तेव्हाही जात असतो एक बळी पुरुषसत्तेचा… – श्रद्धा देसाई

जेव्हा बलात्कार होतो तिच्यावर,
त्यातही दिवसाढवळ्या,
त्यातही लहानगीवर,
त्यातही वर्दळीत,
त्यातही नातलगाकडून,
आणि त्यातही क्रुर पाशवी असेल,
मग तर पेटून उठतात तुझ्या धमन्या,
बेभान होतं सणसणीत शिवी हासडतोस “भडव्या”.
तेव्हाही जन्माला येत असतो आणखी एक बलात्कारी .

जेव्हा पुरुषसत्तेचा बळी जाते ती,
त्यातही हुंड्यापायी,
त्यातही नवविवाहित, त्यातही माता,
त्यातही लहान लेकरांची,
अन त्यातही जिवंत जाळली असेल,
मग तर उसळून उठत तुझं मस्तक.
पण कधीतरी बायकोच्या चार दिवसातही,
“जगावेगळं तुलाच होतं नाही”;
म्हणत जेवणाची फर्माईश करतोस,

जेव्हा सावित्रीला नाकारलं जातं,
त्यातही स्रीवादात,
त्यातही स्त्रियांकडून,
त्यातही परजातीतल्याकडून,
त्यातही विरोधकांकडून,
मग तर खवळतोस तू संपूर्णच.
पण कधीतरी लग्न लावून दिलेल्या बहिणीने हिस्सा मागताच मात्र ,
नात्याचाच ताळेबंद लावतोस लगोलग,
तेव्हाही नाकारलं जात असतं अस्तित्व एका सावित्रीच.

जेव्हा पैशापायी विकली जाते स्त्री,
त्यातही कोवळी,
त्यातही सुंदर,
आणि त्यातही एकुलती एक,
अन त्यातही आईबापाकडून,
मग तर हडबडतोस तू पुरता.
पण कधीतरी पोटच्या पोरीने परजातीतला मुलगा आणताच,

पैशाने मढवत देतोस कुण्या दुसऱ्याच्या गळ्यात;
तेव्हाही विकली जात असते स्त्री पैशापायी.

जेव्हा सरशी करत तिचं सौंदर्य,
त्यातही तुझ्या कर्तृत्वावर,
त्यातही सिलेक्शनमध्ये,
त्यातही प्रमोशनमध्ये,
अन त्यातही लग्नाच्या बाजारातसुद्धा,
मग तर उखडतोस तू या व्यवस्थेवर .
पण कधीतरी उद्विग्न असताना मात्र,
बायकोच्या स्पर्शाऐवजी रिझवतोस मन कुणा मादक तरुणी जवळ,
तेव्हाही बोलीत वरचढ ठरत असतं स्त्रीच सौंदर्य.

सहज मारली जात असते स्त्री गर्भातच,
त्यातही बापाच्या हट्टापायी,
त्यातही चार पैशात,
त्यातही स्त्री डॉक्टर कडून,
अन त्यातही आईच्या मनाविरुद्ध,
मग तर विव्हळतोस तू आकांताने.
पण कधीतरी तुझ्याच पोटच्या लेकाला साडीच नेसावी वाटते; म्हणून त्याच्याच जीवावर उठतो तू,
तेव्हाही सहजच मारली जात असते एक स्त्री.

असाच जन्माला येत असतो बलात्कारी,
अशीच पैशापायी विकली जात असते स्त्री,
असंच नाकारलं जात असत सावित्रीला,
असंच कर्तृत्वापेक्षा वरचढ ठरत असत सौंदर्य,
असाच मारला जात असतो गर्भ स्त्रीचा,
तेव्हाही, जेव्हा कधीतरी स्त्रीच म्हणत असते,

“बाईच्या आयुष्याला भोग भोगावेच लागतात”

श्रद्धा देसाई

9607052334

टाटा सामाजिक विज्ञान संस्था,मुंबई

One comment

Leave a Reply