कॉ. शरद पाटील : एक स्कुल ऑफ थॉट – कॉ. शशी सोनावणे

कॉ. शरद पाटील यांच्या अभिवादन सभेच्या निमित्ताने कॉ. शरद पाटलांच्या  गोष्टी मला भावल्या किंवा ज्याबद्दल प्रश्न पडले त्याचे थोडक्यात इथे विवेचन करीत आहे. आज १ मे कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम ठेवला आहे. उद्या २ मे ला अक्षय तृतीय आहे आणि खानदेशांत ‘आखाजी’ हा मोठा सण आहे. मी खान्देशातलाच आहे. आमच्याकडे खानदेशात आखाजीच्या दिवशी शेतीच्या संदर्भातले जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते खापराच्यावरच्या पुरणपोळीचे जेवण झाल्यावर एकत्र बसून घेतले जातात आणि हे निर्णय घेत असताना, मी लहान असताना पाहिलंय, आमच्या घरी माझी आजी ही बैठक घेणारी होती. ती ठरवायची कुठे काय पेरायचे. माथ्यावर शेतात काय टाकायचे, खालच्या अंगाच्या शेतात काय काय टाकायचे, बियाणं कोणतं पेरायचं. नवीन सालदाराला किती साल द्यायचं इ. माझे शेती करणारे दोन काका आहेत ते तिच्याशी चर्चा करायचे. माझे वडील आणि दुसरे काका जे शहरात नोकरी करत त्यांना याबाबत फारसे कुणी विचारात नव्हते. आखाजी या सणाच्या दिवशी घरातील कर्ती स्त्री ही शेताचे निर्णय घेताना मी पहिली आहे. या पार्शवभूमीवर मी शहरात इंग्रजीतून शिक्षण होतो, शहरातील पुरुषसत्ता पाहत होतो. माझा जेव्हा कॉ. शरद पाटलांशी संबंध आला, ही  १९९७-९८ ची गोष्ट असेल, तेव्हा मी बिचकत बिचकत प्रश्न विचारला – आपण पुरुषसत्ता, ब्राह्मणी व्यवस्था हे सर्व बोलतो पण माझ्या घरात माझी आजी सत्ता केंद्र आहे हे कसे समजून घ्यायच? तेव्हा कॉ. शरद पाटलांनी स्त्रीसत्ता, मातृसत्ता या विषयावर गप्पांच्या ओघात सहजपणे विवेचन होते. दुसरी गोष्ट अशी होती की त्यावेळेस विद्यार्थी चळवळीत काम करणाऱ्या माझ्या सारख्या कार्यकर्त्याला, एम. ए. इतिहास करून, पुढे दोन वर्ष जवळपास पूर्णवेळ काम करूनही कॉ. शरद पाटील यांनी काय लिहून ठेवले आहे हे माहीतच नव्हते. अशी स्थिती होती. त्यांचे सगळे विवेचन झाल्यावर कॉ. शरद पाटील म्हणाले हे सर्व मी दास शूद्रांची गुलामगिरी पासून लिहून ठेवले आहे. काही वाचतोस की नाही ? माझ्याकडे उत्तर नव्हते. 
कॉ. शरद पाटलांशी माझी जी ओळख झाली, वैचारिक म्हणा किंवा वैयक्तिक, ती कॉ. विलास सोनावणे यांच्यामुळे. आणि कॉ. विलास सोनावणेंशी माझ्यासारखाचा संबंध हा ते चळवळ असलेल्या मुस्लिम ओ. बी. सी. चळवळीमुळे आला. प्रत्येकाचा एक प्रवास असतो. आजही या अभिवादन सभेमध्ये कॉ. शरद पाटलांनी जितक्या पिढ्या पहिल्या त्या सर्व इथे उपस्थित आहेत. १९९३-९४ च्या काळात जेव्हा मुस्लिम ओ. बी. सी. चळवळ जोरात होती त्यावेळेस जातीचा प्रश्न नेमका कसा आहे? जात नावाची गोष्ट नेमकी काय आहे? ती फक्त हिंदू धर्माचा भाग आहे का? तर मग मुस्लिम ओ. बी. सी. हे काय आहे? असे प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पडू लागले होते. पुढे विद्यार्थी चळवळीत काम करत असताना या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात आम्ही कॉ. विलास सोनावणेंना  जाऊन भेटलो. त्यांना भेटल्यानंतर जेव्हा सैद्धांतिक मांडणीचे अभ्यासवर्ग होऊ लागले तेव्हा माझ्यासारख्या पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या कार्यकर्त्याला आपण किती अडाणी आहोत, अज्ञानी आहोत याची जाणीव होऊ लागली. त्यावेळेस विलास सनावणेंनी सांगितले की कॉ. शरद पाटील नावाचे पाहिजे. काय वाचले पाहिजे याची यादी पण दिली. मग आम्ही वाचायला लागलो.
तो काळ असा होतो की कॉ. शरद पाटील सुद्धा एक प्रकारच्या एकटेपणातून जात होतो. कॉ. विलास सोनावणेंच्या पुढाकाराने केरळमध्ये मातृसत्तेच्या संदर्भात कॉ. शरद पाटलाची व्याख्याने आयोजित केली होती. विलास सोनावणेंसोबत ती व्याख्याने देऊन ते नुकतेच आले होते. त्यावेळेस आमच्या त्यांच्याशी चर्चा होऊ लागल्या. त्यांनी अनेक गोष्टी समजावल्या. त्यानंतर चर्चेचा हा प्रवास अखंडपणे चालू राहिला, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत. अनेक बाबतीत त्यांच्याशी पटलं. अनेक गोष्टींमध्ये बिनसलं. कॉ. विलास सोनावणे त्यांच्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक होऊन बाहेर पडले त्याचा एक स्वतंत्र इतिहास होता. आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते त्यांच्याजवळ जाऊनही त्यांच्या सत्यशोधक पक्षाचे भाग होऊ शकलो नाही. अनेक अडचणी होत्या. या झाल्या आठवणींच्या गोष्टी. आपण त्यांच्या भूमिकांबद्दल बोलू या. 

कॉ. शरद पाटील यांचे नाव त्यांच्या हयातीमध्ये विद्यापीठीय संशोधन पद्धतीने दुर्लक्षित केले म्हणून कॉ. शरद पाटील संपले नाही. उलट तो ते गेल्यानंतर, कदाचित हे अतिशयोक्ती वाटू शकते, कॉ. शरद पाटील हे एक ‘School of Thought’ म्हणून विकसित होणार आहेत. हा जो स्कुल ऑफ थॉट आहे त्याने इतिहास लेखनाच्या पद्धतीमध्ये असे प्रश्न दृष्टिकोनाच्या संदर्भात उपस्थित केलेत. आम्हाला इतिहास लेखनाच्या पद्धतीबद्दल यांत्रिक पद्धतीने सांगितले जातं. म्हणजे इतिहास संशोधन करताना आपण archaeological sources किती घेतो, कसे घेतो, साहित्याचे संदर्भ कसे वापरतो याचं आपल्याला technique म्हणून बऱ्याच गोष्टी शिवकल्या जातात. पण साहित्याकडे, विशेषतः प्राचीन साहित्याकडे, त्याच्यातल्या शब्दांकडे कुठल्या दृष्टितने पाहावं, मिथकांचा अभ्यास कसा करावा, त्याचा धांडोळा घेत असताना त्याचा अर्थ कसा लावावा – हा दृष्टीचा जो प्रश्न असतो ती दृष्टी कॉ. शरद पाटलांनी या देशाला, जगाला दिली आहे. ब्राह्मणी विचारवंत त्यांच्यातल्या  कोणाही बद्दल खंत व्यक्त करताना हमेशा असे म्हणतात की अमुक अमुक माणूस जर इंग्लडमध्ये जन्माला आला असता तर त्यांना तिथल्या लोकांनी डोक्यावर घेतले असतं. कॉ. शरद पाटील यांच्याबाबतीतही वेगळ्या अर्थाने हीच परिस्थिती आहे. पण आपला करंटेपण इतका आहे कि हे आपण मान्य करणार नाही. एवढा न्यूनगंड आहे की शरद पाटील असं काही लिहू शकतात हे कसे शक्य आहे? असा आपल्याला प्रश्न पडतो. बहुजन समाजातल्या विचारवंतांना म्हुणुनच मान्यता मिळत नाही. आपणचं आपल्या न्यूनगंडामुळे त्यांना बाजूला सारले. ही बोच कॉ. शरद पाटलांना कायम होती.

मला असं वाटतं  की कॉ. शरद पाटील हे accidental विचारवंत आहेत. कारण जो माणूस देशाच्या स्वातंत्र  चळवळीत उरततो, जीवनदायी कम्युनिष्ट होतो, धुळे जिल्ह्यात आदिवासींचे लढे उभारतो, लढे उभारताना जे प्रश्न पडतात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न  करतो, त्या प्रयत्नातूनच संशोधक बनतो. आदिवासी बिगर आदिवासी समाजाशी भिडत असताना जातीचं प्रश्न जेव्हा पुढे तेव्हा त्याबद्दल संशोधन करत वाद भे करण्याचा पर्यत्न ते करत होते. हे वाद मार्क्सवाद जर विज्ञान आहे तर वैज्ञानिक दृशीतकोणातून करायचा पर्यत्न  करत होते. मार्क्सवादी चौकटीतून घालायचा प्रयत्न ते करत होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात बसपुन्नैय्या व इतरांशी जे वाद झाले ते मार्क्सवादी चौकटीत असले तरी पक्षाच्या ब्राम्हणी नेतृत्वाच्या भूमिकेत बसणारे नसल्यामुळे मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने दाबून टाकले. त्यामुळे शरद पाटील अधिकच खोलात गेले.

पाणिनीच्या व्याकरण आणि त्या व्याकरणाच्या आधाराने निऋती सारख्या शब्दाची व्युत्पत्ती, त्या शब्दाचे अर्थ, अव्ययार्थ, त्यांचे मेहेंदळेंशी झालेले वाद या गोष्टी कोणत्याही विचारशील कार्यकर्त्याला, संशोधकाला खूप मोठे खाद्य देऊन जाणारी आहेत. ते वाचताना त्याच्यातून मिळणार जो आनंद आहे, जी अनुभूती ती फार वेगळी आहे. कारण वैचारिक वाद घालताना श पा कुठेही अभिनिवेषवादी होत नाहीत, कुठेही पूर्वग्रह धरून नाहीत. ब्राम्हणी आणि अब्राह्मणी अशी मांडणी करत असताना ती दृष्टीच्या अनुषंगाने, अन्वेषण पद्धतीच्या अनुषंगाने येते. ब्राम्हण द्वेष किंवा ब्राम्हण समर्थन या अंगाने येते नाही. अब्राह्मणी मांडणी करत असताना मार्क्सवादाला, विज्ञान म्हणून भारताच्या संदर्भामधे कसं उभं करायचं हा जो यक्ष प्रश्न आहे त्या प्रश्नाला ते हाताळतात. म्हणूनच कॉ. शरद पाटील यांचा जातीच्या प्रश्नासंदर्भातला, प्राच्यविद्या संदर्भातला संशोधनाचा एवढा मोठा प्रवास झाल्यानंतरही त्यांच्या नावापुढे कॉम्रेड हे बिरुद जात नाही. अगदी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षामधून (माकप) बाहेर पडल्यावर सुद्धा! जातीच्या प्रशांवर काम करणाऱ्या एवढ्या मोठ्या संशोधकाला माकपने कायम जिल्हा कमिटीवरच ठेवले. राज्य समितीवर कधीच येऊ दिले नाही आणि जातीचा प्रश्न उपस्थित केला म्हूणन एकीकडे त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले तर दुसरी कडे त्यांच्यावतीने राज्य समितीत भांडणाऱ्या विलास सोनावणेंना पार्टीने काढून टाकले हा इतिहास आहे.

जातीच्या प्रश्नावर १९७८ साली माकपमधून पडल्यावर कुठेही अभिनिवेषाची वाट न धरता त्यांनी एक नवा प्रवास सुरु केला आणि तो प्रवास जातीअंताच्या लढ्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. त्यांनी इतिहासाच्या, प्राचविद्येचा अभ्यास इतिहासात रमण्याची नाही केला तर, आजच्या प्रश्नांशी संघर्ष करत उद्याचा समाज कसा उभारायचा याचा विचार त्यांच्या सर्व लिखाणाच्या केंद्रस्थानी राहिला.  मूळ शोधण्याच्या प्रयत्नातून लिखाण केले. ज्याप्रमाणे राहिल्यामध्ये तिथला कम्युनिष्ट पक्षाने रशियाचा भौतिक इतिहास लिहिला, भांडवलशाहीच विकास समजून घेत क्रांतीच्या दिशेने गेले किंवा ज्याप्रमाणे माओ चिनी समाजाचा भौतिक इतिहास मांडतो त्याच प्रमाणे भारतातील  क्रांतीची पूर्व अट म्हणून भारताचा ऐतिहासिक भौतिकवादाचा पाय नेहम कसा? हे समजणे गरजेचे आहे. तो मांडण्याचा प्रयत्न शरद पाटील त्यांचा सर्व लिखाणातून करताना दिसतात आणि हे करत असताना जात वर्ण नावाची गोष्ट ते केंद्रस्थानी ठेवतात. त्यासाठी ते दर्शन परंपरेतील सर्व प्रवाहांचा अभ्यास करतात त्यात कुठेहि हे ब्राम्हणी आहे म्हणून बाजूला ठेवा असा भेदभाव करत नाही. त्याचबरोबर बुद्धाला पंचसुत्री कशी गवसली हे सांगणारी मेंढक या गहपतीची वरकडची जी गोष्ट ते जे सांगतात जी फार महत्वाची आहे. या गोष्टीला दुर्लक्षून चालणार नाही. या मांडणीची पुढे जाऊन भारताच्या इतिहासाच्या रचनेमध्ये भारताच्या राजकीय अर्थशास्त्राची चर्चा विकसित करणे गरजेचे आहे. तो मुद्दा शरद पाटलांनी तिथेच सोडला होता. अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. अजून एक महत्वाची गोष्ट मला जाणवते ती म्हणजे शरद पाटील त्यांच्या सर्व मांडणीतू मार्क्सवादाचा एकप्रवाहीपणापासून फारकत घेत बहुप्रवाही करण्याचा जो प्रयत्न  सतत करत होते ती मांडणी त्यांच्या शेवटच्या खंडात अधिक स्पष्टपणे आल्याचे दिवते. इरावती कर्वेंच्या मातृसत्तासंदर्भातील मांडणीपासून जो शपांचा झगडा आहे तो जाणीव नेणीवच्या पातळीवर मार्क्सवादाला बहुप्रवाही कसं करत येईल इथपर्यंत झाला आहे. आणि यातूनच सौत्रांतिक मार्क्सवाद हि नवी संकल्पना ते मांडतात. सौत्रांतिक मार्क्सवाद म्हणजे नेमकं काय असा प्रश्न माझ्यासह अनेकांनी अनेकवेळा कॉ. शरद पाटलांना विचारला आहे. त्यावर त्यांचं एकाच म्हणणं राहिले आहे कि तुम्ही केवळ formal logic च्या पातळीवर विचार केला तर ते कळणार नाही. दोन वर्षांपूर्वी सौत्रांतिक मार्क्सवादावर कॉ. शरद पाटलांचे अभ्यास शिबीर ठेवले होते. तब्येत बरी नसतानाही दोन दिवा त्यांनी युवा भारतीय कार्यकर्त्यांसमोर दिग्नाग स्कुल ऑफ थॉट, धम्मकीर्तिचे दर्शनातील योगदान यावर विस्तृत मांडणी केली. ती करत असताना जाणीव आणि नेणीवच्या पातळीवर मार्क्सवाद एकप्रवाही झाल्यामुळे नेमके कोणते पेच निर्माण होतात याची मांडणी त्यांनी केली. सहाव्या इंद्रियांपर्यंत थांबणाऱ्या या एक प्रवाही मार्क्सवादाच्या पुढे जाण्यासाठी, सातव्या, आठव्या इंद्रियांपर्यंत विकसित होण्यासाठी दिग्नागच्या dialectical logic ची मांडणी करताना दिसतात. कॉ. शरद पाटील असं मांडतात की बुद्ध आणि बुद्धाच्या नंतरच दिग्नाग ते धम्मकिर्ती पर्यंतचा वैचारिक प्रवास याने formal logic च्या पल्याड जाऊन dialectical logic मार्क्सच्या आधी स्थापित केले. ही महत्वाची गोष्ट आहे. खिस्तोफर कॉडवेल ज्याने मार्क्सवादी सिद्धांकनामध्ये नेणिवेच्या प्रश्न उपस्थिक केला होता त्याचा दाखल देत कॉ. शरद पाटलांचं असं म्हणणं राहील आहे की मार्क्स हा नेणिवेबद्दल बोलत नाही. ही मार्क्सवादाचे मर्यादा आहे असं त्यांचं मत राहील आहे कि मार्क्स हा नेणिवेबद्दल बोलत नाही. हि मार्क्सवादाचे मर्यादा आहे असं त्यांचं मत राहिलं आहे. याबाबत मतभेद राहिले आहेत. माझ्या सारख्यांना पडलेला प्रश्न असा की  मार्क्स जेव्हा परात्मभाव चा सिध्दांत (Theory of Alienation) मांडतो तेव्हा तो केवळ जाणिवेच्या पातळीवर कसा काय उभा राहू शकतो? भांडवलशाहीने नेणिवेच्या पातळीवर मानवाला जे प्रथम केलं आहे त्या परात्मतेचं विश्लेषण जेव्हा तो करतो तेव्हा मार्क्स कुठेतरी नेणिवेची चर्चा करतो. असं आपण बघू शकत नाही का ?

जाणीव आणि नेणीव यांच परस्पर नातं समजून घेत दिग्नाग ने स्थापित केलेल्या dialectical logic च्या माध्यमातून विचार करण्याची गरज ते स्पष्ट करतात. मला असं वाटतं की शरद पाटील हे प्राच्य विद्येमध्ये जरी गुंतले असले तरी ते वर्तमानाच्या प्रश्नांच्या अनुषंगाने ते तिकडे जातात. वर्तमानातील पारशांमधे आपला परात्मभाव एवढे टोकाला गेला असेल, आपल्या नात्याचं स्वरूप बदलत चाललं असेल, तर मग मनाच्या कोपऱ्यामध्ये जाणिवेच्या पातळीवर, नेणिवेच्या पातळीवर नेमका खेळ कसा चालतो याचा आपण तपस केला पाहिजे अशा भूमिकेमध्ये कॉ. शरद पाटील आपल्याला जाताना दिसतात. हे कॉ. शरद पाटील यांचं भारताच्या केवळ इतिहास संशोधनासंदर्भातच नाही तर सामाजजक समजून घेण्याच्या दृशीतकोणाबद्दलच ऐतिहासिक योगदान आहे. या निमित्ताने दुसरी एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे जाती अंत – वर्ग अनंताचा लढा केवळ घोषणा देऊन होणार नाही. तर त्याचा एवढं विस्ताराने पसारा मांडत विचार करावा लागणार आहे. अगदी निऋतीच्या चौपाटासारखं !

शेवटी शरद पाटलांची जात्यंताक भांडवली लोकशाही क्रांतीची जी मांडणी आहे त्याबद्दल युवा भारत संघटनेचे मतभेद राहिले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जी ऐतिहासिक चूक केली तीच चूक शरद पाटील करताना दिसतात. सौत्रांतिक मार्क्सवादाचे मांडणी करत असताना परिवर्तनाची अपेक्षा ते जातयं भांडवली लोकशाही क्रांतीमध्ये करताना दिसतात. २०व्या शतकाने भांडवली लोकशाही क्रांतीचा सर्व पैस आवरून घेतला आहे. भांडवलाचा बदलेल चरित्र, भांडवशीचा जगण्यातील सर्व स्तरांवर झालेला विस्तार याने नवीन गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. त्यामुळे समाजवादाच्या दिशेने जाण्यासाठी भांडवली लोकशाही क्रांतीची पूर्ती होते ही पूर्व अट आहे या गोष्टीला कितपत अर्थ आहे असा प्रश्न पडतो.

ज्यांची परिवर्तनाशी असलेली बांधिलकी हीच प्रमुख असते त्यांना वेळ पडली तर स्वतः मांडलेले विचार देखील नाकारायला कमीपणा वाटत नाही. मार्क्सवात-फुले-आंबेडकरवाद हे सिध्दांकन कॉ. शरद पाटील यांनी विकसित केले. ते याचे जनक. माफुआ ने महाराष्ट्र ढवळून निघाला. पण माफुआ वाद म्हणून विकसित होऊ शकत नाही अशा निष्कर्षाला आल्यावर कॉ. शरद पाटील तो माफुआ सोडून देण्याची हिंमत दाखवतात, त्याची कारण मीमांसा करतात आणि तस करताना ते नवा मार्गही चोखाळतात. आता हे आपल्या पटते ना पटते हा आपला प्रश्न आहे शरद पाटलांचा नाही. ख्रिस्ताला ज्याप्रमाणे क्रुसावर चढवून लोक ख्रिस्ती झाले त्याप्रमाणे शपांना क्रुसावर चढवून लोक माफुआ वादी झाले ! याची बोच कॉ. शरद पाटलांचा कायम वाटत राहिली. असं क्रुसावर चढवले जाणे हे ब्राम्हणी आहे याची आता तरी आपल्याला जाणीव झाली पाहिजे. कुठेतरी जाणीव नेणिवेच्या पातळीवर आपण चळवळीतील कार्यकर्ते ब्राह्मणवादाच्या जोखडात अडकून जातो आणि ते अडकल्यानंतर आपली देखील दृष्टी प्रुवग्रहदूषित होते आणि त्या पूर्वग्रहामुळे आपण कॉ. शरद पाटलांना समजून घेत नाही याची आता तरी आपल्याला जाणीव झाली पाहिजे. अशी जाणीव नसल्यामुळेच शपांवर शारिरीक हल्ले झाले, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले.

वर्तमानाच्या संदर्भात कॉ. शरद पाटलांना नव्याने समजून घेत नवा समाज घडवण्याचा संघर्ष पुढे नेने हीच कॉ. शरद पाटलांना खरी आदरांजली ठरेल.

कॉ. शशी सोनावणे

One comment

Leave a Reply