एम.आय.एम. उर्फ हैद्राबादी शिवसेना – डॉ.बशारत अहमद

एमआयएम -भारिप युतीच्या निमित्ताने एमआयएम पक्षाची चर्चा महाराष्ट्रात जोर धरू लागली आहे. मागील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्यानंतर, एमआयएम च्या दोन आमदार निवडून आल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ.बशारत अहमद यांनी लिहिलेला व “सकल” या अनियतकालिकात प्रकाशित झालेला लेख एमआयएम,सेक्युलर,सांप्रदायिक वगैरेच्या सुरू झालेल्या चर्चेनिमित्ताने “असंतोष” च्या वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘एम.आय.एम.’ चे दोन आमदार निवडून आले. आणि महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात जणू भूकंपच झाला. विविध माध्यमातून आजही त्यावर चर्चा आणि लिखाण चालू आहे. आणि महाराष्ट्रावर एक महान संकट नव्याने आल्यासारखे भासवले जात आहे. वास्तविक पाहता एम.आय.एम. ने महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा पदार्पण केलेले नाही. एम.आय.एम. ची स्थापना १९२७ साली झाली, तेव्हा पासून किमान मराठवाड्यात तरी एम.आय.एम. आपले अस्तित्व टिकवून आहे. परंतु नवाब महमूद नवाज खा. ज्यांना हैदराबादचे नवाब मीर उस्मान अली खान यांनी “नवाब बहादूर यार जंग” असा किताब दिला होता. यांनी १९२७ साली स्थापन केलेली एम.आय.एम. अर्थात मजलिस इत्तहादूल मुस्लिमीन ही एक शुद्ध धार्मिक आणि सामाजिक संघटना होती. आणि त्याच्या स्थापनेचा उद्देश तिच्या नावामध्येच निर्देशित आहे. मजलिस म्हणजे समिती, इत्तहादूल म्हणजे ऐक्य किवा एकता, आणि मुस्लिमीन म्हणजे मुसलमानांची. म्हणजे हि संघटना मुसलमानाच्या विविध घटकांमध्ये, पंथांमध्ये ऐक्य निर्माण करण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आली होती. कारण मुसलमानांनी इस्लाम धर्मात विविध पंथ आणि संप्रदाय निर्माण केले असून त्यांच्यात निव्वळ तार्कीक व वैचारिक मतभेद नसून मनभेद देखील निर्माण करण्यात आले आहेत. ज्याची परिणीती अनेक वेळा संघर्षात आणि दंगलीत देखील होते. शिया व सुन्नी पंथ सर्वांना ज्ञात आहेत. आणि त्यांच्यातील दंगली देखील सर्वांनी पाहिलेल्या आहेत. परंतु शिया पंथात देखील अनेक उपपंथ आहेत. आणि ते देखील आपापसात भांडत असतात. आधीच निजामाच्या राजवटीत मुसलमान अल्पसंख्य होते. आणि त्यात आपसातील फुट आणि तंटे-बखेडे यामुळे निझामाच्या राज्याच्या स्थैर्यावर गंडांतर येऊ लागले होते. म्हणून या संघटनेच्या स्थापनेला निझामाचे नुसतेच प्रोत्साहन नव्हते तर आर्थिक मदत देखील होती. नवाब बहादूर यार जंग स्वतः महदेबी पंथाचे होते. परंतु ते पंथ भेदावर उठून सर्वच मुसलमानांचे कल्याण आणि प्रबोधन व्हावे. या विचाराचे ग्रहस्थ होते. अतिशय फर्डे व प्रभावी वक्ते होते. भारदस्त व्यक्तिमत्व गरजदार आवाज(ज्याला पहाडी आवाज म्हणत) शुद्ध चारित्र्य आणि हेतू बद्दल अत्यंत प्रामाणिक होते. ध्वनिक्षेपकाशिवाय देखील त्यांचा आवाज हजारोंच्या सभेतील शेवटच्या माणसापर्यंत पोहचत असे. एवढी क्षमता त्यांच्या आवाजात होती. त्यांच्या भाषणशैली आणि आवाजाची नक्कल करण्याची टूमच त्याकाळी निर्माण झाली होती. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईचे अॅड.फरकुंदा अली(जे सुदैवाने अजून हयात आहेत) हे त्यांच्या भाषण शैलीची आणि आवाजाची हुबेहूब नकल करून सभा गाजवत अशा या नवाब बहादूर यार जंग यांनी या संघटनेच्या माध्यमातून आदिवासींमध्ये ख्रिस्ती मिशनरी प्रमाणे प्रचारक पाठवून धर्म प्रचारकाचे देखील कार्य केले होते. त्यांच्या प्रयत्नानेच अनेक आदिवासींनी विशेषतः भिल्लांनी आणि तडवींनी इस्लाम धर्म स्वीकारला. त्यातील तडवी हे आज पठाण म्हणून ओळखले जातात. ते त्यांच्याच प्रयत्नांचे फळ आहेत. १९४४ सालामध्ये नवाब बहादूर यार जंग यांचे अकाली निधन झाले. त्यांच्यावर विष प्रयोग करण्यात आला अशी शंका आजही घेतली जाते. त्यांनी आपली सर्व स्थावर जंगम मालमत्ता संघटनेसाठी वक्फ केली होती. म्हणून जनतेने त्यांना, “सिद्दिक-ए-वतन” अशी उपाधी दिली होती. आज देखील त्यांचा जुना वाडा आणि त्या भोवतालचे प्रशस्त मैदान(लातूरच्या तहसील कार्यालया शेजारी) वादग्रस्त आहे. त्या जागेच्या मालकी हक्कासाठी एम.आय.एम., मराठवाडा, वक्फ बोर्ड, आणि कब्जेदार मुस्तफाखान यांच्यात न्यायालात दावा दाखल आहे. कासीम रिझवी यांनी १९४६ साली या संघटनेला राजकीय स्वरूप दिले. आणि हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन होवू नये म्हणून रझाकार चळवळ सुरु केली. रझाकार या पर्शियन भाषेतील शब्दाचा अर्थ स्वयंसेवक असा होतो. “नवाब बहादूर यार जंग” याच्या हयातीतच एम.आय.एम. च्या शाखा संस्थानाच्या प्रत्येक जिल्ह्यातच नव्हे तर गावागावांत स्थापन झाल्या होत्या म्हणून ‘रझाकार चळवळ’ देखील गावागावांत फोफावली. आणि पाहता पाहता रझाकारांची संख्या दीड लाखांवर गेली. या चळवळीच्या स्थापनेमागे आर.एस.एस. कडून प्रेरणा घेतलेली असे वाटते. कारण रझाकारांच्या शाखांवर देखील लाठी-काठी चालविणे आणि पुढे जावून बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात असे. विशेष म्हणजे अशाच स्वरूपाच्या महिलांच्याही शाखा चालत होत्या. १९४८ साली भारतीय सैन्याने जेव्हा हैद्राबाद संस्थानावर ‘पोलीस अॅक्शन’ केली त्यावेळी निझामाचे सैन्य आणि पोलीस रात्रीतूनच हैद्राबादला पसार झाले. आणि भारतीय सेनेचा थोडाफार प्रतिकार रझाकारांनीच केला. त्यांच्याकडे बाराबोरच्या बंदूका होत्या. या बंदुकांना भरमार फुंकुनी असे म्हणत. याला लागणारे छर्रे आणि दारू बहुतेक वेळा गाव पातळीवरच तयार केले जात. प्रत्येक बंदुकधारीकडे मोजकेच काडतूस असत. व तेच परत परत भरून वापरले जात. भारतीय सेनेकडे ‘थ्री नॉट थ्री’ च्या बंदुका होत्या. त्यांच्या पुढे या ‘भरमारचा’ निभाव लागणे शक्यच नव्हते. तरीपण रझाकारांचे मनोबल खच्ची होवू नये म्हणून त्याकाळात एक वाक्यप्रचार प्रचलित होता. “ ‘थ्री नॉट थ्री’ माघारी फिरी, भरमार फुंकुनी लई जोर करी ”.
१९४८ साली सप्टेंबरच्या १७ तारखेला हैद्राबाद संस्थान भारती सेनेने ताब्यात घेतले. रझाकार चळवळीवर बंदी आली, आणि १९४६ साली स्थापन झालेली रझाकार चळवळ सप्टेंबर १९४८ ला संपली परंतु एम.आय.एम. ही धार्मिक संघटना कायम होती. कासीम रिझवी १९४८ ते १९५७ अटकेत होते. सुटकेनंतर त्यांनी संघटनेची सूत्रे अब्दुल वाहिद ओवैसी(असदोद्दीन व अकबरोद्दीन ओवैसींचे आजोबा) यांच्याकडे सोपवून ते पाकिस्तानात स्थलांतरीत झाले. अब्दुल वाहीद ओवैसी हे मुळचे औसा (तत्कालीन जिल्हा उस्मानाबाद) जिल्हा लातूर रहिवासी होते. ते हैद्राबादला वकिली करत. व त्यांचे मूळ नाव अब्दुल वाहीद औसवी होते, पुढे औसवीचे ओवैसी झाले. ते देखील फर्डे वक्ते होते. त्यांनी एम.आय.एम. ला राजकीय स्वरूप द्यायला सुरवात केली. आणि त्यांचे पुत्र सुलतान सलावूद्दिन ओवैसी हे १९६२ साली पहिल्यांदा आंध्रप्रदेश विधानसभेची निवडणूक पथ्थर गद्दी(हैद्राबाद) मतदारसंघातून लढवून आमदार झाले. आणि सतत १९८४ पर्यंत आमदार राहिले. १९८४ साली ते प्रथम ते प्रथम हैद्राबाद चे खासदार झाले. त्यांच्या सोबत त्यांच्या पाठीमागून अमानुद्दान खान, बाहदूर आगा, वजारत रसूल खान, वजाहत रसूल खान,हे नेते देखील आमदार म्हणून सतत निवडून येत. निवडणूक आयोगाची मान्यता मिळवताना एम.आय.एम. चे नामकरण ए.आय.एम.आय.एम. म्हणजे “ऑल इंडिया मजलिस इतेहाद्दूल मुस्लिमीन” असे करण्यात आले. या प्रकारच्या शाखा मराठवाड्यात काही ठिकाणी होत्या. औशाचे अॅड.मझहरूद्दीन हाश्मी हे प्रदेश अध्यक्ष होते. त्यांनी औसा विधानसभेच्या निवडणुका अनेक वेळा लढवल्या पण त्यांना कधी यश आले नाही. मात्र औसा नगरपालिकेचे अनेक वेळा सदस्य निवडले गेले. १९८५ मध्ये लातूर जिल्हा अध्यक्ष म्हणून निझाम्मुद्दिन होते. आणि शहराध्यक्ष महंमद इस्माईल हे लोक देखील लातूर नगरपालिकेला उमेदवार उभे करत परंतु अपयशी ठरत. अॅड. मझहरोद्दीन हाश्मी यांच्या निधनानंतर एम.आय.एम. चे मराठवाड्यातील कार्य थंडावले, किंबहूना बंद पडले.
आता त्यांचे दोन आमदार निवडून आले तर एवढे हवालदिल होण्याचे काही कारण नाही. कासीम रिझवी यांच्या लातूर येथील मालमत्तेच्या केस संदर्भात कोर्टाच्या तारखेला ज्या ज्या वेळी सुलतान सलाउद्दीन औवेसी लातूरला येत त्या त्या वेळी त्यांच्या सभांचेही आयोजन केले जात असे.
सुलतान सलाउद्दीन औवेसी यांनी जेव्हा आपला मुलगा बॅरिस्टर असोदोद्दिन औवेसीकडे पक्षाची सूत्रे सोपवली तेव्हा त्यांच्या पक्षात फुट पडून आ.अमानुल्लाह खान आणि त्यांचे सहकारी वेगळे झाले. आणि त्यांनी ‘मजलिस बचावो तहरिक’ नावाची संघटना स्थापन करून औवेसी यांच्या घराणेशाहीला विरोध केला. ते महदवी पंथाचे होते. व स्वतःला नवाब बहादूर यार जंग यांचे खरे वारस समजत. त्यांच्या विरोधामुळे एम.आय.एम.ची काही प्रमाणात पीछेहाट झाली होती. या भांडणात “नवाब बहादूर यार जंग” यांची हवेली “कोठी दार-अस-सलाम” तसेच इतर मालमत्तेवर ताबा मिळविण्याचा देखील वाद होता. अमानुल्लाह खान यांच्या अकाली निधनाने हा विरोध मावळला. आणि औवेसींचा मार्ग निर्विघ्न झाला. आज “नवाब बहादूर यार जंग” यांची संपूर्ण मालमत्ता औवेसी घराण्याच्या ताब्यात आहे. अरुद्दीन चे धाकटे बंधू आ.अकबरीद्दीन औवेसी हे हैद्राबाद चे भूमाफिया आहेत. म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे, त्यातून ते थोडक्यात बचावले आहेत. ते अनेक दिवस इस्पितळात कोमा मध्ये होते.
या पक्षाच्या नावामध्ये मुस्लिमीन असले तरी ते अन्य धर्मियांनाही पक्षाचे सभासद करून घेतात. तशी तरतूद पक्षाच्या घटनेत आहे. हैद्राबाद महापालिकेची सत्ता पहिल्यांदा प्राप्त झाल्यावर त्यांनी एका दलित कार्यकर्त्याची पहिला महापौर म्हणून निवड केली होती. नांदेड-वाघाडा महापालिकेत देखील त्यांनी प्रा.सुरेश गायकवाड यांच्या साथीने निवडणूक लढवून ११ सदस्य एम.आय.एम. चे तर ३ सदस्य दलितांचे निवडून आणले होते. औरंगाबाद विधानसभेत देखील त्यांनी गंगाधर गाडे यांना उमेदवारी दिली होती. सोलापूर मध्ये देखील त्यांनी धनगर समाजाच्या एका गटा बरोबर युती केली होती. आ.प्रणिती शिंदे ‘एम.आय.एम.’ ला देशद्रोही ठरवून त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी करत आकारण त्यांचे महत्व वाढवत आहेत. महाराष्ट्रातील त्यांच्या राजकीय प्रवेशामुळे शिवसेना व भाजप या हिंदुत्ववादी पक्षांचा फायदाच झाला आहे.
यापूर्वी जेव्हा महाराष्ट्रात ‘मुस्लीम लीग’ (जिला फाळणीचा इतिहास होता) फोफावली होती. त्यावेळी देखील असेच चित्र होते. १९७४ साली नांदेडचे नगराध्यक्ष मुस्लीम लीगचे ‘अॅड.मकबूल सलीम आणि परभणीचे नगराध्यक्ष इमदाक्काबंग निवडून आले होते. त्यापूर्वी मुंबई महापालिकेत पहिल्यांदा सत्तेवर आली, आणि सेनेला मुस्लीम लीगचा पाठिंबा होता. १९८८ साली औरंगाबाद महापालिकेत सेनेचा पहिले महापौर श्री.सवे हे मुस्लीम लीग बरोबर युती करूनच निवडून आले होते. उपमहापौर मुस्लीम लीगचे तकी हसनखान होते. १९७८ साली नांदेडला जनता पक्षाबरोबर युती करून मुस्लीम लीगचे ‘अॅड.नसरूल्लाह खान’ तर मुंबईला ‘जियाओद्दीन बुखारी’ आमदार झाले होते. महाराष्ट्राच्या पुलोद सरकार मध्ये मुलीम लीग देखील सामील झाली होती. मुस्लीम लीग केरळ मध्ये कधी कॉंग्रेस बरोबर तर कधी डाव्या आघाडीबरोबर कायम सत्तेत असते. केंद्रातील यु.पी.ए.-१ मध्ये मुस्लीम लीगचे इ.अहमद हे परराष्ट्र मंत्री देखील होते. त्याचप्रमाणे आंध्रप्रदेश मध्ये कॉंग्रेस, तेलगू देसम पार्टीला हरवून सत्तेत आली ती एम.आय.एम. बरोबर युती करून आली होती. आज देखील तेलंगना राज्यात ती सत्ताधारी पक्षा सोबतच आहे.

हिंदुत्ववादी पक्ष ज्याप्रमाणे मतांचे धृवीकरण करण्यासाठी दंगली घडवून हिंदू-मुस्लीमांना भिडवत असतात, त्याच तंत्राचा अवलंब एम.आय.एम. हैद्राबाद मध्ये करत आली आहे, म्हणून एम.आय.एम.ला हैद्राबाद मध्ये करत आली आहे. म्हणून एम.आय.एम ला “हैद्राबादी शिवसेना” म्हटल्यास वावगे पडणार नाही. हैद्राबादच्या दंगलीनंतर एन.टी.रामाराव यांनी बऱ्यापैकी चाप लावला. त्यामुळे हैद्राबादच्या दंगली बंद झाल्या. परंतु आता हैद्राबाद मध्ये एम.आय.एम. मुसलमानांतील एक पंथ ‘अहमदिया मुस्लीम’ जमायत च्या विरोधातील वातावरण तापवून अन्य मुस्लीम पंथियांना संघटीत करण्याचा प्रयत्न करत असते.परंतु महाराष्ट्रातील सुज्ञ मुस्लीम मतदारांनी ‘मुस्लीम लीगला’ फार दिवस थारा दिला नाही, त्याचप्रमाणे ते एम.आय.एम. ला देखील थारा देणार नाहीत. मुस्लीम लीग जशी महाराष्ट्रातून नामशेष झाली. तसे एम.आय.एम. चे होण्यास फार काळ लागणार नाही.

(लेखक मराठी,उर्दू,कवी व लेखक आहेत.सामाजिक-राजकीय विषयाचे भाष्यकार,मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे कार्यकर्ते,उस्मानाबाद जिल्हा जनता दलाचे माजी जिल्हा अध्यक्ष आहेत.सध्या ते आम आदमी पक्षात कार्यरत आहेत)

Leave a Reply