस्वाच्या आधारे होता कामा नये – न्गुगी वा थियोन्गो

This slideshow requires JavaScript.

केनिया देशाचे लेखक न्गुगी हे गेली पन्नास वर्षे लिहित आहेत. त्यानी आपल्या सुरुवातीच्या काही कादंबऱ्या या इंग्रजी भाषेतून लिहिल्या पण नंतर त्यांनी इंग्रजी भाषेतून लिहिणे सोडून दिले.ख्रिश्चन धर्म व नाव यांचा त्याग केला. त्यांना नको असलेल्या वसाहतवादि भूतकाळाच्या संदर्भाने निश्चित अशा त्यांच्या भाषा आणि संस्कृती बाबत भूमिका आहेत.म्हणून न्गुगी यांनी त्यांच्या गोकोया देशी भाषेतच लिखाण करणे पसंत केले आहे.

न्गुगी हे पेन कॉंग्रेस च्या निमित्ताने पुण्यात आले असून पेन कॉंग्रेस च्या वतीने २८ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५;३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे “ Hierarchy or Network : Decolonization of Language Relationship in the World” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

आजच हाती आलेल्या माहितीनुसार त्यांना व्हिसा नाकारण्यात आल्याने ते उपस्थित राहू शकणार नाहीत.

टाईम्स ऑफ इंडिया मध्ये ४ एप्रिल च्या अंकात प्रकाशित प्रधुमन सोधा यांनी घेतलेली मुलाखत ‘असंतोष’ च्या वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत. मुलाखतीचा अनुवाद कवी,समीक्षक व अनुवादक डॉ. दीपक बोरगावे यांनी केला आहे.

गोकोया या तुमच्या देशी भाषेत लिहिण्यामागे तुमची काय भूमिका आहे ?

मी सुरुवातीला इंग्रजी भाषेत कादंबऱ्या लिहिल्या.माझ्या पहिल्या चार कादंबऱ्या द रिव्हर बिटवीन,वीप नॉट चाइल्ड,अ ग्रेन ऑफ व्हीट आणि पेटल्स ऑफ ब्लड या साऱ्या इंग्रजीतून प्रसिद्ध झाल्या आहेत.नंतर १९७७-७८ मध्ये मी माझ्या मातृभाषेत नागहिका दिंदा(मला जेव्हा वाटेल तेव्हा मी लग्न करेन) हे नाटक लिहिले.याचा परिणाम असा झाला कि मला अधिकाधिक काळ नजरकैदेत ठेवले गेले. आफ्रिकन सरकारने मला आफ्रिकन भाषेत नाटक लिहिल्यामुळे तुरुंगात डांबून ठेवले याचे मला खूप दु:ख झाले.तुरुंगात मी भाषा आणि वसाहतवाद याविषयी खोलवर विचार करायला सुरुवात केली. आपण आता इंग्रजीऐवजी आपल्या मातृभाषेत लिहायचे हे ठरविले.मातृभाषेतली माझी पहिली कादमी तुरुंगात टॉयलेट पेपरवर लिहिली. या कादंबरीचे नाव आहे,सैतानी मुथारबैनी ( इंग्रजी भाषांतर – डेविल ऑन क्रॉस)

मातृभाषेत कादंबरी लिहिल्यानंतर कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले ?

पहिलं आव्हान हे सरळसरळ मानसिक होते. मला हे करता येईल का ? हा प्रश्न होता.ज्या भाषेत यापूर्वी कादंबरी लिहिली गेली नाही अशा भाषेत मी एक आधुनिक कादंबरी लिहू शकेन ? तुरुंगात माझ्या भवताल राजकीय कैदी होते,त्यांनी मला अशी कादंबरी लिहिण्यास प्रोत्साहित केले.

वसाहतवादी मानसिक परिणामाच्या पार्श्वभूमीवर आपल्या व्यक्तिगत संघर्षात आणि लढाईत मातृभाषेचे महत्व काय आहे ?

आपणा सर्वाना एका पायाभूत अशा एका गोष्टीची गरज असते.ज्यामुळे आपण जगाचा अर्थ लावू शकू.जगाशी आपले नातेसंबंध जोडू शकू. हा पाया तुम्हाला तुमच्या भाषेत,संस्कृतीत मिळतो.जी भाषा तुमच्या आजूबाजूचा समाज बोलतो,तुमची मातृभाषा हीच आपला पाया असते. जर तुम्हाला जगातल्या साऱ्या भाषा येत असतील आणि तुम्हाला मातृभाषाच येत नसेल तर याला एक प्रकारची गुलामगिरीच म्हणावे लागेल.याउलट जर तुम्हाला मातृभाषा येत असेल आणि जगाच्याही भाषा येत असतील तर हे एक बलस्थान होऊ शकते.

रेसलिंग विथ द डेविल हि तुरुंगातल्या जीवनावर आधारीत तुम्हची स्मरणगाथा लवकरच प्रकाशित होते आहे. या स्मरणगाथेतून तुम्ही वाचकांना नेमके काय सांगू इच्छिता ?

हि स्मरणगाथा माझ्या तुरुंगातील जीवनाबद्दलची आहे,डिसेंबर १९७७ ते डिसेंबर १९७८ . तुरुंगातून बाहेर पडल्यावर मी हि संस्मरणे,माझ्या अनेक नोंदी ज्या मी तुरुंगात असताना घेतल्या होत्या त्याआशारे लिहिली. डिटेनेड या नावानी ती सुरुवातीला प्रकाशित झाली होती. मी ती आता पुन्हा विकसित करून लिहिली आहे. यातील अनेक तपशील मी गाळले जे ऐतिहासिकदृष्ट्या कालबाह्य झाले होते. टॉयलेट पेपरवर कादंबरी लिहिण्याचे अनुभव त्यात ठेवले. मला हि गोष्ट अधोरेखित करून सांगावीशी वाटते कि लेखन हि एक प्रतिकार करण्याची प्रक्रिया असते.आम्हा कैद्यांना जे टॉयलेट पेपर दिले होते ते खूप कठीण स्वरूपाचे होते.कदाचित कैद्यांना दिलेली एक शिक्षाच होती. लेखन करायला मात्र हे कागद खूपच उपयोगी पडले. त्यावर पेनानी लिहिलेली अक्षरे व्यवस्थित उमटत असत.या कादंबरीत शेरलॉक होम्स नावाचे व द केस ऑफ मिसिंग नॉव्हेल अशी दोन प्रकरणे आहेत.या प्रकरणामधून मी माझी कादंबरी तुरुंग अधिकाऱ्यांनी कशी ताब्यात घेतली आणि मी ती परत कशी मिळविली याची कथा आहे. माझ्याच भाषेत लिहिलेल्या आणि जी भाषा माझाच अवतार आहे. या माझ्या कादंबरी लेखनाकडे मी प्रतिकाराची क्रिया म्हणून पाहतो. दुष्ट शक्तीचा प्रतिकार करणे व्यक्तिगत आणि सामाजिक टिकून राहण्यासाठी आवश्यक असते.

तुम्ही भारतात जाऊन आला आहात .. एक राष्ट्र म्हणून आम्ही आमच्या मनातून आणि जाणीवेतून हा वसाहतवादी परिणाम फेकून देण्यात किती प्रमाणात यशस्वी झालो आहोत ? तुम्हाला काय वाटते ?

मी भारतात फार काळ राहिलेलो नाही त्यामुळे मला अनौपचारिकपणे निरीक्षणे करता आली नाहीत. मला वाटते कि सगळ्याच उत्तर वसाहतवादी समाजाप्रमाणे भारत हा देखील वसाहतवादी परिणामापासून सुटका करून घेण्यासाठी धडपडतो आहे. इंग्रजी हि आजही एक प्रभावी भाषा आहे. वर्चस्वाची भाषा आहे. वसाहतवादाने भाषा आणि समाजाची विषमतेवर आधारलेल्या वर्चस्ववादी नातेसंबंधांची कल्पना केली होती. काही भाषा आणि संस्कृती ह्या दुसऱ्या भाषा आणि संस्कृती यांच्यापेक्षा उच्च प्रतीच्या आहेत असा हा दृष्टीकोन होता.भाषा आणि संस्कृतीचे आदान प्रदान हे समतेच्या तत्वावर व्हायला हवे ; विषमतेच्या सत्तासंबंधाच्या वर्चस्वावर नव्हे. आपणाला भाषिक आणि सांस्कृतिक सरंजामशाहीचा अंत करायलाच पाहिजे.हा एक वसाहतवादाचा अवशेष आहे.

तुम्ही कोणते भारतीय लेखक वाचलेले आहेत जे तुम्हाला तुम्ह्च्या उमेदीच्या काळात स्फूर्ती देणारे ठरले .

आर..के.नारायण,मुल्क राज आनंद,सलमान रश्दी

तुमच्या लेखनातून वसाहतेत्तर परिणामांचीही चर्चा येते जी एत्तदेशीय सत्तेकडून संक्रमित होते आहे. म्हणजे वसाहतवादाच्या नंतरही हे सुरु आहे. याबद्दल आपण काही सांगू शकाल का ?

यालाच मी नव-वसाहतवाद म्हणतो आहे.परिस्थिती अशी आहे कि राजकीयदृष्ट्या आपण स्वातंत्र्य झालो आहोत पण आपली अर्थव्यवस्था आजही पाश्चात्य वर्चस्ववादी शक्तीकडून नियंत्रित होत आहे.यामुळेही आपल्या देशाची जाणीव प्रभावित होते. विशेषतः प्रत्येक बाबतीत पाश्चात्यांची वैधता मिळविण्याचा आपण जो उद्योग करीत राहतो त्यातून हे घडत जाते. वास्तविक हि वैधता आपल्यामधून यायला हवी.आपल्या लोकामधून यायला हवी.आपल्या भाषामधून,आपल्या संस्कृतीमधून,आपल्या गरजामधून यायला हवी ..