कॉ. शरद पाटील : दुःख आणि शोषणमुक्तीचा असंतोषी मार्गस्थ

मी बारावीत असतांना पहिल्यांदा कॉ. शरद पाटील नावाच्या म्हाताऱ्या माणसाचे भाषण ऐकले होते. मी आणि नितीन वाव्हळे (हल्ली, एस. एफ. आय. चे विद्यार्थी नेते) त्यावेळी औरंगाबाद शहरात सार्वजनिक कार्यक्रम असले की, आम्ही बहुतेकवेळा हजरच असायचो. मुख्य कारण म्हणजे अशा कार्यक्रमात खायला चांगले असते आणि दुय्यम कारण म्हणजे डोक्याला खूराक मिळतो. ते कॉ. आहेत तेंव्हा ऐकले होते पण जास्त कळत नव्हते. त्यामुळे हा म्हातारा जाम भारी आहेच प्रथमदर्शनी मत बनले कारण त्यांच्या वयाचे अनेक म्हातारे रिकामे असतात असाच माझा अनुभव होता. त्यांना कोणीच गंभीरपणे ऐकत नाही असेही पाहिले होते हा पाटिल बाबा थोडा वेगळाच वाटला. पदवीला असतांना त्यांचे पुस्तके वाचली. डोक्याला ताण देवून वाचली तेंव्हा कुठे काही गोष्टी समजू लागल्या. आजही त्यांच्यावर दुर्बोध लिखाण करण्याचा, त्यांना संस्कृत खरंच येत होते का? असे अनेक आरोप केले जातात पण, हे आरोप करणारे लोक एकतर शपा वाचत नाहीत किंवा सोईचे वाचतात किंवा या लोकांचा तेवढा आवाका च नसतो. असे अनेक लोक मला माहिती आहेत. शपांच्या लिखाणाच्या काही मर्यादा निश्चीतपणे आहे. त्याची कठोर चिकित्सा झाली पाहिजेच. त्यासाठी शपा माझ्याशी डिबेट करा असे नेहमी ओरडत असायचे. आरोप करणाऱ्यांनी प्राच्यविद्या पंडीत मेहंदळे आणि बौद्ध आणि पाली अभ्यासक, तत्वज्ञ प्रदीप गोखले या लोकांनी त्यांना प्रतिक्रिया आणि प्रतिसाद दिला यावरूनच शपांचे वैचारिक मोठेपण सिद्ध होते. कोणाही लिंबूटिंबूला मेहंदळे आणि गोखले प्रतिसाद देणार नाहीत. जयंत लेले यांच्यासारख्या समाजशास्त्रज्ञ आणि विद्युत भागवत यांच्यासारख्या स्त्रीवादी अभ्यासक यांची शरद पाटलांनी त्यांच्या ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ मध्ये दखल घेतली होती. त्यामुळे दोघेही ‘आमच्या पुस्तकाची आणि लेखाची दखल त्यांनी घेतली होती.’ असे माझ्याजवळ मोकळेपणाने बोलले आहेत. शरद पाटील महत्वाची मांडणी ऐतिहसिक मांडणी करत होते असे जयंत लेले म्हटले आहेत तर पाटलांना स्त्रीप्रश्नाचे गांभीर्य जास्त समजत असलामुळे त्यांचे महत्व जास्त आहे. अन्यथा बायकांचा प्रश्न म्हणून स्त्रीवादाला बाजूला टाकले जाते असेही विद्युत भागवत म्हणाल्या. सुहास पळशीकर मास्तरने त्यांच्या “सामाजिक शास्त्रातील वैचारिक गारठा” या लेखातसुद्धा शपांच्या नवीन वैचारिक मांडणीची दखल घेतली आहे आणि शपांना कसे जाणीवपूर्वक अनुल्लेखाने दुर्लक्षित केले. याविषयी खंत सुद्धा व्यक्त केली आहे. शपा जीवंत असातांना सदानंद मोरे आणि आ. ह. साळुंखे यांनी काही मतभेद व्यक्त केले होते. पण, त्याही लोकांनी म्हणावी तशी दखल घेतलेली दिसत नाही. कारण शपा हे तसे ‘वैचारिक आणि अभ्यासाकीय क्षेत्रा’च्या बाहेरचे होते. पूर्णवेळ कार्यकर्ता अनेक अभावग्रस्त जीवनात ज्ञानयज्ञ प्रज्वलित करत होता जसा कुणबी शेतीवर अनेक प्रयोग करतो तसेच शपा ज्ञान व्यवहारात अनेक नवीन प्रयोग करत होते. हे त्यांच्या अनुयायांना पटले नाही तर बाकीच्यांविषयी आपण काय बोलणार? नेहमी प्रवाहित राहण्यासाठी मोठी किंमत द्यावी लागते आणि पाटलांनी ती मोजली आहे. अनेकजण डबके बनून जगतात त्यामुळे एकाच गोष्टीला ते आयुष्यभरासाठी चिटकलेले असतात आणि त्याचेच समर्थन करत असतात. पण पाटलांच्या लिखाणात ह्याचा अर्थ लावताना मी चुकलो, हे त्यावेळी कळले नव्हते, त्यावेळी मी बरोबर नव्हतो असे अनेक वाक्य असतात. पण, लोकांना फक्त त्यांच्या लिखणा तील “मी” दिसतो आणि बाकी दिसत नाही. शपा गेल्यानंतर मार्क्सवादी, मार्क्स-फुले-आंबेडकरवादी, सौतांत्रीक मार्क्सवादी, फुले आंबेडकरवादी, ब्राह्मणेतर, बहुजनवादी अशा अनेक गटात असणारे लोक ‘आम्हीच त्यांचे खरे वारसदार आहोत’ असा दावा करत असतात. या गटांमधील नवीन मुले तर सोशल मीडियावर नुसता गलिच्छ गोंधळ आणि भाषिक व्यवहार करतात. या सगळ्या प्रक्रियेला शपांच्या विचारांचे विकृतीकरण किंवा अपहरण असेच मला म्हणावे वाटते. कॉ. शशी सोनावणे यांनी सकल मासिकामध्ये “कॉ. शरद पाटील: एक स्कूल ऑफ थॉट” नावाचा खूपच महत्त्वाचा लेख लिहिला आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने मराठा क्रांती मोर्च्याच्या विरोधात लेखन करत असतांना शरद पाटील हे कसे सामंती मराठा होते असाही शोध लावला होता. पण, संबंधित व्यक्तीचा इतिहास पाहिला तर वायफळ बोलण्यात सदरील व्यक्ती प्रसिद्धच आहे. त्याच व्यक्तीने नंतरच्या काळात शरद पाटील माझे गुरु आहेत असेही म्हटल्याचे आठवते. मराठ्यांच्या सामंती व्यवहारावर हल्लाबोल करणारे शपा शेतकरी जाती जातीअंतकवादी झाल्याशिवाय जातीव्यवस्था अंताला जाणार नाही हे सुद्धा सांगायला विसरले नाहीत. त्यासाठी सातत्याने जातीच्या अर्थ-राजकारणाची मांडणी झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. एक मात्र नक्की आहे की, शपाला डिबेट करणारे लोक भेटले असते तर खूपच नवीन वैचारिक निर्मिती झाली असती. त्याला महाराष्ट्र आणि भारत आता मुकला आहे. राया दूनांशकाया, पिटर हुडीस यांचे लिखाण पाटलांनी वाचले होते की, नाही हे मला माहिती नाही. वाचले असावे. या लोकांच्याच तोडीचे काम कॉ. पाटील भारतात करत होते. शेवटी, शपा मानवाच्या दुःख आणि शोषण मुक्तीच्या लढ्यातील महत्तम सेंद्रिय बुद्धिजीवी होते. ग्रामचीने आपल्या शिक्षणावरील भाष्यात म्हटले आहे की, “पारंपरिक शिक्षण आणि ज्ञान व्यवहार करणाऱ्या समूहातील लोकांना ज्ञान निर्मिती करतांना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही कारण त्यांच्याकडे ती पार्श्वभूमी, सामाजिक सवय आणि शिस्त असते पण, ज्ञानाची आणि शिक्षणाची ज्यांचा संबंध नसतो त्या समूहातील लोकांना खूपच मेहनत घ्यावी लागते. त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते.” या समूहातील लोकांना सहजासहजी विद्वान, अभ्यासक, बुद्धिजीवी म्हणून मान्यता मिळत नाही. शरद पाटलांचा हाच अनुभव आहे. हल्ली, कॉग्नेटीव (मानसिक) क्रांतीची झपाट्याने जगभर चर्चा चालू आहे. मेंदूविज्ञानात आणि मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात अनेक संशोधन होतांना दिसत. या संदर्भात सुद्धा शपा काहीतरी म्हणू इच्छित होते. मानसशास्तज्ञ यशपाल जोगदंड ( मानसशास्त्र आणि मेंदूविज्ञानात स्कॉटलंड येथे पीएचडी) म्हणतात की, ‘दिग्नागाच्या आधारे कॉ. शरद पाटील काहीतरी महत्वाचे म्हणू पाहत होते. ते मलाही अजून समजले नाही पण काहीतरी महत्वाचे त्यांना म्हणायचे होते.’ जात ही भौतिक आहे त्याचप्रमाणे मानसिकसुद्धा आहे असे आपणास जातीच्या वर्तन व्यवहारातून स्पष्ट झाले आहे त्यामुळे जातीअंताचे मानसशास्त्र गरजेचे आहे असे म्हणणारा शपांचा विचार महत्वाचा आहे. त्यामुळेच महत्तम बौद्ध दार्शनिक दिग्नाग हा त्यांचा मुकुटमणी झाला होता. समाजवादी मनाच्या अभावी विसाव्या शतकातील समाजवादी क्रांत्याचे प्रयोग ढासळले असे बुडाचे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे. त्यामुळे ‘समाजवादी मन’ घडवण्यासाठी त्यांचा जाणीव-नेणीवेच्या तर्कशास्त्राचा आग्रह होता. पण, प्रत्यक्षात मानसशास्त्रज्ञ याविषयी अज्ञानी आहेत पण, पाटलांचे स्वयंघोषित अनुयायी आम्हाला ‘जाणीव-नेणीवेचे तर्कशास्त्र कळल्याचा आव आणतात आणि एकमेकांच्या नेणीवेतील जात शोधतात. त्यामुळे पाटलांच्या महत्वाच्या प्रतिपादनाचा धुरळा उडतो. यशपाल जोगदंड आणि शुश्रुत जाधव या मानसशास्त्रज्ञानी ‘जातीच्या मानसशास्त्र’ संदर्भात केलेली मांडणी वाचून पाटलांच्या विवेचनाचे महत्व कळते आणि त्यासोबतच, कॉ. पाटलांच्या डोक्यात ‘समाजवादी मना’च्या निमित्ताने काहीतरी भन्नाट कल्पना होती असेच म्हणावे वाटते. ज्ञान व्यवहार लोकतांत्रिक करणे आणि दुःख आणि शोषण मुक्तीचे तत्वज्ञान विकसित करत माणसाचे मन समाजवादी करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे म्हणून आपण सगळयांनी असंतोष बाळगला पाहिजे. तो प्रयत्न सातत्याने करत राहणे हीच कॉ. शरद पाटिल नावाच्या मला पहिल्याच भेटीत प्रभावीत करणाऱ्या म्हाताऱ्याला आदरांजली असेल. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना मंगलकामना टीप- कॉ. शरद पाटलाची चिरफाड झाली पाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे देवकुमार अहिरे इतिहास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे  

One comment

Leave a Reply