सत्याचा पाठपुरावा आणि जागतिक शांतता प्रस्थापित करणे अधिक आव्हानात्मक आणि गरजेचे आहे -पेन काँग्रेसला पुण्यात सुरुवात जगातील कवी,लेखक,कादंबरीकर,निबंधकार यांची संघटना असलेल्या ‘पेन इंटरनॅशनल’ च्या अधिवेशनाला काल आगाखान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी व महादेव देसाई यांना वंदन करून सुरुवात झाली.

सदर अधिवेशनाकरीता एनगुगी वा थियोन्गो,अशोक वाजपेयी,गुलाम मोहम्मद शेख,आशिष नंदी सहित जगभरातील ४०० प्रतिनिधींची उपस्थिती आहे.

सत्याचा पाठपुरावा आणि जागतिक शांतता प्रस्थापित करणे अधिक आव्हानात्मक आणि गरजेचे आहे. महात्मा गांधींच्या विचार कार्यास हे अधिवेशन समर्पित असून सत्य,स्वातंत्र्य,अभिव्यक्ती,विविधता याबाबतीतल साहित्य व्यवहारातील चर्चा या काँग्रेसच्या केंद्रस्थानी असतील असे पेन इंटरनॅशनल च्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष जेनिफर क्लेमेंट याप्रसंगी बोलताना म्हणाल्या.

सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या विमाननगर परिसरात झालेल्या उद्घाटन सोहळ्यात डॉ. गणेश देवी यांनी ‘पेन काँग्रेस आणि पुणे’ संबंधी विशेष व्याख्यान दिले.

तत्पूर्वी कन्नड व्यंगचित्रकार पी.महमूद यांना पहिला गौरी लंकेश पुरस्कार जाहीर करण्यात आला.

डॉ.गणेश देवी म्हणाले……

पंधराशे वर्षाचा सातत्याचा इतिहास असलेली भाषा पुणे बोलते. मराठी आणि इतर अनेक भारतीय भाषा ह्या भारतीय विचार आणि आचार यांचे प्रतिनिधित्व करतात, हाच भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचा पाया आहे. हा थोर सभ्यतेचा आणि संस्कृतीचा एक सततचा प्रवाह आहे आणि यात नेहमी वैविधतेचा पुरस्कार, उत्सव आणि लोकशाही मूल्ये ही केंद्रस्थानी राहीलेली आहेत.

पेन ही आंतरराष्ट्रीय लेखकांची संघटना आज हा उत्सव साजरा करत आहे, तिला आशा आहे की, सत्याचा विजय हा होणारच आहे.

गांधी, जे सत्याचा शोध घेणारे विचारवंत मानले जातात, ते पेन या काँग्रेसच्या केंद्रस्थानी आहेत.

या कॉंग्रेसमध्ये जगातील ८० पेक्षा अधिक देशांचा सहभाग आहे, आणि हे ४००० पेक्षा अधिक भाषांचे प्रतिनिधित्व करतात. आणि आम्ही सारेजण या भाषांच्या संरक्षणासाठी झटत आहोत आणि आम्हाला या भाषेतील सॄजनात्मक गोष्टी महत्त्वाच्या वाटतात.

जागतिकीकरणाच्या आर्थिक रेट्यामुळे या भाषांसमोर आपल्या अस्तित्वाचा, त्यांच्या स्वत:च्या आवाजाचा आणि विचाराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. आपण सारेजण संघटीत राहू या आणि या धोक्याचा मुकाबला करु या.

८०० भाषा बोलणाऱ्या भारताचा एक प्रतिनिधी म्हणून भारतीय प्राचीन विचार परत एकदा मांडण्याची संधी दिल्याबद्दल, मी पेन इंटरनॅशनलचे आभार मानतो, जे आपणास हे सांगत आहे की, सारे जग हे माझे आहे, पण ते माझ्या मालकीचे नाही. उलट, मीच तिचा आहे.