मार्क्स काय म्हणाला ? – दीपक बोरगावे

मार्क्स काय म्हणाला ?

(कार्ल मार्क्स यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त)

 

एकदा कविता मार्क्सच्या अभ्यास खोलीत शिरली.

मार्क्स खोलीत एकटाच होता

तो होता लिहण्यात मग्न

त्याचं लक्षचं नव्हतं कवितेकडे.

 

आपला गळा खाकरत

तिने लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला

पण काही उपयोग झाला नाही.

 

मनाचा हिय्या करून

शेवटी ती अक्षरशः ओरडीलच

कार्ल …..कार्ल …

 

मार्क्सने आपल्या जाड्या भिंगातून कवितेकडे पाहिले

त्याने विचारले, काय पाहिजे ?

 

काही नाही

सहजच आले होते,

मी कविता आहे.

 

असं म्हटल्यावर, मार्क्सने आपला पेन खाली ठेवला.

 

कुठून आलीस ? मार्क्सने विचारलं.

 

इंडियातून, कविता म्हणाली.

 

मार्क्स थोडा बावचळला;

इतक्या लांबून कशी काय ?

असं वाटलं असावं त्याला कदाचित.

 

काय काय लिहतेस ?

आय मीन, कसल्या कविता लिहतेस ?

 

कविता थोडी लाजलीच

मार्क्सने आपल्याला हा प्रश्न विचारावा म्हणजे…

 

आपल्या पापण्या मिटून ती म्हणाली,

काही नाही, असंच काहीतरी !

 

म्हणजे ?

 

अहो, गाणी, निसर्ग, श्रावणातला घन निळा वगैरे…

 

श्रावण म्हणजे काय ?

 

अहो, तो एक ऋतू आहे

आय मीन, निसर्गच म्हणा की !

 

निसर्ग ? ठीकच आहे मग.

 

माणसांबद्दल लिहते की नाही ?

शेताबद्दल, कारखान्याबद्दल ?

आणि स्वयंपाक घर ?

तिथे तर असशीलच तू रोज ?

 

चर्चमध्ये जातेस ?

धर्मगुरू, धर्मग्रंथ, शाळा, फळा, खडू

हे माहित असेलच ?

 

समाज व्यवस्था, धर्मव्यवस्था, उत्पादन व्यवस्था, उत्पादन साधनांची मालकी ?

 

म्हणजे, आपल्या जगण्याच्या भौतिकतेबद्दल म्हणतोय मी.

 

आपलं जगणं हे ह्या भौतिकतेमध्ये घडत असतं

काही समजते का ?

 

कवितेचा मख्ख चेहरा पाहून

मार्क्स म्हणाला,

दे सोडून, समजत नसेल तर !

 

हे सांगताना

तो हसला स्वतःशीच

गालातल्या गालात,

त्याच्या भारदार दाढीमुळे

ते कवितेला समजलं नसावं.

 

तो पुढे म्हणाला,

बरोबर आहे तुझं…

तुला तिकडे वळूच दिलेलं नाही,

तेव्हा तुझा तरी काय दोष ?

 

तुझे आईवडील काय करतात ?

त्याने विचारले.

 

शेतात काम.

मीही करते मदत त्याना…

 

शाळेला जाते की नाही ?

 

अहो, मी महाविद्यालयात शिकते.

कविता आत्मविश्वासाने म्हणाली.

 

इतकी लहान दिसते ही हाडाची जुडी

महाविद्यालयात असेल का ही ?

मार्क्सला हे पटलेच नसावे.

 

मग मार्क्स म्हणाला,

खूपच मोठी आहेस मग तू

प्रोढ झाली आहेस, किमान वयाने तरी !

 

म्हणजे,

तुला विचार करता येतो

एवढी निश्चितच मोठी झाली आहेस तू.

 

प्रथमतः

म्हणून,

विचार कसे निर्माण होतात

याचा विचार कर !

 

ते ब-याचदा लादले जातात आपल्यावर,

कुणाच्या तरी सोयीसाठी,

कुणाच्या तरी फायद्यासाठी, स्वार्थासाठी,

दुसऱ्यांवर राज्य करण्यासाठी,

म्हणजे वर्चस्वासाठी,

तेही दुसऱ्यांचे श्रम चोरून !

 

कवितेला फारसं समजलं नाही;

तिने मान हलवली

नि पुन्हा मार्क्सच्या डोळ्यात पाहू लागली….

 

मार्क्स पुढे म्हणाला,

तुझे प्राध्यापक काय म्हणतात,

ते ऐक,

विचार प्रश्न त्यांना

टाक भंडावून त्यांना.

 

ऐक,

रस्त्यावरील माणूस

त्याच्या बोटांमधून घरंगळणारे कौशल्याचे संगीत.

 

ऐक,

कारखान्याचे भोंगे

त्यातला आकांत आणि आक्रोश.

 

ऐक शेतातील मातीला,

ती काहीतरी म्हणत असते नेहमीच,

तिच्या आतील आकसलेले विभ्रम.

 

ऐक,

चर्चच्या घंटानादात

तुझ्या शेजारच्या मुलीचे रक्त

प्राचीन काळापासून वाहणारे.

 

विचार प्रश्न देवांना नि दगडांना

धर्मगुरूंना आणि धर्मग्रंथांना

काय म्हणणं आहे त्यांचं ?

 

तसं बघितलं तर, ते काहीच म्हणत नसतात;

त्यांच्या वतीने त्यांचे रखवालदारच बोलत असतात.

लिहित असतात पोथ्या पुराणे

नि काहीबाही

हे तुझ्या लक्षात यायला पाहिजे.

 

पाणी वाहते उताराकडे

खड्ड्याकडे

साचले तर तिचा प्रवाह बंद होतो.

 

जिथे कमतरता तिथे भरून राहते पाणी

आणि मग मुरते मातीच्या पोटात

पुन्हा उगवण्यासाठी

सर्वाच्या उत्थापनासाठी

हिरव्या आकाशाची आस घेऊन

भुकेल्या आतड्यांच्या तहानेसाठी.

पाणी हा समतेचा विचार आहे

विषमतेचा व्यवहार पाणी करत नाही.

हे निसर्गाचं म्हणतोय मी

माणसाचं नव्हे;

हे लक्षात घे तू !

याशिवाय,

ऐक,

तुझ्या आईचा गोंधळ तिच्या मनातला

तिची धुसपूस तिचं कोंडलेपण

तिचा अडकणारा श्वास.

ऐक,

तुझ्या मित्राचा आक्रोश

पहा त्याच्या दारिद्र्यातील फाटके दरवाजे

ऐक त्याचे करूण गाणे.

ऐक,

तुझ्या मैत्रिणीची कैफियत

महाविद्यालयाच्या जिन्यावरुन उतरताना.

ऐक,

तिचा पितृसत्तेचा सापळा

तिच्या कपाळावर उमटलेली हिंसा

तिच्या कातडीवरची नक्षी

खरचटलेली

तिच्यावर टेहळणारी नजरकैद नि पहारा

आणि वाच तिच्या वह्यांमधल्या कविता

पाठीमागील पानांवर गळणा-या.

ऐक,

काळजीपूर्वक तुझ्या वडलांचे डोळे

खोलवर पापण्यांच्या आंत.

ऐक,

तिथे दडलेली नि जळणारी एक आग

एक हिंसा

म्हणजे सापडेल तुला

तुझ्या आईचं दु:ख

नि तिच्या यातनेचा कल्लोळ.

ऐकू येईल मग

तुझ्या बोटांना एक वेगळेच महाकाव्य

होईल स्पर्श मग

तुला ख-या काव्याचा.

मार्क्स बोलतच राहिला-

बोलतच राहिला…

डोळे झाकून स्वतःचे

तिथं उभं राहणं देखील

कवितेला अवघडल्यासारखे वाटू लागलं

ती संपूर्णतः गोंधळून गेली.

याचा काय संबंध कवितेशी ?

ती स्वतःशीच पुटपुटली

घराकडे परतली गोंधळ घेऊन मनात.

शेतात, कारखान्यात, स्वयंपाकघरात,

महाविद्यालयात, देवळात, परसात, धर्मग्रंथात

भटकत राहिली

शोधत स्वतःला नि दुसऱ्यांना

पण तिला काहीच सापडले नाही.

तिच्या मैत्रिणीला तिने विचारलं

तुला श्रावण कसा काय आवडत नाही गं ?

 

तिचा मैत्रीण म्हणाली,

कुठला श्रावण ?

तो श्रावण बाळ?

म्हणजे शाळेत वाचलेली गोष्ट ?

अगं वेडे, तो श्रावण नव्हे

श्रावण मासी हर्ष मानसी… तो श्रावण !

कुठाय तो ?

तिच्या मैत्रिणीने विचारले.

श्रावणात,

म्हणजे किती सुंदर आणि प्रसन्न वाटते !

तुला कसं काय हे दिसत नाही ?

मला महाविद्यालयाची फी भरायला पैसे नाहीत

घरात रोज कटकटी.

शेजारचा मुलगा मला रोज त्रास देतो.

रोजचे आहेत खाण्याचे वांधे.

नोकरी कर, असं वडील म्हणताहेत.

आईवर सतत संशय

तिचा कुणाशी तरी संबंध आहे

कामाच्या ठिकाणी म्हणून.

रोजच हाणामा-या !

परवा आईने एका बाईला पकडून आणले घरात

आणि वडलांना विचारले,

हिचा तुमचा काय संबंध ?

वडील हादरलेच प्रथमतः

नंतर आईलाच बदडून काढले मरेस्तोवर.

ह्या अशा रोजच्या भानगडीत मला श्रावण कुठे दिसणार ?

कवितेने विचार केला.

विचार निर्माण होतात कसे?

याचाच प्रथमतः विचार करायला हवा.

दीपक बोरगावे

कवी,अनुवादक व समीक्षक, इंग्रजी विषयाचे निवृत्त प्राध्यापक,

भाषांतर विद्येत पीएचडी

 

One comment

Leave a Reply